‘‘एचआयव्हीसोबत जगणारे आणि त्याची जोखीम असलेले लोक म्हणजे पॉझिटिव्ह माणसं, वेश्या, तृतीयपंथी आणि समिलगी व्यक्ती! यांच्याबद्दल समाजात असलेली भीती, गरसमज दूर करावा म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणून प्रसारमाध्यमांसोबत काम करण्याचा ‘प्रकल्प’ आला. त्यात मी काम करू लागले आणि दिसलं ते ‘ग्रे’ जग. ते अनुभव मला बदलवून गेले.’’ सांगताहेत  गेली आठ वर्षे ‘सीफार’च्या माध्यमातून ‘जन वकालत’ करणाऱ्या कार्यकर्त्यां संयोगिता ढमढेरे.
एचआयव्ही आणि एड्स, त्यासोबत जगणारी माणसं आणि या आजाराची जोखीम असलेली माणसं यांचा माझ्या आयुष्यात शिरकाव झाला तो योगायोगानेच. या विषयाची मला फार माहिती होती किंवा या माणसांबद्दल विशेष आस्था होती अशातला भाग नव्हता. १५ र्वष पत्रकारिता केल्यानंतर काहीतरी बदल हवा म्हणून केलेल्या प्रयत्नांत ‘माध्यम वकालत’ हा मध्यममार्ग सापडला. माध्यम, त्यांच्यात होत असलेल्या बदलांचा अभ्यास करायचा, त्यात ‘एचआयव्ही’च्या प्रश्नाला मिळू शकेल अशी जागा आणि त्यासाठी मदत करू शकतील असे पत्रकार शोधणं, त्यांना या विषयाबाबत संवेदनशील करणं हे माझं काम. मी सीफार (सेंटर फॉर अ‍ॅडव्होकसी अ‍ॅन्ड रिसर्च) बरोबर काम करायला सुरुवात केली.
‘एचआयव्ही’सोबत जगणारे आणि त्याची जोखीम असलेले लोक म्हणजे पॉझिटिव्ह माणसं, वेश्या, तृतीयपंथी आणि समिलगी व्यक्ती! यांच्याबद्दल समाजात असलेली भीती, गरसमज दूर करावा. त्यामुळे या लोकांना समाजात मिळणारी तुच्छ वागणूक कमी होईल, याचा परिणाम म्हणून त्यांचा आत्मविश्वास वाढेल त्यामुळे ते ‘एचआयव्ही’ पासून स्वत:चा बचाव करतील आणि स्वत:पासून इतरांना होणारा प्रसारही रोखतील हा यामागचा विचार. ‘एचआयव्ही’चा प्रसार आटोक्यात आणावा म्हणून या वर्गात निरोधचा वापर, नियमित आरोग्य तपासणी आणि ‘एचआयव्ही’ची चाचणी केली जाणं ही कामं नियमित होत होती. ते बदलत होते, पण बदलत नव्हता समाज! समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन! म्हणून समाजाची मानसिकता बदलण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणून प्रसारमाध्यमांसोबत काम करण्याचा ‘प्रकल्प’ आला. त्यात मी काम करू लागले.
आजपर्यंत शेतकरी, धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त, दलित, महिला आणि मुलं याविषयी लिहिलं होतं. त्यासाठी त्या त्या समस्या समजून घेतल्या होत्या. आतापर्यंत काम केलं ते प्रश्न होते स्पष्ट आणि समजायला सोपे. ती माणसं होती पीडित, वंचित आणि गरीब. त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराची बाजू पूर्ण काळीकुट्ट आणि या माणसांची बाजू लखलखीत शुभ्र. पण ‘एचआयव्ही’, त्यासोबत जगणारे आणि त्याची जोखीम असलेले लोक हा सगळाच ‘ग्रे’ एरिआ! त्यांच्याबद्दल लिहिलं, बोललं, दाखवलं जात होतं ते अतिरंजित, कीव करणारं नाहीतर काहीच नाही. त्यांचं मत, त्यांची बाजू हे तर विचारातच घेतलं गेलं नाही. समाजात, माध्यमात त्यांना सहज झुकतं माप नाही. या समुदायाची कायदेशीर, नतिक आणि नसíगक सगळीच गोची! त्यात या सगळयांचा संबंध प्रत्यक्ष ‘सेक्स’शी, त्यातून मिळणाऱ्या पशाशी! सेक्स आणि पसा त्यांची वेगळी लंगिकता हे ‘ग्रे’ रंगातल्या अनेकविध रंगीबेरंगी, चकचकीत, झगमगीत शेडस्ची भर टाकणारं. समिलगी लोकांची तर ओळखच आहे सतरंगी. समाजात त्यांच्याबद्दल प्रचलित आहेत ते फक्त पूर्वग्रह आणि गरसमज.  त्यांच्याबद्दल,त्यांच्यासंबंधी बोलणंही अवघड होतं अशा स्थितीत त्यांच्या बाजूने आपण बोलण्यापेक्षा किंवा त्यांनीच स्वत:ची वकिली करणं संयुक्तिक होतं आणि त्यांना माध्यमांसमोर बोलतं करणं हे मोठं आव्हान होतं.
२००५ साली मोजके लोक आपली ‘पॉझिटिव्ह’ ओळख सांगणारे. कलंक आणि भेदभावाशी निकराने लढणारे नाहीतर हताशपणे शरण गेलेले, त्यांच्याशी मोकळा संवाद साधणं दुर्मीळ. पहिल्या भेटीत बोलत्या झाल्या त्या स्त्रिया. सर्वसाधारणपणे पहिल्याच गरोदरपणात कळलेला ‘एचआयव्ही.’ त्याच्याशी जमवून घेत असतानाच झालेलं बाळ, त्याला ‘एचआयव्ही’ झाला नसेल ना याची खात्री करून घेण्यासाठी १८ महिन्यांचा जीवघेणा प्रतीक्षेचा काळ घालवणाऱ्या, घरात कुणाची बरोबर जेवण्याची तयारी नाही तर कुणाला पाणी, साबण वेगळं ठेवण्याची सक्ती, कशाबशा माहेरी तग धरून राहिलेल्या महिलांचे डोळे बोलता बोलताना  झरायला लागायचे, आवाज कापायचा. तेव्हा त्यांना सावरावं की स्वत:ला काय करावं समजायचं नाही. पण त्या थोडय़ाच वेळात सावरायच्या. ‘पॉझिटिव्ह नेटवर्क’चं काम पुढे कसं न्यायचं, जिल्ह्य़ापर्यंत कसं  पोहोचवायचं याची चर्चा करू लागायच्या. एकेकीचा झगडा पाहताना, ऐकताना गलबलून यायचं. आता उठून हिच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे, असं वाटायचं. त्यातच एका मीटिंगला गेले. एका खोलीत एकाच वस्तीतल्या १५ ते २० महिला. सगळ्याजणी ‘एचआयव्ही’ पॉझिटिव्ह! तोवर ‘एचआयव्ही’ एवढा पसरलाय याची जाणीव नव्हती. मात्र तिथे ना रडणं ना नराश्य. सगळ्या हसत खेळत बोलत होत्या, धमाल करत होत्या. मनात आलं समाजाने त्यांना सहज स्वीकारलं तर या महिलांचं समाजातही हेच चित्र दिसेल. घर, मुलं, नवरा अन् सासर एक ना अनेक व्याप, पण या बायांच्या चेहऱ्यावर त्याचा मागमूस नाही. ‘एचआयव्ही’ त्यांना इष्टापत्ती वाटत होती. त्यानिमित्ताने त्या घराबाहेर पडत होत्या, एकत्र येत होत्या, एकमेकींच्या आधाराने पाय घट्ट रोवून उभ्या राहात होत्या. त्या दर महिन्याच्या मीटिंगची वाट पाहायच्या. कारण तिथे त्यांची मनं मोकळी होत होती, जुळत होती, आपल्यासाठी,आपली काळजी करणारं कोणीतरी आहे ही भावना त्या पहिल्यांच अनुभवत होत्या. म्हणून संस्थेतले सर, मॅडम त्यांच्यासाठी सर्वस्व होते. सकाळी  कार्यशाळेत ‘एचआयव्ही’ची कहाणी सांगताना रडू आवरू न शकलेल्या या महिला संध्याकाळी शेकोटीजवळ ‘कोंबडी पळाली’वर नाचू लागल्या की त्यांना थांबवणं अवघड. अशाच क्षणांना या महिला स्वत:चे प्रश्न सोडवू शकतील हा विश्वास वाढला.  
त्यापकी अनेकजणींनी एरवी सहज शक्य झालं नसतं असं पाऊल उचललं, आपल्याच पसंतीचा जोडीदार निवडला. त्यानंतर योग्य औषधोपचार घेऊन मुलालाही जन्म दिला. जाणीवपूर्वक निर्णय घेऊन ‘पॉझिटिव्ह’ संसारात त्या रमल्या आहेत. काही मुलांना घेऊन बाहेर पडल्या आहेत, संस्थेचाही हात सोडून स्वतंत्र आयुष्य जगताहेत. त्यापकी काहींची लढाई तर अंगावर काटा आणणारी. एक बाई आठवतेय,  तिची पॉझिटिव्ह मुलगी, स्वतवर होणारा अन्याय, भेदभाव ती सहन करत होती. पण आपल्या चिमुकल्या मुलीलाही गाव त्रास द्यायला लागल्यावर ती पेटून उठली. आख्खा गाव तिच्या विरोधात उभा. गावाचं नाव खराब केलं म्हणून तिच्यावर रागावलेला, आरोपावर आरोप, पण बाई डगमगली नाही. तटून राहिली. तीन-चार र्वष झाली तरी गाव द्रवलं नाही, बाहेरच्या जगातूनही  मदतीला कोणी धावून आलं नाही. अजूनही परिस्थिती पालटण्याची वाट पाहात तिचा एकाकी लढा चालू आहे.
स्त्रियांचा उत्साह दांडगा होता. तितकीच खरी होती त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची आत्मीयता. असे झटून काम करणारे अनेक जण भेटले. रेल्वे पुलाखाली कुठे कचरापेटीजवळ, अनेक महिन्यांत अंघोळ न केलेले, जखमा झालेले शिरेवाटे अमली पदार्थ घेणारे लोक. त्यांच्या जखमांवर, तिथे जाऊन ड्रेसिंग करणारी, आंघोळीला, ऑफिसला घेऊन येणारी, सीिरज बदलून देणारी मुंबईतली संगीता असो की मणिपूरची नीना. माझ्यापुरत्या त्या माझ्या फ्लोरेन्स नाइंटेंगल आणि मदर तेरेसाच होत्या. एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींना नीट औषधपाणी न मिळण्याच्या काळात कोणत्याही प्रकल्पाशिवाय काही मिशनरी, ‘सहारा’ संस्था या व्यक्तींची काळजी घेत होत्या. घरच्यांना नको असलेल्या मोठय़ांना, मुलांना सहज सामावून घेत होत्या. शेवटच्या स्टेजला असलेल्या या लोकांना पाहिलं की जेवढं निराश वाटायचं तेवढंच अत्यंत शांतपणे, प्रेमाने त्यांची सेवा करणारे लोक, स्वच्छ प्रसन्न परिसर पाहिला की  उभारी यायची.
एकदम अनोळखी असलेलं जग रोजच्या जगण्याचा भाग झालं, त्यांच्यासोबत उठणं, बसणं, जेवण, प्रवास, एकत्र राहणं सोपं होतं. एके दिवशी ‘मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे आणि ..’ असं वाक्य माझ्या तोंडून निघालं त्या दिवशी मी खरंच त्यांच्यातली झाले .. त्यांचा जगण्याचा संघर्ष आणि छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून ते घेत असलेला आनंद पाहिला की आपल्या कथित सामान्य जगातले हेवेदावे, स्पर्धा याचं काहीच वाटेनासं होतं.
 समिलगी जगाबाबत मी बऱ्यापकी अनभिज्ञ आणि पूर्वग्रहही होते. मात्र एका आंतरराष्ट्रीय परिषदेत एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि ‘गे’ असलेले दक्षिण अफ्रिकेतील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एडविन कमॅरॉन यांचं भाषण ऐकलं आणि याबद्दल होते नव्हते ते पूर्वग्रह नष्ट झाले आणि माझ्या कामाची वाट आणखी स्पष्ट झाली.
एचआयव्हीची लागण आणि एड्सने मृत्यू झालेल्यांच्या संख्येची दरसाल १ डिसेंबरला कोष्टक मांडणाऱ्या माध्यमांसमोर मला दिसलेला मानवी चेहरा आणण्याचं काम केलं. जिल्हा, तालुक्यातून प्रथमच ‘पॉझिटिव्ह’ स्त्रिया, सेक्स वर्कर्स बोलू लागल्या. आपली कहाणी सांगू लागल्या. पूर्वी अशी थेट संपर्कात न आलेली ही माणसं पाहून पत्रकारही चक्रावले, त्यांच्याबद्दल लिहिण्यासाठी सरसावले. एचआयव्ही हा आजार असला तरी हा प्रश्न विकासाच्या इतर प्रश्नांइतकाच आíथक, सामाजिक आणि राजकीय आहे हे त्यांच्या लिखाणातून येऊ लागलं. सेक्स वर्कर असो की  एचआयव्हीची लागण झालेली स्त्री, प्रत्येकीची कहाणी बाईचं दुय्यमत्व, तिला नसलेलं निर्णयस्वातंत्र्य, नसलेली रोजगाराची संधी, गरिबी इथेच जाऊन पोहोचत होती.
काही बातम्या आज वर्तमानपत्रात येत नाहीत, पण रेल्वेखाली झालेला एखादा अपघाती मृत्यू हा एचआयव्हीमुळे झालेला आहे हे त्या व्यक्तीच्या सहकाऱ्यांना माहीत असतं किंवा साताऱ्याजवळच्या गावात एचआयव्ही पॉझिटिव्ह बाईबरोबर भेदभाव होतोय, तिला काही मदत करता यईल का, असा फोन येतोच आहे.. म्हणजे अजून बरंच काम शिल्लक आहे.
संपर्क – सीफार (सेंटर फॉर अ‍ॅडव्होकसी अ‍ॅन्ड रिसर्च) २-३ प्रमोदिनी, २९ इशदान सोसायची, आनंदनगर, ऑफ पौंड रोड, कोथरुड, पुणे ३८ दूरध्वनी – ६५२२१०७५
 इ-मेल – mesanyogita@hotmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीफार (सेंटर फॉर अ‍ॅडव्होकसी अ‍ॅन्ड रिसर्च) ही संस्था एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती आणि एचआयव्हीचा धोका असलेले सर्व समुदाय यांचे अधिकार आणि न्याय मागण्यांसाठी काम करते. वंचित घटकांच्या प्रश्नांना प्रसार माध्यमांमध्ये स्थान निर्माण करणे त्यासाठी जनवकालत हे सीफारचे प्रमुख उदीष्ट आहे.

सीफार (सेंटर फॉर अ‍ॅडव्होकसी अ‍ॅन्ड रिसर्च) ही संस्था एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती आणि एचआयव्हीचा धोका असलेले सर्व समुदाय यांचे अधिकार आणि न्याय मागण्यांसाठी काम करते. वंचित घटकांच्या प्रश्नांना प्रसार माध्यमांमध्ये स्थान निर्माण करणे त्यासाठी जनवकालत हे सीफारचे प्रमुख उदीष्ट आहे.