आज तीस वर्षांनी मागे वळून पाहताना अनेक गोष्टी सहज वाटतात. काही भावनांची तीव्रता साहजिकपणे कमी झालेली आहे. जुन्या सगळय़ा घटनांकडे तटस्थपणे पाहता येतं, पण या घटना काही वर्षांपूर्वी घडताना ते सगळं फार महत्त्वाचंच होतं. अर्थात आजही ते महत्त्वाचं आहेच. त्या आठवणींमागील तरंग मात्र बदलतात.
या क्षेत्राकडे वळण्यामागच्या प्रेरणा कुठल्या, याचा विचार केला तर अनेक घटना, व्यक्ती, काही पुस्तकं खूप काही क्षणार्धात नजरेसमोरून तरळून गेली. एकाच क्षणी ते ठरतं असंही नाही. या दृष्टीने विचार केला तर मला आठवतात ती लहानपणापासून वाचलेली पुस्तकं. ज्या गावात- वर्धा- मी लहानाची मोठी झाली, ते त्या वेळी ना शहर ना खेडं अशा स्वरूपाचं छोटं गाव. आमच्या घराच्या आजूबाजूला फारशी वस्ती नव्हती. साधारण दोन एकराच्या परिसरात राहतं घर आणि भोवताली शेती. मागच्या बाजूला दुसऱ्यांची शेती व पुढे रस्त्याच्या पलीकडे जिल्हा परिषदेची शाळा. त्यामुळे सहज जाता येईल असा शेजार म्हणजे आमच्याच सालगडय़ाचं घर. त्यांची मुलगी माझ्यापेक्षा एक वर्षांने मोठी. घरात आम्ही तिघं भावंडं. त्यामुळे आम्ही आणि ती मुलं अशीच आमची सोबत होती. घरात भरपूर पुस्तकं आणि सगळय़ांना वाचनाची आवड. घरात वर्तमानपत्र यायचं व सर्वानी ते वाचायचं अशीही पद्धत. शिवाय आजोबांना डोळय़ांचा त्रास व वाचनाची आवड, त्यामुळे त्यांना वाचून दाखवण्याच्या निमित्ताने वाचन व्हायचंच. या वाचनात त्या वेळी जास्त समजले ते साने गुरुजी. ‘खेडय़ाकडे चला’ या पुस्तकाचा परिणाम जास्त टिकला. त्यातून ‘आपण काही तरी करायचं’ हे वाटणं पक्कं होत गेलं. यासोबतच माझ्या आईला केवळ घरात राहण्यापेक्षा आपण काहीतरी करावंसं वाटायचं. या विचारांचाही परिणाम नकळतपणे मनावर होताच. याशिवाय माझी बालमत्रीण (वर म्हटलेली सालगडय़ांची मुलगी) बाळंतपणात गेली, हे कॉलेजच्या पहिल्या वर्षांला असताना समजल्यावर, या वाटण्याला आणखी आकार आला. बीजं रुजत होती.
याचदरम्यान वर्धा येथे राष्ट्र सेवा दल व नंतर छात्र युवा संघर्ष वाहिनीची ओळख झाली. नागपूरमध्ये छात्र युवा संघर्ष वाहिनीतर्फे खासगी क्लासेसविरोधी आंदोलन, मुलींवरील िहसाचाराच्या काही घटना व आठवडय़ाचा नियमित अभ्यासवर्ग अशा अनेक उपक्रमांतून सामाजिक प्रश्नांचे विविध पैलू समजू लागली. यासोबत घरातून विरोध पत्करून (विशेषत: घरातील पुरुषांचा विरोध व स्त्रियांचा पािठबा) सुरू असलेले एम. एस. डब्लू.चे शिक्षण व त्यातील विषयांची अधिकाधिक स्पष्टता संघर्ष वाहिनीच्या चर्चामधून जास्त चांगल्या पद्धतीने होत गेली. संघर्ष वाहिनीत जाण्यासाठी घरातून होणाऱ्या विरोधामुळे काही वेळा गोंधळ व्हायचा. याच निमित्ताने डॉ. सतीश गोगुलवार यांच्याशी ओळख झाली. त्याचे पर्यवसान पुढे विवाहामध्ये झाले. हे स्वत: ठरवलेलं तरीही अॅरेज्ड लग्न. दोन्हीकडून थोडा विरोध व थोडं समर्थन दोन्हीही होतं. यानंतर वडसा-देसाईगंज येथे मोहन हिराबाई हिरालाल यांच्यासोबत रोजगार हमी मजूर संघटनेच्या कामात सहभागी होण्याचं आमचं सुरुवातीलाच ठरलं. त्यानुसार १९८३च्या फेब्रुवारीमध्ये आम्ही दोघेही ‘बांधकाम व लाकूड कामगार संघटने’च्या कार्यालयात राहायला आलो. कार्यालयातलीच एक खोली आम्हाला मिळाली. स्वयंपाकघर मात्र सगळ्यांचं मिळून एकच होतं.
आता वाटतं, बांधकाम व लाकूड कामगार संघटना ही माझी लोकांसोबतच्या कामाची शाळाच होती. एम.एस.डब्ल्यू.च्या अभ्यासक्रमात कितीही थिअरी व फिल्ड वर्कमध्ये काम झालेलं असलं तरी, लोकांसोबतच्या कामाचे विविध पदर इथेच मला समजले. सुखदेवबाबू उईके, मोहन हिराबाई हिरालाल, सतीश, मदन वघारे, मदनलाल मेश्राम व गावातल्या इतर अनेक कार्यकर्त्यांकडून मला खूप काही शिकता आलं. ज्योती केळकर व नागेश हाटकर त्या वेळी बरेचदा इकडे यायचे. स्त्रियांसोबत शिबिरे, महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेविषयी माहिती मला त्यांच्याकडून झाली. लोकांसमोर बोलणं हेही त्या वेळी माझ्यासाठी एक धाडसाचं काम होतं. वध्रेत जमीनदाराची मुलगी म्हणून पाहिलेल्या गावापेक्षा गावाचं एक वेगळं चित्र इथे मला पाहायला मिळालं, समजलं. मजुरांचे प्रश्न तर समजलेच, पण मुख्य म्हणजे त्यांची ताकद समजली. रोजगार हमी मजूर संघटनेच्या वतीने महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. १९८४ मध्ये या मेळाव्यासाठी रोजगार हमीच्या कामावर १०० ते १५० रुपये मजुरी असताना काम बंद ठेवून एक हजार महिला व ५०० पुरुष प्रत्येकी दोन-पाच रुपये वर्गणी देऊन उपस्थित होते. या वेळी महिला मंडळे बहुतेक पाटलीण महिलांचीच होती. संघटनेने ठरवून त्यांना बोलावले, मात्र त्यांच्याकडून वर्गणी घेतली नव्हती. फक्त ज्या गावात (विसोरा, ता. वडसा) मेळावा होता तिथल्या एका पाटलांची जागा घेतली होती. सुमनताई बंग, कुमुदताई पावडे, नलिनीताई सोमकुंवर या मेळाव्याला हजर होत्या. या परिसरातली जवळपास सर्व महिला मंडळे या मेळाव्याला उपस्थित होती. इतरांच्या मदतीने असला तरी मी आयोजित केलेला असा हा पहिलाच कार्यक्रम होता. असाच एक मेळावा कुरखेडा तालुक्यातील बेलगाव हय़ा गावातही झाला. त्या वर्षीच आम्ही वडसा सोडून कुरखेडा येथे राहायला आलो होतो. या मेळाव्यांनी मला एक आत्मविश्वास दिला. तसेच या दोन्ही परिसरात एक वातावरण तयार झाले. कुरखेडा परिसरात अंगणवाडीच्या माध्यमाने प्रत्येक गावात एक महिला मंडळ स्थापन झालेले होते. जिथे जिथे दलित वस्ती असेल, तिथे तिथे दलित महिलांचे वेगळे महिला मंडळ असायचेच. त्यामुळे कुरखेडा तालुक्यात सुरुवातीपासून संपर्क असणारी बांधकाम व लाकूड कामगार संघटना असली तरी मुख्यत: महिला मंडळं ही संपर्काची माध्यमं ठरली. हय़ा मेळाव्यानंतर महिला मंडळे अधेमधे एकत्र येण्याची सुरुवात झाली. याआधी सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाची सुरुवातही झालेली होती. एकाने दुसऱ्या महिला मंडळाला माहिती देत हे लोण पसरू लागलं.
१९८६ मध्ये कुरखेडा तालुक्यातील गुरनोली हय़ा गावी महिला मंडळांचे प्रशिक्षण शिबीर झालं. ह्य़ा शिबिरातून महिला मंडळांचा दारूबंदी कार्यक्रम पुढे आला. साधारणत: सगळीकडेच महिला मंडळ झालं की, दारूबंदीचा मुद्दा पुढे यायचाच. या शिबिरात एका वयस्कर अध्यक्षबाईंनी ‘दारू बंद झाली तर आमची अर्धी दु:खं दूर होतील,’ असे विचार मांडले. सगळय़ांकडूनच आलेला टोकदार प्रश्न म्हणजे जे सरकार आम्हाला २ ऑक्टोबरला दारूबंदी करायला सांगते तेच सरकार दारूचे परवाने देते असं कसं? हय़ा सतत भेटीतूनच कुरखेडय़ात पहिला दारूविरोधी मोर्चा काढायचे ठरले. पत्रकं नाहीत, लाऊडस्पीकर नाही, फार मोठा प्रचार नाही तरीही २०० महिलांचा निघालेला हा कुरखेडय़ाच्या इतिहासातला फक्त स्त्रियांचा पहिलाच मोर्चा. दारूबंदीचा ठराव करणारी अनेक गावं आता राज्यात आहेत, ही कौतुकाची बाब आहे. मात्र २७ वर्षांपूर्वी हे विचार मांडणं व कृतीत आणणं, हे फार अवघड काम होतं, असं वाटतं. पुरोगामित्वाचे हे सगळे कार्यक्रम लोकांकडील वर्गणीतूनच व्हायचे, कारण संस्थेकडे त्या वेळी कुठलेही प्रकल्प नव्हते. सतीशचा दवाखाना व आम्हाला मिळणाऱ्या काही फेलोशिप्स हाच त्या वेळी आमचा आíथक आधार होता. दवाखाना हा तसा फारसा मिळकतीचा भाग नव्हता, कारण इंजेक्शनचा विनाकारण वापर करायचा नाही व जास्त फी घ्यायची नाही हे आधीच ठरलेलं असल्यामुळे ही सेवाच होती.
अर्थात गावातील लोक सतीशच्या कामाविषयी किती प्रामाणिक होते, त्याचे खूप चांगले अनुभव आले. येथे उल्लेख करावासा वाटतो, एक छत्तीसगढी कंवर आदिवासी बाई कोंबडीचं पिल्लू घेऊन आली आणि ‘ये रख ले’ म्हणाली. हे काय ते मला समजेना. थोडी विचारपूस केल्यावर समजलं, दोन-तीन महिन्यांपूर्वी तिनं औषध नेलं होतं पण पसे देता आले नाहीत म्हणून हे पिल्लू देऊन पसे फेडण्याचा तिचा विचार होता. आदिवासी समाजातला हा प्रामाणिकपणा अनेक ठिकाणी प्रत्ययाला आला. महिला गटांना व्यवसायासाठी शासनाची योजना घेताना एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथे शासकीय कर्मचाऱ्यांनी आजारी बकऱ्या घेऊन दिल्यामुळे दुसऱ्या-तिसऱ्याच दिवशीच बकऱ्या मेल्या. विम्याची सगळी प्रक्रिया करूनही पसे मिळाले नाहीत. संस्थेकडे या योजनेचे काम आल्यावर चौकशी केली तेव्हा लक्षात आले की, पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी योजना राबवताना अनेक ठिकाणी स्वत:चा व्यक्तिगत फायदा करून घेण्यासाठी गटाची फसवणूक केली आहे. काही बाबी पुढे आणून लोकांना न्याय मिळवता आला तरी काही बाबी पुराव्याअभावी करता आल्या नाहीत. या गटाला योजनेचा पूर्ण पसा दिला गेलेला नव्हताच म्हणून त्यांनी उर्वरित रक्कम उचलून काही कामं करावं यासाठी मी स्वत: भेटायला गेले तेव्हा उत्तर मिळालं, ‘याच्या आधी कधी पसे डुबवल्याचा आम्हाला डाग नाही. हे पहिल्यांदाच आमच्या नावाने पसे लागले.’ त्यांची काहीही चूक नसतानाही त्यांनी केवळ त्यांच्या नावाने ती रक्कम आहे म्हणून ही जबाबदारी घेतली. खरं तर ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी यात चुका केलेल्या होत्या. त्यांनी किंवा त्यांच्यासारख्या इतरांना यातून खूप शिकण्यासारखं आहे.
१९८९-९० च्या दरम्यान महिला बचत गटांच्या कार्यक्रमाची ओळख झाली. या निमित्ताने लोक र्कज कसं व कुठून घेतात इत्यादींविषयी माहिती घेण्याची सुरुवात झाली. त्यातून पुढे आले की लोक साधारणत: मुदलाच्या सव्वा ते दीडपटीने आंध्रातून येणारे सावकार, काही स्थानिक सावकार यांच्याकडून र्कज घेत असत. या सावकारांना कंगाल बँक, मद्रासी इ. लोकांनी दिलेली प्रचलित नावं होती. स्त्रियांसोबतच्या गप्पांतून याचे चक्रावून टाकणारे हिशेब समजले. एवढंच नाही तर र्कज घेणाऱ्यांना त्यांच्या बोलण्यामुळे मानहानीही सहन करावी लागायची. क्वचित काही ठिकाणी यासाठी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या कहाण्याही समजल्या. या सगळय़ामुळे स्वयंसहायता गटाचे काम करण्याचे पक्केहोत गेले. स्वयंसहायता गटांविषयी इतर राज्यात चालणारे काम स्पार्क व नंतर स्वयंशिक्षण प्रयोग हय़ा संस्थांच्या सहकार्याने पाहता आले. १९८५ ते १९९० च्या दरम्यान आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये स्वयंसहायता गटाची चळवळ मूळ धरू लागली होती. हय़ा प्रत्यक्ष भेटीतून समूहामुळे स्त्रियांचा वाढलेला आत्मविश्वास, आíथक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी उभे केलेले विविध कार्यक्रम पाहून स्वयंसहायता गटाच्या माध्यमाने काम करण्याचे निश्चित होत गेले. १९९० पासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
इतर कुठल्याही पूर्वीच्या कार्यक्रमापेक्षा या कार्यक्रमाला अधिक प्रतिसाद मिळू लागला. कारण ठळक दिसणारा फायदा होता. विशेषत: कुटुंबातील लोक तयार होते, कारण त्यांचाही यात काही ना काही फायदा होताच. स्त्रियांसाठी आíथक मुद्दाच केवळ महत्त्वाचा नव्हता तर गट म्हणून एकत्र येता येणं, कृती करण्यासाठी सोपं जातं. अशा सोयी जास्त लक्षात घेतल्या गेल्या असं वाटतं. १९९४ पासून या प्रयत्नांना जास्त वेग आला. आíथक फायदा म्हणून स्त्रिया ओढल्या जात असल्या तरी पशाच्या व्यवहारांबाबत कमी अनुभव असल्यामुळे व फसवले जाण्याचा धोका असल्याने एकाएकी कामात सामील व्हायला स्त्रिया पुढे येण्यास घाबरायच्या. गावात एक-दोन गट थोडे व्यवस्थित उभे राहिले की त्या गावातली गटांची संख्या वाढायला लागायची. सुरुवातीला थोडय़ा शिक्षित पुरुष मंडळींना या गटाविषयी फार विश्वास नव्हता. मात्र ही पद्धती आदिवासी व ग्रामीण भागात मूळ असणाऱ्यांना नवीन नव्हती. गाव फंड, पसा फंड अशा नावाने असे प्रकार पूर्वीही गावात उभे झालेले होते. मात्र या कार्यक्रमात अनेक ठिकाणी फसवणूक झाल्याचे अनुभवही अनेकांचे होते. अनेक गावांत दलितांमध्ये पोर्णिमेला थोडा निधी जमा करून तो गावात कर्ज देण्यासाठी उपयोगात आणल्याची उदाहरणं होती. या फंडातून गावात बुद्ध विहारांचं बांधकाम झालं होतं. पण बहुतांश ठिकाणी स्त्रियांनी पसा गोळा करायचा व पुरुषांनी तो घरासाठी असेल किंवा गावासाठी वापरायचा असं चित्र दिसतं. स्वयंसहायता गटात गट छोटा असणं, पसा त्यामुळे मर्यादित व त्याचा सततचा वापर यामुळे काही प्रमाणात त्यावर नियंत्रण ठेवणं महिलांना शक्य झालं. सुरुवातीच्या काळात बऱ्याच स्त्रिया शिकलेल्या नसल्यामुळे किंवा आíथक व्यवहाराचा अनुभव नसल्यामुळे काही ठिकाणी व्यवहार पुरुषांच्या हातात गेले व त्यात फसवणूक झाली. विशेषत: जे गट सरकारी योजनांना जोडले गेले त्या ठिकाणी हे अनुभव जास्त आले. काही ठिकाणी पुरुषांनी चांगली मदत केल्याचीही उदाहरणं आहेत, नाही असं नाही. पण स्त्रियांनी स्वतंत्रपणे उभे राहणं, त्यांचा आत्मविश्वास वाढणं व काही नव्या कार्यक्रमांची उभारणी त्यातून होणं असे उद्देश समोर ठेवून आम्ही महिलांनी स्वतंत्रपणे व्यवहार हाताळण्याला पािठबा देण्याचं ठरविलं. बँकांमध्ये जाणं, व्यवहार करणं, बँक मॅनेजरने खुर्चीत बसवून कर्जव्यवहार करायला देणं अशा गोष्टी दलित, आदिवासी किंवा गावपाडय़ात कमी मानाच्या समजल्या जाणाऱ्या जाती-जमातींतील तेही स्त्रियांसाठी खूपच मोठी उपलब्धता होती.
संस्थेअंतर्गत स्वयंसहायता गटाची सुरुवात झाली ती कोसा उत्पादक महिला गटापासून. हा गट म्हणजे गावातील पाटील मंडळींकडे भांडी घासणारा वर्ग यात बाया किंवा पुरुषसुद्धा असतात. त्यामुळे या गटांना बँक कर्ज घेऊन गावाच्या कार्यक्रमात त्यांनी खुर्चीवर बसणं ही वर्ग व्यवस्थेतल्या छोटय़ाशा मात्र आमूलाग्र बदलाची सुरुवात होती. बचत गटाच्या माध्यमातून ही एक प्रकारे स्त्रियांची आíथक साक्षरताही आहे. या कामासाठी आमचे एक मार्गदर्शक मित्र दत्ता सावळे यांच्या वैचारिक व तात्त्विक पािठब्याचा आम्हाला खूपच फायदा झाला. पशाचा उपयोग वंचितांच्या सर्वागीण सक्षमीकरणासाठी कसा करता येईल याविषयी आमच्या पूर्ण गटाला विचार करायला दत्ताभाऊंनी मदत केली. त्यामुळे सुरुवातीपासूनच हा केवळ आíथक कार्यक्रम नाही व फक्त स्त्रियांचा नाही तर वंचितांच्या विकासाचा एक मार्ग आहे. ही समज असणारे कार्यकत्रे ही संस्थेची ठेव व वेगळी ओळख निर्माण होऊ शकली.
यामुळेच स्वयंसहायता गटाच्या माध्यमाने स्त्रीवादी विचार देणारे उपक्रम ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’मधून पुढे आले. महिला दिन, स्त्री िहसाविरोधी पंधरवडा यांसारखे कार्यक्रम गावपातळीपर्यंत पोहचू शकले. यासोबतच गटांची संघउभारणी झाल्यावर, त्यात अभ्यास गट व त्यातून स्त्रियांचा जात-पंचायतसारख्या निर्णयप्रक्रियांमध्ये सहभाग आणणं, स्त्रियांवरील िहसेविषयी गावपातळीवर ठोस पावलं उचलणं, आíथक व्यवहार सक्षमतेने करणं, आरोग्यसेवांवर व शाळांवर देखरेख करणं यांसारख्या बाबीही रुजल्या आहेत. किशोरी गट व शिक्षणविषयक कार्यक्रम यामुळे हा मुद्दा केवळ प्रौढ स्त्रियांचाच न राहता किशोरवयीन मुले-मुली त्यात आलेली आहेत. काही ठिकाणी गावसंघटनेच्या माध्यमाने असे प्रयत्न पुढे गेल्यामुळे एकसंध समाज या प्रक्रियेशी जोडला गेला आहे. अनेक कार्यकत्रेही या प्रक्रियेतून घडले, स्वतंत्र उभे राहिले व घडत आहेत. लोकांसाठी हे त्यांचं काम म्हणून ओळख आहे.
संस्थेच्या कामासोबत उभ्या झालेल्या लोकसंघटना (क्रांतिज्योती महिला संघटना, जनकल्याण अपंग जनसंघटन, महिला बचत गट परिसर संघ) स्वतंत्रपणे उभ्या होत आहेत. याशिवाय संस्था महाराष्ट्रात उभारलेल्या विविध प्रक्रियांशी (विदर्भस्तरीय आंतरराष्ट्रीय महिला दिन शतकोत्सव संघटना, महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद) जोडून त्यात महत्त्वाची भूमिका करत आहे.
आम्ही दोघांनी ही सुरुवात केलेली असली व सुरुवातीला घरातून विरोध झाला तरी आज ‘घरं’ आमच्यासोबत आहेत. चढउतार आले, येत आहेत व येत राहणार. सर्वाच्या सोबतीमुळे त्यावर मात करण्याची शक्ती आहे. आज जे काही आहे ते सगळय़ांमुळे आहे एवढंच म्हणावसं वाटतं.
पत्ता-शुभदा देशमुख, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’
ता. कुरखेडा, जि. गडचिरोली-४४१ २०९.
दूरध्वनी-०७१३९-२४५४७१
ई-मेल-arogyasathi@rediffmail.com
arogyasathi@gmail.com
वेबसाइट-www.arogyasathi.org
वाटचाल सर्वागीण प्रगतीसाठी
पत्रकं नाहीत, लाऊडस्पीकर नाही, फार मोठा प्रचार नाही तरीही २०० महिलांचा निघालेला हा कुरखेडय़ाच्या इतिहासातला फक्त स्त्रियांचा पहिलाच मोर्चा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-12-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social worker shubhada deshmukh