फेब्रुवारी १९६२मध्ये मी सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल सोशल वर्कर म्हणून पाऊल ठेवलं आणि तीच माझी कर्मभूमी ठरली. रुग्णालयाच्या आजवरच्या २८ वर्षांच्या कारकिर्दीत मी व माझ्या सहकाऱ्यांनी अनेक अभिनव प्रकल्प सुरू केले. काही अभिनव उपचारपद्धतीही वापरल्या. सायन हॉस्पिटलच्या बराकीतील ‘पॅराप्लेजिक फाऊंडेशन’, ऐरोली येथील अपंग मुलांसाठीचा ‘संजीवन दीप’ प्रकल्प, वडाळ्यातील कर्णबधिरांची शाळा, तरुण कर्णबधिरांना एकत्र आणणारी ‘डेफ युथ फाऊंडेशन’, बाहेरगावाहून येणाऱ्या हृदयरोगाच्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना राहण्यासाठी ‘सुरजबा अतिथीगृह’ आणि विशेष मुलांसाठी बालविकास क्लिनिक या प्रकल्पांपैकी पॅराप्लेजिक फाऊंडेशनवर इथे विस्ताराने लिहायचं ठरवलंय.
कर्जतपासून मुंबईकडे येताना ‘सायन हॉस्पिटल’ हे पहिलं जनरल हॉस्पिटल असल्यामुळे अपघाताच्या बहुसंख्य केसेस इथेच आणल्या जात. काही दिवसांनी त्यातील अपंगांच्या केसेस मेडिकल सोशल वर्कर म्हणून माझ्याकडे पुनर्वसनासाठी पाठवल्या जात. त्या अपंगांमध्ये पॅराप्लेजिकांची (विकलांग-अतिविकलांग) संख्या तुलनेनं कमी असली तरी त्यांचं पुनर्वसन अवघड आहे हे प्रकर्षांनं, अनुभवानं जाणवत होतं.
मणक्यातून संवेदना वाहून नेणारे मज्जातंतू तुटले की त्याखालील भाग लुळा पडतो. स्नायू कमजोर होतात. शौच, लघवी यावर ताबा नसल्याने वारंवार इन्फेक्शन, जखमा हा जीवनाचा अविभाज्य भाग होतो. उपचारानंतर घरी जायचं (असल्यास) नाहीतर मग ट्रायसिकलवरच झोपायचं; अन् जखमा, हाप टेंपरेचर घेऊन पुन्हा भरती व्हायचं, हा नेहमीचा दु:खद कार्यक्रम चालू असतो.
तो माझ्या कामाचा सुरवातीचा काळ होता. कित्येकदा मजुरीसाठी मुंबईत आलेले मजूर कामावर अपघात होऊन विकलांग होत. असे मजूर मुंबईत इतर आठ-दहा गाववाल्यांबरोबर एका खोलीत राहत. परंतु अपघातानंतर त्या खोलीत राहणं शक्यच नसे. गावी परत पाठवणं म्हणजे तर मृत्यूच्या खाईत ढकलणंच ठरे. तिकडे ना दवाखाना, ना साधा डॉक्टर. एका बाजूनं विकलांग व्यक्तींच्या घराची ही स्थिती तर दुसऱ्या बाजूनं डॉक्टर ‘पेशंटला घरी पाठवा’ असा तगादा लावत. घरी म्हणजे कुठे! डॉक्टरांनी बाहेर काढलं, नातेवाइकांनी नाकारलं तर रुग्णानं अर्ध शरीर घेऊन कुठे जायचं? कोण घेणार ह्य़ांची जबाबदारी? काय आहे यांचं भविष्य?. मला चैन पडेना. सामाजिक कामाच्या जाणिवेतून मी सोशल वर्कचा कोर्स केला. समाजाला हव्या असलेल्या सुविधा समाजात नसतील तर अशी संस्था स्थापणं हे माझं कर्तव्यच आहे असं मला वाटलं.
माझे दोन्ही भाऊ दुर्दैवाने आम्हाला अकाली सोडून गेले. त्यांच्या नावाने सर्व प्रकारच्या अपंगांसाठी संस्था काढायचं मी व माझ्या पतीने ठरवलं. पण त्यांची दारुण अवस्था पाहून मग फक्त विकलांगांचं -अतिविकलांगांचं मनोबल वाढणारं आणि त्यांच्यात आपल्यालाही जगण्याचा हक्क आहे ही वृत्ती बाणवणारं पुनर्वसन केंद्र सुरू करावं असं निश्चित केलं.
माझी सहकारी (कै.) गीता शहा, के.ई. एम. हॉस्पिटलच्या सोशल वर्कर अश्रफ मच्छिवाला (ज्या आजही माझ्यासोबत आहेत), शशी सूद आणि कै. डॉ. बालानी (फिजिशियन) असा समविचारी ग्रुप जमला. १९६८ साली मी चॅरिटी कमिशनरकडे जाऊन ‘पॅराप्लेजिक फाऊंडेशन’ नावानं संस्था रजिस्टर्ड केली. काही वर्षांनंतर ‘क ूंल्ल, क ६्रल्ल’ हे ब्रीदवाक्य मी ठरवलं आणि त्यासाठी बोधचिन्हाचं डिझाइनही मीच बनवलं.’ व्हीलचेअरवर बसलेला विकलांग आणि त्याच्या डोक्यावरून उडणारं पांढरं पाखरू जे त्याच्या मजबूत, आनंदी मनाचं प्रतीक आहे, त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीवर मात करून आनंदी जीवन जगू शकतो असा त्या चिन्हाचा अर्थ आहे. त्या बोधचिन्हाचं कौतुक ऐकताना आजही मन सुखावतं.
सायन हॉस्पिटलच्या एका वॉर्डच्या कोपऱ्यात वर्कशॉप सुरू करून १९६९ साली फाऊंडेशनच्या पहिल्या उपक्रमाला प्रारंभ झाला. कौटुंबिक जबाबदाऱ्या व पूर्ण वेळ नोकरीमुळे १९९० पर्यंत फाऊंडेशनचं वर्कशॉप व वार्षिक क्रीडास्पर्धा चालू ठेवण्याइतपतच काम मी करू शकले. त्याच वर्षी मला हृदयविकाराचा झटका आला आणि मी हॉस्पिटलमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. फाऊंडेशनमध्ये मात्र मी रोज जात असे. आम्ही सर्वजण फाऊंडेशनसाठी जागा शोधत होतो, कारण त्याशिवाय या प्रकल्पाला जोर येणार नव्हता.
अखेर जिथे सुरुवात केली तिथेच वाढण्याची संधी मिळाली. सायन मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे पहिले डीन डॉ. व्ही. एन्. पानसे यांनी हॉस्पिटलच्या एका बराकीत काम करायला परवानगी दिली. त्यानंतरचे डीन डॉ. एस. व्ही. नाडकर्णी यांनी वॉर्डस सुरू करण्यासाठी अख्खी बरॅकच उपलब्ध करून दिली. डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या किंबहुना प्रत्येक डीनच्या पाठिंब्याशिवाय आम्ही हॉस्पिटलच्या ‘बराक टी वन’ मध्ये फाऊंडेशनचं अस्तित्व साकार करू शकलो नसतो.
१९९१मध्ये जागा मिळाली आणि फाऊंडेशनच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. या जागेत हव्या तशा सुधारणा करणं, डागडुजी करणं जरुरीचं होतं. त्यासाठी पैसा उभं करणं गरजेचं होतं. सायन हॉस्पिटलचे एक डोनर डाह्य़ाभाई शहा यांच्यामार्फत मी देणगीदारांशी संपर्क साधला. ते जिथे म्हणतील तिथे मी जात असे. अक्षरश: दोन महिन्यात आम्ही १४ लाख रुपये जमवले. २२-२३ वर्षांपूर्वी ही रक्कम मोठी होती. नूतनीकरणाचं काम सुरु केलं. सेंटर पूर्णत्वानं चालू झालं. हॉस्पिटलच्या सेवेनंतर पॅराप्लेजिक आमच्या पुनर्वसन विभागात येऊ लागले. बराकीचा अर्धा भाग ‘घराच्या अध्र्या वाटेवर’ या प्रकल्पासाठी ठेवला. (नवे नाव ‘स्वीकार’) त्यातील अध्र्या भागात पुढच्या बाजूला कसरत हॉल व उरलेल्या भागात पुरुष व महिलांसाठी एकूण २५ खाटा. मधल्या जागेत ऑफिस, मागच्या पडवीत जेवण बनवण्यासाठी जागा व उर्वरित भागात वर्कशॉप अशी रचना केली.
विकलांग भरती होतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खिन्नता असते. हळूहळू ते आणि त्यांचे नातेवाईक इथे इतके रुळतात की त्यांना हे आपलं घरच आहे असं वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास तसंच नियमित व्यायामानं सुधारलेली तब्येत हा बदल घडवून आणण्यासाठी आमच्या उपचार टीमने घेतलेल्या मेहनतीला मोल नाही. विशेषत: सुरवातीच्या काळात डॉ. नंदकिशोर लाड (आर्थोपेडिक सर्जन, ज्यांना आताच पद्मभूषण किताब मिळालाय) व व्ही. सी. जेकब (फिजिओथेरपिस्ट) यांनी दिलेलं योगदान शब्दातीत. आता हा वारसा डॉ. सरल डबीर पुढे नेतेय. ‘स्वीकार’मध्ये आतापर्यंत ५००च्या वर केसेस हाताळल्या गेल्या आहेत. विकलांग इथे ४ ते ६ महिने राहतात. व्हीलचेअर हेच आपले पाय हे सत्य स्वीकारतात आणि नव्याने आयुष्य सुरु करायला मनाला समर्थ बनवतात. निरोप घेताना त्यांच्या पत्नी मला म्हणतात, ‘फाऊंडेशन हे आमचं माहेर आहे आणि तुम्ही आई. तुमची आठवण आली की आम्ही इकडे येणार.’ मग मीही त्यांना ‘फोन करा, पत्र लिहा अन् हक्कानं या’ असं सांगते.
उपचारानंतर घरी गेलेले विकलांग ट्रायसिकलवरून वर्कशॉपमध्ये येत. पण लांबून येणं त्यांना त्रासदायक होई. घर्षणाने जखमा होत. त्यामुळे हजेरी नियमित नसे. यावर आम्ही दोन उपाय योजले. एका विकलांगाच्या पत्नींनाही काम दिलं. त्यामुळे त्यांची ट्रायसिकल ढकलायला मदत होई. ते वेळेवर येत आणि त्यांची कमाईदेखील होई. त्यांना उदबत्त्या वळणं, स्वेटर विणणं, मेडिंग वगैरे जे जमेल ते काम देत असू.
दुसरा उपाय म्हणजे ज्यांना राहायला योग्य जागा नाही, त्यांना हॉस्पिटलच्या अवतीभवती डोनर शोधून जागा (झोपडय़ा) मिळवून देणं. या झोपडय़ात भांडीकुंडी, कमोडची खुर्ची.. इ. व्यवस्था लावून देणं ओघानं आलंच. वर्कशॉप विभागाला आम्ही ‘श्रमसाफल्य’ हे नाव दिलंय. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश विकलांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांत आत्मविश्वास फुलवणं. सायन रुग्णालयाच्या वॉर्डच्या कोपऱ्यात वर्कशॉपचं बी रुजलं. १९९१पासून टी वन बराकीतील तीनचार खोल्यांतून फोफावलं आणि आज त्याचं एका बहरलेल्या वृक्षात रूपांतर झालंय.
कुठेही गेलं की मला वाटे, हे काम आमचे साथी करू शकतील.. त्यांची मिळकत कशी वाढेल? आज आमचे साथीदार सॅनिटरी नॅपकिन्स, फिनेल, लिक्विड सोप, उदबत्त्या आदी गोष्टी बनवतातच, शिवाय हस्तव्यवसायाच्या इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या सुंदर-सुंदर भेटवस्तू बनवतात की बघत राहावं. महापालिकेच्या जनरल रुग्णालय व प्रसूतिगृहात अपंगांचे २३ स्टॉल आहेत. आमचे विकलांग लोक त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स व फाइल्स या वस्तू ट्रायसिकलवर जाऊन पोहचवतात. त्याचप्रमाणे मोठय़ा हाऊसिंग सोसायटय़ा, बँका, काळा घोडय़ासारखी प्रदर्शने इथेही आम्ही स्टॉल ठेवतो. अशा वाटांमधून आम्हाला विकलांगांचं काम समाजापर्यंत पोहचवण्याचा पर्याय मिळतो.
एक वर्षी आम्ही वर्कशॉपच्या मागचं डम्पिंग ग्राऊंड स्वच्छ करून त्यावर क्रीडास्पर्धा घेण्याचं ठरवलं. कामगार लावून ते स्वच्छ करणं फाऊंडेशनला परवडणारं नव्हतं. आमच्या सोशल वर्क विभागाकडे महाविद्यालयातून एन्. एस. एस.ची मुलं येत. ती आनंदाने तयार झाली. या मुलांच्या बरोबरीने मीही तिथल्या कचऱ्याच्या टेकडय़ा उचलल्या. पुढे क्रीडास्पर्धाचे बक्षीस समारंभ आम्ही ह्य़ाच मैदानावर केले. एकदा समारंभाला मुंबई महापालिकेचे आयुक्त सदाशिव तिनईकर आले होते. नंतर त्यांनी एक पत्र पाठवलं. त्यात म्हटलं होतं, ‘पुनर्वसनाचं एवढं सुंदर काम महापालिकेच्या इतर रुग्णालयामध्येही सुरू व्हावं असं मला वाटतं.’ मनुष्यबळाअभावी त्यांची ही इच्छा मी पूर्ण करू शकले नाही, पण मनाला उभारी देणारं ते पत्र मी जपून ठेवलंय.
दर आठवडय़ाच्या या खेळाला आम्ही ‘जिगर’ हे नाव दिलंय. थ्रो बॉल खेळताना विकलांग व्यक्तींच्या चेहऱ्यावरील आनंद, आत्मविश्वास, तन्मयता आणि टीमवर्क बघितलं की भान हरपून जातं. साधारणपणे एक वर्ष स्थानिक स्तरावर तर दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर आम्ही स्पर्धा घेतो. आमच्या या प्रकल्पात गॉस्पी कपाडिया हिने प्रगतीचे रंग भरलेत. क्रीडास्पर्धा म्हणजे आमच्या बॅटरी चार्जर आहेत. विकलांग व्यक्तींचा मार्चपास (परेड) बघताना डोळे पाणवतात.
गटचर्चा हे व्यक्तिमत्त्व विकासाचं प्रभावी माध्यम आहे. पॅराप्लेजिक व त्यांचे नातेवाईक एकमेकांशी बोलून खूप शिकतात, वाढतात. गेल्या ४० वर्षांत पॅराप्लेजिकांच्या समस्यांवर, उपचारांवर, त्यांच्या क्षमतेवर मी अनेक तज्ज्ञांच्या मदतीने अभिनव चर्चासत्र, गटचर्चा पुढाकार घेऊन आयोजित केल्या. १९९० मध्ये मेडिकल सोशल वर्कस्ची राष्ट्रीय स्तरावरची बैठक घेतली. त्याचबरोबर योग, प्रार्थना हे मनोबल वाढवणारे उपक्रम आम्ही गेली चार दशकं विकलांगांसाठी घेत आहोत. मला वाटतं, ‘असे कार्यक्रम आयोजित करण्याचा उत्साहच मला सदैव तरुण ठेवत असावा.’
फाऊंडेशनमध्ये विकलांग व्यक्तींसाठी आम्ही किचन बांधलं खरं, पण त्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्याचं काय? यावेळी हसुमतीबेन आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि आमचा ‘अन्नपूर्णा प्रकल्प’ सुरू झाला. आज त्या हयात नाहीत, पण पल्लवी गांधीने त्यांची जागा भरून काढलीय. या प्रकल्पाची बसलेली घडी बघताना कधी कधी पूर्वीचे श्रमानं घरचं जेवण करून आणण्याचे दिवस आठवतात. तो आनंदही वेगळाच!
मनाला उभारी येण्यासाठी सहल हे एक उत्तम माध्यम आहे हे माहीत असूनही विकलांग व्यक्तींना सहलीला नेण्याची माझ्या मनाची तयारी होत नव्हती. पण साथींची जिद्द आणि आमचे अविरत मेहनत करणारे स्वयंसेवक व सफाई कामगार यांच्या जोरावर आम्ही शिरडी (३ वेळा), अजिंठा वेरूळ, शांतिवन (पनवेल), कोल्हापूरला जाऊन आलो. या सहलींमुळे व दरवर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे केवळ विकलांग व्यक्तींच नव्हे, तर त्यांची कुटुंबेही एकमेकांच्या जवळ आली.
विकलांगांच्या जीवनात आनंद फुलवण्याची शक्ती मला मिळाली, त्याचं उगमस्थान आईवडिलांनी व राष्ट्रसेवादलाने दिलेल्या संस्कारांमध्ये असावं. सेवादलाच्या कलापथकातून, श्रमदान शिबिरातून मी खेडोपाडी जात असे. त्यांच्याबरोबर काम करताना माझी जडणघडण होत गेली. माझे पती कै. मधुकर वर्दे यांनी विश्वास, स्वातंत्र्य व खंबीर पाठिंबा दिला. त्यांचं असणं माझ्यासाठी प्रकाशासारखं होतं. सासूबाईनी घरचा राबता आनंदानं सांभाळला. व्हीलचेअर बँक सुरू करताना पहिल्या व्हीलचेअरची देणगी सासऱ्यांनी दिली. माझी नणंद विजया खांबेटे यांनी त्यांचे पती द. पा. खांबेटे यांची त्यांच्यामागे बरीच पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यापोटी वेळोवेळी मिळणारं मानधन त्यांनी फाऊंडेशनला दिलं. माझ्या घरच्यांनी मला असं नििश्चत केलं म्हणूनच मिळालेल्या स्वातंत्र्याचा मी सकारात्मक उपयोग करू शकले.
आता फाऊंडेशनची एक मजबूत टीम बनलीय. नीना, पल्लवी, हेमा, शोभा, आरती, सुमन, कांचन, मंगला आणि कितीतरी जणी. आपल्यामागे हे सर्व कोण सांभाळणार ही चिंता नाही या जाणिवेने मन निश्चिंत होतं.
आज मी ८०च्या उंबरठय़ावर आहे. आताशा गोरेगावहून सायनपर्यंत रोज येणं जमत नाही. पण फाऊंडेशन माझा श्वास आहे. माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणात हे आगळंवेगळं नातं भिनलेलं आहे. डोक्यात दुसरे विचारच येत नाहीत. काही कामं मला खुणावतायत.. कोणताच आधार नसलेल्या वयोवृद्ध पॅराप्लेजिकांसाठी वृद्धाश्रम सुरू करायचाय.. ‘स्वीकार’ प्रकल्पातील केसेसच्या अनुभवांवर एक पुस्तक लिहायचंय. वयोमानानुसार शरीर बोलायला लागलंय, पण मन उत्साहाने उडय़ा मारतंय. ९ जानेवारी २०१० रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मी अध्यक्षपदाची सूत्रं खाली ठेवली, तेव्हा सर्वानी उभं राहून मानवंदना दिली. पुरस्कार यापेक्षा वेगळा असतो?
शेवटी दिल की बात.. एका फुलाची इच्छा काय असते? फूल फुलते तेव्हा त्याचा सुगंध पसरतो. काही फुलांचा गंध सुरेख असतो तर काहींचा रंग. आपण त्यावर भाळतो. पण फुलाची इच्छा असते त्याचे पराग सर्वत्र पसरावेत, बीज रुजावं आणि आपल्यासारखीच फुलं आपल्यामागे उमलत राहावी. माझी इच्छा याहून वेगळी कशी बरं असेल? ल्ल
शब्दांकन- संपदा वागळे
संपर्क- सुलभा वर्दे – पत्ता-पॅराप्लेजिक फाउंडेशन,
टी-१, लोकमान्य टिळक महापालिका सामान्य रुग्णालय, व्ही.पी.जी. शोरुमच्या पुढे, सायन, मुंबई-४०००२२
दूरध्वनी-०२२-२४०७१६७१ किंवा २४०३३६६९
इ-मेल-paraplegicfoundation@yahoo.com
वेबसाइट-www.paraplegicfoundation.in
बीज रुजावे रुजावे
विकलांग आणि अतिविकलांग व्यक्तींना पुन्हा त्यांच्या ‘पाया’वर उभं करणं हे आव्हानात्मक कामच आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social worker sulbha varde