१९३२ मधील सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या दुसऱ्या फेरीतही स्त्रियांनी मोठय़ा प्रमाणावर भाग घेतला, पण याही वेळी गांधीजींनी प्रेमाताईंना सत्याग्रहात जाण्याची अनुमती दिली नाही. त्या ऐवजी संपूर्ण साबरमती आश्रमाची जबाबदारी आपण तुरुंगातून परत येईपर्यंत सांभाळण्याचा आदेश दिला. आपल्यावर महात्माजींनी ही जबाबदारी टाकून मोठाच विश्वास दाखवला, याबद्दल प्रेमाताईंना फारच आनंद वाटला. पण त्याचबरोबर याही वेळी आपल्याला सत्याग्रहात भाग घेता आला नाही याबद्दल मन खट्टूही झालं.
गांधीयुगात प्रेमाताई कंटक यांचे नाव मोठय़ा आदराने घेतले जात असे. त्या फक्त विचाराने गांधीवादी नव्हत्या, तर त्यांचे पूर्ण वागणे, दिनक्रम हाही गांधींच्या अनुकरणाचाच असा होता. प्रेमाताई कंटक यांचा जन्म कारवार या आता कर्नाटकात समाविष्ट असलेल्या गावी झाला होता. वडिलांचे वास्तव्य मुंबईत, त्यामुळे त्यांचे बालपण व शिक्षणही मुंबईतच झाले. वडील सुधारक असल्यामुळे मॅट्रिक झाल्यावरही त्यांनी प्रेमाताईंना विल्सन कॉलेज या मुंबईच्या चौपाटीवरील प्रसिद्ध महाविद्यालयात शिकायला पाठविले. त्यांच्याबरोबर मागच्या- पुढच्या वर्गात एकही मराठी भाषिक मुलगी नव्हती. ‘हिंदू मिशनरी’ साप्ताहिकाचे संपादक गजानन भास्कर वैद्य, अश्वत्थामाचार्य बाळाचार्य गजेंद्रगडकर यांसारख्या नामवंत शिक्षकांकडेप्रेमाताईंना शिकण्याची संधी मिळाली. या विद्वान शिक्षकांमुळेच धर्म, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांची गोडी त्यांना लागली.
प्रेमाताई इंटरच्या वर्गात शिकत असता, १९२४ साली मुंबई महापालिकेने गांधीजींना मानपत्र दिले. त्या सभेला गांधीजींबद्दल सर्वत्र कुतूहल होते. या मानपत्र समारंभाला प्रेमाताई गेल्या व गांधीजींच्या दर्शनाने भारावून गेल्या. १९२७ मध्ये पदवीधर झाल्यावर त्यांना स्वत:ला व वडिलांनाही त्यांनी एम.ए. पदवी घ्यावी असे वाटले व त्यांचे पदव्युत्तर शिक्षण सुरू झाले. एम.ए.च्या प्रथम वर्षांत असताना ‘युथ लीग’ या तरुणांच्या चळवळ्या संघटनेची माहिती घेत गेल्या आणि हळूहळू त्या संघटनेशी व चळवळीशी त्या एकरूप होत गेल्या. याच सुमारास वल्लभभाई पटेल त्यांच्या नेतृत्वाखाली बाडरेलीचा सत्याग्रह जोरात सुरू होता. या शेतकऱ्यांच्या लढय़ाकडे त्या आकृष्ट झाल्या. अहमदाबादला जाऊन महात्मा गांधींना भेटल्या व साबरमती आश्रमात राहून काम करण्याची आपली इच्छा त्यांना सांगितली. गांधीजींनी त्यांना आपले शिक्षण पूर्ण करून मग आश्रमात येण्याचा सल्ला दिला. नाराज झालेल्या प्रेमाताईंनी मुंबईला येऊन १९२९ मध्ये एम.ए.ची परीक्षा दिली, पण अभ्यासातून त्यांचे मनच उडाले होते. त्यामुळे परीक्षेचा निकाल काय लागणार हे त्यांना व पालकांनाही कळले होते.
१९२८ साल म्हणजे सायमन कमिशनच्या विरुद्ध आंदोलनाचा काळ. प्रेमाताई ‘युथ लीग’च्या प्रांतिक कार्यकारिणीवर तसेच शहर कार्यकारिणीवर सदस्या होत्या. त्या सायमन आयोगाच्या विरोधाच्या निदर्शनात ‘युवक संघ ऊर्फ युथ लीग’च्या कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांचा भाग होता. या काळात महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती. त्यामुळे सायमन कमिशनच्या विरोधी निदर्शनात प्रेमाताई तसेच वैकुंठलाल देसाई यांची कन्या शांतीबेन देसाई या दोनच महिला होत्या. प्रेमाताईंच्या राजकीय चळवळीमधील सहभागाची सुरुवात ही सायमन कमिशनच्या वेळेपासून झाली हे अनेकांना माहीत नाही.
प्रेमाताई राजकीय चळवळीकडे फक्त भारावल्या म्हणून वळल्या नव्हत्या. एम.ए.ला असताना त्यांनी समाजवादी व साम्यवादी ग्रंथांचा अभ्यास केला. हा अभ्यास केल्यावरही त्यांना गांधीजींचीच विचारप्रणाली पटत राहिली. एम.ए.ला परत बसण्याचा विचार सोडून देऊन त्या १९३०च्या सुरुवातीला अहमदाबादमध्ये साबरमती आश्रमातच राहण्याचा निर्धार करून तिथे पोहोचल्या. म. गांधींनी त्यांना आश्रमात ठेवून घेतले व आश्रमातील छात्रालयाची प्रमुख नेमले. प्रेमाताईंना दांडीच्या सत्याग्रहात जायचे होते, पण गांधीजींनी आश्रमातील स्त्रियांवर आश्रमाची जबाबदारी सोपवली व दांडीच्या सत्याग्रहात प्रेमाताईंना भाग घेता आला नाही, याची त्यांना अखेपर्यंत खंत होती. १९३१ साली सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराचीमध्ये काँग्रेसचे अधिवेशन होते. त्या अधिवेशनाला महात्माजींनी ‘प्रेमाबेन’ला बरोबर नेले होते. १९३२ साली लंडनमध्ये भरलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहून गांधीजी परतले व हिंदुस्थानात सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी सुरू झाली. हिंदुस्थानात मिठाच्या व जंगल सत्याग्रह वगैरे सत्याग्रहात स्त्रिया प्रथमच घराबाहेर पडल्या होत्या. सत्याग्रह, निदर्शने, हरताळ, परदेशी कपडय़ांची होळी इत्यादी कार्यक्रमांत भाग घेण्यासाठी स्त्रिया खूप मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडल्या होत्या. जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या धैर्याचे काँग्रेसच्या अधिवेशनात जाहीर कौतुक व अभिनंदनही केले होते. १९३२ मधील सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या या दुसऱ्या फेरीतही स्त्रियांनी मोठय़ा प्रमाणावर भाग घेतला. पण याही वेळी गांधीजींनी प्रेमाताईंना सत्याग्रहात जाण्याची अनुमती दिली नाही. त्या ऐवजी संपूर्ण साबरमती आश्रमाची जबाबदारी आपण तुरुंगातून परत येईपर्यंत सांभाळण्याचा आदेश दिला. आपल्यावर महात्माजींनी ही जबाबदारी टाकून मोठाच विश्वास दाखवला, याबद्दल प्रेमाताईंना फारच आनंद वाटला. पण त्याचबरोबर याही वेळी आपल्याला सत्याग्रहात भाग घेता आला नाही याबद्दल मन खट्टूही झाले.
१९३३ साली महात्माजींनी साबरमतीचा आश्रम बंद केला. त्यानंतर सत्याग्रह करून प्रेमाताई दोन वेळा तुरुंगात गेल्या. प्रत्येक वेळी त्यांना सहा सहा महिन्यांची शिक्षा झाली होती. ‘तरुणांनो खेडय़ात चला’ हा गांधीजींचा आदेश त्याच वेळचा. काँग्रेसच्या चळवळीत असलेल्या अनेक दाम्पत्यांनी आपला मोर्चा खेडय़ाकडे वळवून विधायक कार्यक्रमाला व त्याचबरोबर खडतर आयुष्यक्रमाला वाहून घेले. तरुण कार्यकर्त्यांत थोडे नावारूपाला आलेले शंकरराव देव व स. ज. भागवत (पुढे आचार्य भागवत नावाने प्रसिद्ध) यांना बरोबर घेऊन पुणे जिल्ह्य़ातल्या सासवड या गावी आश्रम सुरू केला (हे आचार्य अत्रे यांचे गाव पेशवेकालीन सरदार पुरंदरे यांच्याकडे होते.). प्रेमाताई नुकत्याच तुरुंगवासातून बाहेर आल्या होत्या. त्यांनी याच आश्रमात राहून विधायक कार्य करावयाचे ठरविले व ते आमरण पाळले. १९४० साली वैयक्तिक सत्याग्रहासाठी गांधीजींनी प्रेमाबेनची निवड केली. या सबंध वर्षांत प्रत्येक वेळी सुटल्यावर परत सत्याग्रह असा चार वेळा त्यांनी सत्याग्रह केला. प्रत्येक वेळी त्यांना तीन महिन्यांची शिक्षा होई. १९४२ साली त्यांना भारत संरक्षण कायद्याखाली अटक होऊन दीड वर्षे तुरुंगात ठेवले होते.
प्रेमाताईंना येरवडा जेलमध्ये स्वतंत्र तंबूत ठेवले होते. राजबंदिनी म्हणून ‘अ’ वर्ग मिळाला होता. येरवडा तुरुंग तरुण मुलींनी फुलून गेला होता. प्रेमाबेन कडव्या गांधीवादी होत्या. आश्रमातील शिस्त बंडखोर व क्रांतिवादावर विश्वास असणाऱ्या तरुणींना मानवणारी नव्हती. त्यांच्याबरोबर प्रार्थनेशिवाय मुली येतच नसत. येरवडय़ाच्या तुरुंगावर मुलींनी तिरंगा फडकाविला, या त्यांच्या धैर्याचे कौतुक त्यांनी केले नाहीच; शिवाय झेंडय़ासाठी वापरलेल्या साडीचा काठ इंदू भटचा आहे अशी खरी, पण गरज नसताना जेलरला माहिती पुरविली व इंदू भट व सिंधू देशपांडे यांना आठ दिवस बंद कोठडीची शिक्षा झाली. याबद्दल मुलींनी प्रेमाताईंचा राग धरला तो कायमचाच. पुढे सर्व राज्यबंदिनींनी उपवास केल्यामुळे त्यांची शिक्षा रद्द झाली ते अलाहिदा. त्यांच्या तुरुंगवासाच्या वेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचीही संख्या होती. त्यापैकी शिस्तप्रिय मणीबेन पटेल, मणीबेन नानावटी, पद्माताई हरोलीकर, सोफिया खान यांचा मात्र तरुणींनी राग केला नाही. दोघींनीही एकमेकींना आदराने व प्रेमाने वागविले.
तुरुंगातून सुटल्यावर प्रेमाताई परत सासवडच्या आश्रमात आल्या. प्रेमाताई अविवाहित होत्या. ज्या आश्रमाची व्यवस्था त्या पाहात त्याचे संस्थापक शंकरराव देवही अविवाहित राहून देशाची सेवा करण्याची शपथ घेतलेले. या दोन अविवाहित व्यक्तींच्या आश्रमीय सहजीवनामुळे दोघांनाही निंदानालस्ती सहन करावी लागली. प्रेमाताईंनी ही कुत्सित टीका सहन न होऊन सासवडचा आश्रम सोडून भारतात इतरत्र जाऊन काम करण्याची परवानगी गांधीजींकडे पत्राद्वारे केली होती. गांधीजींनी त्यांना तसे न करण्याबद्दल व कामातही बदल न करण्याबद्दल उलट टपाली कळविले होते.
शंकरराव देव ३० डिसेंबर १९७४ रोजी कालवश झाले. सासवडचा आश्रम शंकरराव देवांनी स्थापन केला, पण चालविला तो कायम प्रेमाताईंनीच. काँग्रेस पक्षावर ‘चले जाव’च्या आंदोलनामुळे बंदी आली होती. त्या वेळी अनेक समित्या स्थापन झाल्या व काँग्रेसचे कार्य त्याद्वारे चाले. स्त्रियांची समिती स्थापन होऊन त्याच्या शाखा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ांत स्थापन झाल्या. या समितीचे १९५२ पर्यंत प्रेमाताईंनी काम पाहिले. पण निष्ठेने विधायक काम करण्यापेक्षा राजकारणात सक्रिय काम करण्याचा महिलांचा ओढा पाहून त्या उद्विग्न झाल्या. त्यांनी सात दिवसांचा उपास केला. आपण स्त्रियांची मानसिकता बदलू शकलो नाही याचे त्यांना अतीव दु:ख झाले व मन:शांतीसाठी वातावरणातून दूर जावे म्हणून त्या हिमालयात काही दिवस जाऊन राहिल्या. परत आल्यावर सासवडमध्येच शंकरराव देवांच्या आश्रमाशेजारी ‘कस्तुरबा’ आश्रमाची जबाबदारी घेऊन ती मृत्यूपर्यंत पार पाडली.
सासवडच्या परिसरात दारूबंदी चळवळ करून वर्षांतले चार महिने पूर्ण दारूबंदी  केली. मटकाबंदी चळवळीला व सासवड गावातील ग्रामसेवा कार्यक्रमाला त्यांनी नेतृत्व दिले. ग्रामीण स्त्रीने स्वावलंबी व्हावे म्हणून जागृती केली. कस्तुरबा आश्रमात त्यांच्यासाठी काही व्यवसायांचे शिक्षण सुरू केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आश्रमाच्या सर्व कार्यक्रमांत सासवडच्या आसपास असलेल्या खेडय़ातील गावकऱ्यांना सहभागी करून घेतले. उतारवयातही खऱ्या अर्थाने त्यांनी ग्रामविकासाचे काम अत्यंत निष्ठेने केले. माणसाच्या आयुष्यात जर अध्यात्माचे थोडे ज्ञान असेल तर अंगीकृत कामात आपोआप निष्ठा येते, असे त्यांचे मत होते. त्यामुळे रात्रीचा सत्संग त्यांनी गावक ऱ्यांबरोबर सुरू केला. एका हातात काठी व कंदील घेतलेला स्वयंसेवक व स्वत:च्या हातात बॅटरी घेऊन त्या आश्रमापासून थोडय़ा अंतरावर असलेल्या गावात सत्संगासाठी जात. त्यांच्यासमोर २०-२५ स्त्री-पुरुष सत्संगासाठी जमलेले मी स्वत: पाहिले आहेत व हा सत्संग अनुभवला आहे. एखादा अभंग घेऊन त्यावर निरूपण व पुढे आश्रम भजनावलीतील भजने असे या सत्संगाचे स्वरूप होते.
प्रेमाताई या जशा कार्यकर्त्यां होत्या तशाच त्या विदुषीही होत्या. शंकरराव देवांच्या मृत्यूनंतर त्यांचे अपूर्ण आत्मचरित्र प्रेमाताईंनी संपादित करून प्रकाशित केले. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपासून ते १९३६च्या फैजपूर काँग्रेसपर्यंतच्या महाराष्ट्रातील सोळा वर्षांच्या काळातील राजकीय घडामोडींचा आढावा त्यांनी ‘सत्याग्रही महाराष्ट्र’ या पुस्तकात घेतला आहे. हे पुस्तक १९४० सालच्या ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध केले. ‘काम व कामिनी’ ही त्यांनी लिहिलेली एकमेव मराठी कादंबरी तिच्या वेगळ्या आशयामुळे वादाचा विषय बनली होती.
प्रेमाबाई व्रतस्थ जीवन जगल्या. अत्यंत कठोर शिस्तीत स्वत: वागल्या व सभोवतालच्या कार्यकर्त्यांनीही तसेच वागावे अशी अपेक्षा करू लागल्या. तुरुंगवासात त्यांच्या वयाच्या कार्यकर्त्यां त्यांना फारच मान देत. युवतींना त्यांच्या देशभक्तीबद्दल कितीही आदर असला तरी त्यांच्या हट्टी व दुराग्रही स्वभावामुळे त्या अप्रियच राहिल्या. कसेही असले तरी त्यांचा आश्रमीय जीवनावरील व गांधींच्या विचारसरणीबद्दल दृढ विश्वास व देशप्रेम यांचे तागडे कायम वरच राहील.    
gawankar.rohini@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा