समाजातल्या गरजू, उपेक्षितांना चांगलं आयुष्य देण्यासाठी समाजसेवेचं व्रत घेतलेल्या अनेक संस्था चांगल्या मनुष्यबळाच्या प्रतीक्षेत असतात. तर समाजसेवा करण्याची इच्छा असणारे अनेक जण नेमकं कुणाला भेटावं या संभ्रमात असतात. या दोहोंमधला पूल बांधण्याचे काम करणाऱ्या, आज ४६०० समाजसेवी असणाऱ्या आणि पाचशे स्वयंसेवी संस्थांना समाजसेवी मिळवून देणाऱ्या ‘सोस्वा’ या संस्थेचा हा परिचय ५ डिसेंबरला साजरा झालेल्या ‘व्हॉलंटियर डे’च्या निमित्ताने..
समाजात दोन प्रकारची माणसं असतात- एक डोक्याने विचार करणारी, दुसरी मनाने विचार करणारी. पहिल्या प्रकारची माणसं फक्त स्वत:पुरतं पाहणारी असतात. मी आणि माझं कुटुंब यातच ते गुरफटलेले असतात. मात्र जी मनाने विचार करणारी माणसं असतात ती मात्र समाजाचा, त्यातल्या माणसांचा, त्यांच्या गरजांचा आवर्जून विचार करतात.
आज समाजात खूप काही करायची गरज आहे. ‘नाही रे’चा वर्ग खूप मोठा आहे. त्यांना आपल्याइतकं नाही तरी काही प्रमाणात तरी काही गोष्टी मिळाल्या पाहिजेत यासाठी ‘आहे रे’ गटाने जाणीवपूर्वक काही प्रयत्न केले पाहिजेत. आणि असा विचार करणारे लोक समाजात वाढत चालले आहेत ही जमेची बाब आहे. मात्र अनेकदा विचार तर आहे, पण नेमकी दिशा कळत नाही. काही जणांकडे समाजाला देण्यासाठी वेळ असतो. कधी अर्धवेळ, कधी काही दिवस, कधी काही तास ते देऊ शकतात. तर काही जण आपली नोकरी-व्यवसाय सांभाळून फावल्या वेळात समाजातल्या गरजू लोकांना मदत करण्याचं ठरवतात. पण आपण काय करू शकतो हे नेमकं लक्षात येत नाही. तर अनेकदा ‘समाजसेवा’ म्हटलं की मदर तेरेसा, बाबा आमटे, प्रकाश आमटे, राणी-अभय बंग यांच्यासारखे आपलं सर्वस्व वाहणारे लोक डोळ्यासामोर उभे राहतात. त्यांच्यासारखं आपण होऊ शकणार नाही, असं वाटून मग अनेक जण काहीच न करता राहतात. ‘समाजसेवा’ हा फार मोठा शब्द झाला. पण प्रत्येक जणाने शक्य तेवढी दुसऱ्याला मदत केली तरी पुरेसं ठरू शकेल.
आपल्या स्वत:कडे अशा किती तरी गोष्टी आहेत ज्यांचा गरजू लोकांना उपयोग होईल. जसं की संगणकाचं ज्ञान, हिशेब लिहिणं, उपकरणांच्या छोटय़ा-छोटय़ा दुरुस्त्या, लेखन, वाचन, कोणाची बाहेरची कामं करणं, कोणाला सोबत करणं, शाळांमध्ये जाऊन एखादा विषय शिकविणं, वृद्धाश्रम, अनाथाश्रमात, मतिमंद, गतिमंद, अंध, अपंग यांच्यासाठी आपण थोडा वेळ जरी काढला तरी खूप काही साधता येऊ शकतं. महिला आणि मुलांचं समुपदेशन, मुलांना योगासनं, जादूचे प्रयोग, नृत्य या गोष्टी शिकवता येतील. आपल्या कामातून वेळ काढून आपण मोठय़ा हॉस्पिटलमधील आजारी मुलांना भेटायला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करता येईल. मुलांना कार्यालयीन कौशल्य, गायन, इंग्रजी संभाषण शिकवता येईल. वृद्धाश्रमात वृद्धांना योगासनं शिकवणं, त्यांचे वेगवेगळे खेळ घेणं, त्यांचे वाढदिवस साजरे करणं. कर्करोगग्रस्तांना समुमदेशन करता येईल. रुग्णांसाठी मदतकेंद्रामार्फत सेवा पुरवता येईल. शालेय सुट्टय़ांमध्ये मुलांच्या कार्यशाळा घेणं. शाळांचे जे वार्षकिोत्सव, विविध कार्यक्रम, स्पर्धा यांसाठी मदत करणं अशी कामं समाजसेवींची वाट पाहत आहेत.
या पाश्र्वभूमीवर सोस्वा (रडउकएळोडफ रएफश्कउए ळड श्डछवठळअफ अॅएठउकएर) या संस्थेचं काम महत्त्वपूर्ण आहे. १९८४ मध्ये ती सुरू करण्यात आली. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची तांत्रिक, आíथक, मनुष्यबळाची क्षमता वाढविण्याचं काम ‘सोस्वा’ करते.
आपल्या संस्कृतीत देणगी देणं फार श्रेष्ठ मानलं जातं. पसे, कपडे, पुस्तकं, औषधं, शैक्षणिक साहित्य अशा कित्येक गोष्टी आपल्याला देणगी म्हणून देण्याची इच्छा असते. पण ती कोणाला, कोठे द्यावी हे आपल्याला कळत नाही. फसवणूक होण्याचीच भीती जास्त असते. ‘सोस्वा’ अशा स्वरूपाच्या देणग्याही स्वीकारते आणि त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करते.
स्वयंसेवी संस्थांना बळकट करत असतानाच ‘सोस्वा’च्या असं लक्षात आलं की, संस्थेच्या मर्यादित सहकाऱ्यांच्या साहय़ाने स्वयंसेवी संस्थांची मनुष्यबळाची गरज पूर्ण होऊ शकणारी नाही. यासाठी काय करता येईल यावर विचार झाला. यातूनच १९९५ मध्ये वोलॅक्ट (उएठळएफोडफ ढफटडळकठॅ श्डछवठळअफ अउळकडठ) नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला. अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, ज्यांना मनुष्यबळाची गरज आहे. पण त्यांच्यापर्यंत योग्य व्यक्ती, योग्य वेळेत मिळत नाही. स्वयंसेवक खूप आहेत. पण त्यांना योग्य दिशा आणि योग्य संस्था मिळत नाहीत. यासाठी या दोहोंमधला दुवा बनण्याचं काम ‘सोस्वा’ने केलं आहे. तेही विनामूल्य.
आपल्या दैनंदिन व्यवहारात थोडाही अडथळा न आणता आपण काही तरी करू शकतो हा विश्वास ‘सोस्वा’ने समाजासाठी काही तरी करण्याची इच्छा असणाऱ्या स्वयंसेवकांना (श्डछवठळएएफर) दिला. ज्यांना मी ‘समाजसेवी’ म्हणेन. त्यांच्यातील सेवाभाव (श्डछवठळएएफकरट) जोपासण्याचं आणि तो वृद्धिंगत करण्याचं काम ‘सोस्वा’ करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यातील अनेकांच्या डोक्यात असलेल्या ‘समाजसेवा’ या संकल्पनेवर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं.
‘सोस्वा’च्या कार्यकत्यांनी मिळेल तिथे समोर असतील तेवढय़ा लोकांसमोर ही संकल्पना मांडायला सुरुवात केली. प्रारंभी गृहिणी या प्रक्रियेत सहभागी व्हायला लागल्या. जे या प्रक्रियेत जोडले गेले ते इतरांना सांगायला लागले. आपल्या मित्र-मत्रिणी, नातेवाईक यांना आपणहून सामील करायला लागले. आज घडीला ४ हजार ६०० समाजसेवी यात सहभागी झाले आहेत. यात ‘सोस्वा’ आणखीन एक गोष्ट करते ती म्हणजे या साऱ्या समाजसेवींना आपल्या घराजवळच काम करण्याची संधी मिळवून देते. यामुळे त्यांचा जाण्या-येण्याचा वेळ वाचतो. शिवाय आपल्याजवळचं अधिकाधिक देण्याचा ते प्रयत्न करतात. आठवडय़ातले तीन-चार तास जरी आपण यांना दिले तरी खूप झालं. हा विश्वास ‘सोस्वा’ने या समाजसेवींच्या मनात जोपासला.
यासंदर्भात या उपक्रमाच्या प्रमुख राधा वेदांतम सांगतात, ‘कार्यकर्ते घडवणं हेसुद्धा अनेकदा आव्हानात्मक काम असतं. उत्साहाने अनेक जण आपली नावं देतात. कामाला सुरुवातही करतात पण त्यांच्यावर इतरही जबाबदाऱ्या असल्याने त्यांचं थोडं दुर्लक्ष होतं. त्यांना थोडा आधार द्यावा लागतो. दर आठवडय़ाला संपर्क साधावा लागतो. साधारणपणे तीन महिने नियमित असं काम ते करत गेले तर त्यांना त्याची आपोआप सवय होऊन जाते. ते तयार होतात. आज असे असंख्य कार्यकर्ते आपापल्या क्षमतेनुसार या समाजकार्याच्या कार्याला हातभार लावत आहेत आणि समाज निरोगी करण्यासाठी धडपडत आहेत.’
एक ताई एका अनाथालयातल्या मुलांना दर रविवारी शिकवायला जायच्या. एक-दोन महिने त्या सलगपणे जात होत्या तेव्हा त्यांच्याच लक्षात आलं की, फक्त एक दिवस मुलांना शिकवणं पुरेसं नाही, त्यांनी आपल्या मित्र-मत्रिणींना यात सहभागी करून घेतलं. आणि मग पूर्ण आठवडाभर, नियमित हा अभ्यास सुरू झाला. दर शनिवार-रविवार ताई आणि त्यांचे पती तिथे जायला लागले. मुलांमध्ये आणि या लोकांमध्ये एक नातं, विश्वास निर्माण झाला. इतका की एका दहावीच्या मुलाने ताईंनी आपल्यासोबत परीक्षा केंद्रावर यावं असा हट्ट धरला. ताईनी रजा घेतली आणि रोज त्याच्याबरोबर जाऊ लागल्या. तो मुलगा ६० टक्क्यांनी दहावी उत्तीर्ण झाला. आनाथाश्रमाच्या १५ वर्षांच्या इतिहासातील तो दहावी झालेला पहिला मुलगा.
मानखुर्दमधल्या रिमांड होममधली घटना. तिथे एक ताई मुलांना शिकवायला गेल्या. मुलांनी सांगितलं, आम्हाला शिकायचं नाही. आम्हाला सिनेमातल्या गाण्यांवर नाचायचं आहे.ताई मुलांसाठी टेपरेकॉर्डर घेऊन गेल्या. काही दिवसांनंतर एक दिवस हळूच म्हणाल्या, आपण जास्त वेळ नाचू या, पण थोडा वेळ शिकूया. मुलांना ते पटलं. ती शिकायला लागली. कालांतराने नाच मागे पडला. शिकणं सुरूच राहिलं.
सायनमध्ये सुबोध बेंद्रे हे समाजसेवी नववी, दहावीच्या मुलांना गणित, विज्ञान आणि इंग्रजी शिकवायला जातात. थोडीथोडकी नव्हे तर १४ र्वष ते हे काम करताहेत. ते स्वत: इंजिनीअर असून त्यांना शिकवायला खूप आवडतं. त्यांची ही आवड अनेकांसाठी जगण्याची प्रेरणा ठरली आहे.
अशा प्रकारे आपली सेवा देणाऱ्यांमध्ये स्त्रियाही मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यातल्या अनेक जणी आपापल्या कार्यक्षेत्रात खूप आघाडीवर आहेत. तरीही वेळ काढून त्या आपल्यातील ‘सेवाभाव’ जपत आहेत. आपल्या कलाकौशल्याचा, ज्ञानाचा उपयोग इतरांसाठी करत आहेत. समाजसेवींमधला हा सेवाभाव पाहून या कार्यक्रमाच्या प्रमुख राधा वेदांतम् यांच्या चेहऱ्यावर या उपक्रमासाठी घेतलेल्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान दिसतं. सध्या त्या उपक्रमांतर्गत आरोग्य, शिक्षण, पाणी या विषयांवर सध्या ठिकठिकाणी कामाने वेग घेतला आहे.’
‘सोस्वा’ आपल्यापरीनेही मुंबई परिघात काम करत आहे. दोन वर्षांपूर्वी ‘सोस्वा’ने मुंबईच्या मनपा शाळेत ‘जलसाक्षरता’ अभियान चालवलं. मुलांमध्ये कसं वाचवता येईल याची जागृती आणण्याचं काम केलं. संस्थेने मुलांना चार घरांचं ऑडिट करायला लावलं. आपण पाणी कोठे कोठे वाया घालवतो हे मुलांना यातून समजलं. याचाच परिणाम म्हणून त्या वर्षी मुलांनी होळी खेळली नाही.
‘मुलांमधलं वाचनकौशल्य वाढावं यासाठी आणखी काम करण्याची गरज असल्याचं राधाताईंनी सांगितलं. तसंच सध्याची परिस्थिती पाहता मुली आणि युवतींचं जीवन खूप धोकादायक बनलं आहे यासाठी िलगभेदावर काम करण्याची अत्यंत गरज असल्याचं राधाताई म्हणतात. या विषयावर काम करण्याची इच्छा असलेले समाजसेवी ‘सोस्वा’ला मिळाले तर लवकरच हे काम हाती घेतलं जाईल, असं त्या म्हणाल्या.
समाजसेवींमधला ‘सेवभाव’ जोपासण्याचं ‘सोस्वा’चं काम गेल्या सोळा वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवक (समाजसेवी) यांच्यामध्ये दुवा साधला जात आहे. संस्थांच्या मागणीनुसार, समाजसेवींची आवड आणि कौशल्यानुसार मेळ घातला जातो. फायदा असा होतो की, संस्थांचा वेळ तर वाचतो, शिवाय चांगलं काम करणारे कार्यकत्रे त्यांना कमी वेळेत मिळू शकतात. ‘सोस्वा’ने आत्तापर्यंत पाचशे स्वयंसेवी संस्थांना मदतीचा हात दिला आहे.
दुसरीकडे समाजसेवा करू इच्छिणाऱ्यांना योग्य संस्थेची माहिती मिळाल्याने जास्तीत जास्त चांगलं काम करायला मिळून आत्मिक समाधान मिळत आहे. इच्छुकांनी ‘सोस्वा’शी संपर्क साधून आपल्याला हवं ते काम हवं त्या वेळेत करण्याची अपेक्षा पूर्ण करता येईल. हा उपक्रम चालवताना, संकल्पना रुजवताना सुरुवातीला काही अडचणी आल्या, मात्र निश्चयाच्या बळावर तो चालू ठेवला गेला. गेल्या २५ वर्षांपासून संस्थेचा संपूर्ण कारभार हा अवघ्या एका खोलीतून चालवला जात आहे. काही वेळा निधीची अडचण जाणवतेच. संस्थेचा दैनंदिन खर्च, कार्यकर्त्यांचं मानधन, व्यवस्थापन या साऱ्यांसाठी निधीची खूप आवश्यकता आहे. जसे समाजातल्या गरजूंसाठी ‘समाजसेवी’ मिळाले तसेच सोस्वासाठीही देणगीदारही निश्चितच मिळतील, असा विश्वास राधाताई आणि ‘सोस्वा’चे सर्वच कार्यकर्ते व्यक्त करतात. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असली तरी समाज तिला घडवत असतो. तो सामाजिक प्राणी आहे. त्या समाजाचं ऋण काही अंशी तरी फेडायचं काम प्रत्येकाने करायला हवं. तरच आपली सामाजिक बांधीलकी सिद्ध होईल. आणि ‘सोस्वा’सारख्या संस्थांचा उद्देशही!
‘सोस्वा’चा पत्ता –
रुम.न. २ व ३, पेटीट म्युनिसिपल स्कूल,
भाभा हॉस्पिटलसमोर, हील रोड,
वांद्रे (प) मुंबई-५०
ई-मेल – volact@sosva.org.in
दूरध्वनी- ०२२-२६५५५७०४ / २६४१ १२०५
मदतीचा ध्वज उंच धरा रे!
समाजातल्या गरजू, उपेक्षितांना चांगलं आयुष्य देण्यासाठी समाजसेवेचं व्रत घेतलेल्या अनेक संस्था चांगल्या मनुष्यबळाच्या प्रतीक्षेत असतात.
आणखी वाचा
First published on: 07-12-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Society for service to voluntary agencies sosva