सन १९०६. अतिशय तरल न्यायबुद्धीसाठी प्रसिद्ध असलेल्या न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी आणि मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या रमाबाई रानडे यांच्या हस्ते दक्षिण मुंबईत, ‘चंदारामजी गर्ल्स हायस्कूल’ची स्थापना झाली.. ती शाळा आजही चंदारामजी हायस्कूल म्हणून प्रसिद्ध आहे. विशेष असं, ही शाळा एका सॉलिसिटरच्या न्यायबुद्धीतून उभी राहिली, सन १८७५ मध्ये नानूभाई कोठारे यांनी ‘नानू हार्मसजी’ कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या एका श्रीमंत अशिलाच्या संपत्तीच्या कटकटी सोडवून त्यांच्या इच्छेप्रमाणे विल्हेवाट लावल्यानंतरही काही पैसा शिल्लक उरला. त्या पैशातून एखादं सत्कार्य उभं राहावं म्हणून नानूभाई कोठारींनी या शाळेची स्थापना केली. नानूभाई हे अॅड. केतकी राजन जयकर यांचे पणजोबा.
कायदा न्याय मिळवून देण्यासाठी असतो. न्याय मिळाल्याचं प्रतिबिंब त्या अशिलाच्या जीवन व्यवहारात नाही पडलं तर न्याय हा कायद्याच्या कलमांचे आकडे आणि शब्द यातच गुंतून राहील. म्हणूनच जीवन व्यवहार आणि कायद्याची संवेदनक्षमतेनं सांगड घालणाऱ्या अॅडव्होकेट केतकी जयकर आणि त्यांचे पती सॉलिसिटर राजन जयकर यांना भेटायचं ठरवलं आणि कोठारे- जयकर ही दोन नावांची कुटुंब कायद्याने, नात्याने, विचारांनी कशी घट्ट बांधली गेली आहेत त्याची प्रचीती आली.
केतकीताईंचे सासरे आणि त्यांचे काका हे नानूभाई हार्मसजी फर्ममध्ये पार्टनर्स- जवळचे मित्र! आज या दोन कुटुंबांत अनेक नाती विणली गेली आहेत. मुख्य वैशिष्टय़ म्हणजे दोन्ही कुटुंबांत मिळून बारा सॉलिसिटर्स आणि सहा अॅडव्होकेट्स आहेत. केतकीताईंची ७३ वर्षांची बहीण सॉलिसिटर लक्ष्मी मानकर या आपल्या माहेरच्या फर्ममध्येच काम करत पुढे शिकत राहिल्या. पाठारे प्रभूंमधल्या त्या पहिल्या स्त्री-सॉलिसिटर. यांची शिक्षणगाथा खूपच गमतीची आहे. १९६० साली लग्न झालं तेव्हा त्या फक्त बी. ए. झाल्या होत्या. मुलं मोठी झाल्यानंतर ८० साली एलएल. बी., ८२ साली एलएल. एम, कंपनी लॉमध्ये सुवर्णपदक मिळवलं. सॉलिसिटर व्हायची इच्छा होती, अभ्यासही प्रचंड केला. पण पहिल्या २-३ प्रयत्नांत यश मिळालं नाही. दरम्यान मुलंही कायदे शिक्षणाच्याच प्रवाहात आली. आता आईच्या ‘इभ्रती’चा प्रश्न होता. लक्ष्मीताई सांगतात, ‘‘माझे मेहुणे सॉलिसिटर राजन जयकरांनी त्या वेळी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि चौथ्या प्रयत्नात चाळिशीनंतर मी सॉलिसिटर झाले. एक मुलगा निमिष सॉलिसिटर तर दुसरा महेश अॅडव्होकेट झाला.
विद्यासंपादनाची अपार ओढ आणि ज्ञानदान हे दैनंदिन गरजांइतकं आयुष्याचं अविभाज्य अंग हे या दोन्ही कुटुंबाचं वैशिष्टय़ आहे. केतकी जयकरांचे काका, दिलीप कोठारे हे माटुंग्याच्या न्यू लॉ कॉलेजचे पहिले प्राचार्य. राजन जयकरांची आई प्रमिला मोतीराम जयकर या त्या काळातल्या एम.ए. होत्या. फ्रेंच आणि इंग्रजी विषयांत त्यांनी आपल्या मुलांना – सॉलिसिटर राजन आणि सॉलिसिटर मोहन जयकर यांना – शिक्षणासोबत कलांचं, छंदाचंही बाळकडू पाजलं. मोहन जयकरांची पत्नी स्मिता जयकर याही एलएल. बी. प्रारंभी दूरदर्शनवर ‘कोर्टाची पायरी’ हा कार्यक्रम करायच्या. पुढे अभिनयक्षेत्रात शिरल्या.
राजन जयकरांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या वस्तू जमवण्याचा छंद होता. आईनं तो जोपासला. करीअर निवडताना त्यांना कलाक्षेत्र खुणावत होतं. डिझाइनिंगच्या कोर्सला जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला जायचं होतं. पण वडिलांचे मित्र जे इंटिरिअर डिझायनर म्हणून फर्निचरचं दुकानच चालवत होते ते म्हणाले की, ‘‘तुझ्यासाठी चांगली वेगात एक आयती बस चालून येतेय, वडिलांची फर्म झकास चालव.. डिझायनिंग म्हणजे डेपोत उभी असलेली बस आहे रे. जेव्हा सुटेल तेव्हा बघू..’’ अन् राजन जयकर कायदेक्षेत्रात आले. पण त्यांनी पुराणवस्तुसंग्राहक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकंही मिळवली. त्यांची एक मुलगी ममता डिझायनर झाली तर दुसरी नम्रता सॉलिसिटर.
एका कुटुंबात इतके कायदेतज्ज्ञ.. घरात किंवा कोर्टात.. समोरासमोर उभे ठाकतात तेव्हा? घरात बौद्धिक चर्चा झडतातच. कोर्टात मात्र हार्डकोअर प्रोफेशनल्स. मुळात सारे जण वेगवेगळ्या कंपन्या, ट्रस्ट्स सांभाळतात. खूप प्रकारची कामं करतात. एकादे वेळी एक जण दुसऱ्याच्या जागी मीटिंग घेतो किंवा कोर्टात उभा राहतो. एवढं एकमेकांसाठी करायलाच पाहिजे.
सॉलिसिटर लक्ष्मी मानकर म्हणतात, ‘‘तुम्ही नाटक- चित्रपटात जो कोर्टरूम ड्रामा बघता तो तसा तेवढा नसतो. पण आमच्या कामात नाटय़ भरपूर असतं. विशेषत: मृत्युपत्र, वारसदार, प्रॉपर्टीची भांडणे यात सर्वात जास्त शत्रुत्व नातेवाईकच एकमेकांशी करतात. आम्ही दोघी बहिणी अशा केसेस सेटलमेंटनं सुटाव्यात म्हणून खूप प्रयत्न करतो.’’
केतकीताईंना तर सुरुवातीपासूनच कायद्याच्या लढाईइतकंच कायद्याच्या माहिती प्रसाराचं महत्त्व जास्त वाटतं. केवळ कायद्याच्या अज्ञानामुळे शिकलेल्या स्त्रियाही फसतात. हताश होतात. याचा गरिबी-श्रीमंतीशी संबंध नसतो. स्त्रीनं जागरूक राहावं म्हणून त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी दूरदर्शनवर ‘न्यायदेवता’, ‘मनुष्यदेवता’ यांच्यासारख्या मालिका लिहिल्या. त्यात नाटय़ातून कायद्याचं शिक्षण तर दिलंच, पण लेखनासाठी प्रतिष्ठित ‘रापा’ अॅवॉर्डही मिळवलं.
आजही त्यांना वाटतं, मी घरीच ऑफिस चालवते त्यामुळे स्त्रिया नि:संकोचपणे येतात. अडचणी मांडतात. नात्यांमधले गुंते स्त्री- अॅडव्होकेट चांगली समजू शकते. केतकीताईंनी आता सारं लक्ष ‘फॅमिली कोर्टावरच’ केंद्रित केलं आहे.
राजन-केतकींची मुलगी सॉलिसिटर नम्रता जयकर-गरुड ही मात्र धडाडीनं क्रिमिनल केसेसही बघते. नम्रतानं बाराव्या वर्षीच वडिलांना सांगितलं होतं, ‘मीसुद्धा सॉलिसिटर होणार.’ जयकर घराण्यातली ती पहिली स्त्री-सॉलिसिटर. तिची आई- मावशी जशा घरातल्याच लोकांच्याकडून शिकत, निरीक्षण करत कोर्टात उभ्या राहिल्या, फर्ममध्ये आत्मविश्वासानं वावरल्या तसाच आत्मविश्वास नम्रताला आई- वडिलांकडून मिळाला. मोहनकाकांमुळे, त्यांच्या फर्ममध्ये आर्टिकलशिप करताना कंपनी, कस्टम्स, सरकारी संस्था, सिव्हिल, क्रिमिनल.. खूप वेगवेगळे अनुभव मिळाले.
नम्रताच्या मते सध्याची शहरी तरुणी अधिक प्रगल्भ आहे. हक्कांची जाणीव असणारी आहे, ध्येय ठरवून ते मिळवणारी, हक्कांसाठी झगडायला सिद्ध असणारी आहे आणि तसंच असायला हवं. सॉलिसिटर होऊनही नम्रताला पुढे शिकायचंय. तिला कॉर्पोरेट कंपनी लॉमध्येच काम करायचं आहे. मात्र परदेशाची ओढ अजिबात नाही. आपल्याकडे काम करायला भरपूर स्कोप आहे आणि आमच्या क्षमतांचा वापर आमच्या देशासाठीच व्हायला हवा ही या घरातल्या तरुण पिढीची धारणा आहे.
कोठारे घराण्याच्या सहा पिढय़ा आणि जयकरांच्या तीन पिढय़ा असं हे मोठं कुटुंब. कुटुंबाच्या संचिताची विचारसरणी कशी प्रकटते तर ती कार्यसंस्कृतीत प्रतिबिंबित होते, लॉ फर्मनं लोकांच्या मिळवलेल्या विश्वासातून दिसते. सामाजिक कार्यातून जाणवते. नानूभाई कोठारेंनी लावलेल्या शाळेच्या विश्वस्तपदी यातले काही कुटुंबसदस्य काम करतात. केंद्र शासन, राज्य शासन, महिला कल्याण समित्या यावरही केतकीताई उत्स्फूर्तपणे काम करतात. त्यांचा शिकवण्याचा वारसा इंटिरियर डिझायनर मुलगी पुढे चालवतेय. तिच्या क्षेत्रात, वडिलांची डिझायनिंगची आवडही जोपासतेय तर नम्रता शैक्षणिक क्षेत्रात वडिलांचे काम पुढे चालवायला तयार आहे. साऱ्या चुलत-मावस भावांशी सख्य असल्यामुळेच की, काय दोघींनी जीवनसाथीही, त्यांचेच सहकारी, कायदाक्षेत्रातलेच निवडलेत.
मुंबई उच्च न्यायालयाला अलीकडेच दीडशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक संग्रहालयाची जबाबदारी राजन जयकरांनी स्वीकारली आहे. कायदेतज्ज्ञ आणि क्युरेटर अशा दोन्ही क्षेत्रांचे भरपूर ज्ञान ते पणाला लावत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाला हेरिटेज दर्जा मिळाला आहे. एकदा तिथे काही तरी नूतनीकरणाचं काम सुरू झालं. त्यामुळे हेरिटेज वास्तूचं नुकसान होऊ नये म्हणून रात्री उशिरापर्यंत राजन जयकरांनी धावपळ केली. मुंबईतल्या अनेक हेरिटेज वास्तूंसाठी, पर्यावरणासाठी, झाडांसाठीसुद्धा ते कायद्याची लढाई लढताहेत. त्यांचं घर हायकोर्टाच्या बरोबर समोर आहे. मध्ये मोकळे मैदान. रोज सकाळी उगवत्या सूर्याबरोबर या कुटुंबाला न्यायमंदिराचं दर्शन होतं. ते न्यायदेवतेच्या छत्रछायेत आहेत तसंच न्यायदेवतेला जपण्यासाठीही सज्ज आहेत, अशीच भावना आपल्या मनात उमटते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा