संध्याकाळच्या वेळेला ‘घात वेळ’ का म्हणतात याचा आजोबांना अनुभव येतोय. रोज साधारण सहा वाजले की त्यांचा रक्तदाब वाढायला सुरुवात होते, चक्कर येते, डोकं जड होतं आणि पडून राहावंसं वाटतं. कधी कधी तर मळमळ होऊन उलटी होईल की काय अशी शंका वाटते. डॉक्टरसुद्धा चक्रावून गेले की नेहमीची सगळी औषधं देऊन आजोबांकडून सगळी पथ्यं पाळली जात असूनसुद्धा असं का होत आहे?

मग एकदा आजोबाच डॉक्टरांना म्हणते झाले की, संध्याकाळ झाली ना की मला भीती वाटायला लागते. मुलगा आणि सून कामावरून घरी आले की, त्यांचं आणि अक्षयचं घमासान युद्ध सुरू होतं. रोज घरामध्ये राग, चिडचिड, धुसफुस, कधी कधी आदळआपट आणि दोनदा तर मारहाणसुद्धा झालेली आहे. मला हे सगळं सहन होत नाही.

mazhi maitrin
माझी मैत्रीण: फासला दोनों से मिटाया ना गया…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग
Tara Bhawalkar, Tara Bhawalkar latest news,
‘‘शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं’’
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
sandha badaltana manprasthashram
सांधा बदलताना : मन:प्रस्थाश्रम
people with personality disorder
स्वभाव, विभाव : खुदी से इश्क किया रे…
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत

माझी दोन्ही मुलं मी खूप प्रेमाने वाढवली आहेत. कधीही आवाज वाढवला नाही आणि हात तर कधीच उगारला नाही. माझी पत्नीसुद्धा अत्यंत खंबीरपणे संसार करायची. मुलं, त्यांचा अभ्यास आणि त्यांचं वागणं हा आमच्या समोर कधी प्रश्न उभाच राहिला नाही. पण आता माझ्या डोळ्यासमोर हे जे काय घडत आहे ते माझ्या आकलनापलीकडचं आहे. रोज संध्याकाळची भांडणं मला सहन होत नाहीत. त्यामुळे संध्याकाळ झाली की मला कसंतरी व्हायला लागतं. डॉक्टर कुलकर्णी या कुटुंबाचे गेली ४० वर्षांचे स्नेही. त्यामुळे वडीलकीच्या अधिकारात त्यांनी अक्षय आणि त्याचे आई-बाबा या तिघांना बोलावून घेतलं. आजोबांची तब्येत वारंवार बिघडण्यामागचं कारण सांगितलं. याबद्दल आम्ही काहीतरी करतो, असं आश्वासन देऊन सगळे घरी परतले.

आणखी वाचा-विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर

सगळे जण घरी पोहोचले खरे, पण भांडणावरचा खरा उपाय काय हे कोणाला कळत नव्हतं. गेली चार वर्षं वाद चालू होता व कोणीच माघार घ्यायला तयार नव्हतं. आता काय नवीन करावं, या विचारात सगळे जण असतानाच दारावरची बेल वाजली. दार उघडलं तर समोर नंदा काका. नंदा काकाला बघून अक्षयच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. सदानंद हा बाबांचा मोठा चुलत भाऊ. गेल्या पिढीतले सगळे जण नोकरीधंद्याच्या निमित्ताने गाव सोडून वेगवेगळ्या ठिकाणी पसरले पण सदानंद मात्र गावीच राहिला. त्याने घरची थोडीशी शेती करणं चालू ठेवलं. एका खताची एजन्सी घेऊन छोटं दुकान उघडलं आणि एक पोल्ट्रीसुद्धा सुरू केली. हे सगळं करून तो सुखाने एकटाच राहात होता.

वर्षातून दोनदा तीनदा त्यांची चक्कर शहराकडे व्हायची. दोन-चार दिवस राहायचा. नाटक, सिनेमा, संगीताचे कार्यक्रम बघायचा आणि परत गावी जायचा. पण सगळ्यांशीच जोडून राहणारा, आपुलकीने वागणारा नंदा काका हा नेहमीच हवाहवासा होता. आज तर घराला त्याची गरज होती.
नेहमीप्रमाणे बॅग खाली ठेवून त्याने आजोबांना नमस्कार केला. अगदी पायावर डोकं ठेवून. ताबडतोब बाबा आणि आईने पण नंदा काकाला नमस्कार केला. आईने अक्षयला खूण केली, पण अक्षयने नमस्कार न करता थेट मिठी मारली आणि मग काका-पुतण्या बराच वेळ एकमेकांचा हात धरून गप्पा मारत बसले. रात्रीची जेवणं झाली आणि सगळे जण कॉफीचे मग हातात घेऊन गप्पा मारत बसले. नंदा काकांनी थेट विचारलं, ‘‘तुम्ही सगळे जण काहीतरी लपवत आहात. काय झालं?’’ बाबा एकदम दचकलाच. ‘‘अरे, मी मोठा भाऊ आहे तुझा. तू गुडघ्याएवढा होतास तेव्हापासून तुला ओळखतोय. मी आल्यापासून तुम्ही सगळे जण इतके हसता आहात की कोणत्या तरी संकटातून मी तुम्हाला सोडवलं असं वाटतंय. काय झालं ते सांगूनच टाका.’’

आजोबांनी लगेच पुढाकार घेतला ‘‘नंदा, आज आम्ही एक भला मोठा प्रश्न सुटत नाही म्हणून हताश होऊन बसलेलो आहोत. आता तुला काही सुचतं का ते तू सांग.’’ तेवढ्यात अक्षय म्हणाला, ‘‘नंदा काका कसं सांगणार? तो तर आई-बाबांच्या बाजूने बोलणार. मला समजून घेणारं आपल्या घरात कोणी नाहीये.’’
‘‘अक्षय, मला एक संधी तर दे. तू आधीच या पेपरमध्ये मला शून्य मार्क दिलेत. मी एक गोष्ट तुला निश्चित सांगतो की, मी जे काही सांगेन ते तुला मुळीच बंधनकारक नाहीये. माझ्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला तू शंभर टक्के मोकळा आहेस. आणि तू तसं केलंस तरीही मी तुझ्यावर रागावणार नाही. तुझ्या आणि माझ्या नात्यात फरक पडणार नाही. हे मी खात्रीनं सांगतो. मग आता बोलूया?’’

आणखी वाचा-सांधा बदलताना : मन:प्रस्थाश्रम

‘‘ठीक आहे.’’ अक्षयने हिरवा झेंडा दाखवला आणि आई बोलती झाली. ‘‘भाऊजी, तुम्हाला तर माहीत आहे की अक्षयला अभ्यासाची आवड नाही. चौथी-पाचवीपर्यंत मी त्याचा कसाबसा अभ्यास करून घेत असे. तो कधीही आनंदाने माझ्याबरोबर बसला नाही. अगदी गरज पडेल तेवढ्यापुरता फक्त तो अभ्यास करायचा. आणि दरवर्षी फक्त पास व्हायचा. काही जणांना लहानपणी अभ्यासाची फारशी आवड नसते. थोडा मोठा झाला की समज येईल असं मला वाटत होतं. हा सहावीत गेला आणि करोनाची साथ आली. मग ऑनलाइन शाळा, पहिल्यांदा माझं आजारपण, नंतर करोनामुळे आजोबा आठवडाभर व्हेंटिलेटरवर, त्यानंतर आमच्या नोकरीची अनिश्चितता या सगळ्यांमध्ये दोन वर्षं कशी गेली कळलं नाही. सहावी-सातवी अशीच वाया गेली. सगळ्यांसारखा तोही ऑनलाइन परीक्षा देत पास झाला.’’ बाबा मध्येच म्हणाला, ‘‘ शाळा परत सुरू झाल्यावर बहुतेक मुलं अभ्यासाला लागली.’’ हे म्हणताना त्याने अक्षयकडे बघितलं. अक्षय उलटा बाबांच्या डोळ्याला डोळा भिडवून रागावून बघत होता.

‘‘बाबा उगाच टोमणे मारायची काही गरज नाहीये.’’ अक्षयच्या आवाजातली धार आणि वाढलेला आवाज हा आई-बाबांना नवीन नसला, तरी नंदा काकाला नवीनच होता. इतक्या मोठ्या आवाजात आई-बाबांशी बोलणारा अक्षय नंदा काकासुद्धा पहिल्यांदाच बघत होता. त्याचा चेहरा पाहून आजोबा म्हणाले, ‘‘अरे, हा तर फक्त ट्रेलर आहे. पूर्ण पिक्चर मला रोज संध्याकाळी बघावा लागतो आणि एखादा भयपट बघावा तशी माझी अवस्था होते. रोज संध्याकाळी ब्लड प्रेशर वाढतं, डोकं दुखतं आणि चक्कर येते.’’
‘‘बाबा आपण अक्षयबद्दल बोलूया.’’ आईने पुन्हा संभाषणाचा ताबा घेतला, ‘‘बरं का भाऊजी, हा गेली दोन वर्षं कॉम्प्युटर गेम खेळतो आहे. बरेचदा शाळा बुडवतो. अभ्यासाबद्दल तर जितकं कमी बोलावं तितकं बरं. मागच्या वर्षी निदान सर्व विषयांत पास तरी झाला होता. यावर्षी दहावीचं वर्ष असूनसुद्धा हा पहिल्या सहामाही परीक्षेत गणित आणि सायन्स या दोन्ही महत्त्वाच्या विषयांमध्ये नापास झाला आहे. पुस्तकांकडे बघतसुद्धा नाही. ’’

आणखी वाचा-स्वभाव, विभाव : खुदी से इश्क किया रे…

बाबाही बोलता झाला, ‘‘हा एकुलता एक असला म्हणून काय झालं? शिक्षण आणि काहीतरी नोकरीधंदा हे करायला नको का? असं गेमिंग वगैरे करून काही आयुष्य चालतं का? निदान रोजच्या रोज अभ्यास करणं आणि दरवर्षी पास होणं एवढं तरी नको का?’’
‘‘या गोष्टीवरून घरात रोज वाद चाललेले आहेत. अक्षय म्हणतोय की, मी शाळा सोडतो आणि आई-बाबा म्हणताहेत की मुळीच शिक्षण सोडायचं नाही आणि या सगळ्या गोंधळात माझ्या रक्तदाबाची वाट लागली आहे. आता तूच सांग काय करायचं?’’ आजोबांनी एका वाक्यात भांडणाचं सार सांगितलं.
‘‘अरे, पण माझं कोणी अजून ऐकूनच घेत नाहीये.’’ अक्षय मध्येच बोलला. ‘‘हो अक्षय, सांग बाबा तुझी बाजूसुद्धा.’’ नंदा काकांनी अक्षयच्या खांद्यावर हात ठेवून त्याला प्रोत्साहन दिलं. ‘‘काका, मला अभ्यास मुळीच आवडत नाही. फारसा जमतही नाही. त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करायच्या आणि त्या पाठ करून पेपरमध्ये लिहायच्या हे मला जमत नाही. मी काय करू? मी खूप प्रयत्न केला पण माझं आणि अभ्यासाचं काही जमत नाही. माझं मुळीच लक्ष लागत नाही. अभ्यासातून उघडणारे रस्ते हे माझ्यासाठी संपलेले आहेत. माझं फार काही होईल असं मला वाटत नाही. बहुतेक इंटरनेटमध्येच काहीतरी कामाचे उपयोगी सापडेल. मी शोधतो आहे.’’

नंदा काकाच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो म्हणाला, ‘‘माझ्यासाठी तर हा माझ्या पिक्चरचा पुढचा एपिसोड आहे असं वाटतंय. मलाही शाळेमध्ये कधीच रस नव्हता. मी आपला कायमच शेतात असायचो. मार खात खात कशीबशी बारावी केली आणि नंतर घरच्याच व्यवसायात पडलो. व्यायामशाळा आणि व्यवसाय एवढ्याच दोन गोष्टी केल्या. नंतर कधीतरी बाहेरून बी. कॉम. केलं कारण मला अकाऊंटिंग शिकायचं होतं. पण शाळेमध्ये तुझं काय होत असेल हे समजून घ्यायला मी अगदी योग्य माणूस आहे.’’
‘‘पण हे असं आता चालेल का? आमच्याकडे ना शेती आहे ना व्यवसाय. अक्षयने स्वत:च्या जोरावर काही कमावलं नाही तर याचं कसं होणार? ’’
‘‘तुमचा सगळ्यांचा जर माझ्यावर पूर्ण विश्वास असेल, तर मी तुम्हाला एक रस्ता सुचवतो. पटतो आहे का ते बघा.’’ अक्षयला शंका होतीच. तो म्हणाला, ‘‘ नंदा काका, तू तुला काय वाटतं ते सुचव. ते मला पटेल की नाही याची मी आता खात्री देऊ शकत नाही.’’

आणखी वाचा-सांदीत सापडलेले…! मैत्री

‘‘ठीक आहे अक्षय. ऐकून तर घे.’’ नंदा काका सांगू लागला, ‘‘आई-बाबांबरोबर रोज इथे मारामारी करत राहण्यापेक्षा तू माझ्याबरोबर गावी चल. आपलं गाव चांगली तालुक्याची जागा आहे. ब्रॉडबँड इंटरनेट आहे. मी आणि तुझा बाबा ज्या शाळेमध्ये गेलो त्या शाळेच्या शिक्षकांशी चांगली ओळख आहे. तू माझ्याबरोबर राहा. रोज सकाळी बारा-एकपर्यंत तू तुझे इंटरनेट कर. दुपारी मला दुकानात मदत कर आणि संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर आपले शिक्षक तुझी शिकवणी घेतील आणि दहावीची तयारी करून घेतील. माझी फक्त एक अट आहे की सकाळचे तीन-चार तास सोडले तर इंटरनेटला हात लावायचा नाही. दुकानामध्ये हातात फोन घ्यायचा नाही. आणि रोज संध्याकाळी शिकवणीमध्ये होईल तसा अभ्यास करायचा. हे जर तुला चालणार असेल, तर तू माझ्याबरोबर गावी राहा. तिथल्या शाळेतून दहावी दे. दहावी झाली की पुढे काय ते आपण नंतर ठरवू.’’ ‘‘अरे, पण यामुळे फक्त प्रश्न आजच्या ऐवजी सहा महिन्यांनी पुढे जाईल. सहा महिन्यांनी काय चमत्कार होणार आहे?’’ बाबा म्हणाले.

‘‘अरे, अक्षय माझ्याबरोबर राहिला, तर तुमच्या घरातली भांडणं थांबतील. त्याला त्याचं इंटरनेट करता येईल आणि आमच्या गावाच्या शाळेत शिक्षकांच्या शिकवणीने त्याची निदान दहावीची सोय होईल. सध्या तुमच्या घरी जे चाललंय त्यापेक्षा तरी ते निश्चितच सकारात्मक आहे. त्या सहा महिन्यांमध्ये त्याला काय सापडतं ते बघूया. दहावीचं आहे. काय मोठा फरक पडतो? दहावीनंतर आपण एक वर्षभर देऊया ना त्याला. त्या वर्षभरामध्ये त्याला आवडीचं काहीतरी तर सापडेलच. नाही तर तो कॉलेजसाठी इथे परत येईल. काय बिघडतं आयुष्यात एक वर्ष गेलं तर? अगदी लोकमान्य टिळकांनीसुद्धा तब्येत सुधारण्यासाठी कॉलेज थांबवून एक वर्ष व्यायामशाळेला दिलं होतं. मग अक्षयला का नाही?’’
आजोबा, आई आणि बाबा नि:शब्द झाले. त्यांना हे मुळीच पटलं नव्हतं, पण दुसरा काही उपाय समोर दिसत नव्हता. त्यामुळे ते सगळेच जण अक्षयकडे बघत होते. ‘‘काय रे अक्षय, हे मान्य आहे का तुला ? या एक वर्षामध्ये तुला योग्य काही सापडलं नाही तर गुपचूप अकरावी-बारावी करशील आणि शिक्षणाला लागशील?’’ आईने विचारलं.
अक्षय मनापासून खूश झाला. रोजची भांडणं नाहीत आणि रोज चार तास कटकट न होता हवं ते करायला मिळणार यापेक्षा अजून तरी काय हवं? थोडा अभ्यास करून दहावी पदरात पाडून घेऊ आणि पुढचं एक वर्ष भविष्याचा रस्ता शोधायला आहेच.

अक्षयनं मान डोलावून सांगितलं, ‘‘हो मान्य आहे. मी गावी दहावी करतो. नंदा काकाबरोबर राहतो.’’ ‘‘मीसुद्धा जातो या दोघांबरोबर. तिथे माझी तब्येत बरी राहील असं मला वाटतंय.’’
आई-बाबांची अजूनही खात्री पटली नव्हतीच. पण रोज भांडण करून मुलाबरोबरचं नातंच सडू देण्यापेक्षा शांतपणे दहावी पदरात पाडून घ्यायची आणि अक्षयच्या मनातला शिक्षणाबद्दलचा तिटकारा कमी होण्याच्या आशेने धीर धरायचा, हा त्यांना त्यातल्या त्यात कमी नुकसानीचा मार्ग वाटला.
‘‘शिक्षण आणि खात्रीची नोकरी यासाठी एका पिढीनं गाव सोडलं. आता याच गोष्टींना वैतागून पुढची पिढी गावाकडे परत आली तर योग्यच आहे की. चला, सामान बांधूया या दोघांचं.’’ नंदा काकाच्या आवाजात चांगलाच उत्साह आणि सकारात्मक भावना होती.

chaturang@expressindia.com

Story img Loader