काळाच्या ओघात प्रत्येक वर्ष निघून जात असतं. वर्ष संपत आलं की, ‘गेले करायचे राहून’ ही भावना तीव्र होऊ लागते. आयुष्यभर आपण फक्त वस्तू जमा करत राहातो. त्यांची निगा राखतो.. जपून ठेवतो. मधून मधून घासपूस करतो.. असं आपण ‘मनाचं’ करतो का? मनातल्या सृजनशीलतेला जपतो का?… अधूनमधून त्याची घासपूस करतो का? तसं केलं तरच प्रत्येक नवं वर्ष नव्या उमेदीत जाणं शक्य होईल आणि आयुष्याचा उत्तरार्ध समाधानात जाईल. २०१२ साल संपत आलं आहे. त्याच्या पूर्वसंध्येवर प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवं, काय गेले करायचे राहून? ..
आपल्या भारतीय परंपरेमध्ये प्राचीन काळापासून समाजस्वास्थ्याच्या दृष्टीनं मानवी जीवनाचा आलेख मांडलेला आहे. त्यातले चार आश्रम ही कल्पना अतिशय आदर्श समजावी लागेल. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम! शतकानुशतकं माणसाच्या जगण्याचं स्वरूप वेगानं बदलत गेलंय; काही संदर्भ बदलत गेलेत, धारणा बदलत गेल्या आहेत. नीतिमत्तेच्या कल्पना सापेक्ष झाल्या आहेत. कुटुंब, नातेसंबंध, सौहार्द, एकमेकांतला संवाद या सर्व गोष्टींना अति व्यक्तिगत स्वरूप येत चाललंय. पण ‘माणूस’ हा प्राणी मात्र मुंगीच्या चालीनं बदलतोय असं वाटतं. चार आश्रमांचा उल्लेख करताना त्यातल्या गृहस्थाश्रम ते वानप्रस्थाश्रम या कालखंडाचा आवर्जून आज विचार करावासा वाटतो. ‘वानप्रस्थाश्रम’ ही कल्पना आजच्या काळात संदर्भहीन आहे. परंतु माणसाच्या जीवनातल्या त्या कालखंडावर गांभीर्यानं आपण विचारच करत नाही.
पन्नास ते पासष्ट हा वयोगट आज अतिआधुनिक (पोशाखापासून) स्वरूपात समोर येतोय. परंतु तो बऱ्यापैकी संभ्रमात आहे. मागच्याशी अजून पूर्ण नाळ तुटलेली नाही आणि पुढच्या वेगाशी सामना करता येत नाही अशी काहीशी गोंधळलेली अवस्था आज या वयोगटात आहे. एकीकडे नवरात्र, गौरी-गणपती तर करायचंय पण त्यातलं कर्मकांड नीट तपासूूून पाहावंसंही वाटतंय.. ते वाटणं आजूबाजूच्या मंडळींना उमगत नाहीये म्हणून मग आहे तसं चालू ठेवणं, नंतर अति थकणं आणि शेवटी कुठेतरी काहीच ठाम विचार मांडू न शकल्याची खंत वाटणं! मग विचारांच्या आवर्तात आपल्यातल्या अनेक गोष्टी या गदारोळात आपण विसरूनच गेलोय याचा कधीतरी साक्षात्कार होतो.. आपण काहीतरी लिहू शकतो, कविता करतो, चित्रांसाठी, रांगोळीसाठी आपला हात चांगला आहे; गाण्यांची आवड आहे. बागकाम तर अत्यंत आवडता छंद.. अरेच्चा हे सगळं गेलं कुठं?
हा साक्षात्कार पन्नास-पंचावन्नाव्या वर्र्षी होऊन काय उपयोग.. कारण काहीतरी नवीन निर्माण करण्याची सुरुवात ही एकदम एकाएकी नाही होऊ शकत.. त्याचं बीज कुठेतरी विशी-पंचविशीत- सजवावं लागतं.. मधून मधून त्याला पाणी घालावं लागतं. पण माणसं जगण्याच्या धांदलीत ‘वेळेचा’ अडसर वारंवार उभा करतात. ‘जगण्याशी’ लढणं तर रोजचंच आहे. पण त्या जगण्यातच काही कारंजी उभी करावी लागतात, काही डोलणारी फुलं फुलवावी लागतात. काही वेळा मनासमोर इंद्रधनुष्य उभं करावं लागतं.. त्यातले रंग हातात घ्यावे लागतात.. आणि या सर्वासाठी आपल्याजवळ संवेदनशील असं हौशी मन असावं लागतं आणि ते मन असणारी माणसं सगळ्या लढाया हसत हसत खेळत राहातात. कधी कधी पराभूत होतात, पण कुठल्यातरी जयाच्या आठवणीनं तो पराभूत क्षण परतवून लावतात.. काही जण वेगळी असतात, ‘मी आतापर्यंत इतकं सोसलंय’ यांचं भांडवल करून नंतर काहीच करायचं नाही हा ‘फंडा’ ही मंडळी वापरतात आणि नंतर मग स्वत:हून एकाकीपणा लादून घेतात.. याउलट काही भन्नाट माणसं काहीतरी भन्नाट गोष्टी करत राहतात.. एक सत्याऐंशी वर्षांच्या आजी.. आत्ताच्या काही म्हाताऱ्या माणसांसारखंच टी.व्ही.चं प्रचंड वेड.. स्वभाव चळवळ्या.. आनंदी.. गमतीशीर बोलणं.. गमतीशीर उपमा देणं.. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर एक महिना बिछान्यावर होत्या.. एक दिवस त्या प्लॅस्टर घातलेल्या पायाला उद्देशून म्हणाल्या, ‘‘आता लाड पुरे.. मुकाटपणे चालायला लागायचं आणि बाहेरचा ‘उजेड’ पाहायचा.’’ या सकारात्मक विचारांमुळे लवकर बऱ्या झाल्या.. आजही त्या टीव्हीवरच्या सगळ्या पदार्थ तयार करण्याच्या कार्यक्रमातून प्रत्येक रेसिपी स्वत: लिहून काढतात. अगदी नॉनव्हेजही! (स्वत: खात नसूनही) असंख्य वह्य़ा भरल्या आहेत.. काही जण विचारतात, ‘‘आजी तुम्हाला काय करायच्यात या रेसिपी? तुम्ही कुठे काय करणार आहात?’’.. त्यावर म्हणतात, ‘‘अहो, असावं जवळ .. दुसऱ्या कुणाला उपयोग होईल. शिवाय बोटांना लिहिण्याचा व्यायाम!’’ वय र्वष सत्त्याऐंशी, कुठे तरी जाणवतंय ? आता या आजींचा खरं म्हणजे हा ‘संन्यासाश्रम’ आहे.. पण आहे तो ‘आश्रम’ त्या असा जगतात- त्यांना स्वत:ला साठीपर्यंत सासूबाई होत्या- सतत वर्दळीचं घर.. पण ही बाई पहिल्यापासूनच आनंद मुठीत घेऊन वावरतेय..
स्त्रिया नोकऱ्या करायला लागून साधारण साठ वर्षांचा काळ लोटलाय. नोकरी संपल्यानंतर किंवा सध्याचा व्हीआरएस घेतल्यानंतर पन्नाशी उलटते. एकाएकी हातात भरपूर वेळ मिळतो. गाठीशी दुसरं काही जमवलेलं नसतं. काही वेळा कुवतही नसते. मग एकाएकी बायकांना वाटायला लागतं ‘आता’ राहून गेलेल्या गोष्टी कराव्या. यातला ‘आता’ महत्त्वाचा.. कारण हा ‘आत्ता’ पन्नाशीनंतरचा आहे. विचार करता अनेकींना हेच कळत नाही की आपलं राहून काय गेलंय.. मग करणार काय? आपल्याला काय येतंय, आपल्याला कशाची आवड आहे; आपली कशात गती आहे हे माहीतच नसतं. कारण आतापर्यंत शोधच घेतलेला नसतो. मग ‘आता’ तो शोध घ्यायचा.. आणि नंतर ठरवायचं! सगळी गोंधळलेली अवस्था.. आयुष्यभर आपण फक्त वस्तू जमा करत राहातो. त्यांची निगा राखतो.. जपून ठेवतो. मधून मधून घासपूस करतो.. असं आपण ‘मनाचं’ करतो का? मनातल्या सजनशीलतेला जपतो का?.. अधुनमधून त्याची घासपूस करतो का?.. तर नाही! घरसंसार, नोकरी, येणं-जाणं.. मुलांचं संगोपन.. अनेक कारणं सांगायला असतात.. मग पन्नाशी येते.. पंचावन्न गाठतो. हातात करण्यासारखं काही उरत नाही.. मन सैरभैर होतं. आपल्यासारखीच दुसरी एखादी इतकी आपल्याइतकीच ‘बुडलेली’ असूनही तिनं काय काय केलेलं असतं.. ते पाहून मन खंतावते.. (काही व्यक्तींना ती खंतही वाटत नाही हा भाग वेगळा.)
साठीच्या आसपास निराळं काहीतरी करून बघावं हे वाटतानाही ते ‘निराळं’ शोधण्याची दृष्टी त्यापूर्वीच, वयाच्या पूर्वार्धातच मिळवायला हवी.. मध्यंतरी एका बातमीत ‘कराड’च्या एका संस्कारवर्ग चालवणाऱ्या बाईंबद्दल वाचलं.. रसिकता आणि संवेदनशील दृष्टी लहानपणापासून कशी तयार करायची हे त्या बाई मुलांना शिकवतात. फार बरं वाटलं ऐकून. ती दृष्टी लहानपणापासून तयार होणं गरजेचं आहे. सध्याच्या आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या या काळात हा साठीतला वर्ग दोन टोकांचा दिसतो. काहीजण एकदम चालू काळाशी धावत धावत स्पर्धा करणारे. मग एकदम धाड्दिशी पंजाबी ड्रेस अंगावर चढतो, स्पोर्ट्स शूज घालून सकाळी फिरायला जाणं सुरू होतं! उच्चभ्रू वर्गातल्या स्त्री/पुरुष जीन्स, टी-शर्ट घालून सारखे आऊंटिंगला जातात.. सारखे कुठले कुठले क्लास, गेटटूगेदर्स, सगळ्या घटनांचे सुरू होतात उत्सव.. अगदी मृत्यूचेही! सगळं लाऊड!
याउलट एक वर्ग अत्यंत समतोलपणे वाटचाल करताना दिसतो. मुला-नातवंडांसमोर आपण कसं असावं याचं भान ठेवणारा हा वर्ग ऊठसूट प्रेमाचं प्रदर्शन करताना मिठय़ा मारताना दिसणार नाही किंवा टाळ्याही देताना दिसणार नाही. वाटतं प्रत्येक वयाचीसुद्धा वागणुकीची एक मागणी असते. कोणीही, केव्हाही, कसं, स्वत:ला प्रेझेंट करावं हा ‘व्यक्तिस्वातंत्र्याचा’ जोरदार मुद्दा होऊ शकतो. मानसिक धारणा ही स्वत: बनवावी लागते असं म्हणावंसं वाटतं. ‘आता काय माझं – दस गेले पाच राहिले’ हा उद्गार भयानक कंटाळवाणा वाटतो. त्याच वेळी एखादं उदाहरण असंही दिसतं की, आजही सत्तरीतल्या हिराबाई पुरणपोळ्यांची कंत्राटं घेऊन दिवसाला चार-चार किलो पोळ्या लाटतात.. पूर्वी परिस्थितीसाठी केलं, आता स्वस्थ बसवत नाही म्हणून करतात! कुठून येते ही ऊर्जा?
तीस-चाळीस वर्षांपूर्वीची साठीतली स्त्री आणि आत्ताची साठीतली स्त्री यात फक्त काळाचाच फरक आहे असं नाही.. तर मानसिकतेचाही आहे. यालाही कारण आहे ते म्हणजे मध्यंतरीच्या काळात घराबाहेर पडलेली स्त्री! शिक्षण सुलभ झाल्यानं स्त्रीच्या एकंदरीत अवस्थेत झालेला बदल- त्या अनुषंगानं नोकरीसाठी बाहेर पडणं, आपोआप संतती मर्यादित, नेटकं कुटुंब आणि नंतर निवृत्तीनंतर आलेलं रिकामपण- हा प्रवास रिकामपणाशी थांबतो. मुलं बहुधा परदेशी, कुटुंब विभक्त असल्यानं माणसांचा गलबला नाही, नोकरीमुळे ठरवून कमी केलेल्या जबाबदाऱ्या, यातून येणारं रिकामपण अंगावर येणारं ठरतं. अशा वेळी पहिल्यापासून काहीच छंद नसेल तर हे रिकामपण कोणत्याही विधायक कृतीपेक्षा फक्त गप्पा, (त्यातही गॉसिपिंग) सहली, खरेदी आणि नंतर नैराश्य अशा वाटेवरून चालायला लागतं.
सध्या आजूबाजूला पाहताना वाटतं सगळ्याच गोष्टी विपुल प्रमाणात मिळाल्यानंतर तृप्ती येण्याऐवजी ‘आणखी हवं आणखी हवं’ हे जास्तच वाढतं. दोघांच्या नोकरीमुळे येणारा पैसा- त्यातून मुलं दोनच.. त्यात मनोरंजनाची साधनं अलोट, मोहाची साधनं अलोट, सेलिब्रेशन्सचा अतिरेक, खरेदी अलोट, मुलांचे लाड अमर्याद या सगळ्यातून साठीला येऊन ठेपतो तेव्हा ‘स्वत:च्या आत’ डोकावून शांतपणे स्वस्थपणे एखाद्या गोष्टीचा विचार करण्याची सवयच लागलेली नसते. हा साक्षात्कार मनाला सुन्न करतो.. तरी काहीजणी त्यातूनही स्वत:चा ‘वेगळा विचार’ जगण्याच्या रामरगाडय़ातही जिवंत ठेवतात आणि रिकामपणातून काही ‘चांगलं’ मिळवण्याच्या मार्गाला लागतात. पुस्तकांची भिशी, वाचकमंच, एनजीओज्ना जोडून घेणं, घरातल्या नोकरवर्गाला शिक्षण देणं अशा अनेक गोष्टी.
यातला एक मधला भाग म्हणजे नोकरी न करता फक्त घराचं बघणाऱ्या गृहिणी!.. या गृहिणी कधी आपखुशीनं तर कधी नाइलाजानं घरी थांबलेल्या! अशा स्त्रियांना आयुष्यभर स्वयंपाकघर पाहून कंटाळा आलेला असतो. साठीच्या आसपास जबाबदाऱ्या संपल्यानंतर बाहेर पडण्याचे वेध लागतात. संसार करता करता एकीकडे मनात काही निराळी जमवाजमव केली असेल तर त्या स्त्रिया छानपैकी या वयाला सामोऱ्या जातात. काहीजणी आनंदानं नातवंडांची जबाबदारी घेतात..
एकूणच कुठल्याही वयाची धास्ती वाटून घेता त्या अवस्थेची आधीपासून तयारी असेल तर ते वय कधीच जाचक वाटत नाही. त्यातूनही पूर्वीच्या ‘वानप्रस्थाश्रम’ अवस्थेतली सुसंस्कृत कल्पना आपणही प्रयत्नपूर्वक अमलात आणू शकतो. नवीन वर्ष अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलंय. आता विशी-तिशीत असलेल्यांनीही स्वत:च शोध घ्यायला हवा आणि स्वत:ला विचारायला हवं, काय गेले करायचे राहून?
गेले करायचे राहून
काळाच्या ओघात प्रत्येक वर्ष निघून जात असतं. वर्ष संपत आलं की, ‘गेले करायचे राहून’ ही भावना तीव्र होऊ लागते. आयुष्यभर आपण फक्त वस्तू जमा करत राहातो. त्यांची निगा राखतो.. जपून ठेवतो. मधून मधून घासपूस करतो.. असं आपण ‘मनाचं’ करतो का? मनातल्या सृजनशीलतेला जपतो का?...
आणखी वाचा
First published on: 22-12-2012 at 05:08 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Something remain undone in the previous year