वर्षांनुर्वष आपण अनुभवत असतो की रात्रीनंतर दिवस येतो तसा वर्षांखेरीनंतर वर्षांरंभ येतो. पण एकूण अस्तित्वाच्या अंतानंतर काय असेल? असेल का नाही? व्याकूळ करणारा प्रश्न मनात उमटला आणि पाठोपाठ आठवली एक कविता, ‘तरीही काही बाकी राहील’..
तुम्हाला खात्री आहे काय
की आग सगळं काही जाळून टाकू शकते
सगळं काही सुकवू शकते हवा
पाणी सगळं काही विरघळवू शकतं
सर्व काही नष्ट करू शकतं ब्रह्मास्त्र?
नाही, निश्चित काही बाकी राहील
कुठे आणि कसं आणि किती?  
हे तर तेच सांगेल
जे राहील..!
वर्ष संपत आलं. वाऱ्यानं कॅलेंडरची पानं उडावीत तितक्या भुर्रकन.. जिथं वस्तू, मूल्य, माणसंही बघता बघता कालबाह्य़ होतायत तिथं वर्षांचं काय म्हणा!.. पहाटे पहाटे टेकडीवर फिरताना मनात येत होतं.. इतक्यात सूर्योदयानं लक्ष वेधून घेतलं. भवतालाला जाग येत होती. मनही टक्कंजागं होतं. दिवस उजाडताना पाहणं हा रोज एक नवा अनुभव असतो..
विचारांच्या तंद्रीत टेकडी उतरताना मनात आलं. प्रत्येक शिखरावर उताराचा अटळ आरंभबिंदू असतो. पण लगेच असंही वाटलं, प्रत्येक पायथ्याशी वर चढत जाण्याची ओढही असतेच की! परतीच्या वाटेवर मग चढ.. उतार.. चढ, आरंभ.. शेवट.. आरंभ, जन्म.. मरण.. जन्म यांचं चक्राकार फिरत राहणं याविषयीच विचार येत राहिले. उंचावरून अनुभवलेलं उजाडणाऱ्या निसर्गाचं रूप मनात तरळत होतं. मन एका वेगळ्या उंचीवर पोचलं होतं. त्या अवस्थेत आठवत राहिली लहान-मोठय़ा प्रवासातली निरीक्षणं, अंतर्मुख मनात झालेलं त्यांचं आकलन आणि नंतर झालेलं त्यांचं शब्दांकन. आठवणींशी खेळता खेळता डोळ्यांसमोर आली अगदी जवळून अनुभवलेली रात्रीची निमूट उभी असलेली झाडं आणि त्यांच्या आतली खळबळ.. तशी रोजच सकाळ-संध्याकाळ फिरताना निरखत असते मी झाडांचं उभ्या उभ्या जगणं. सहअनुभूतीनं जाणू बघत असते त्यांचे अंतरंग व्यवहार.. त्या दिवशी अशीच फिरून आल्यावर मनातली आवर्तनं उतरवून ठेवली होती शब्दात. कितीतरी वर्षांपूर्वीची ती पूर्ण कविता आठवली मला..

‘‘काळी पडत जातात झाडं
रात्र व्हायला लागली की
बुडून राहतात तशीच
लख्ख अंधारात अंतर्बाह्य़!
दिवे लावून विस्कटत नाहीत अंधाराचे थर
स्वच्छ भोगतात कोलाहल
आपल्या प्रवाही खोडातले
जमिनीखालचे
आणि पानापानात अडकलेल्या
आपल्या आकाशातले!
अनुभवतात स्वत:चे झाड असणे
थेंब थेंब वाढत जाणे
भोगून झाला अंधार पुरेसा की उजाडतेच
मग ती हळूहळू पुन्हा हिरवी होतात
चमकू लागतात
कालच्या पेक्षा आज थोडे तरी वाढलो
हे समजल्यासारखी सळसळत राहतात..!

Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
Technical progress , Visual pollution, thinking attitude,
क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर
Shani Surya Yuti 2025
Shani Surya Yuti 2025 : यंदा दोनदा होणार सूर्य-शनिची युती, ‘या’ तीन राशींच्या वाढतील अडचणी
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा

व्वा..! स्वत:लाच दाद द्यावीशी वाटली. झाडं रात्र कशी घालवत असतील हा विचार कसा आला असेल तेव्हा मनात कोण जाणे.. माणसाच्या बाबतीतही असं म्हणतात की झोपेत आपली सर्व ज्ञानेंद्रियं आणि कर्मेद्रियं निद्राधीन असतात, श्वासाखेरीज पूर्ण ये-जा थांबलेली असते तेव्हा आपल्या शरीरात आंतरिक व्यवस्थापन होत असतं. आतली सगळी आवराआवर झाल्यावर नव्या दिवसाच्या नव्या आव्हानांना जाण्यासाठी ताजंतवानं होऊन शरीर उठून बसतं!.. कवितेतल्या झाडांसारखी माणसं ‘कालच्या पेक्षा आज थोडे तरी वाढलो’ का? हे समजून घेतात की नाही कोण जाणे.. बहुधा नाहीच. पण छान आहे ना हा विचार? खरंच आपण उठल्यावर क्षणभर तरी अंतर्मुख व्हायला हवं. आपल्या निद्रिस्त अवस्थेचा आपण कधी विचारच करीत नाही. विचारांच्या ओघात झोपेबद्दल कुठे तरी वाचल्याचं आठवलं की झोपेला लघुमरण म्हणतात. म्हणजे आपला रोजच पुनर्जन्म होत असतो तर..! आपल्यातूनच आपला नवा जन्म..! या कल्पनेशी कितीतरी वेळ खेळत राहिलं मन..
विचारांची पाऊलवाट वळणं घेत चालली होती. त्या वाटेवरून चालता चालता परत आठवली फिरताना रोज भेटणारी झाडं.. मन त्या वेळच्या अनुभवात जाऊन पोचलं. मैदानात अंतराअंतरावर उभ्या असलेल्या वडाच्या झाडांची पानं भराभर गळून पडत होती. गळलेल्या पानांचा खच पडला होता जमिनीवर. त्या वाळलेल्या पानांवरून चालताना कुरकुर आवाज येत होता पानं चुरली जात असल्याचा. फिरताना तशी रोजच दिसायची झाडांची ही सगळी अवस्थांतरं.. पण त्या दिवशी जाणवलं. या गळून पडलेल्या पानांचा चुरा किती सहज सामावून जातोय जमिनीत. अंगावर पडणारं सगळं पोटात घेणाऱ्या याच जमिनीत खोलवर पसरून या झाडांची मुळं शोषत असतात जीवनरस आणि पोचवत राहतात फांद्यापर्यंत. मग गळून पडलेल्या पानांनी जाता जाता मागे ठेवलेल्या पानगळखुणा तहानल्यासारख्या पिऊन घेतात ओठाशी आलेलं सत्त्व. सरसावतात नवागताच्या स्वागताला. परतताना मनभर पसरलेला होता हा अवस्थांतराचा चक्राकार प्रवास. घरी आल्यावर डायरीत लिहिलं होतं..

‘‘ही जमीन नाही
कैक युगं दर शिशिरात
विमुक्तपणे गळून पडणाऱ्या पानांचे
असंख्य थर आहेत हे एकमेकांवर साचलेले..!
ओतप्रोत ताजेपणानी चमकताहेत वृक्षांवर
ती पानं नाहीत
आतील अनावर सृजनेच्छेच्या वादळात
अंतर्बाह्य़ ढवळून हिरवी झालेली जमीनच
ऊध्र्वगामी होऊन सळसळते आहे वृक्षांवर..!’’

ग्रेट ना? लघुमरण, आपल्यातूनच आपला जन्म. या विचारतरंगांना बिलगून ही कविता आठवली आणि ती लिहिली त्या वेळेपेक्षा आता वेगळीच जाणवली. आपल्यातूनच आपला जन्म हा भाव किती व्यापक रूपात व्यक्त झालाय इथं. चार ओळीत सगळी उलथापालथ चित्रित झालीय. म्हणजे गळून पडलेल्या पानांची जमीन होणं आणि त्या जमिनीचंच पुन्हा पानं होऊन सळसळणं.! मनानं लगेच निसर्गातल्या दुसऱ्या एका अशाच आवर्तनाकडे झेप घेतली. इथल्याच समुद्राचं पाणी वाफ होऊन वर जातं आणि ढगांमधून पावसाच्या रूपात पुन्हा समुद्राच्या पाण्यात मिसळून जातं! सगळी पानं गळून गेली म्हणून झाड कधी तसंच निष्पर्ण राहत नाही. त्याला पुन्हा पालवी फुटते. पाण्याची वाफ होत होत पूर्ण समुद्र कधी सुकून जात नाही. पावसाच्या रूपात पाणी पुन्हा त्यात सामावत राहतं. निसर्गातल्या या आवर्तनाच्या जाणिवेनं मनातल्या विचारांना सकारात्मक दिशा मिळाली.
हेच विचार बरोबर घेऊन परत घरी चालले होते. वर्षांखेर जवळ आली होती. नकळत सगळं वर्ष अधूनमधून आठवत होतं. तिन्हीसांजेला उगीचंच कातर होतं मन तसं वर्षांखेरीसही होत असतं का? कसली हुरहुर वाटत असते मनाला? काहीतरी हातातून निसटत असल्याची? की काहीतरी करायचं राहून गेल्याची? मनाच्या या ‘व्याकूळ’ अवस्थेला सामोरं न जाता, असं का होतंय ते समजून न घेता, कदाचित ते टाळण्यासाठीच आपण फटाके फोडून जल्लोष करत. पाटर्य़ा झोडत वर्षांखेर साजरी करतो!
वाटलं आपण आपल्यापुरतं तरी हे टाळू शकू. घरी आल्यावर त्याच अंतर्मुख आणि प्रसन्न अवस्थेत डायरी लिहायला घेतली. पूर्ण वर्षांचा आढावा घेऊन झाला. ठरवलं होतं ते बहुतेक सर्व करता आलं होतं. राहिलेलं नव्या वर्षांच्या प्लॅनरमध्ये घालता येणार होतं. पण मनात आलं आज राहिलेलं काम आपण उद्यावर सोपवतो. या वर्षीचे राहिलेले प्लॅन्स पुढच्या वर्षांच्या डायरीत जमा होतात. पण या आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या गोष्टींचं काय होणार? एकदम कावरंबावरं व्हायला झालं. मनाची गाडी मग पुनर्जन्मविषयक विचारांच्या रुळांवरून धावायला लागली. याविषयी अधूनमधून बराच विचार करून झाला होता. कसाही विचार करून पाहिला तरी रूढ असलेली पुनर्जन्म कल्पना मला मान्य होत नव्हती. फार तर असं म्हणता येईल की पूर्वजन्म म्हणजे मागच्या पिढय़ा आणि पुनर्जन्म म्हणजे पुढच्या पिढय़ा किंवा याच, आपल्याच जन्मापुरतं बोलायचं तर एखादं नवं आकलन, नवी क्षमता प्राप्त होणं हाच वरच्या पायरीवर नेणारा आपला नवा जन्म. पुनर्जन्म या संकल्पनेचा आपल्यापुरता असा अर्थ लावून मी स्वस्थ होते. पण, या आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या गोष्टींचं काय होणार? हा सहज मनात आलेला विचार अस्वस्थ, अंतर्मुख करणारा होता. मात्र सकाळपासून निसर्गाच्या सान्निध्यात मिळालेल्या सकारात्मक विचारांनी एक वेगळी ऊर्जा दिली. मनात आलं आपण आपल्या आयुष्याचा परीघ ओलांडून पाहिला तर? सृष्टीतील विविध आवर्तनांच्या विलोभनीय खेळाचा ‘आस्वाद’ कवितेपुरता न ठेवता तो आपल्या प्रत्यश्र जगण्यातील विचारांचा भाग बनेल का? एका व्यापक परिघाचा विचार करता येईल का? पानगळ.. बहर.., दिवस.. रात्र.., काहीच कायमचं नाही. प्रत्येक आरंभाला शेवट आहे तसा प्रत्येक शेवटातून आरंभ आहे.
या विचारांना आधार देणारी फार पूर्वी वाचलेली ‘यिन-यांग’ वर्तुळ ही चिनी संकल्पना आठवली. काळं-पांढरं, सृजन-विनाश या द्वैताचं एक वर्तुळाकार चिन्ह! सृजनाच्या अध्र्या भागात विनाशाचं एक सूक्ष्म बीज असतं आणि विनाशाच्या अध्र्या भागात सृजनाचं! एक अवस्था पूर्णत्वाला गेली की दुसऱ्या अवस्थेची सुरुवात होते. दिवस मावळत मावळत अंधार घनगर्द झाला की उजाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. हा आपलाही अनुभव असतोच की!
एकामागून एक करीत मनात असंख्य विचारतरंग उमटत होते. मग आयुष्यातले अनेक खचवणारे प्रसंगही आठवत गेले. त्या वेळी वाटलं होतं की संपलं सगळं. पण नाही. उभं राहता आलं नव्या दमानं पुन्हा. राखेतून नवा जन्म घेऊन उभ्या राहिलेल्या माणसांची कितीतरी उदाहरणंसुद्धा पाठोपाठ आठवत गेली. अंतर्मुख अवस्थेत वाटून गेलं की व्यक्ती ‘मी’ला पुनर्जन्म खरंच असेल किंवा नसेलही पण ही कल्पना स्वीकारली तर आज राहिलेलं काम उद्या लवकर उठून करू म्हणून निवांत झोपता येतं, तसं या जन्मात साकारायची राहिलेली स्वप्नं पुढल्या नव्या जन्मात साकारता येतील, असं म्हणून मृत्यूलाही निवांतपणे सामोरं जाता येईल! असा दिलासा देण्यासाठीच योजली असेल का ही कल्पना कुण्या विचारवंतांनी? विचारांशी खेळता खेळता त्या कल्पनेतलं काव्य उमगलं! एका वेगळ्या समाधानात मी डायरी बंद केली. डोळे मिटले. वाटलं आज मी काहीतरी मौल्यवान कमावलंय!
पण विस्तारलेल्या जाणिवेला त्या समाधानात दिसलं एक प्रश्नचिन्ह.. आपण वर्षांनुर्वष अनुभवत असतो की रात्रीनंतर दिवस येतो तसा वर्षांखेरीनंतर वर्षांरंभ येतो. पुनर्जन्म संकल्पना असं मानायला जागा ठेवते की एका जन्मानंतर दुसरा जन्म असू शकतो. किंवा जीवनसातत्य टिकलेलं तर अनुभवतोच आपण. पण या एकूण एक अस्तित्वाच्या अंतानंतर काय असेल? असेल का नाही? व्याकूळ करणारा प्रश्न मनात उमटला आणि पाठोपाठ आठवली अलीकडेच अनुवाद केलेली डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी यांची एक कविता, ‘तरीही काही बाकी राहील’ म्हणत या प्रश्नाला आश्वासक उत्तर देणारी! वर्षांखेर साजरी करताना या कवितेचा आशय सोबत घेण्यासारखा आहे.

‘चिता पेटली आहे
आणि जळतं आहे स्मशान
पण मी तुम्हाला सांगतो
तरीही काही बाकी राहील
काय राहील
हे मला माहीत नाही
किती राहील
याचा अंदाज तुम्ही स्वत: करा
का राहील
हा एक निर्थक प्रश्न आहे
मी फक्त इतकंच जाणतो
की काही तरी राहील.

तुम्हाला खात्री आहे काय
की जगण्याच्या इच्छा मरून जातील
झरून जातील श्रद्धा
सुकून जातील स्वप्नं
व्यर्थ होऊन जातील शब्द..

तुम्हाला खात्री आहे काय
की आग सगळं काही जाळून टाकू शकते
सगळं काही सुकवू शकते हवा
पाणी सगळं काही विरघळवू शकतं
सर्व काही नष्ट करू शकतं ब्रह्मास्त्र?
नाही, निश्चित काही बाकी राहील
कुठे आणि कसं आणि किती?  
हे तर तेच सांगेल
जे राहील..!’’

Story img Loader