हिंदी चित्रपटांतील गाणी म्हणजे ‘भावनांक’ या संकल्पनेचे आपोआप उलगडत जाणारे पापुद्रे. सर्व रसांचा परिपोष करणारी ही गाणी ऐकणं म्हणजे मानसशास्त्र अनुभवामध्ये जगण्याचे काही क्षण… कधी ही गाणी आपल्यासाठीच लिहिली गेली आहेत, असं वाटायला लावतात, तर कधी दुसऱ्यांच्या भावना समजून घ्यायला मदत करतात… म्हणूनच मग ‘तेरे बिना जिंदगी से कोई’सारखं गाणं कधीही, कुठेही ऐकलं तरी मनाला भिडतं, तर ‘आ चलके तुझें, मैं लेके चलूँ,’सारखं गाणं आशावाद जागवत राहतं. एकांतात असलो काय किंवा समूहात… ही गाणी आपल्याला भावनेच्या हिंदोळ्यांवर कायमच झुलवत ठेवतात…

प्रेक्षागृहातले दिवे मंद होतात आणि समोरचा पांढरा पडदा जिवंत होतो. ‘प्यार हुवा इकरार हुवा है, प्यारसे फिर क्यूं डरता है दिल’… सुरांबरोबर प्रेक्षक आपापल्या हातापायांचा ताल धरतात. समोर असतात पावसात निथळणारे (छत्री असूनही) नर्गिस आणि राज कपूर. किती पिढ्या जातील-येतील,अशा गाण्यांची मोहिनी अजूनही तशीच दाट. ध्रुपद संपून पहिले कडवे सुरू होता होता चित्र आणि सूर थबकतात. पडदा शांत होतो…

‘‘रसभंगाबद्दल मनापासून क्षमायाचना. जनमानसावर नाजूक पकड जमवून असलेली अशी अनेक हिंदी गाणी आपापला ‘ईक्यू’ (Emotional Quotient) म्हणजे ‘भावनांक’ वाढवण्यासाठीची साधनसामुग्री म्हणून कशी वापरू शकतो ते आज आपण एकत्र शिकणार आहोत.’’ असं म्हणून पुढच्या दोन तासांच्या यात्रेला सुरुवात होते. शहरे बदलली, श्रोते बदलले, पण भावनांना समजून घेण्याच्या या पाककृतीची लज्जत काही कमी झालेली नाही…

उदाहरणादाखल हेच गाणं घेऊया. पहिल्या चार ओळींचे शब्द वाचले तर त्यामधून व्यक्त होणारी भावना आहे, भविष्यातील असुरक्षिततेबद्दलची चिंता आहे, प्रेम अतूट आहे तरीही काळजी आहे. मुक्कामाला कसं पोहोचणार याबद्दल शंका आहे. तरीही धून इतकी खेळकर का? ताल इतका उडता का? असे प्रश्न उपस्थित केले की प्रेक्षक बोलायला लागतात…

‘‘त्या दोघांनी एकत्र असणं इतकं महत्त्वाचं आहे की त्यामुळे चिंतासुद्धा प्रसन्न बनते.’’

‘‘आशावाद परिस्थितीवर अवलंबून नसतो. आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. पहिल्या कडव्यानंतरचा, गाण्यात दिसणारा तो टपरीतला चहावालासुद्धा आशावादी आहे.’’

‘‘गाणं सुरू होतं तेव्हा, ‘मालूम नहीं हैं कहाँ मंझील…’ या ओळीमध्ये ‘मंझील’ हा शब्द पहिल्यांदा प्रश्नार्थक येतो आणि दुसऱ्या वेळेला ‘मंझील सापडली’ असा येतोय पहा…’’ आम्ही त्या ओळी पुन्हा ऐकतो आणि पाहतो. ही चर्चा करणारी सर्वसामान्य माणसं असतात, मानसशास्त्राचे विद्यार्थी वगैरे नसतात. पण ‘भावनांक’ या संकल्पनेचे पापुद्रे आपोआप उलगडले जातात.

अनेक विषयांमध्ये तपशिलात शिरून नवं ज्ञान मिळवणारे आपण भावनांच्या अनुभवांबद्दल मात्र तितके सजग असतो असे नाही. ‘मॅड, बॅड, सॅड, आणि ग्लॅड’ या चौकटीमध्ये आपल्या भावना कोंबून बसवलेल्या असतात. भावनिक अनुभवाबद्दलची जाण माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला सक्षम बनवते, असं शिक्षणशास्त्र सांगतं आणि अध्यात्मसुद्धा. भावनिक अनुभवाचे पैलू असतात. भावनांमध्ये ऊर्जा असते. ती आपल्या शरीरातील अवयव संस्थांवर तसेच वर्तनावर भलाबुरा परिणाम करते. आपली संपूर्ण देहबोली सतत भावनांची अभिव्यक्ती करत असते. मनातले विचार (अंतर्वाणी) आणि बाह्यवाणी हेसुद्धा भावनिक अनुभवाचा अभिन्न घटक असतात.

ही सारी थियरी शिकण्यासाठीचे एक साधन आहे ‘आंधी’ चित्रपटातील, ‘तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नहीं…’ हे अजरामर गाणं. गाण्याचे शब्द म्हणजे नायक-नायिकेचं स्वगत अर्थात मनातले विचार. त्यात दिसणारा त्यांच्या नात्याबद्दलचा दृष्टिकोन. अनेक वर्षांनी भेटल्यानंतरची त्यांची देहबोली… काहीशी अवघडलेली, पण तरीही उत्सुक. दोन कडव्यांमधल्या अवकाशात आहे तो त्यांचा प्रकट संवाद. दुपारकडून-संध्याकाळकडे कलणारी वेळ. हवेतला गारवा वाढलाय. तो आपला कोट तिच्या खांद्यावर ठेवतो आहे. भावनांची ऊब देणारं त्याचं वर्तन…

तुम्हाला सांगतो, प्रेक्षक मंडळी हे सारे तपशील अगदी आनंदाने पुरवतात. मानसशास्त्र अनुभवामध्ये जगण्याचे क्षण असतात हे. या गीताच्या निर्मितीमध्ये सहभाग असलेल्या प्रत्येकाच्या कामगिरीबद्दल चर्चा होते. ‘‘या गीताचा कवी, चित्रपटाचा पटकथा-संवाद लेखक आणि दिग्दर्शक एकच असल्याने अनुभव एकजिनसी झाला आहे.’’ एक मत.

‘‘आर.डीं.ची प्रतिभा पाहा… हे गाणं म्हणजे स्वत:च्या वडिलांना केलेला मानाचा मुजरा.’’

त्यानंतर सूर आणि भावना यांच्यावर चर्चा होते. ‘तुम जो कह दो तो आज की रात चाँद डूबेगा नहीं, रात को रोक लो…’ ही ओळ मी गाऊन दाखवतो. वरवर गेय न वाटणाऱ्या शब्दांना सुरांनी कसं रत्नहारासारखं बांधलं आहे त्याचा अनुभव येतो. स्वत:च्या आणि दुसऱ्यांच्या भावनांबद्दलचं ‘भान आणि जाण’ ही भावनांक वाढवण्याची पहिली पायरी. भावनांच्या छटा ओळखणं आणि त्याला ‘नाव देणं’ ही पुढची.

प्रत्येक रचनेमध्ये प्रामुख्याने दिसणाऱ्या भावनांचा एक पट असतो… पण त्यामागे अनेक भावना दडलेल्या असतात. दिसणाऱ्या आणि दडलेल्या भावना शोधूया आपण… असे म्हणून पुढची फेरी सुरू होते. ‘तुम इतना जो मुस्कुरा रहे हो’ या गाण्यामध्ये दिसणाऱ्या भावनेमागे, ‘क्या गम है जिस को छुपा रहे हो’ ही दडलेली व्यथा आहे. गाणं ऐकायचं आणि त्यावर बोलायचं ही सवय आता श्रोत्यांच्या अंगवळणी पडायला लागते.

‘तुम्हे हो न हो, मुझको तो इतना यकीन है, मुझे प्यार तुमसे नहीं है…नहीं है’ मी गद्यामध्ये हे शब्द म्हणून दाखवतो. किती आत्मविश्वास आहे पहा या नकारामध्ये, असं म्हणून गाणं लावल्यावर हास्यकल्लोळ उडतो. कारण संगीताचा पेहराव चढल्यावर त्या नकाराचा चक्क होकार बनलेला असतो. ‘दो दिवाने शहरमें’ आणि ‘एक अकेला इस शहरमें’ ध्रुपदामधले हे शब्द बदलले तर गाण्याची आणि चालीची प्रकृती कशी बदलते ते अनुभवताना प्रत्येकाला काहीतरी नवं ‘कळल्याची’ भावना आलेली असते.

स्वत:च्या भावनांचं नियोजन करता येणं हा भावनांकातला पुढचा टप्पा. मोकाट सुटलेल्या भावना दाखवणारी अनेक गीतं आहेतच. आणि भावनांचे नियमन करायला सांगणारीसुद्धा गीतं आहेत. हिंदी फिल्म संगीताचा विशेष म्हणजे त्यामध्ये एकही भावना वर्ज्य मानलेली नाही. अत्यंत थिल्लर शब्दांपासून, मनाला खोल स्पर्श करणारी गाणी आहेत. त्यात संताप, द्वेष, अतिआत्मविश्वास, क्रौर्य, शौर्य, हेवा, मुका राग अशा एका भावकुटुंबातील अनेक छटा दाखवणाऱ्या रचना आहेत. ‘दुखी मन मेरे’मध्ये कठीण परिस्थिती सोडून जाण्याचा संदेश आहे. ‘छोड दे सारी दुनिया किसीके लिए, ये मुनासीब नहीं आदमी के लिए’ मध्ये परिस्थितीचा सामना करायला लावणारी वृत्ती आहे. ‘न जाओ सैंया, छुडा कें बैया’मध्ये व्याकूळ आर्तता आहे, तर ‘आयेगा आनेवाला’मध्ये हुरहुर लावणारी असोशीसुद्धा आहे. कधी गूढतेचं वलय असणारी असुरक्षितता (गुमनाम हैं कोई) तर ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’ मध्ये संधिकालच्या धूसरतेमधला आशा-निराशेचा खेळही आहे. जीवन-मृत्यूच्या चक्राला स्पर्श करणारा.

प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा म्हणतात की, ‘‘बॉलीवूड आणि क्रिकेट या दोन गोष्टी भारतीय एकात्मतेची प्रतीके आहेत.’’ फिल्मी संगीताची ही सादरीकरणं मी पंजाबपासून ते तमिळनाडू-केरळपर्यंत केली आहेत. ‘मैत्री’ या भावनेचं राष्ट्रगीत आहे, ‘शोले’मधले, ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन टिकलेलं माध्यम आहे हे. शिवाय तरुण पिढीलाही जुनी गाणी छान ठाऊक असतात हा एक फायदा.

प्रेक्षकांप्रमाणे मी गाणी बदलतो. ओटीटीवर आलेल्या ‘ज्युबिली’ या मालिकेमधले, ‘तेरे-मेरे इश्क का इक शायराना दौर सा था’ हे गाणं मी नुकतंच माझ्या कोठारात घेतलं. फिल्मी नसलेली पण हिंदीतली काही गाणीही तरुणाईसाठी वापरायला छान असतात. उदाहरणार्थ, प्रतीक कुहाडची काही गाणी.

स्वत:च्या भावनिक नियोजनाबरोबरच दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं हा भावनांक विकासाचा पुढचा टप्पा. त्यासाठी आवश्यक असतात, आस्था, कणव, सह-अनुभूती यांसारख्या भावना. हिंदी चित्रपटगीतांमध्ये वापरलेल्या ‘प्रार्थना’ या सूत्रावर खरं तर एक संपूर्ण कार्यक्रम होऊ शकतो. विविध उन्नत भावनांची पखरण असलेल्या गीतांची एक मोठी रेंज इथेही सहजपणे सापडते.

गाण्याच्या सुरुवातीआधीची शांतता म्हणजे गीताचा खरा प्रारंभ. ‘तारे जमींपर’मधल्या ‘माँ’ या गाण्याच्या आधीचा प्रसंग मी दाखवतो. गीत संपल्यावरची शांतता आणि त्यातल्या भावना अनुभवल्या आहेत अशी उदाहरणं द्या पाहू, असा प्रश्न प्रेक्षकांना करतो. गंमत म्हणजे, या टप्प्यावरचे प्रेक्षक गाण्याआधी आणि नंतर असलेली ‘भावनिक बांधणी’ खूप छान उचलतात. फिल्मी संगीत आपण ऐकताना पाहतो आणि पाहताना ऐकतो. संगीत आणि दृश्य यांची रचना मनावर वारंवार उमटत राहाते. त्यामुळे ही गाणी पाठ करावी लागत नाहीत. शिकण्या-शिकवण्यासाठी हा मोठाच फायदा असतो. कवीचे शब्द, संगीतकाराचे सूर, दिग्दर्शक चमूचे सादरीकरण, कलावंतांचा अभिनय याचा एकसंध भावनिक परिणाम प्रेक्षक मनावर होतच असतो. आवडणाऱ्या पदार्थाची पाककृती शोधायची संधी या सत्रामधून हाती लागते तेव्हा बहुतेकजण त्यामध्ये सहर्ष सहभाग देतात.

आशावाद आणि समन्वय सांगणाऱ्या गाण्यांचाही एक मोठा गट आहे, ‘बर्फी’ मधले ‘इत्तीसी हंसी, इत्तासा टुकड़ा चाँद का, ख्वाबों के तिनकों से चल बनाएं आशियाँ’ हे गाणं मी कधी कधी वापरतो. तर कधी कधी ‘आ चलके तुझें, मैं लेके चलूँ, एक ऐसे गगनके तले’ हे माझं सगळ्यात आवडतं गाणं. भावनिक आरोग्यामधला स्वीकार आणि एकात्मता फार छान साधली आहे त्यात. भावनांचा हा सरस आणि स‘रस’ अनुभव घेताना आमचे दीड-दोन तास कापरासारखे उडून जातात. हाताला खूप काही लागलं असा भाव असतो आणि मन अगदी ताजंतवानं झालेलं असतं.

‘‘हिंदी गाण्यांकडे पाहायची नजरच बदलली माझी.’’

‘‘आता घरी अंताक्षरी खेळताना भावनांच्या भेंड्या लावू.’’ अशा प्रतिक्रिया सर्व वयोगटातील मंडळी देत असतात. भावनिक स्वास्थ्याच्या प्रबोधनाचा इतका सर्वमान्य मार्ग सापडणं कठीण.

या सूत्रावरच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हा कार्यक्रम सादर करण्याचा प्रसंग आला. लोकप्रिय संगीताच्या माध्यमातून भाव-जागरण म्हणजे संस्कृतीमधला एक महत्त्वपूर्ण पैलू, जन-शिक्षणासाठी वापरणं. सर्व परदेश तज्ज्ञांनी अगदी ‘आ वासून’ हे सत्र ऐकलं-पाहिलं कारण परिषदेमधले सर्व स्वदेशी प्रतिनिधी त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ‘‘तुमच्या चित्रपटांमध्ये अशक्य प्रसंगी त्या व्यक्तिरेखा अशक्य गाणी गातात… आणि तुमचे लोक ती इतक्या समरसतेनं ऐकतात हे सगळ्यात अशक्य!’’ युरोपातील एक ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ म्हणाले. ‘‘मला त्यातलं एक अक्षरही समजलं नाही, पण तुम्हा सर्वांच्या भावना मात्र अगदी जशाच्या तशा उतरल्या मनात.’’ अमेरिकेतल्या एक मनोविकारतज्ज्ञ म्हणाल्या.

या संगीताबरोबरचा माझा प्रवास, रेडीओतल्या ‘बिनाका गीतमाला’पासून सुरू झाला आणि एफ.एम. तसेच ब्लू टूथच्या जमान्यातही तो निरंतर चालू आहे. प्रवासात असतानाही आणि निवांतपणा अनुभवतानाही, मित्रमैत्रिणींच्या समूहातही आणि स्वत:बरोबर चालतानाही… जशी मनाची अवस्था, नेमके तसे गाणे पुढे आणणाऱ्या या ‘पद्याखाणी’ला जितकी दाद द्यावी तितकी थोडीच!

anandiph@gmail.com