आरती अंकलीकर
‘‘मला ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट होती. या पुरस्कार सोहळय़ातला प्रत्येक क्षण मी लहान मुलाच्या उत्सुकतेनं, उत्साहानं अनुभवला. आम्हा कलाकारांसाठी मैफली, कार्यक्रम हे नेहमीचे, पण असा देशाचा, मानाचा पुरस्कार मनोबल आणखी वाढवतो. रसिकांनी इतकी वर्ष दिलेल्या प्रेमाची पावतीच या पुरस्कारांमधून आम्हाला मिळत असते.’’
गेल्या वर्षी मे महिन्याच्या मध्यावर मेलबर्न, ऑस्ट्रेलियामधून मला फोन आला. मार्च २०२३ मध्ये मेलबर्नला शास्त्रीय संगीताचा महोत्सव- ‘मेलबर्न हिंदूस्थानी क्लासिकल म्युझिक फेस्टिव्हल २०२३’ होणार होता. त्यात गाण्याचं निमंत्रण देण्यासाठी होता तो फोन. पुढे काही दिवस बोलणं झालं आणि मेअखेरीस माझा ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित झाला. मग न्यूझीलंडच्या रसिकांना ही बातमी कळली,त्यांनी ही संधी साधून मला न्यूझीलंडमध्ये कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. कार्यक्रमाचं निमंत्रण, तेही निसर्गाचं वरदान लाभलेल्या नंदनवनातून आलं होतं. त्यामुळे आमंत्रण न स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता!
गोष्टी पडताळून पाहिल्या आणि न्यूझीलंडचे फेब्रुवारी २०२३ चे कार्यक्रमही ठरले. ८ फेब्रुवारीला भारतातून निघणं आणि १५ मार्चला परतणं, असा कार्यक्रम ठरला. आता पासपोर्ट, व्हिसा, कागदपत्रं, सगळं सुरू झालं. भारतातून व्हिसा आवश्यक असलेल्या कोणत्याही दोन देशांत जायचं असेल तर कमीत कमी ८-९ महिने आधी तयारी सुरू करावी लागते. त्याप्रमाणे मी तयारी सुरू केली. नोव्हेंबरच्या ११ तारखेला मी न्यूझीलंडच्या व्हिसासाठी अर्ज केला आणि चार दिवसांत मिळालासुद्धा व्हिसा! ऑस्ट्रेलियाच्या व्हिसाला मात्र एक महिना लागतो असं कळलं, म्हणून डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात तो अर्ज करायचा ठरला. कार्यक्रम ठरले होते, तारखा ठरल्या होत्या, हॉलचं बुकिंग झालं होतं. आता व्हिसा मिळाला की तिकीट काढायचं! या सगळय़ा घटनांच्या दरम्यान २५ नोव्हेंबरला संध्याकाळी मी चहा पीत आईशी गप्पा मारत बाल्कनीत बसले होते. तेव्हा एक फोन आला, ‘‘आरतीजी, बधाई हो! आपको २०२० का ‘संगीत नाटक अकादमी’ अॅवॉर्ड घोषित हुआ हैं..’’ पाठोपाठ अकादमीच्या वेबसाइटवर ही घोषणा झाल्याचा फोटोही आला. मग एकापाठोपाठ एक फोन सुरू झाले. खूप आनंद झाला. आई खूश! काही दिवसांत ‘संगीत नाटक अकादमी’चं पत्र आलं. मनात धाकधूक सुरू झाली. पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळायचा आहे. समारंभाची तारीख कोणती ठरणार? फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचा दौरा. या तारखांमध्ये जर राष्ट्रपतींनी तारीख दिली तर हा दौरा पुढे ढकलावा लागेल. एप्रिल महिन्यात या देशांमध्ये थंडी सुरू होते. त्यामुळे दौरा मार्चपर्यंतच शक्य होता. विचारांचं काहूर उठलं. बरं, माझ्या हातात यातलं काहीच नव्हतं. केवळ वाट पाहणं! ते सुरू झालं. राष्ट्रपतींच्या तारखेची वाट पाहणाऱ्या माझ्या टीममध्ये बरीच मंडळी होती. प्रामुख्यानं न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे आयोजक!
जानेवारी उजाडला. ऑस्ट्रेलियाचा व्हिसा आला नव्हता. १७ जानेवारीला ‘संगीत नाटक अकादमी’चं पत्र आलं. सन्माननीय राष्ट्रपतींनी त्यांची तारीख कळवली होती आणि पुरस्कार सोहळय़ाची तारीख निश्चित झाली होती, ती होती २३ फेब्रुवारी. २२ फेब्रुवारीला समारंभाची तालीम होती आणि २३ फेब्रुवारीला समारंभ! न्यूझीलंडचा निळाशार समुद्र, मेलबर्न, तिकडचा रंगमंच, मैफली, श्रोते.. सगळं काही एका क्षणात डोळय़ांसमोर येऊन नाचू लागलं. एकीकडे ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ आणि दुसरीकडे हा दौरा. निर्णयाची वेळ आली होती, दौरा की पुरस्कार? मग चर्चा सुरू झाली आयोजकांशी आणि न्यूझीलंडच्या आयोजकांमुळे उत्तम तोडगा निघाला. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार आहे पुरस्कार. तुम्ही जरूर जा दिल्लीला. आपण आपला दौरा २६ फेब्रुवारीपासून सुरू करू या. आम्हाला अभिमान आहे तुमचा!’’ खूप दिलासा मिळाला.
फेब्रुवारी आला. दोन महिन्यांनंतरही ऑस्ट्रेलियाच्या व्हिसाचा पत्ता नव्हता. कुठे काय चुकलंय ते कळत नव्हतं. मी भारतातल्या इतर कार्यक्रमांत आणि दिल्लीच्या तयारीत व्यग्र होते. आता २६ फेब्रुवारीला न्यूझीलंडला जायचं ठरवलं. तिथे जाऊन ऑस्ट्रेलियाच्या व्हिसाची वाट पाहायची. आता दिल्लीचे विचार मनात घोंघावू लागले. अनेक कलाकारांची भेट होणार होती दिल्लीत. करोनाच्या साथीमुळे तीन वर्ष ‘संगीत नाटक अकादमी’नं पुरस्कार जाहीर केले नव्हते. बैठका होऊ शकल्या नव्हत्या. आता २०२३ मध्ये २०१९, २०२०, २०२१ अशा तिन्ही वर्षांचे पुरस्कार एकत्रितपणे घोषित केले होते. १२६ जणांची मोठी यादी. हिंदूस्थानी संगीतातले पं. विनायक तोरवी, पं. उदय भवाळकर, शुभ्रा गुहा ही मंडळी भेटणार होती तिथे!
२२ फेब्रुवारीला सकाळी मी आणि माझी जिवलग मैत्रीण संयोगिता दिल्लीला निघालो. विमान उतरण्याआधी अर्धा तास कॅप्टननं सांगितलं, दिल्लीत खूप धुकं असल्यामुळे विमान अमृतसरला नेतोय. वाटलं, आपली पुरस्कार समारंभाची तालीम चुकणार; पण दहा मिनिटांत धुकं ओसरून हवामान सुधारलं आणि आम्ही एक तास उशिरा दिल्लीत उतरलो. हॉटेलमध्ये पोहोचलो, तर लॉबीमध्ये जणू सगळं कलाविश्व अवतरलं होतं. भारतातले प्रथितयश गायक, वादक, हिंदूस्थानी, कर्नाटक संगीत, लोककला, नाटय़ क्षेत्रातले कलावंत.. कुणी मणिपूरचा- पारंपरिक मणिपुरी पेहरावात, कुणी तामिळनाडूचे लुंगी-कुडता, कांजीवरम साडीमध्ये, कुणी नृत्यांगना, गायक, वादक, सगळेच अतिशय रंगीबेरंगी- विशेषत: त्यांच्या भागातल्या विशेष पेहरावात आले होते. २ वाजता विज्ञान भवनात रिहर्सल होती. आम्ही सगळे अकादमीनं ठरवलेल्या बसमधून विज्ञान भवनात पोहोचलो. करोनापूर्वी दरवर्षी ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनात होत असे. भारतभरच्या साधारण ४०-४२ कलाकारांना पुरस्कारित केलं जात असे. पण या वर्षी १२० जण असल्यामुळे विज्ञान भवनाची निवड करण्यात आली. राष्ट्रपती भवनात समारंभ झाला असता तर आणखी दिमाखदार झाला असता सोहळा! विज्ञान भवनात अतिशय कडक सुरक्षाव्यवस्था होती रिहर्सललासुद्धा. अनेक सुरक्षा कडय़ांमधून जावं लागलं. आत गेल्यावर एकच गडबड उडाली. आपापलं नाव असलेल्या खुर्चीवर जाऊन बसायचं होतं. अनेक वयस्कर, व्हीलचेअरवरचे कलाकारदेखील होते, त्यांची सोय करण्यात आली. आम्हीही स्थानापन्न झालो. मंचावर जाऊन पुरस्कार घेण्याची तालीम झाली. झाडून सगळय़ांची. अगदी व्हीलचेअरवाल्यांची आणि ती ढकलणाऱ्यांचीसुद्धा! सन्माननीय राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे ‘प्रोटोकॉल’ला खूप महत्त्व. तालीम सुरू असताना कुणी तरी बातमी दिली, की उद्या राष्ट्रपती महोदया थोडाच वेळ देऊ शकतील. १२० जणांना पुरस्कार देण्याइतका वेळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ९-१० जणांना पुरस्कार देऊन त्या जातील. ती बातमी सगळीकडे पसरली. सगळे खिन्न, उदास, थोडे नाराज. मी मात्र ठरवलं की जे होईल ते स्वीकारायचं. भारत सरकारचा बहुमान आहे. श्रोत्यांनी केलेल्या प्रेमाचं फळ!
२३ तारीख उजाडली. सकाळी हॉटेलच्या लॉबीमध्ये सगळी कलावंत मंडळी जमली. अनेक रंगांची, संस्कृतीची उधळणच. वेगवेगळय़ा वेशभूषा, तशाच भाषाही. आम्हा सगळय़ांना पासेस, बॅचेस देण्यात आले. आम्ही बसमध्ये बसलो. पुरस्कार विजेत्यांना खास लाल सुरक्षा पासेस दिले होते. राष्ट्रपतींच्या हस्ते, त्यांच्याजवळ जाऊन पुरस्कार घेणार म्हणून! विज्ञान भवनात पोहोचलो ९ वाजता. तिथले सुरक्षारक्षक आम्हाला आमच्या पर्सेस आत नेऊ देईनात. सुरक्षा नियम! सगळा गोंधळ उडाला. जवळच एक काऊंटर होता फूटपाथवर. तिथे जमा करा म्हणाले. परत टेन्शन. देवाचं नाव घेऊन ठेवल्या पर्सेस तिथे आणि आत प्रवेश केला. कालच्या आणि आजच्या वातावरणात खूप फरक होता. आज प्रत्यक्ष राष्ट्रपती येणार म्हणून सुरक्षा अतिशय कडक होती. कसून तपासणी होत होती. आम्ही सगळे स्थानापन्न झालो.
एवढय़ात माननीय राष्ट्रपतींचं आगमन झालं. त्यानंतर राष्ट्रगीत झालं. भारताच्या कानाकोपऱ्यातून आले होते कलाकार. वाजणाऱ्या राष्ट्रगीतामध्ये त्यांनी आपला सूर मिसळला होता. अतिशय सुरेल आणि लयबद्ध गात होते सगळे. राष्ट्रगीत जेव्हा समूहात गायलं जातं तेव्हा काही औरच मजा येते! अभिमानानं ऊर भरून येतो. राष्ट्रपती शेवटपर्यंत थांबणार की नाहीत ही शंका होतीच सर्वाच्या मनात. पहिले ४० पुरस्कार झाले. मी रांगेत उभी होते. एवढय़ात माननीय द्रौपदीजींना खुर्चीवर बसायला नेलं. आणि एका मंत्री महोदयांचं भाषण सुरू झालं. २०१९ चे पुरस्कार झाले होते. २०२० मध्ये माझा दुसरा नंबर होता. शंकेची पाल चुकचुकली मनात, ‘जातील का राष्ट्रपती?’ एवढय़ात भाषण संपलं आणि राष्ट्रपती परत उठून व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला आल्या. माझं नाव पुकारलं गेलं.
माझं अभिनंदन करत त्यांनी मला पुरस्कार प्रदान केला. तो घेऊन मी व्यासपीठावरून उतरत असताना गुरुजन, आईवडील, कुटुंबीय, हितचिंतक, श्रोते आणि परमेश्वर सगळय़ांचं स्मरण झालं. पुरस्कार घेऊन मी जागेवर येऊन बसले. बाकी सोहळा निर्विघ्न पार पडला. सगळंच सुरळीत झालं होतं. राष्ट्रपती महोदया शेवटपर्यंत अतिशय उत्साहानं हजर होत्या. उत्तम भाषण झालं त्यांचं. सगळय़ा कलाकारांच्या डोळय़ांत आनंद, अभिमान ओसंडून वाहत होता. राष्ट्रपती लवकर जातील ही अफवा ज्यानं पसरवली तो मात्र नंतर कुणाला सापडला नाही!
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २४ तारखेला परत पुणे. आता बॅगा भरायच्या आणि २६ तारखेला न्यूझीलंडला जायचं आणि ठरवल्याप्रमाणे मी निघाले. आज वेलिंग्टनमध्ये बसून हा लेख लिहिते आहे. निसर्गाचं वरदान लाभलेला सुंदर देश! दूरवर पसरलेला अथांग सागर, त्याचं निळंशार पाणी, लांबवर जाणारे निर्जन किनारे, अगदी स्वच्छ-सुंदर. डोंगरांच्या रांगा, टुमदार घरं, वळणदार मोकळे रस्ते, शिस्तीत जाणारी वाहनं. उन्हाळा असूनदेखील हवेत गारवा.
आम्हा मुंबईकरांसाठी हिवाळाच! वेलिंग्टन वाऱ्याचं शहर. सोसाटय़ाचा वारा वाहतो इथे. आता दोन कार्यक्रम होतील. एक ‘इंडियन हाय कमिशन, वेलिंग्डन’मध्ये, दुसरा ख्राईस्टचर्चला. त्यानंतर परत ऑस्ट्रेलियाच्या व्हिसाची वाट पाहणं सुरू! मेलबर्नला कार्यक्रम आहे महोत्सवात. ऑस्ट्रेलियाला जाऊ शकले की नाही ते तुम्हाला सांगेनच.. पुढच्या लेखात!