‘संगीत-श्रवण’ ही कला हौस किंवा आवड यापलीकडे व्यासंगापर्यंत ज्यांना न्यायची आहे, त्यांच्यासाठी अष्टौप्रहर सुरेल संगीताचा आनंद घेणं हा मनाला समृद्ध करणारा अनुभव. अभिजात संगीतातून निर्माण होणारं नादसौंदर्य हे मनावर दीर्घकाळ आनंद टिकवून ठेवणारं असतं. त्यामुळे ज्यांना कानावर पडणाऱ्या नेहमीच्या गदारोळापासून काही काळ का होईना मुक्ती हवी आहे, अशांसाठीदेखील ही एक ‘करून बघण्यासारखी’ गोष्ट आहे.
दरवर्षी नव्या वर्षाची सुरुवात आपण अनेक सुंदर संकल्प मनात घेऊन करत असतो, कारण चाकोरीबद्ध जीवनाला विविध अंगांनी समृद्ध करणारे आपल्यातलेच काही पैलू आपल्याला अधिक तजेलदार आणि चमकदार बनवण्यासाठी खुणावत असतात. ध्वनी किंवा नाद हादेखील मनाला समृद्ध करणारा असाच एक सुंदर पैलू. हा पैलू जोखण्यासाठी आणि कसण्यासाठी मी यंदाच्याही वर्षी ‘ध्वनिसौंदर्या’ची परिचित आणि अपरिचित दालनं शोधत राहणं असा संकल्प मनात घेऊन त्या दिशेनं भटकंती सुरू केली. पहिल्यांदाच समोर आलं ते भारतीय अभिजात संगीताचं भरजरी आणि समृद्ध दालन…
महाराष्ट्रातील अनेक सांस्कृतिक नगरं ज्याप्रमाणे वर्षाची सुरुवात अभिरुचिसंपन्न वातावरणात करतात; त्याप्रमाणेच नाशिक या सांस्कृतिक नगरीचीही सुरुवात गेल्या काही वर्षांपासून अभिजात संगीताच्या एका सुरेल पर्वणीनं होत असते. ‘अष्टौप्रहर स्वरहोत्र’ हे या संगीत पर्वणीचं नाव. यात गावकुसाच्या बाहेर असलेल्या भव्य अशा बालाजी मंदिराच्या अष्टकोनी गाभाऱ्यात आणि विस्तीर्ण परिसरात अखंड चोवीस तास, हजारो रसिक श्रोते अभिजात संगीताचा मनमुराद आनंद लुटताना तल्लीन झालेले दिसतात. जानेवारी महिन्याच्या ऐन कडाक्याच्या थंडीतही सुरांची उबदार दुलई पांघरणारा रसिकांचा हा मेळा बघून सादरकर्त्या कलाकारांनाही एक वेगळीच ऊर्जा मिळत असावी. मॅरेथॉन पद्धतीने चालणाऱ्या या ‘अष्टौप्रहर’ संगीत पर्वणीतून श्रोत्यांना एकाच छताखाली आठही प्रहरांतून गायल्या आणि वाजविल्या जाणाऱ्या भारतीय रागरागिण्यांना भेटता येतं. दिवसाच्या प्रत्येक प्रहराशी सुसंवादी असलेल्या रागरागिण्यांच्या भावप्रतिमा महोत्सवातील सहभागी कलाकार अतिशय तयारीनं आणि तन्मयतेनं सादर करत असतात; आणि श्रोतेही त्या तितक्याच चोखंदळपणे कानात साठवून घेत असतात. उत्तर भारतीय संगीत पद्धतीच्या रागरागिण्यांचं वर्गीकरण ज्या दहा थाटांमध्ये केलं जातं, त्या दहाही थाटांतील राग या महोत्सवातून एकामागून एक रागसमय चक्रानुसार ऐकायला मिळतात. याचा एकत्रित परिणाम म्हणून ध्वनिसौंदर्याचा दीर्घकाळ मनावर रेंगाळणारा एक वेगळाच आनंद अनुभवता येतो.
मोबाइलशिवाय पानही न हलणाऱ्या आजच्या जगात हे दर्दी रसिक हातातलं सगळं बाजूला ठेवून, एकाच ठिकाणी तासन्तास बसून समाधी लागल्यागत भान हरपून रागसंगीत ऐकत असतात. अर्थातच, अशा प्रकारच्या अभिजात संगीतामध्ये काही तरी विलक्षण आकर्षण आणि नाद लावण्याचं सामर्थ्य असतं म्हणूनच ना!
अशा प्रकारे तासन्तास संगीत ऐकणाऱ्या श्रोत्यांकडे बघून मला नेहमी असं वाटतं की, यांना सतत चोवीस तास काय ऐकायचं असतं? त्यातून काय मिळतं? त्यांच्यातल्या अनेकांशी बोलल्यावर असं लक्षात येतं की, यातील नावीन्यपूर्ण नाद-माधुर्य हेच तर भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य आहे. संगीत जरी तेच असलं, राग जरी तेच असले, तरी ते पुन:पुन्हा ऐकत राहावेसे वाटतात, कारण आठ प्रहरांतील प्रत्येक क्षणाला ते नव्यानं समोर येत असतात. म्हणून ही मंडळी या नावीन्यपूर्ण सामूहिक श्रवणासाठी समोर बसतात. सूर्यनारायणाच्या साक्षीनं सुरू होणाऱ्या दिवसाशी ‘सूर’रूपी नारायण कसा संवाद खुलवत नेतो, हे समयचक्रावर आधारित असलेल्या भारतीय रागसंगीतापेक्षा कोण बरं अधिक चांगलं समजावून सांगेल? दिवसाच्या प्रत्येक प्रहरागणिक बदलत जाणाऱ्या वातावरणातील प्रकाशरंगांच्या छटा आणि त्यांच्या हातात हात गुंफून, तितक्याच विलोभनीय पद्धतीनं साकार होणाऱ्या रागसंगीतातील सुमधुर भावछटा हा सुंदर मिलाफ अशा जिवंत मैफिलींमधून अनुभवायला मिळतो. रसिकांसाठी हे फक्त ‘ऐकणं’ नसतं, तर कानात साठवून घेणं असतं. एरवी हौस म्हणून या कानानं ऐकलेलं संगीत त्या कानानं सोडून देणं वेगळं आणि अभिजात संगीताचा जाणीवपूर्वक रसास्वाद घेता येणं वेगळं. हा रसास्वाद घेण्यासाठी अशा प्रकारच्या मोठ्या पल्ल्याच्या संगीत महोत्सवांतून रसिक मंडळी गर्दी करताना दिसतात. याचाच अर्थ अभिजात संगीतातून निर्माण होणारं ‘नादसौंदर्य’ हे मनावर दीर्घकाळ आनंद टिकवून ठेवणारं असतं.
‘संगीत-श्रवण’ ही कला हौस किंवा आवड यापलीकडे जाऊन व्यासंगापर्यंत ज्यांना न्यायची आहे, त्यांना तर हा आनंद घेणं शक्य आहेच; परंतु ज्यांना कानावर पडणाऱ्या नेहमीच्या गदारोळापासून काही काळ का होईना मुक्ती हवी आहे, अशांसाठीदेखील ही एक ‘करून बघण्यासारखी’ गोष्ट आहे. वर्षभरातून एकदा तनामनाच्या शुद्धीसाठी आपण कधी तरी एखादा उपवास करून बघतोच ना! अगदी तसंच कानांनी इतर काही सवंग ऐकण्याऐवजी एका दिवसापुरतं का होईना फक्त अभिजात संगीत ऐकून बघायला काय हरकत आहे? नसेल चोवीस तास शक्य, पण सुरुवातीला दोन-तीन तासांसाठी का होईना आपल्या आजूबाजूला जिथेही शास्त्रीय संगीताची मैफील असेल, तिथे आपण नक्कीच जाऊन बसू शकतो. शास्त्रीय संगीतातील प्रत्येक राग एक मूड तयार करीत असतो- ज्याला सामान्यत: ‘माहोल’ असं म्हटलं जातं. एरवी आपल्या मनात दर मिनिटाला शेकडो विचार येऊन जातात- जे आपल्या बुद्धीच्या सिग्नल यंत्रणेवर ताण निर्माण करत असतात. परंतु अशा प्रकारच्या शास्त्रीय संगीताच्या माहोलमध्ये तो ‘माहोल’ हा एकच सिग्नल असल्यामुळे कोणत्याही विचारचा ताण येण्याची शक्यता कमी होते. ऐकू येणाऱ्या राग संगीताचा माहोल इतका रंगत जातो की, त्या आनंदापुढे आपल्याला बाह्य गोष्टींचा हळूहळू विसर पडू लागतो. कळो अथवा न कळो, कानांनी आल्हाददायक आणि शांत करणारं रागसंगीत ऐकल्यामुळे नादसौंदर्याचा प्रवाही आनंद नक्कीच अनुभवता येतो.
मागील अनेक दशके आकाशवाणी केंद्रांवरून आवर्जून त्या त्या वेळेच्या रागसंगीताचे गायन अथवा वादन ऐकवलं जाई. श्रोत्यांना कोणत्या वेळी कोणता राग ऐकवावा याची जाण असणारे कार्यक्रम अधिकारी रागांची समयसूचकता पाळून कार्यक्रम प्रसारित करीत असत. ‘रागाला विशिष्ट वेळ असते’ हे माहिती असणाऱ्या अनेक श्रोत्यांचा कान प्रॅक्टिकली तयार होता. चुकून कधी भलत्या वेळी भलता राग लागला तर केंद्रामध्ये तशी तक्रारवजा पत्रे जात. त्या काळी दिवसातला बराच वेळ शास्त्रीय संगीत ऐकवलं जाई. लोकांकडे वेळही मुबलक होता आणि दुसरे पर्यायही नव्हते, त्यामुळे विशिष्ट वर्गाची आवड म्हणून प्रसारित होणारं संगीत हे अनेकांच्या ध्वनिसौंदर्य आस्वादाचं माध्यम बनलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडिओ केंद्रामार्फत प्रसारित होणारं संगीत हे दिनचर्येचा भाग म्हणून (ऐकणं अनिवार्य असायचं.) त्यात आजच्यासारखा ‘प्ले लिस्ट’चा ऑप्शन किंवा चॉइस नव्हता. उपशास्त्रीय संगीत, सुमधुर भावगीतं, चित्रपट गीतं असे साधारणपणे शांत करणारे व दर्जेदार संगीतही ऐकवलं जाई. परंतु शास्त्रीय संगीताच्या बाबतीत प्रात:कालीन राग, दुपारचे राग, सायंकालीन राग व रात्रीचे राग, एक वेगळीच वातावरणनिर्मिती करीत असत. विशेष म्हणजे यातील एकही संगीतसभा न चुकवणारा श्रोतावर्ग मोठा असे.
जमाना बदलला, प्रसारमाध्यमांची संख्या वाढली आणि काय केव्हा ऐकावं याचं ‘समयस्वातंत्र्य’ बोटाच्या क्लिकवर आलं. ऐकण्यातली मल्टिचॉइस मुबलकता वाढली आणि रागाची वेळ हे बंधन शिथिल पडून केव्हाही कोणताही राग ऐकावा अशी सोय आली. पण भलत्या वेळी भलता राग गायला किंवा वाजवला तर त्यातून पूर्ण रसप्राप्ती अगर समाधान होत नाही, असं मानणारा एक साधकवर्ग आजही आहे. त्यांचंही राग-समयावरचं प्रेम नाकारून चालणार नाही. ताजमहाल हा दिवसाही दिसतोच, पण रात्रीच्या चांदण्यात त्याची शोभा न्याहाळणं हा अनुभव दिवसा घेता येत नाही. म्हणून भारतीय संगीतात परंपरेने प्रस्थापित झालेले राग आणि समय यांचा समन्वय मानणारे साधक आजही शक्यतो रागसमयाचं पालन करताना दिसतात. त्यांना प्रतिसाद देणारे, त्या-त्या वेळी त्या-त्या समयाचा संगीत माहोल आवर्जून मनात तयार करून ठेवलेले श्रोतेही असतात. अशा श्रोत्यांसाठी आज काही प्रमाणात काही ऑनलाइन (प्लॅटफॉर्मवरून) असे ‘समयसंगीत’ ऐकविणारे मोजके पर्यायही उपलब्ध आहेत; परंतु मल्टिचॉइसच्या या जमान्यात त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आवर्जून त्याच वेळात, तेच संगीत ऐकवणारा वर्ग झपाट्यानं कमी झाला आहे. म्हणून समयसूचकतेचं भान पाळून सादर होणाऱ्या शास्त्रीय रागदारी संगीताच्या जिवंत मैफिलींना आजही वेगळंच महत्त्व आहे.
भारतीय संगीतातील विद्वानांनी समयचक्रानुसार रागांचं विभाजन करीत असताना ऐकण्याचा संबंध मानवी मनाशी लावलेला आहे हे लक्षात येतं. दिवसाच्या पहिल्या प्रहरात साधारणपणे मनाची अवस्था ही प्रसन्न, कोमल, सौम्य व काहीशी शिथिल असते. अशा वेळी कोमल सुरांचे राग ऐकले की मनाला बरं वाटतं. त्यानंतर प्रत्येक प्रहरागणिक बदलत जाणाऱ्या मानवी मनाच्या, चंचल, तीव्र अशा विविध अवस्थांनुसार साधारणपणे विविध तीव्र, शुद्ध व मिश्र सुरांचे राग ऐकावेसे वाटतात. पारंपरिक रागदारी संगीताच्या मैफिलींमधून आजही सादरकर्त्या कलाकारांकडून समयाचं भान पाळून, त्या त्या प्रहराचे समयोचित रागसंगीत सादर केलं जातं. विशिष्ट वेळी विशिष्ट राग ऐकविणाऱ्या या मैफिली ‘करमणुकी’च्या पलीकडे असणारी ‘मनोरंजन’ ही दर्जेदार अवस्था अनुभवास आणून देतात. ‘मनोरंजन’ या शब्दाची उत्पत्तीच ‘मन’ या शब्दापासून झाली आहे; अर्थात ज्या नादाने मनाचे रंजन होईल त्यातून सौंदर्यच निर्माण होईल हे वेगळं सांगायला नको.
trupti.chaware@gmail.com