ध्वनिप्रदूषित वातावरण आणि त्याला सरावलेले कान हे कटू सत्य स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसलं तरी शांततेचा अनुभव देणारे क्षण निर्माण करण्याची संधी प्रयत्नपूर्वक ओळखावी व मिळवावी लागते. त्यासाठी आवश्यक आहे ती ‘श्रवणसाधना.’ आपल्या शरीरात ‘नादा’चं अस्तित्व असतंच. ‘हृदयाचे ठोके’ किंवा ‘श्वासोच्छ्वासाची लय’ हे दोन्ही गर्भावस्थेपासूनच आपली सोबत करत असतात. मन:शांतीसाठी आवश्यक शरीरातील नाद ऐकण्यासाठी कान तयार करणं हेच ध्वनिसौंदर्य.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ध्वनिसौंदर्य आस्वादाचा अनुभव कितीही हवाहवासा वाटत असला, तरी त्याविषयी जाणवत असलेल्या आणि नसलेल्या मर्यादांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे लक्षात घेऊन पहिल्या दोन भागांतून आपण प्रामुख्याने या विषयातील मर्यादांचाच विचार केला. परंतु प्रत्येक विषयाच्या नाण्याला दोन बाजू असतात; तद्वतच, ध्वनी या विषयाला ‘मर्यादां’चं आव्हान असलं तरी त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या काही ‘शक्यतां’चा आता आपण विचार करणार आहोत.
या शक्यता म्हणजे आपल्या आजूबाजूला सहज-सुलभपणे उपलब्ध असलेली ध्वनिनिर्मितीकारक विविध माध्यमं आणि ध्वनिसौंदर्याचा आस्वाद घेण्याची व देण्याची क्षमता असणाऱ्या सोप्या संधी, उपाय व युक्त्या. ध्वनिप्रदूषित वातावरण आणि सरावलेले कान हे कटू सत्य स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसलं तरी त्याच सरावलेल्या कानांना विश्रांती देण्यासाठी, शांततेचा अनुभव देणारे क्षण दैनंदिन धकाधकीच्या जीवनात निर्माण करणं ही संधी मात्र आपल्याला प्रयत्नपूर्वक ओळखावी व मिळवावी लागेल. यासाठी आपल्या आजूबाजूला असलेले तरल ध्वनी ऐकण्याची सवय करून घेणं आणि स्वत:च स्वत:साठी ‘श्रवणसाधना’ आखणं हा एक चांगला उपाय आहे. अशा श्रवणसाधनेसाठी ‘ध्वनिसौंदर्य’ निर्माण करणारी काही सोपी साधनं आणि माध्यमं यांचा विचार करू या.
आपल्या सगळ्यात जवळ असलेलं पहिलं साधन आणि ध्वनिनिर्मितीचं महत्त्वाचं माध्यम म्हणजे ‘श्वास’. ज्याप्रमाणे आपल्या शरीरात श्वासाचं अस्तित्व हे असतंच, त्याचप्रमाणे आपल्या शरीरात ‘नादा’चंही अस्तित्व असतंच असतं. श्वासनलिकेतून आत येणारा श्वास आवाज म्हणून बाहेर पडत असतांना स्वरयंत्र वापरलं जातं आणि त्यातील स्वरतंतू कंप पावल्यामुळे इच्छित नाद निर्माण होत असतो. स्वरयंत्रातून निघणाऱ्या या नादातूनच पुढे उच्चार आणि बोलण्याची प्रक्रिया किंवा भाषा घडत असते. कानांनी सहज ऐकू येणाऱ्या नादाला योगमार्गात ‘आहत’ नाद असं म्हणतात. काही आहत नाद हे स्थूल पातळीवरचे, तर काही सूक्ष्म पातळीवरचे असतात. यापैकी सूक्ष्म नाद ऐकण्यासाठी कानाने ऐकण्याची सवय प्रयत्नपूर्वक सूक्ष्म करावी लागते.
वास्तविक, आपण जन्माला येतो तेच मुळी नादासोबत, पण त्याकडे सहजासहजी आपलं लक्ष जात नाही. ते लक्ष जाण्यासाठी काही क्रिया प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात, ज्या योगमार्गात साधना म्हणून सांगितल्या जातात. ‘हृदयाचे ठोके’, श्वासोच्छ्वास, ‘शरीरातील स्पंदनं’(वेगवेगळी व्हायब्रेशन्स) हे सूक्ष्म प्रकारातील नाद अगदी गर्भावस्थेपासूनच आपली सोबत करत असतात. लक्षपूर्वक ऐकलं न गेल्यानं तसेच या सूक्ष्म नादाचे अर्थ आपल्याला लावता येत नसले तरीही स्वत:च्या अगदी जवळ असलेले, आपल्याच आतमधले असे हे स्पष्ट व अस्पष्ट शरीरनिर्मित नाद अगदी शेवटपर्यंत आपली सोबत करीत असतात. म्हणजे नाद हा आपल्या अस्तित्वाचाच भाग आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. पण त्याची आपल्याला जाणीव असतेच असं नाही. ती असती तर आपल्याच शरीरात असलेल्या या सुंदर आणि सूक्ष्म नादातील श्रवणसुख आपण कितीतरी वेळा आणि अगदी सहज घेऊ शकलो असतो. पण जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याखेरीज असं होतांना दिसत नाही याचं कारण मागील लेखात म्हटल्याप्रमाणे आपले कान गोंगाटाला इतके सरावलेले असतात की ते या शरीरजन्य आणि मनोरम अशा सूक्ष्म नादापर्यंत आपल्याला पोहोचू देत नाहीत.
योगमार्गात किंवा ध्यानधारणेत मात्र ‘आहत’ आणि ‘अनाहत’ या दोन्ही प्रकारच्या नादाची साधना करणाऱ्या साधकांना हृदयाचे ठोके, श्वासोच्छवासाचा आवाज इत्यादी सूक्ष्म नाद जाणवू शकतात; इतकंच नव्हे तर ‘नादानुसंधान’ या क्रियेत श्वासाच्या साहचर्याने हृदयाची गती समायोजित करण्याची कला या मार्गातील काही साधकांना सरावाने अवगत झालेली असते. अशा साधकांची श्रवणसंवेदना कमालीची सूक्ष्म आणि तरल असते, ज्यायोगे त्यांना त्यांचं ‘मनोशारीरिक आरोग्य’ उत्तम राखता येत असतं. असे ध्यानसाधक हे मितभाषी, कमी आवाजात बोलणारे, आवर्जून कर्ण-सुसह्य संगीत ऐकणारे आणि निर्धाराने कर्णकर्कश संगीत टाळणारे असतात असंही लक्षात येतं.
‘नादानुसंधान’ ही ध्यानप्रक्रिया विशिष्ट कष्टसाध्य साधनेनंतर कळू लागते, परंतु दैनंदिन जीवनातही ध्वनिसौंदर्याचा आस्वाद घेण्याची पहिली पायरी म्हणून आहत पातळीवरचा सूक्ष्म नाद ऐकण्याची, अर्थात कान तयार करण्याची सवय लावून घेणं हे अगदी कुणालाही शक्य आहे. त्याची सुरुवात म्हणून कमी आवाजातलं बोलणं ऐकणं, जवळचं ऐकणं, तरल आणि संवेदनक्षम ऐकणं, त्याचप्रमाणे काय ऐकावं आणि काय ऐकू नये याचा विवेक करणं म्हणजेच सूक्ष्म नादासाठी कान तयार करणं होय.
आपल्या कानांनी कोणते आवाज ऐकायचे हे समजलं तर आपण अधिक शांत, आरोग्यदायी आणि सुसंवादित जीवन जगू शकतो. बाहेरून येणारा ध्वनी हा कानांना ऐकू येत असला तरीही त्याला प्रतिसाद मात्र तयार करावा लागतो. श्रवणसाधनेचा विचार करत असताना ही जाणीव तरल करणं आवश्यक आहे. असं होऊन श्वासाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास शरीरातील स्पंदनं आणि कंपनं आपल्याला जाणवू लागतात.
‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च अँड अॅनालिटिकल रिव्ह्यूज’ ( IJPAR)च्या सप्टेंबर २०२२च्या अंकात ‘नादयोग : आरोग्यासाठी एक प्राचीन ध्वनी-चिकित्सा व्यवस्थापन’ हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. काशी हिंदू विश्वविद्यालय ‘स्वास्थ्यवृत्त आणि योग विभाग, आयुर्वेद विद्याशाखा’ यांच्या संशोधकांनी यात शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर ‘नादयोग’ या प्राचीन भारतीय उपचार चिकित्सेचं महत्त्व विशद केलं आहे. योग हा शब्द संस्कृत मूळ शब्द ‘युज’ या शब्दापासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ आहे जोडणे. मानवी मन हे वाऱ्यासारखं चंचल असतं पण नादसाधनेनं ते सजगपणाच्या प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न नक्कीच करता येतो.
आधुनिक मानसशास्त्र आणि योगिक तत्त्वज्ञानानुसार, ताण हे तीन प्रकारचे असतात. स्नायूंचा ताण, मानसिक ताण आणि भावनिक ताण. नादयोग आणि ध्यानाच्या पद्धतशीर आणि सततच्या सरावानं हे ताण हळूहळू कमी केले जाऊ शकतात. मानवी शरीरात निर्माण होणारा ध्वनी अर्थात नाद. नाद हा संयोगशब्द मानला तर ‘ना’ हे नाकाचं अर्थात श्वासाचं प्रतीक तर ‘द’ हे दंतभागाचं अर्थात उच्चारांचं प्रतीक. यानुसार ‘श्वास’ आणि ‘उच्चार’ एकत्र येऊन निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे ‘नाद’ असं नक्कीच म्हणता येईल. या दृष्टीने नादाकडे ‘योग’ म्हणून पाहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे योगसाधनेमुळे तणावग्रस्त शरीराला विश्रांती मिळत असते, आणि त्याद्वारे स्नायूंवरचा ताण हलका होत असतो, त्याचप्रमाणे नादयोग हीदेखील सहज आणि ताणविरहित क्रिया आहे. याचं उदाहरण देताना या शोधनिबंधामध्ये योगमार्गातील भ्रामरी प्राणायामाची सहज सोपी प्रक्रिया सांगितली आहे जी ध्वनिसौंदर्याचा आस्वाद घेण्याच्या प्रक्रियेत एक परिणामकारक साधन म्हणून नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.
‘भ्रामरी प्राणायाम’ हा आपल्या शरीरातील गुंजायमान ध्वनिलहरी सक्रिय करणारा एक उत्तम प्राणायाम आहे. भ्रमराच्या गुंजनाप्रमाणे असणारा हा ‘स्वर’प्राणायाम असून मेंदू ताजातवाना करणारा एक उत्तम आरोग्यमंत्रही आहे. आपल्या तोंडाच्या पोकळीतून निर्माण होणारा नाद, दोन भुवयांच्या मध्ये म्हणजेच आज्ञाचक्रावर नेऊन मन स्थिर करणं हे या प्राणायामामुळे सहज शक्य होतं. पाठीचा कणा ताठ ठेवून मृगमुद्रेसह सहजासनात किंवा षण्मुखी मुद्रेसह वज्रासनात टाचांवर बसून ही क्रिया केल्यास शांततेचा आणि आनंदाचा अनुभव येतो. यासाठी हाताची मुद्रा धारण करताना सर्वप्रथम दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करतात, त्यानंतर डोळे अलगद बंद करून पहिली दोन बोटं बंद पापण्यांवर ठेवली जातात. तिसरं बोट, अर्थात अनामिका, नाकपुड्यांमधून हवेच्या प्रवाहाचं नियमन करते, तर दोन्ही करंगळ्या बंद ओठांच्या खाली ठेवल्या जातात. डोळे आणि कान बंद करून अंतर्मुख होण्यासाठी या प्राणायामामुळे मदत होते. ही मुद्रा चेहऱ्याच्या आजूबाजूच्या मांसपेशी सक्रिय करीत स्नायूऊर्जा मेंदूच्या दिशेने वर सरकवण्यास मदत करते. यासाठी नाकपुड्यांमधून हळूहळू श्वास घेत, स्वरयंत्रातून निर्माण झालेला आवाज हा घशाच्या मागील पोकळीतून ‘हम्म’ किंवा ओंकाराचा दीर्घ उच्चार करत कपाळाच्या दिशेनं वर नेल्यास, कंपनातून निर्माण होणारा ऊर्जाप्रवाह मेंदूच्या पुढील भागात गुंजू लागल्याचं जाणवतं.
सकाळी जाग आल्याआल्या याची तीन ते सात आवर्तनं केल्यास चांगला परिणाम जाणवतो. या प्राणायामानंतर दोन्ही हातांचं घर्षण करून चेहऱ्यावर फिरवल्यास ताजंतवानं वाटतं. ही क्रिया अगदी घरबसल्या करून आपण ध्वनिसौंदर्याचा पहिला अनुभव घेऊ शकतो. नादातील चैतन्य अनुभवत असताना मनाशी एकरूपता साधून देणारी ही क्रिया प्राथमिक अवस्थेत सहज, सोपी आणि साधी वाटत असली तरी तिची परिणाकारकता हळूहळू जाणवते. तसेच व्यक्तीपरत्वे या क्रियेचे आणि उच्चारांचे प्राथमिक ते प्रगत असे विविध टप्पे असल्याने तिचा सराव प्रशिक्षकांकडून योग्य पद्धतीने शिकून काही काळ तरी त्यांच्या देखरेखीखाली केला पाहिजे.
नादयोगातील प्राणायामामुळे दुष्परिणाम होत नाहीत, पण प्रश्न प्रगतीचा आहे. साधकाचं लक्ष बाह्य ध्वनीवरून हळूहळू आतील नादावर केंद्रित होण्याला महत्त्व आहे, त्यामुळे काही काळ स्वत:चा स्वत: प्रयोगात्मक सराव केल्यानंतर प्रशिक्षकांकडून तो प्रत्यक्षपणे तपासूनही घेतला पाहिजे. ऑनलाइन पद्धतीने किंवा प्रसारमाध्यमातून शिकत असल्यास, शिकविणारी व्यक्ती ही त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी आहे याची खात्री जरूर करून घ्यावी. ऑनलाइन हा एक पर्याय असला तरी शेवटी योगविद्या ही एक पारंपरिक, सूचक आणि प्रयोगात्मक आहे त्यामुळे गुरूसमोर आसन मिळणं हेच श्रेयस्कर.
प्राचीन भारतात अनेक योगसाधक नादयोगाचा अभ्यास करीत असताना, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे मिळविण्यासाठी ‘ऐकणे’ या प्रक्रियेबद्दल जागरूक होते तसेच आपल्या भावभावना आणि भौतिक शरीरावर परिणाम करणाऱ्या सूक्ष्म ध्वनींबद्दलही ते अधिक संवेदनशील होते. बाह्य आणि अंतरंग विश्वाशी एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी, नाद या घटकाची भूमिका त्या काळी महत्त्वाची मानली असे.
परंपरेनं चालत आलेल्या योगविद्या शाखांमध्ये आजही हा नादअभ्यास करून मानवी विचारपातळीच्या पलीकडे असलेल्या अलौकिक अवस्थेचा अनुभव घेण्यासाठी साधना केली जाते. अशा साधकांच्या सहवासाने ध्वनिसौंदर्य या विषयाच्या अधिक जवळ जाता येईल.
trupti.chaware@gmail.com