‘‘पाळीव प्राणी त्यांच्या घरच्यांचे लाडके! पण रस्त्यावरचे बेवारस कुत्रे, मांजरी? किंवा अगदी पाळीव असले तरी वृद्ध किंवा जायबंदी झालेले प्राणी? ते लाडके तर नसतातच, पण जणू ओझं असल्यासारखीच वागणूक त्यांना मिळते. अशा प्राण्यांचं दु:ख कमी करता यावं, शक्य झाल्यास त्यांना नवीन, प्रेमाचं घर मिळावं यासाठी काम करण्याची प्रेरणा मला एका कुत्र्यामुळेच मिळाली आणि त्यातूनच मिळालं माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट!’’ सांगताहेत ‘रेस्क्यू’ संस्थेच्या सहसंस्थापक तान्या काणे.
मला लहानपणापासून प्राण्यांची खूप आवड! घरात एक तरी कुत्रा किंवा मांजर असावं हा माझा हट्ट! पण तेव्हा आई समजवायची, ‘‘अगं ती मोठी जबाबदारी असते. तू मोठी हो. मग बघू.’’ पण मी सतत ‘डॉग शोज्’ बघायचे. कुत्र्यांवरची पुस्तकं वाचायचे. ज्या मैत्रिणींकडे कुत्रा त्यांच्याच घरी मी सापडायचे. गंमत म्हणजे, सगळय़ा मैत्रिणी जेव्हा आपसांत खेळायच्या, तेव्हा मी मात्र त्यांच्या घरातल्या कुत्र्याबरोबर खेळत असायचे.
एकदा काय झालं, माझी दहावीची परीक्षा चालू होती. एक दिवस संध्याकाळी आई म्हणाली, ‘‘दिवसभर अभ्यास करून कंटाळली आहेस. चल, कोपऱ्यावरच्या दुकानातून ब्रेड घेऊन येऊ. तेवढंच फिरून तुला बरं वाटेल.’’ दुकानातून परत येताना वाटेत आईला एक ओळखीच्या बाई भेटल्या. त्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. त्या बाईंसोबत दोन कुत्रे होते. आम्ही घरी यायला निघालो, तर त्यातला एक कुत्रा आमच्या मागे मागे घरी आला आणि सरळ घरात घुसला. काहीही संकोच नाही, भीती नाही. जणू हे त्याचं स्वत:चं हक्काचं घर आहे, तो अनेक वर्ष इथेच राहतोय, इतक्या सराईतपणे तो घरभर फिरू लागला. मी आईला म्हटलं, ‘‘आलाच आहे हा कुत्रा घरात, तर आपण त्याला पाळू या का?’’
आई म्हणाली, ‘‘अगं, ज्यांचा तो कुत्रा आहे त्यांना नको का विचारायला?’’ मग आईनं त्या बाईंना फोन करून सांगितलं, तर त्या म्हणाल्या, ‘‘छे! अहो, तो आमचा कुत्रा नाहीये. रस्त्यावरचा भटका कुत्रा आहे. आम्ही कुठे फिरायला निघालो की तो आमच्याबरोबर येतो.’’
झालं! मी आईला म्हटलं, ‘‘त्यानं मला निवडलं आहे. देवानं त्याला माझ्यासाठी पाठवलंय. तो आपल्या घरी येणं हा सुखद योगायोग आहे. आता मी परत त्याला रस्त्यावर कसं सोडणार? मी त्याचं सगळं सगळं करीन. आपण त्याला पाळू या.’’ बाबांनीही ‘हो’ म्हटलं आणि ‘डुगी’ आमच्या घरचा झाला. डुगी माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या मनात जणू त्यानं प्राण्यांविषयी प्रेम, आवड, आस्था आणि कणव निर्माण केली. डुगीमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली. पुढच्या आयुष्यात मला प्राण्यांचं आयुष्य सुंदर आणि सुखकर बनवण्यासाठी जे-जे करता येईल ते करायचंय. डुगीमुळे मला भावी आयुष्याची दिशा मिळाली. अर्थ गवसला.
आम्ही डुगीसाठी रीतसर प्रशिक्षक नेमला. तो त्याला शिकवत असताना मी खेळ, अभ्यास सोडून जातीनं तिथे हजर राहायची. पण त्या प्रशिक्षकाचं शिकवणं बघून मी कमालीची अस्वस्थ व्हायची. एवढासा गोजिरवाणा जीव तो! तुम्ही त्याला भीती दाखवून, छडीचा धाक दाखवून कसं काय शिकवता? तीच गोष्ट तुम्ही त्याला प्रेमानं शिकवू शकता ना! खरं तर कुत्र्यांचं नाक तीक्ष्ण असतं, त्यांच्याकडे उपजत ग्रहणशक्ती असते. आपण फक्त त्याचा उपयोग करून प्रेमानं त्याला शिकवायला हवं. मग मी त्या ट्रेनरला कायमची रजा दिली आणि एक एक गोष्ट स्वत:च डुगीला शिकवू लागले.
मी आणि बाबा डुगीला तपासणीसाठी पशुवैद्यकाकडे नेत असू. मला तिथे जाणं एवढं आवडायचं, की मी डॉक्टरांना एकदा थेट विचारलंच, की ‘‘मी तुमच्याकडे येऊन स्वयंसेवक म्हणून काम करू का?’’ ते म्हणाले, ‘‘येत जा सुट्टीत!’’ सुट्टीत कुठलं? मी तर रोज कॉलेजमधून थेट त्यांच्या दवाखान्यात जाई. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून मी हौसेनं हे काम करू लागले. हळूहळू तिथेच मी प्राण्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांच्यावर प्रथमोपचार कसे करायचे, त्यांचे आजार आणि त्यांची लक्षणं हे सगळं हळूहळू शिकत गेले. पुढे मी रीतसर विविध अभ्यासक्रम केले. पण माझ्या भावी कामाचं मूळ बीज रोवलं गेलं ते तिथेच! अर्थात पुढे नेमकं काय करायचं याविषयी मी चाचपडतच होते. लग्नानंतर एका वर्षांसाठी मी इंग्लंडला गेले. तिथेही मी स्वेच्छा कार्य सुरू केलं आणि एका नव्या सत्याची धक्कादायक ओळख झाली. हळूहळू मी काय काम करणार आहे याचं धूसर का होईना, पण चित्र मनात स्पष्ट झालं. बरेच लोक हौसेनं कुत्रे पाळतात. पण नंतर त्यांचं वय झालं, ते आजारी पडले की सर्रास त्यांना रस्त्यावर सोडून देतात. अशा पाळीव, पण रस्त्यावर सोडलेल्या बेवारस, भटक्या कुत्र्यांना दत्तक देण्याचं काम मी इंग्लंडमध्ये सुरू केलं. वर्षांनंतर मी भारतात परतले. आता मला माझं उत्तर सापडलं होतं. चाचपडणं संपलं होतं.
रस्त्यावर सोडलेल्या कुत्र्यांना दत्तक देण्याच्या माध्यमातून हक्काचा चांगला निवारा मिळवून द्यायचा, कुत्र्यांच्या प्रशिक्षणाची अमानुष पद्धत बदलावी यासाठी मुळात व्यवस्थेत बदल घडवून आणायचा, सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे भटक्या, बेवारस जनावरांविषयी लोकांच्या मनात कणव आणि प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा! माझ्या कार्याची दिशा मला सापडली. साधारण २००७ पूर्वी रस्त्यावरचे कुत्रे जायबंदी झाले, तर त्यांच्या उपचारांसाठी रुग्णालयं नव्हती. उपचारपद्धती अस्तित्वात नव्हती. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होत असे, पण त्यांची काळजी घेण्याचा दृष्टिकोनच मुळी समाजात नव्हता. अशा आजारी, जायबंदी भटक्या कुत्र्यांवर उपचार करून त्यांना पुढे योग्य इच्छुकांच्या हाती सुपूर्द करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न सुरू केले. माझ्या आयुष्याचा हेतू हा आहे, की केवळ पाळीव प्राणी नव्हे, तर बेवारस भटक्या प्राण्यांचंही आयुष्य, वेदनारहित आणि सुंदर व्हायला हवं. पाळीव प्राण्यांना आजारपणात अथवा अपघात झाल्यास जशी सेवा मिळते, तीच सेवा मिळण्याचा भटक्या जनावरांनाही हक्क आहे. तो हक्क त्यांना मिळवून देण्याचं काम मला प्रामुख्यानं करायला हवं.
माझ्या या विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कारणीभूत ठरला तो एक कुत्राच! एकदा मला रस्त्यावर अत्यंत दयनीय अवस्थेतला एक कुत्रा सापडला. तो ‘केनाईन डिस्टेंपर’ या मज्जासंस्थेच्या विकारानं ग्रस्त होता. या विकारात कुत्र्यांना कमालीच्या वेदना होतात, ते खूप रडतात, विव्हळतात. मला त्या कुत्र्यावर उपचार सुरू करण्यापूर्वी फक्त एका रात्रीसाठी कुठेतरी निवारा हवा होता. हा विकार संसर्गजन्य असल्यानं त्याला इतर कुत्र्यांबरोबर ठेवता येणार नव्हतं. मी अक्षरश: माझ्या ओळखीच्या, प्राण्यांशी संबंधित ४० लोकांना निरोप पाठवले. पण कोणीही मला प्रतिसाद देत नव्हतं. तो कुत्रा केविलवाणा रडत होता, तळमळत होता. मी हताश झाले. एवढय़ात मला प्राणीप्रेमी नेहा पंचमियाकडून प्रतिसाद मिळाला. तिनं तिच्या घरातली जागा मला देऊ केली. मी तातडीनं त्या कुत्र्याला तिथे हलवलं. त्याच्यावर उपचार सुरू केले. पण दुर्दैवानं त्याच रात्री तो मरण पावला. मी रात्रभर त्याच्या वेदना पाहताना कमालीची अस्वस्थ झाले होते. एवढय़ा मोठय़ा समाजानं त्याला एका रात्रीचा निवाराही नाकारला होता, मदत नाकारली होती. का? तर तो पाळीव प्राणी नाही, रस्त्यावरचा बेवारस कुत्रा आहे! माझ्या मनाला ही गोष्ट खूप लागली. अरे, तो बेवारस, रस्त्यावरचा कुत्रा असला म्हणून काय झालं! तो एक जिताजागता, जिवंत प्राणीच आहे ना! मग त्याला उपचार मिळण्याचा, जगण्याचा, चांगलं जगण्याचा हक्क नाही का? तो हक्क त्याला मिळायलाच हवा.
भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या तुरळक संस्था होत्या तेव्हा. पण इतरांकडे आशेनं बघण्यापेक्षा आपण स्वत:च त्यांच्यासाठी काही का करू नये? या विचारातून मी नेहासह ‘रेस्क्यू’ ही संस्था सुरू केली. मला नेहासारखी समविचारी, समविवेकी मैत्रीण मिळाली. सुरुवातीला आम्ही दोघी रात्री दोन-तीन वाजता आमच्या गाडय़ा घेऊन निघायचो. भटक्या, बेवारस, जखमी वा आजारी प्राण्यांचा शोध घ्यायचो. त्यांना गाडीत घालून डॉक्टरांकडे उपचारांसाठी घेऊन जायचो. बऱ्याच वेळा अपघातात जायबंदी झालेला कुत्रा घाबरून पुन्हा गाडीखालीच लपतो. मी आणि नेहानं अनेक वेळा गाडीखाली अक्षरश: लोळण घेत अशा जायबंदी कुत्र्यांना शोधून वाचवलं आहे. अशा वेळी त्यांच्या डोळय़ातले केविलवाणे, पण कृतज्ञ भाव इतके हृदयस्पर्शी असतात!
एकदा एका दिवाळीत अशाच एका भटक्या कुत्र्याच्या शेपटीला पेटलेले फटाके बांधून कुणीतरी सोडून दिलं होतं. तो बिचारा त्या आवाजानं घाबरून गोल गोल फिरत होता, भाजण्याच्या वेदनेनं कळवळत होता. त्याला वाचवलं तेव्हा मनाला अपार वेदना झाल्या. मुक्या प्राण्यांच्या जीवाशी कोणी इतकं अमानुषपणे, क्रूरपणे कसं खेळू शकतं? रस्त्यावरचे भटके कुत्रे. त्यांना कोणी वाली नाही. त्यांच्याशी कसंही वागा. त्यांना मारा-झोडा, ही अमानुष वर्तणूक चालणार नाही. हे समाजाला पटवून देण्यासाठी मग आम्ही लोकांना एकत्र करून त्यांच्याशी बोलायला लागलो. हळूहळू लोकांची मानसिकता बदलू लागली.
याची पहिली जाणीव आम्हाला कशी झाली ते सांगते. काही वर्षांपूर्वी एक कुत्रा पुण्याच्या कँप भागातल्या जलाशयात पडला. तो खूप रडत होता. मला रात्री ११ वाजता फोन आला. आम्ही अग्निशमन दलाला कळवलं आणि तिकडे धावलो. त्याला बाहेर काढलं. मी स्वत: त्याच्या जखमांवर मलमपट्टी केली. पुढे तो बरा झाल्यावर एका गृहस्थानं त्याला दत्तक घेतलं. गंमत म्हणजे अगदी अलीकडेही असाच एक प्रसंग घडला. आम्हाला फोन आल्यावर आमच्या ‘रेस्क्यू टीम’नं त्या कुत्र्याला बाहेर काढलं. आम्हाला या कुत्र्याविषयी कोणी कळवलं? ज्या गृहस्थांनी आधीच्या वाचवलेल्या कुत्र्याला दत्तक घेतलं होतं त्यांनीच! त्यांच्याकडचा कुत्रा पाहून आम्हाला इतका आनंद झाला! सुरुवातीला आम्ही सुरू केलेल्या ‘हेल्पलाइन’वर तुरळक कॉल्स येत. पण आता कॉल्स एवढे वाढलेत की आमची ७० जणांची टीमसुद्धा अपुरी पडते.
मला एका गोष्टीची खूप खंत वाटते, की बरेच लोक पाळीव प्राण्यांचं वय झालंय म्हणून, ते जायबंदी झालेत म्हणून वा त्यांच्या आजारपणाचा खर्च परवडत नाही म्हणून त्यांना घरातून बाहेर हाकलवतात. त्यांना रस्त्यावर सोडतात. एखाद्या प्राण्याला दहा-पंधरा वर्ष जीव लावून अचानक तुम्ही त्याला रस्त्यावर कसं बरं काढू शकता? जे कुत्रे, मांजरी रस्त्यावरच जन्माला आले आहेत, त्यांची जगण्याची ऊर्मी, जिगिषा प्रबळ असते. पण पाळलेल्या प्राण्यांमध्ये ही संघर्षांची मानसिकता मुळातच विकसित झालेली नसते. त्यात ते आजारी, वृद्ध झालेले असतात. अशा प्राण्यांचं जगणं अत्यंत कठीण होऊन बसतं. अशा कुत्र्यांना कोणी दत्तक घ्यायलाही तयार नसतं. मग आम्ही लोकांना पटवून देतो, की ‘‘अरे, आता याचं आयुष्य अवघं दोन ते तीन वर्षच उरलंय. तेवढं तरी त्यांचं आयुष्य सुखात जाऊ दे! माणुसकीच्या नात्यानं त्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात सांभाळा.’’ ज्यांना लोकांनी उकिरडय़ावर सोडून दिलं, अशा अनेक वृद्ध आणि आजारी प्राण्यांना- गाई, म्हशी, डुकरं, कुत्रे, मांजरी यांना आम्ही निवारा मिळवून देतो. तर वन्य प्राण्यांना त्यांच्या अधिवासात सोडतो.
शेतकऱ्यांच्या गाई, म्हशी, बैल आजारी पडले, धनगरांची तट्टू, मेंढपाळांच्या मेंढय़ा आजारी पडल्या तर त्यांना गरिबीमुळे त्यांच्यावरच्या उपचारांचा खर्च परवडत नाही. अशा वेळी आम्ही त्यांच्या उपचाराचा खर्च उचलतो आणि ते प्राणी बरे झाल्यावर त्यांना मूळ मालकाच्या हाती सोपवतो. त्यांच्यावरच्या उपचारांमुळे त्यांना जीवनदान लाभतं याचा आम्हाला मनापासून आनंद होतो.
खरं सांगायचं तर आम्ही त्यांना जीवनदान नाही देत. हे प्राणी उलट आम्हाला जगण्याची उमेद देतात. बळ देतात. आयुष्याला उद्दिष्ट देतात. म्हणून खरं तर आम्हीच त्यांचे मनापासून ऋणी आहोत!
शब्दांकन- माधुरी ताम्हणे
madhuri.m.tamhane@gmail.com
tanya@resqct.org