‘‘कोकणात राहताना आजूबाजूचा निसर्ग आणि त्यातले प्राणी-पक्षी हे लहानपणापासून माझ्या आयुष्याचा भाग झाले. मग ती पाळीव कुत्री असोत, आईवेगळं माकडाचं किंवा मुंगसाची पिल्लं असोत किंवा अगदी घराच्या दारापर्यंत आलेला बिबटय़ा असो! माणसांच्या कृत्रिम जगानं कधीच दिले नसते असे अनेक खरेखुरे, मानवी संवेदनांनी भरलेले अनुभव मला या प्राण्यांनी दिले. मला माणूस म्हणून जगण्याचं भान आणि बळही यांनीच दिलं..’’ सांगताहेत सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक डॉ. राजा दांडेकर.
मैत्र : ‘भावस्थिराणी जननांतर सौहृदानी’ असं ‘शाकुंतल’मध्ये म्हटलं आहे. जन्मजन्मांतरीचे भाव नव्यानं जागे होऊन पुन्हा नव्यानं मैत्र होतं. हे जसं माणसांच्या बाबतीत आहे, तसं पशुपक्ष्यांच्या बाबतीतही असावं असं मला वाटतं. त्या त्या आयुष्यात ती ती माणसं, पशू, पक्षी आपल्याला नव्यानं पुन:पुन्हा भेटत असतात आणि त्यांच्याशी जिवाभावाचे संबंध जुळतात, मैत्री होते. माणूस सोडला, तर इतर प्राणिमात्रांबरोबरची मैत्री अगदी निरपेक्ष असते असं अनुभवास येतं.
जन्मापासून जंगलातल्या घरात लहानपण गेलं, ते या जिवाभावाच्या प्राण्यांबरोबरच. जवळपास दुसरी कुटुंबं नसल्यानं साथसंगत होती ती प्राण्यांचीच. घरात मांजरं, कुत्रे, गायी, बैल, म्हशी, वासरं हे प्राणी तर होतेच, पण सभोवताली समृद्ध निसर्ग होता. अनेकानेक पक्षी, माकडं, बिबटे, रानडुक्कर, कोल्हे, ससे, मोर, रानमांजर, नीलगायी अशांचा वावर घर परिसरात नेहमीचाच होता. आम्ही माणसं आणि हे ‘मूळनिवासी’ एकत्र गुण्यागोविंदानं नांदत असू.
कधीकधी घराच्या अंगणात माचावर बसून कंदिलाच्या प्रकाशात आम्ही परवचा म्हणत असू आणि माचाखाली बिबटय़ा आमचा परवचा, श्लोक, स्तोत्र ऐकायला बसलेला असे. ते लक्षात आलं की मग अगदी दबक्या पावलानं घरात जात असू आणि लगेच दाराची कडी लावून घेत असू. आम्हाला घाबरेघुबरे झालेले बघून झोपाळय़ावर बसलेली आजी आम्हाला सांगायची, ‘‘अरे जंगलातले प्राणी काही वाईट नसतात. तुम्हाला भीती वाटली तो वाघोबासुद्धा वाईट नाही काही! आपण शेजार केला म्हणून सहजच चौकशीला आला असेल.’’ रात्री भीती वाटू लागली, तर आम्ही हळूच उठून आजीच्या दोन बाजूला असलेल्या शेगडीच्या उबदार अंथरुणावर आसरा घ्यायचो. मग आजी पशुपक्ष्यांना माणसांची भाषा देऊन छान गोष्टी सांगायची. हळू आवाजात सांगितलेल्या गोष्टींनी आमचं लहानपण आणि माणूसपणही घडवलं. मग शाळेत जायला लागल्यावर इसापनीती आणि पंचतंत्रातल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्या प्रत्येक कथेचं कथासार माणसाला माणूसपण शिकवणारं होतं. माझ्या बालपणातील माझे मैतर असणाऱ्या एकेका प्राण्यांची एकेक कथाच आहे. ती एकेक करून सांगायला हवी.
मातृवत्सल तांबू : ही आमच्या घरातली सगळय़ात ज्येष्ठ गाय. तिच्या सात पिढय़ा आमच्या घरात नांदून गेल्या. तांबूच्याच दुधावर आमचे पिंड पोसले गेले. आम्हाला म्हशीचं दूध प्यायला घरात बंदी होती. अतिशय प्रेमळ असणारी तांबू वर्णानं तांबूसलाल होती. रोज सकाळी तिचं दूध काढताना आम्ही आपापले गंज घेऊन वाडय़ात जायचो. धारोष्ण दूध पिऊन तृप्त व्हायचो. तांबूची कांती तजेलदार होती. तिच्या डोळय़ात अखंड मातृत्व होतं. डोळय़ात सांजनिळी झाक असायची तिच्या. इतके मातृवत्सल डोळे दुसऱ्या कुणा गायीचे मी पाहिलेले नाहीत. अजूनही तो दिवस आठवतोय मला, त्या दिवशी इतर भावंडं मामाकडे गेली होती. वडिलांबरोबर नेहमीप्रमाणे मी दूध प्यायला गोठय़ात गेलो होतो. थोडं दूध काढून झाल्यावर वडिलांनी वासराला दूध प्यायला सोडलं आणि ते बाजूला झाले. मला काय वाटलं कुणास ठाऊक, मी तांबूकडे पाहिलं आणि वासरासमोरच्या बाजूला मी गुडघ्यावर खाली बसलो. गायीचा एक सड हातात धरला आणि तोंडाच्या दिशेनं तो पिळला. दुधाची एक धारोष्ण धार माझ्या नाकातोंडात आणि डोळय़ांवर उडाली आणि पुढच्याच क्षणाला मी माझे हातही टेकून वासरासारखं सड तोंडात घेऊन दूध पिऊ लागलो. तांबू आता वासरासारखंच मलाही चाटत होती. तिच्या वात्सल्यानं मी न्हाऊन निघालो होतं. तिचं अमृततुल्य दूध पिऊन वासरू आणि मी दोघंही तृप्त झालो होतो. तांबूचं मातृवत्सल स्नेहपान अजूनही माझ्या स्मरणात आहे.
आमचा नाम्या : हा आमच्या कुटुंबाचा १६ वर्ष सदस्य होता. आमची पोल्ट्री होती. २०० कोंबडय़ा होत्या, पण घरात सर्व शाकाहारी असल्यानं घरात अंडी येत नसत. रोज दोन-चार अंडी फुटली, तर ती या श्वानाला मिळत असत. त्यामुळे नाम्या बलदंड झाला होता! लोकं या लांडग्यासारख्या कुत्र्याला पाहूनच घाबरत असत. घरापासून दूरच्या बेडय़ात (गेट) उभं राहून ते आधी विचारत, की कुत्रा बांधलेला आहे का? पिंजऱ्यात आहे का? मग घरी येत असत. नाम्याची गावात दहशत होती. तसा तो उगाच कोणाला त्रास देत नसे. चुकून कोणी काही चोरून नेलं तरी तो त्या चोराच्या घरापर्यंत जाऊन घर पाहून ठेवायचा. परत घरी येऊन आम्हाला घेऊन जिथून आंबे चोरले असतील त्या झाडापाशी घेऊन जायचा आणि मग चोराच्या घरी जाऊन भुंकायचा. आम्ही चोरलेले आंबे बाहेर घेऊन यायला सांगायचो आणि ते आणल्यावर नाम्या त्या चोरालाच घरी आंबे आणून पोहोचवायला लावायचा. हा अंगरक्षक बरोबर असला की आम्हाला कुठे जायला भीती नसायची. एक दिवस आई गावात गेली होती. ती घराबाहेर पडली, की नाम्या तिच्याबरोबर अंगरक्षक म्हणून जायचा आणि ती ज्या घरात जाईल त्या घरासमोर ती पुन्हा बाहेर येईपर्यंत ठाण मांडून बसायचा.
एकदा एका बाईनं खवचटपणे विचारलं, ‘‘या काळुंद्रय़ाला कशाला आणलास गं बरोबर?’’ आई म्हणाली, ‘‘तुला बघायचंय? तू नुसता माझा एक हात पकड.’’ त्या बाईनं आईचा हात पकडला आणि तत्क्षणी नाम्यानं झेप घेऊन आपल्या बळकट जबडय़ात त्या बाईचा हात पकडला. तिच्याकडे तांबारलेल्या डोळय़ांनी रोखून बघत असा काही गुरगुरला, की त्या बाईला कापरंच भरलं! आईनं नाम्याला सांगितलं ‘‘सोड रे तिला.’’ तत्क्षणी नाम्यानं तिचा हात सोडला. नाम्याची स्वामिनिष्ठा अजोड होती!मुंगुसाची पिल्लं : एकदा विठूमामा गुरं घेऊन घरी आला होता. त्याच्या हातात छोटंसं गाठोडं होतं. मी विचारलं, ‘‘या गाठोडय़ात काय हलतंय?’’ अंगणात बसून गाठोडं सोडण्याआधी त्यानं सांगितलं, ‘‘घरातला उंदराचा लाकडी पिंजरा घेऊन ये.’’ मी धावत जाऊन पिंजरा घेऊन आलो. एक एक करत त्यानं मुंगसाची सात पिल्लं काढून पिंजऱ्यात सोडली. मी आश्चर्यमुग्ध होऊन पाहात राहिलो. तो म्हणाला, ‘‘एक चमचा, वाटीत दूध-साखर आणि थोडा कापूस घेऊन ये.’’ खारुटलीसारखी दिसणारी ती गुबगुबीत पिल्लं, त्यांचे तांबूस डोळे पाहून आम्ही हरखून गेलो होतो. ‘‘आरं पोरानूं, या पिल्लांची आयस तिकडे जंगलात बिळाच्या तोंडावर मरून पडली होती. तिच्या या तान्हुल्यांचं कसं होणार रं? म्हणून कापडात घेऊन त्यांना घरात घेऊन आलो.’’ तो म्हणाला, जगतील तितकं जगतील.
पिंजऱ्यातून एक एक पिल्लू बाहेर काढून त्यानं कापूस दुधात भिजवून दूध पिल्लांच्या तोंडाला लावलं. भुकेलेली ती पिल्लं आपल्या इवल्याशा तोंडानं दूध पिऊ लागली. सगळय़ांना दूध पाजून झाल्यावर आम्ही पिंजऱ्यात गवत, कापूस, घोंगडीचा तुकडा यांची गादी तयार केली. पिल्लांना पुन्हा पिंजऱ्यात सोडलं, साखर-पाण्याची छोटी वाटी पिंजऱ्यात ठेवली. आजीच्या फुलांच्या परडीतली एक दुर्वाची जुडी सोडून पिंजऱ्यात ठेवली. दिवसातून दोन-चार वेळा त्यांना दूध पाजू लागलो. दिसामाजी पिल्लं मोठी होऊ लागली. बोटभर असणारी पिल्लं बघता बघता खारीसारखी मोठी दिसू लागली. दिवसातून दोनचार वेळा आळीपाळीनं आम्ही फाटक्या धोतराच्या मऊसूत फडक्यात एकेका पिल्लाला काढून लहानशा बोंडल्यानं दूध पाजत असू. पिल्लं मुटूमुटू दूध प्यायला लागली की आम्हाला खूप गंमत वाटायची. आता लाकडाचा उंदरांचा मोठा पिंजराही त्यांना लहान पडायला लागला होता. हळूहळू पिंजरा उघडला की पिल्लं पिंजऱ्याबाहेर येऊन ताटलीतलं दूध पिऊ लागली होती. घरातही फिरू लागली. मग एक दिवस त्यांच्या त्याच बिळाच्या तोंडावर पिंजरा उघडला आणि भराभर पिल्लं बाहेर पडून आपल्या मातुलगृहात निघून गेली. रिकामा पिंजरा घेऊन आम्ही घरी आलो. आमचा भातुकलीचा एक खेळ संपला होता.
मग कधी कासवाची पिल्लं, मोराची अंडी, भेकराचं पिल्लू, ससे, वनगायीचा बछडा असं कोणकोण घरी येत असे. त्यांचं संगोपन करून, मोठं करून पुन्हा जंगलात सोडून देत होतो. माझं अवघं लहानपण जंगलातल्या पशुपक्ष्यांच्या संगतीत खेळण्या-बागडण्यात गेलं होतं. जगणं काय असतं हे आम्ही शिकत होतो. जगा, जगवा, जगू द्या. याच्या खूप साऱ्या गोष्टी मी माझ्या ‘रानगोष्टी’ या पुस्तकात लिहिल्या आहेत. यातून आमचं लहानपण समृद्ध होत गेलं. असं लहानपण क्वचितच कुणाला अनुभवाला येतं.
अजून दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. वैद्यकीय पदवी घेऊन, विवाह करून, शहरातल्या माणसांच्या जंगलातून पुन्हा रानवाऱ्याचा मोकळा श्वास घ्यायला चिखलगावला जंगलात झोपडी बांधून राहायला आलो. हाती केवळ शून्य होतं. समृद्ध निसर्गात राहणं हीच आमची समृद्धी होती. झोपडीत सोबतीला होती ती आठ-दहा मांजरं आणि एक-दोन कुत्रे. असा कुटुंबकबिला घेऊन आम्ही आरण्यक जगू लागलो.
रॉकीची स्वामिनिष्ठा : आमच्या झोपडीत रॉकी कुत्रा आमचा सोबती होता. रात्री आम्ही त्याला मोकळं सोडत असू. जेवण झाल्यावर मी रोज पडवीत शतपावली करत फिरत असे. एव्हाना घरी लाईट आले होते, फोन आला होता. रॉकी अतिशय रुबाबदार होता. भलंमोठं शरीर, सोनेरी केस, झुपकेदार शेपटी, तपकिरी डोळे. आवाजही चांगला भरदार होता. त्याला बघून लोकं घाबरत असत. पडवीत कॉटवर तो रात्री बसत असे. झोपण्याआधी त्याला आम्ही पिंजऱ्यात टाकत असू. बिबटय़ाची स्वारी येत असे ना!
एका रात्री जेवून मी असाच शतपावली करत होतो. फोन आला, म्हणून मी फोनवर बोलत जरा उभा राहिलो. तेवढय़ात रॉकी उठून धावत माझ्याकडे आला. माझ्या पायाशी येऊन एकदम किंचाळलाच! मी खाली पाहिलं, तर पायाशी मोठा विंचू होता. विंचू मला चावायला येतोय, हे पाहताच रॉकीनं येऊन आपला पाय मध्ये घातला होता. विंचू त्याला चावला होता. त्या डंखामुळे तो किंचाळला होता. मी लगेच चपलेनं विंचू मारला आणि त्याला फेकून देऊन रॉकीपाशी आलो. तो वेदनेनं विव्हळत होता. मी त्याला उचलून घरात आणलं. त्याला विष चांगलंच चढलं होतं. डोळे लाल झाले होते, तापही आला होता, लाळ गळत होती. मी भराभर औषधोपचार केले. त्याचे पाय मांडीवर घेऊन त्यावरून हात फिरवत होतो. औषधांनी विष उतरू लागलं. रात्रभर तो माझ्या मांडीवर डोकं ठेवून पडून होता. विष उतरलं, पण सकाळपर्यंत फुणफुण राहिली होती. सकाळी तो बसला, हळूहळू उभा राहिला, चालू लागला. पुन्हा जवळ येऊन मला चाटू लागला. त्याच्या स्वामिनिष्ठेनं मला गहिवरून आलं. मी विचार केला, रॉकीच्या जागी कुणी माणूस असतं, तर त्यानं घेतला असता का स्वत:ला विंचू चावून! जिवाभावाचं मैत्र असतं ते असं.
काळ आला होता, पण : एकदा रात्री अडीचचा सुमार होता. नुकताच दमदार पाऊस पडून गेला होता. घराबाहेर पडवीच्या कोपऱ्यावर पिंजऱ्यात आमची कुत्री चिनू आणि तिचा बच्चा शिवा दोघं होते. ते जोरजोरात भुंकू लागले. आधी मी दुर्लक्ष केलं. पण नंतर ते फारच जोरात भुंकू लागले, तेव्हा वाटलं, की कुणीतरी श्वापद जवळ आलेलं दिसतंय. बहुतेक बिबटय़ा असावा. वाटलं की असेल कुंपणापर्यंत आलेलं, कारण अगदी जवळ वाघ आला, तर कुत्री जोरात न भुंकता घाबरून शेपूट घालून खाली बसतात आणि तोंडानं ‘कुई कुई’ असा आवाज काढतात. तरीसुद्धा म्हटलं, बघावं एकदा बाहेर जाऊन.
मी दार उघडून, मोठा टॉर्च घेऊन बाहेर आलो. सभोवार कुंपणावर प्रकाशझोत टाकून कोणी दिसतंय का पाहात होतो, कारण यापूर्वी आमचे पाचएक कुत्रे बिबटय़ानं नेले होते. कुंपणावर वेध घेत असताना मला जवळच बिबटय़ाचा वास आला, चाहूलही लागली. म्हणून मी टॉर्चचा प्रकाश शेजारी फिरवला आणि पाहतो तर काय, माझ्या अगदी एक हात शेजारी बिबटय़ा उभा राहून माझ्याकडे रोखून पाहात होता. मी त्याच्या डोळय़ांवर प्रकाशझोत टाकला. आमची नजरानजर झाली. रेणूनं (रेणू दांडेकर) आतून विचारलं, ‘‘कोण आहे रे?’’ तीही उठून दारापर्यंत आली होती. मी म्हणालो, ‘‘बिबटय़ा आहे. शेजारीच, इथं माझ्यासमोर बिबटय़ा आहे.’’ माझ्या मनात आलं, त्याला त्याची शिकार मिळाली नाही म्हणून हा आपली तर शिकार करणार नाही ना? माझ्या डोळय़ांत त्याला भीती दिसली तर हा आपल्याला गारद करणार. मग मीही त्याच्या डोळय़ात डोळे घालून पाहिलं आणि खूप मोठय़ानं त्यांच्यावर ओरडलो. माझ्या ओरडण्यानं घाबरून त्यानं एकदम स्वत:भोवती गिरकी घेतली आणि क्षणात अंधारात दिसेनासा झाला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती इतकंच!
जन्मल्यापासून जंगलाच्याच सोबतीत वाढलो. पुढे वैद्यकीय शिक्षणासाठी शहरात गेल्यावर माणुसकी हरवलेल्या माणसांच्या जंगलाचा कधी कधी खूप उबग यायचा आणि मनाला पुन्हा जंगलाची ओढ लागायची. संधी मिळताच बाहेर पडायचं, असं करता करता सह्याद्रीच्या सातही रांगा पायी भटकून झाल्या. सगळय़ा वन्य जमातींचा आश्रय घेऊन झाला. खरं तर जंगलाचाच आश्रय मिळाला. डोंगर, दऱ्या, गड-किल्ले फिरताना कधी कुठल्या गुहेत, घळीत, झाडाच्या पारावर, मंदिरात, कधी कुणाच्या झोपडीत, गोठय़ात तर कधी उघडय़ा माळरानावर मोकळय़ा आभाळाखालीसुद्धा चांदण्यात छान झोप लागायची. कधी भीती वाटलीच नाही. जंगलाच्या सोबतीनं जगताना घरातले-बाहेरचे पशू, पक्षी आणि झाडं या सगळय़ांनी मला माणूस म्हणून जगण्यासाठीचं भान दिलं आणि बळही दिलं.
भाग्या
घराजवळच्याच जंगलात मित्राला एक आईविना असलेलं माकडाचं पोर सापडलं होतं. त्यानं ते घरी नेलं, तेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याला घरात घेणं नाकारलं, मग आम्ही त्याला आमच्या बिऱ्हाडी घेऊन आलो. त्याचे लालचुटुक ओठ, घारे डोळे (कोकणातलं होतं ना!) पाहून धाकटय़ा भावंडांना फार गंमत वाटली. आई म्हणाली, ‘‘हे आणखी कोण नवीन माकड आणलं आहेस!’’ मी म्हणालो,‘‘आमचा नवीन मित्र आहे. याचं नाव भाग्या. आईविना पोरकं पोर आहे ते. बघ कसा बिलगून बसलाय मला!’’ भाग्याला चहा फार आवडायचा. घरी गेल्यावर आईनं चहा केला. मी म्हणालो, आता गंमत बघ. घरी कप-बशीतून चहा प्यायचो आम्ही. मी भाऊ, बहिणीला, वडिलांना कप बशीतून चहा दिला आणि भाग्यासमोर फक्त चहाचा कप ठेवला. जमिनीवर बसून गुडघ्यावर हात ठेवून तो कपाकडे बघत बसला. मधूनच माझ्याकडे बघत होता. आम्ही त्याच्यासमोर मुद्दामहून चहा बशीत ओतून भुरुक भुरुक आवाज करत चहा पीत होतो. मग त्यालाही मी बशी दिली. तेव्हा तो खूश होऊन चहा बशीत ओतून दोन हातात बशी धरून चहा पिऊ लागला! अशी गंमत! भाग्या थोडा मोठा झाला. वडिलांनी त्याला नारळाच्या झाडावर चढून तयार नारळ पाडायला शिकवलं होतं. ते काम तो अगदी सफाईदारपणे आणि आवडीनं करायचा. त्यामुळे वडिलांनाही तो आवडत असे. काम झाल्यावर बक्षीस म्हणून वडील त्यालाही चहा देत, कप-बशीतून!
घराजवळच्या एका छोटय़ाशा झाडावर लांब दोरीनं आम्ही त्याला बांधत असू. लांब दोरीमुळे तो झाडावरून जमिनीवर उतरत असे. मला बोलवायचं असलं, काही हवं असलं, की तो एका विशिष्ट आवाजात ओरडत असे. झाडाच्या फांद्या धरून गदागदा हलवत असे. कोणी मोठय़ानं माझ्याशी बोललं किंवा भांडत असलं तर त्याला फार राग येत असे. तो आता तीन वर्षांचा झाला होता आणि राग आला की दात विचकत मोठमोठय़ानं ओरडत असे. अंगावर धावून आल्यासारखा करू लागे. लोकांना त्याची भीती वाटू लागली होती. एक दिवस एक भयानक प्रसंग घडला. दोन स्त्रिया आमच्या घरी येत होत्या. त्या अपरिचित स्त्रियांना बघून तो ओरडू लागला. मग झाडावरून खाली उतरून त्यांनं त्यांचा रस्ता अडवला. त्याला दात विचकताना पाहून काही कळायच्या आत त्या दोघींनी त्याला पकडलं आणि त्याचं नाक-तोंड जमिनीवर रक्तबंबाळ होईपर्यंत घासलं. मग त्यानंही दोघींवर हल्ला करून त्यांच्या हाताचे, दंडाचे चावे घेतले. दंडाचं मांस बाहेर आलं. त्या स्त्रिया मोठय़ानं किंचाळू लागल्या. मी धावत येऊन भाग्याला बाजूला केलं. दोरीतून सुटून तो शेतात पळून गेला. त्या दोन्ही बायकांना अंगणात बसवून मी शांत केलं, पाणी प्यायला दिलं. प्रथमोपचार करून रक्त थांबवलं, बँडेज केलं. मी आमचा कुत्रा नाम्याला म्हणालो, ‘‘पकड भाग्याला.’’ कुत्र्यापाठोपाठ मी काठी घेऊन शेतात धावलो.
नाम्या गुरगुरत भाग्याला पकडायला गेला. त्याला येताना पाहिल्यावर भाग्यानं समोर जाऊन नाम्याच्याही श्रीमुखात एक जोरदार थप्पड मारली. नाम्या मागे सरला, तसा भाग्या धावत येऊन झेप घेऊन माझ्या खांद्यावर येऊन बसला. मी त्याला शेजारी असलेल्या पोल्ट्री शेडमध्ये रिकाम्या खांबाला साखळीनं बांधून ठेवलं. रागानं निगडीच्या शिमटीनं त्याला फटके दिले. तो शांतपणे गुडघ्यात मान खुपसून रडत बसला. घरातून पाणी आणि अन्न आणून भाग्यासमोर ठेवून मी दार बंद केलं. घरी येऊन त्या दोन स्त्रियांना बरोबर घेऊन धीर देत होडीनं दाभोळला उपचारांसाठी घेऊन गेलो. दोघींनाही हाताला, दंडाला झालेल्या जखमांना टाके घालावे लागले. औषधोपचार करून, त्यांना खायला-प्यायला देऊन पुन्हा होडीनं गावाला आणून त्यांच्या घरी पोहोचवलं. त्यांच्या घरातल्या लोकांचे शिव्याशाप ऐकून मी घरी आलो तेव्हा संध्याकाळ होऊन गेली होती. घरी येऊन मी आंघोळ करून चहा घेतला आणि भाग्यासाठी चहा घेऊन रिकाम्या पोल्ट्री शेडकडे आलो. दार उघडून पाहिलं, तर भाग्या गुडघ्यात डोकं खुपसून रडतच होता. आज प्रथमच मी त्याला मारलं होतं, शिक्षा केली होती. मी त्याच्या जवळ बसलो, साखळी सोडून त्याला मांडीवर घेतलं. त्याचं रक्तबंबाळ नाक, तोंड आणि सुजलेला चेहरा पाहून मला फार वाईट वाटलं. मी का मारलं त्याला उगाच.. त्यानं खरं तर स्वसंरक्षणासाठी त्या स्त्रियांवर हल्ला केला होता. आधी त्यांनी भाग्याला जखमी केलं होतं. मी घरातून तेल-हळद मागवून घेतलं, कापसानं त्याचं नाक-तोंड पुसून त्याला तेल-हळद लावली.
त्याच्या अंगावरून हात फिरवला, अंगाला तेल लावलं. त्यानं अन्नपाणी घेतलं नव्हतं. त्याची समजूत काढत, आंजारत-गोंजारत त्याला चहा बशीत ओतून दिला. त्यानं करुण नजरेनं माझ्याकडे पाहिलं. छातीशी घट्ट बिलगून तो पुन्हा रडू लागला. ‘‘क्षमा कर मला.. तुझी चूक नसताना मी उगाच तुला मारलं. रडू नको,’’ असं म्हणत मी प्रेमानं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला शांत केलं, बशीनं चहा पाजला आणि घरात घेऊन आलो. लहान पोरासारखा तो छातीला बिलगून भितुर भितुर डोळय़ांनी माझ्याकडे पाहत होता. त्याला भूक लागली असावी. आईला सांगून मी माझ्या जेवणाचं ताट वाढून ओटीवर घेऊन आलो. त्याला मांडीवर बसवून, भात कालवून त्याला एक एक घास भरवू लागलो. त्यानंही एक घास उचलून मला भरवला. मला गहिवरून आलं, डोळे ओसंडून वाहू लागले. त्याला पोटभर जेवू घातलं, पाणी पाजलं. त्याच्या झोपायच्या जागेवर आणलं आणि त्याच्या नाकातोंडाला, अंगाला तेल-हळदीनं मसाज करून त्याला झोपवलं. बाळासारखं मुटकुळं करून तो अंथरुणावर शांत बसला होता. मीही दिवसभराच्या धावपळीनं दमलो होतो. अंथरुणावर पडलो, पण झोप येत नव्हती. मला अपराधी वाटू लागलं. मनात विचार आला, बऱ्याचदा पालक मुलांना त्यांची खरंच चूक होती की नाही याचा विचार न करता कठोर शिक्षा करतात. तसंच काहीसं आज झालं होतं. काहीएक निश्चय करून मी झोपून गेलो. घरातल्या सर्वानाही या घटनेचा त्रास झाला होता. सकाळी उठल्यावर मी आवरून दोन कपबशांत आमचा दोघांचा चहा घेऊन भाग्याजवळ गेलो.
नेहमीसारखा तो मांडीवर येऊन बसला. बशीतून कपभर चहा प्यायल्यावर लहानग्यासारखा माझ्या छातीशी घट्ट बिलगला. मी घरात सर्वाना सकाळीच माझा निर्णय सांगितला होता. मी पुन्हा त्याच्या सर्वागाला तेल हळद लावली, थोडं खाऊ घातलं आणि त्याला मोकळं करून जंगलाची वाट धरली. गावाच्या वेशीपर्यंत गेल्यावर वेशीवरच्या वडाच्या मोठय़ा झाडाच्या बेचक्यात खिशातून लपवून आणलेला बिस्किटांचा पुडा उघडून ठेवला. भाग्याला खांद्यावरून उतरवून त्या बेचक्यात ठेवलं. एक बिस्किट त्याला भरवलं आणि म्हणालो, ‘‘तू आता मोठा झालास. तुझा तू आता या जंगलात राहा. तुझं तू नवीन घर कर. हवं तर मला स्मरून कर किंवा विस्मरून कर. आता आपली पुन्हा भेट होईल का नाही माहीत नाही. मी आता दूर शहरात शिकायला जाणार आहे. मला क्षमा कर..’’ त्यानं एकदाच पाणावलेल्या डोळय़ांनी मला पाहिलं. छातीशी एकदाच बिलगून, खांद्यावर बसून माझ्या डोक्यावरून हात फिरवले आणि क्षणात उतरून वडाच्या उंच फांदीवर तो जाऊन बसला. ‘ये हृदयीचं ते हृदयी’ दोघांनाही कळलं होतं. जड अंत:करणानं त्याचा निरोप घेऊन मी परतलो.
rajadandekar@yahoo. Com