पूजा सामंत

‘‘मी नवी नवी ‘प्राणिपालक’ आहे! अनेक वर्ष कुत्र्यामांजरांशी काहीही संपर्क नसल्यामुळे मनात बसलेली भीती दूर करून त्यांच्याशी मैत्री करणं मी शिकून घेतलं आणि नंतर ‘डोरा’ आणि ‘बंकू’नं मला खूपच बदलवलं. जेव्हा भावना अनावर होतात तेव्हा मेंदूत चाललेला आशा-निराशेचा खेळ डोरा न सांगता ओळखतो. तो त्याचा पंजा सावकाश माझ्या डोक्यावर ठेवतो आणि मन शांत होतं..’’ सांगताहेत अभिनेत्री सई ताम्हणकर.

मुक्या प्राण्यांना आपल्यासारखं बोलता येत नसलं तरी भावना असतात! आपल्या मालकाविषयीचं, सुहृदाविषयीचं प्रेम व्यक्त करण्याची दोन पायांच्या माणसाची पद्धत सरधोपट असते; प्राण्यांचं तसं नसतं. प्राणी साधे, सरळ आणि निष्कपट! माणसांप्रमाणे पोटात एक आणि आणि ओठात दुसरं असं नसतं. ते जसे असतात तसेच आपल्या समोर असतात. त्यांच्या भावना शब्दांच्या पलीकडच्या, पण खऱ्या. आपण त्यांच्याशी बोलून व्यक्त झालो नाही, तरी ते आपल्या भावना समजून घेतात. आपण स्वत:ला जितकं ओळखत नाही तितके ते आपल्याला ओळखतात. म्हणून ते जिवाभावाचे!

माझा जन्म, बालपण, शिक्षण सांगली इथे झालं. आजूबाजूच्या आळीत मी काही घरांत गाय, कुठे कुत्रा, कुठे कोंबडय़ा पाळलेल्या पाहात होते. आमच्या घराजवळ बरीच झाडंझुडपं असत. गर्द झाडांवर बसलेली घुबडं मी रोज पाहात असे. त्याच्याबद्दल फारसं मला माहीत नव्हतं, पण त्याचा आकार, मोठाले डोळे मला आकर्षून घेत असत. मला वाटायचं, झाडावर चढून हे घुबड घरात आणून ठेवावं. हा विचार बरेच दिवस मनात रेंगाळल्यावर एके दिवशी  मी आईला सांगून टाकलं, ‘‘मी घुबड पाळणार आहे. घुबडं काय खातात? अन्न की दूध? मी त्यांना भरवीन.’’ माझा तो संकल्प ऐकून आई जरा घाबरलीच. म्हणाली, ‘‘सई, काही तरी काय बोलतेस! घुबड पाळत नाहीत.’’ अर्थातच त्या वेळी माझा तो हट्ट पूर्ण होणं शक्य नव्हतं. आई धास्तावली का, ते मला त्या वयात समजलं नाही. आज मात्र त्याचं हसू येतं! खरंतर पुराणांनुसार घुबड हे लक्ष्मीचं वाहन समजलं जातं, मग ते अपशकुनी कसं, यावर समाधानकारक उत्तर अजून सापडलेलं नाही. पण त्या विचारात खूप बदल झालेला आहे.

घुबड पाळण्याचा विचार आईनं पूर्ण होऊ न दिल्यामुळे नंतर मी आईला निक्षून सांगितलं, ‘‘आता मी कुत्रा पाळणार आहे. ’’ ती पुन्हा हबकली! मी शाळा, टय़ुशन्स, स्पर्धा या सगळय़ात व्यग्र असल्यावर त्या कुत्र्याकडे कोण बघणार? त्याची काळजी कोण घेणार? असा तिचा मुद्दा. कुत्रा-मांजर पाळण्याचा माझा हट्ट अवघा काही दिवस टिकेल आणि नंतर कुत्र्याची दैनंदिन जबाबदारी आईवरच पडेल, याची तिला खात्री असल्यामुळे पुन्हा मला स्पष्ट नकार मिळाला. पण का कुणास ठाऊक, या वेळी कुत्रा मनात घर करून बसला होता. घरून परवानगी नव्हती, तरीपण मला कुत्रा हवाच होता. त्याच्याबरोबर खेळणं किती छान असेल याची स्वप्नं मी रंगवू लागले. एकदा शाळेतून येत असताना मला पांढऱ्या रंगाचं, कुत्र्याचं गोंडस पिल्लू एका आडोशाला बसलेलं दिसलं. मला खूप आनंद झाला, कारण मला अगदी तसंच छोटं पिल्लू हवं होतं. मी त्या पिल्लाला उचलून घराकडे धूम ठोकली. आईच्या नकळत हा सगळा कारभार करत होते मी! घरातच एका कोपऱ्यात पिल्लाला दूध, पाणी देऊन जुन्या टॉवेलवर झोपवलं आणि साळसुदासारखी घरात वावरायला लागले. त्याच दिवशी रात्री साधारण नऊ वाजता परसदारात एक कुत्री येऊन भुंकायला लागली. त्या पिल्लाची आई! मी तिचं पिल्लू उचलून आणलंय हे तिला कसं समजलं देव जाणे. आई म्हणायला लागली, ‘‘का बरं बाहेर कुत्रा भुंकतोय? भुकेला आहे का?’’ पिल्लाची आई घराभोवती फिरत जोरजोरात भुंकू लागली होती. बराच वेळ आणि सततच्या भुंकण्यामागे काही तरी वेगळं कारण असावं हे आईला जाणवलं. तिनं खडसावून मला विचारलं. तेव्हा मी हळूच ते पांढरंशुभ्र पिल्लू दाखवलं. आईनं डोक्यावर हात मारून घेतला आणि पिल्लू उचलून बाहेर भुंकणाऱ्या कुत्रीसमोर ठेवलं. मग काय! पिल्लाच्या आईच्या डोळय़ांत एक वेगळीच चमक आली. ती पिल्लाला तोंडात पकडून निघूनही गेली. मी मात्र नंतर आईचा ओरडा आणि मारदेखील खाल्ला आणि ते कुत्रापुराण तिथंच थांबलं.

पुढे शिक्षण, वाढता अभ्यास, एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज् यांत दिवसभर धावपळ व्हायला लागली. तेव्हा कुत्रा-मांजर पाळणं विसरून गेले. बऱ्याच काळानंतर माझा सहकारी अभिनेता आणि मित्र ललित प्रभाकर याच्या घरी मनीमाऊ पाहिली आणि तिच्या रूपानं, आपल्याच तोऱ्यात राहाण्याच्या रुबाबानं मला ती खूप आवडून गेली. एक मनी आपणही पाळावी, असं मनात तरंगून गेलं. पण मध्यंतरीच्या काळात पाळीव प्राण्यांशी माझा थेट संबंध आला नव्हता. त्यामुळे एक प्रकारची भीती मनात होती. मी मुंबईत राहात असले, तरी चित्रीकरणाच्या निमित्तानं बाहेर गेल्यावर या  दोस्तांची काळजी कोण घेणार हाही प्रश्न होताच. शूटिंग, मीटिंग्ज, संहिता वाचन, फोटोशूट यात खूप वेळ जातो आणि घरात प्राणी पाळायचा म्हणजे त्यांना वेळ द्यायलाच हवा. त्यामुळे त्या वेळी काही जमून आलं नाही. मी मनातून तो विषय काढून टाकला आणि प्राण्यांशी जवळीक साधणं राहूनच गेलं.

 काही काळापूर्वी मी ‘पेटपुराण’ ही वेब मालिका केली. नावावरून त्यात खादाडीविषयी काहीतरी असेल असं वाटत असलं, तरी त्याचा विषय ‘पेट्स’ अर्थात पाळीव प्राण्यांबद्दलचा होता. पुन्हा माझ्या आयुष्यात प्राणी येणार होते. पण प्राणिपालनाचा अजिबातच अनुभवच नसल्यानं प्राण्यांबरोबरच सतत राहाणं, वावरणं, शूटिंग करणं जमेल का, याबद्दल शंकाच यायला लागली. शिवाय इथे नुसतं वावरणं नव्हतं, तर त्यांना जवळ घेणं, त्यांचे लाड करणं, गोंजारून त्यांचा मुका घेणं, हे सारं करायला लागणार होतं. तसं थेट करायचं आहे, हे आधी माहीत असतं तर कदाचित मी मालिकेला होकारच दिला नसता! पण अवघ्या आठ दिवसांत या मूक दोस्तांबरोबर मी रुळले, इतकी, की चित्रीकरण संपल्यानंतर मी थेट एक कुत्राच दत्तक घेतला, डोरा. आज तो माझा मित्र झालाय. पण तत्पूर्वी सेटवरच्या प्राण्यांशी माझी दोस्ती कशी झाली हेही ‘इंटरेस्टिंग’ आहे.

  वेब मालिकेच्या या कथेत मी पत्नीच्या आणि माझ्या नवऱ्याच्या भूमिकेत ललित प्रभाकर आहे. या जोडप्याला मूल नको असतं, पण पाळीव प्राणी हवा असतो, अशी काहीशी कथा. त्यात बायकोला मांजर आणि नवऱ्याला कुत्रा हवा असतो आणि शेवटी घरात कुत्रा-मांजर दोघंही येतात. चित्रीकरणाच्या सुरुवातीला मी त्या मांजरीच्या पिल्लाला स्पर्श करायलाही घाबरत होते. मग दिग्दर्शकाचा ओरडा खाऊन खाऊन माझी भीती दडपण्याचा प्रयत्न करत शक्य तितकं ‘नॉर्मल’ होण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी चक्क वर्कशॉप केलं. त्याचा इतका चांगला परिणाम झाला, की मी आणि ललित सहजतेनं त्या प्राण्यांबरोबर वावरू लागलो आणि साहजिकच चित्रीकरणही करायला लागलो. त्या मांजरीनं मला इतका लळा लावला, की शूटिंग संपल्यावर मला प्रकर्षांनं जाणवलं, की मी या मनीमाऊशिवाय राहूच शकणार नाही! मग दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंगला सांगून त्या मांजरीला दत्तक घेतलं. सेटवरच तिचं नामकरण केलं. ‘बंकू’ असं ‘शॉर्ट अँड स्वीट’ नाव ठेवलं आणि तिला घेऊनच घरी गेले. नंतर मला बंकूची खूप सवय झाली. निरीक्षण करून करून हे कळायला लागलं, की मांजरीसुद्धा आपल्या मालकांचे लाड करतात. पण कुत्रा जसा उत्तेजित होऊन आपल्या पुढेमागे उडय़ा मारेल, तसं मांजर कधी करणार नाही! प्रत्येक मुक्या प्राण्याची भावना दर्शवण्याची पद्धत वेगळी.

   मी दत्तक घेतलेल्या त्या कुत्र्याचं नाव डोरा! डोरा आणि माझ्यात एक भावनिक बंध निर्माण झालो. आमच्या अभिनयाच्या व्यवसायात अटीतटीची स्पर्धा असते, हेवेदावे असतात, व्यावसायिक वाद असतात. असंही खूपदा होतं, की भावना अनावर होतात आणि त्या व्यक्त करण्यासाठी आपली प्रिय व्यक्ती जवळ असतेच असं नाही. माझ्या मनातला आशा-निराशेचा खेळ मात्र डोरा ओळखतो. तो त्याचे पंजे माझ्या डोक्यावर फिरवतो. मी कधी थकून आले की त्याचं प्रेमानं बिलगणं माझा थकवा घालवून टाकतं. मी आनंदात असले तरी या बिलंदराला कसं कळतं कोण जाणे! मग तो मांडीवर बसतो, शेपटी हलवतो, डोळे आनंदात दिसतात. माझ्या सगळय़ाच भावना त्याला समजतात. हा एक ‘मूकसंवाद’च असतो. शब्दांवाचून कळले सारे.. तसा!

  मला वाटतं, डोरा आल्यापासून माझ्यात खूप मोठा बदल झालाय. त्याच्याबरोबर राहाताना माझ्यातली माया, ममता, वात्सल्याची भावना अधिक वाढलीय. पूर्वी मी कधी कामाच्या ताणतणावानं चिडचिड करत असे, पण आता अधिक संयमी, समजूतदार, शांत झाले आहे. डोराकडे पाहाताना वाटतं, त्यालाही कधीतरी राग येतच असेल, वाईट वाटत असेल. तरी पाळीव प्राणी त्याचं प्रदर्शन करत नाहीत. त्यांच्याकडून मी काही गुण शिकलेच पाहिजेत. मी असं ऐकलंय, की मुलांना जर लहान वयापासून पाळीव प्राण्यांच्या सहवासात ठेवलं तर मुलं अधिक लवकर शिकतात, प्रगती करतात असं मानसशास्त्र सांगतं. निष्पाप प्राण्यांवर दया करणं, त्यांच्यावर प्रेम करणं हे मुलांच्या संस्कारांचाच एक भाग असायला हवं. ते त्यांना तिरस्कारापासून दूर ठेवतं आणि मुलांची वाढ निकोप होते असं म्हणतात. म्हणूनही असेल कदाचित, पण शहरी वातावरणात हल्ली पाळीव प्राणी पाळण्याचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. तरीही मी नेहमी असंच सुचवीन, की पाळीव प्राणी विकत घेण्यापेक्षा दत्तक घ्या, जेणेकरून त्यांना घर मिळेल आणि घराला एक सवंगडी! सध्या तरी माझ्या कामाच्या व्यग्रतेमुळे बंकूला ज्ञानेश सांभाळतो. पण डोरा माझ्याकडे आहे. मी बाहेर असते तेव्हा शेजारी त्याला सांभाळतात.

नव्यानं ‘प्राणिपालक’ झाल्यानंतर मी बदलातला जो आनंद अनुभवला, तो अवर्णनीय आहे. त्याचा त्रास झाला नाही, तर आपल्यातल्याच नव्या गुणांची ओळख झाली. तुम्ही अजून कोणता प्राणी पाळला नसेल, तर तुम्हालाही लवकरच ही अनुभूती मिळो!

samant.pooja@gmail.com