‘‘माझ्या आयुष्यावर खरं साम्राज्य मांजरांचं होतं. सख्खं भावंड नसल्याची उणीव या लाघवी सोबत्यांनी कायम भरून काढली. प्रत्येकाची वेगळी तऱ्हा, वेगळा स्वभाव आणि वेगळा किस्सा. रोज कुशीत येऊन झोपणारी फुली, मारलेली ‘शिकार’ समोर आणून ठेवणारा शंभू, सहाव्या मजल्यावर लिफ्टने अलगद पोहोचणारी टुई, ‘टीन एजर’बाजा, थेट हिंदी सिनेमा दाखवणारे गुलछबू-गुलबकावली, भावलेली मूकपणे साद घालणारी ‘नि:शब्द म्याऊं’ आणि या सगळय़ांतून सापडलेले माणसांचं निरीक्षण करणारे ‘जास्वंदी’तील बोके. किती तरी अनुभव. त्यांच्याशिवायही सर्व प्राण्यांवर समभावाने प्रेम करण्याचं जे बाळकडू मला मिळालं, त्याचा आता मोठेपणी माणसांच्या बाबतीत उपयोग होतोय.’’ सांगताहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शका, लेखिका सई परांजपे.

माझ्या लहानपणी आप्पा- माझे आजोबा रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, एक गोष्ट सांगत असत. ती अशी, एकदा स्वर्गात गदारोळ माजला. खास देवांच्या श्रेष्ठींसाठी राखून ठेवलेलं ताजं लोणी चोरून खात असलेल्या तीन-चार अप्सरांना रंगेहाथ पकडलं गेलं. खाली मान घालून बापडय़ा अप्सरांनी आपला गुन्हा कबूल केला. या अपराधाबाबतचा न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी नारदमुनींवर सोपवण्यात आली. त्यांनी शिक्षा ठोठावली. ‘तुमच्या घोर कृत्याबद्दल तुम्हाला पृथ्वीवर चोरटय़ा मांजरींचा जन्म घेऊन राहावं लागेल.’ अप्सरांनी खूप गयावया केली. म्हणाल्या, ‘‘महाराज, नका एवढी क्रूर शिक्षा देऊ. आपला कठोर शाप मागे घ्या.’’
‘‘ते होणे नाही,’’ नारद पुकारले.
‘‘एकदा दिलेला शाप मागे घेता येत नाही. पण ठीक आहे. तुमचा पहिलाच गुन्हा आहे, हे लक्षात घेता, एक उ:शाप देतो. पृथ्वीवर मांजरींचा जन्म घेऊन, तुम्ही परांजप्यांच्या घरी राहाल. अगदी चैनीत!’’
आणि खरोखरच पुण्याचं आमचं घर ‘पुरुषोत्तमाश्रम’ हे मांजरांचं घर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. लहानपणापासून मी मांजरांच्यात वाढले. माझ्या पाळण्यातही एखादं मांजर वेटोळं करून पहुडलेलं असायचं, असं भले बुजुर्ग सांगत असत. मला सख्खं भावंड नसल्याची उणीव या लाघवी सोबत्यांनी भरून काढली, हे मात्र खरं. अनेकदा आमच्या फाटकामध्ये
तीन-चार माऊची पिल्लं सोडून दिलेली आढळत. याच्यामागे, स्वत:ला नको असलेल्या अनाथ पिल्लांना चांगलं घर मिळावं, हा उदात्त हेतू असावा. पण ही भूतदया, म्हणजे ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ असाच प्रकार म्हणावा लागेल.
प्राण्यांवर प्रेम करण्याचे धडे मला बालपणापासून मिळाले. घरातले सगळेच (म्हणजे आप्पा आणि आई) प्राणीवेडे होते. तेव्हा साध्या निरीक्षणामधून माझ्यावर सहज संस्कार होत गेले. शिवाय ज्या कथाकहाण्यांचा खुराक मला मिळत असे, त्या बहुधा विविध जनावरांच्या करामतींभोवती गुंफलेल्या असत. तेव्हा अगदी बालपणापासून माझी जिराफ, वाघ, सिंह, हिपोपोटॅमस, झेब्रा आणि अर्थातच घोडी, कुत्री, मांजरं अशा अनेक सवंगडय़ांबरोबर दोस्ती जमली. गाढवं, डुकरं, ही सहसा न आवडणारी जनावरंही मला प्यारी होती.

Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत

विन्स्टन चर्चिल यांची एक सुरेख आख्यायिका आहे. लंडन शहराच्या बाहेर त्यांचं एक छानसं छोटंसं फार्म हाऊस होतं. आठवडाभराच्या जीवघेण्या मेटाकुटीनंतर दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी जिथे पळ काढता येईल, असं. चर्चिल साहेबांना जनावरांचं प्रेम होतं. या फार्म हाऊसमध्ये कुत्री-मांजरं तर होतीच, पण बाहेरच्या मोकळय़ा आवारात मोठय़ा हौसेनं त्यांनी गायी आणि डुकरं पाळली होती. दर रविवारी सकाळी डुकरांच्या कटघऱ्यासमोर एक मोठी खुर्ची मांडली जायची आणि आपला चिरुट, वर्तमानपत्र आणि चहाचा प्याला घेऊन साहेब त्या खुर्चीत विराजमान होत. वर्तमानपत्र वाचीत, चहाचे घुटके घेत आणि अधूनमधून पुष्ट डुकरांकडे ममतेने पाहात त्यांचे रविवार सकाळचे दोनेक तास मजेत जात असत. त्यांच्या या वागण्याचे त्यांच्या सेक्रेटरीला मात्र फार वैषम्य वाटत असे. एकदा धीर करून त्यानं विचारलं, ‘‘साहेब, आपण डुकरांच्या कटघऱ्यासमोर का बरं बसता?’’
हसून चर्चिल म्हणाले, ‘‘अरे, तुला माहीत नाही का? मी जातिवंत ब्रिटिश आहे. मला प्राण्यांचं प्रेम आहे.’’
‘‘ते खरं. पण घरात किती तरी छान छान कुत्री आहेत. मांजरं आहेत.’’
‘‘कबूल! पण खरं सांगू? कुत्री म्हणशील, तर लांगूलचालक जात. कायम तुमची मर्जी सांभाळणारं. तुमच्या ‘हो’ला‘हो’ मिळवीत राहाणार.’’
‘‘बरं, मग मांजर?’’
‘‘एक नंबरची मिजासखोर. स्वत:ला फार थोर आणि दुसऱ्याला तुच्छ समजणारी. लहर असली तर लाडीगोडी करणार. नाही माझा कुत्र्यामांजरांबरोबर मेळ जमत. आता ही डुकरं कशी? त्यांना उच्चनीच भावनेचा स्पर्शही नाही. सरळ तुमच्या डोळय़ाला डोळा भिडवून समोर उभी ठाकतात. त्यांच्याबरोबर माझा छान सूर जुळतो. डल्ली ल्ल डल्ली!’’
सर्व प्राण्यांवर समभावाने प्रेम करण्याचं जे बाळकडू मला मिळालं, त्याचा आता मोठेपणी माणसांच्या बाबतीत उपयोग होतो. कुणीही नवीन माणूस भेटला, की त्याचा धर्म, जात, भाषा, प्रांत, सामाजिक दर्जा काय असावा, याचा विचारही माझ्या मनाला स्पर्श करीत नाही. आजकाल जातीपातीवरून लोक जो गदारोळ उठवतात, दुही माजवतात, ते पाहून वैषम्य वाटतं. नवल वाटतं. असो.

‘पुरुषोत्तमाश्रमा’मध्ये, माझ्या बालपणी, वेगवेगळय़ा काळांमध्ये एक घोडी, एक बकरी, दोन कासवं, एक काकाकुवा आणि असंख्य कुत्री, यांची राजवट होऊन गेली. पण खरं साम्राज्य मांजरांचं होतं, यात शंका नाही. आयुष्यात किती किती मांजरं येऊन गेली. शंभू, छब्या, ब्रह्मा, मलई, माखन, जुजूब, राफा, चिमाजी आप्पा, मखमल, मिठीबाई, काजळ, शांती, बुवा, खट्टू, बकासुर, बेला आणि इतर अनेक. किती नावं घ्यावीत? प्रत्येकाची वेगळी तऱ्हा, वेगळा स्वभाव आणि वेगळा किस्सा. ‘मांजरासारखं मांजर’ कधीच नसतं. प्रत्येकाचं काहीना काही वैशिष्टय़ असतं. स्वत:चं असं.

शंभूला कच्च्या भाज्या फार प्रिय होत्या. अंकिता, भाजी चिरायला बसली, की शंभू पाहता पाहता दुधी भोपळा किंवा वांग्याचे तुकडे लंपास करीत असे. अख्खा टोमॅटो पळवण्यात तर तो विलक्षण तरबेज होता. त्यामुळे भाज्या कडीकुलपात ठेवाव्या लागत. शंभूची माझ्यावर नको एवढी भक्ती होती. ‘नको’ अशासाठी, की कधी कधी तो प्रेमाने मारलेली शिकारसुद्धा माझ्यासाठी आणत असे, नैवेद्य! मारलेली बिचारी चिमणी किंवा उंदीर तो माझ्या पुढय़ात आणून ठेवी. आयत्या मिळालेल्या पक्वान्नावर मी ताव का मारीत नाही, याचा त्याला अचंबा वाटत असणार. फुली तर नेहमी माझ्या कुशीत झोपत असे. तिच्या मंद गुर्रगुर्रच्या पार्श्वसंगीतामुळे छान झोप लागायची. तिच्याकडे पाठ केलेली मात्र तिला मुळीच चालायचं नाही. आपण कूस बदलली तर अंगावरून चढून फुली नव्या जागेत पुन्हा स्थानापन्न होत असे.

शांती नावाची एक बिल्ली होऊन गेली. दिसायला अतिशय लोभस. तिची एक वाईट खोड होती. मधूनच ती नाहीशी होत असे, ती तीन-चार दिवस बेपत्ता असे. परत येई, ते काहीचं वावगं घडलं नाही अशा थाटात. एकदा अशीच गायब झाली. तीन-चार दिवसांनंतर तिच्या तपासासाठी आमच्याकडून शोधपथक निघणार, तोच कुणी तरी सांगत आलं ‘अहो, आपली शांती, शेजारी भटांकडे पलंगावर झोपली आहे.’ शहानिशा करायला मी शेजारी रवाना झाले, तर खरंच. शांताबाई त्यांच्या गादीवर तण्णावून आडव्या झोपलेल्या!
‘‘हे काय?’’ मी विस्मयाने विचारलं, ‘‘आमची शांती इकडे कशी?’’
‘‘तुमची शांती? अहो, काय बोलताहात? ही आमची बबडी आहे. फार लाडकी आहे हो सगळय़ांची. तिला एक वाईट सवय आहे. मधूनच ती नाहीशी होते, ती दिवस, दिवस येत नाही.’’ तर दोन्ही घरची ही पाहुणी उपाशी नव्हती, तर छान तुपाशी जेवत होती.
छब्या! खूप वर्ष मला साथ दिलेला, माझा एक अतिशय प्रिय बोका. त्यावेळी नुकतीच मी मुंबईला आले होते, आणि जुहूला एक छोटासा फ्लॅट घेतला होता. त्या काळात माझ्या नाटकाच्या तालमी चालू होत्या. शंकर नाग माझा सहाय्यक होता. नाना चौकात आमच्या तालमी चालत. एकदा शंकरने तालीम संपल्यावर दोन मांजरीची पिल्लं माझ्यासमोर ठेवली. एक बोका, एक भाटी, दोघं अतिशय गोजिरवाणी होती. पांढरी शुभ्र, उगाच नावाला पाठीवर काळे आणि नारिंगी छप्पे. त्यांची नावं ठेवली गुलछबू आणि गुलबकावली, आणि मोठय़ा मेटाकुटीने त्यांना सांभाळत, लोकलमधून घरी आणलं. माझ्या दुसऱ्या मजल्याच्या फ्लॅटमध्ये ती छान रुळली. बाल्कनीत त्यांना शी आणि सू करायला माती भरलेलं घमेलं होतं. त्याच्यात शिस्तीने ती आपला कार्यभाग उरकीत. पुढे पिल्लं मोठी झाली आणि निसर्गाने अधिक्षेप केला. जनावरांना नात्यागोत्याचं बंधन वा सोयरसुतक नसतं. गुलछबू गुलबकावलीची वरचेवर छेड काढू लागला. एकदा अति झालं. गुलू खूप कावली, आणि अब्रूरक्षणार्थ तिने सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. (उंचावरून पडली तरी मांजरं पंजावरती जमीन गाठतात, त्यामुळे त्यांना इजा होत नाही.) थेट हिंदी सिनेमा. ती तडक शेजारच्या बीच हाऊसमध्ये गेली. तिथं तिला नवं सुरक्षित घर मिळालं. ती परतून कधी आली नाही. गुलछबूने मात्र ठाणं हलवलं नाही.

फ्लॅश फॉर्वर्ड! बरेच दिवस लोटले. गुलछबू आता चांगला आडदांड झाला होता. रोज कुठे कुठे मारामारी करून यायचा. मग त्या काळात घर सांभाळायला आलेला राजन प्रेमाने त्याची मलमपट्टी करी. कुठल्याशा लढाईत त्याने आपल्या एका कानाची आहुती दिली होती. डोईवर असंख्य व्रण, पांढऱ्या शुभ्र रंगाला अवकळा आलेली आणि एकच कान अशा थाटातला त्याचा अवतार पाहून कुणी, हा पाळलेला लाडाचा बोका आहे, असं म्हणणं शक्य नव्हतं. आता त्याला ‘गुलछबू’ हे नाव शोभत नव्हतं. त्याचा छब्या झाला. राजन तमिळी होता. काळा वर्ण, कुरळे केस, चमकदार डोळे आणि हसरा चेहरा, यामुळे तो सगळय़ांना आवडायचा.

‘कथा’ या माझ्या चित्रपटासाठी जुळवाजुळव चालली होती. अजून कलाकार ठरले नव्हते. आमचा कसून तपास चालू होता. कमल हसन तेव्हा मुंबईत आलेला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा त्याचा मानस होता. आमची गाठ पडली. मी ‘कथा’चा प्रस्ताव मांडला आणि त्याची बोलणी करायला माझ्या घरी यायला तो आनंदाने राजी झाला. नुकताच माझा ‘चष्मेबद्दूर’ झळकला होता, आणि माझा भाव काहीसा तेजीत होता. कमल हसन घरी येणार हे ऐकून राजन जवळजवळ मूच्र्छित व्हायचा शिल्लक होता. त्याचा आधी विश्वासच बसेना. आनंदाचा पहिला बहर ओसरल्यावर, गंभीर चेहरा करून राजन माझ्या समोर उभा राहिला. म्हणाला, ‘‘मॅडम, एक जबरदस्त प्रॉब्लेम हैं। ’’
‘‘असं? काय तो?’’
‘‘छब्या!’’
‘‘छब्याचं काय?’’
‘‘कमल हसन साब आये, और एकदम उनके सामने छब्या हाजिर हुवा तो?’’
‘‘तो क्या? घर का बिल्ला है. वह कहाँ जायेगा!’’
‘‘नही मॅडम. उसे गॅरेज मे बांधके रखते हैं। कमलसाब उसे देखेंगे, तो कभी अपनी फिल्म में काम नही करेंगे।’’
कमल हसन रीतसर आले. छब्या अजिबात उगवला नाही. ‘कथा’ची पटकथा ऐकून ती आवडल्याचा त्यांनी निर्वाळा दिला, पण भूमिका करायला मात्र नकार दिला. याचं कारण नंतर सांगितलं, की सिनेमात दोन समतोल पात्रं असल्यामुळे ‘श्रेय भागीदारीसाठी’ त्यांची तयारी नव्हती. असो.
टुई! माझ्या आयुष्यात आलेल्या महत्त्वाच्या मांजरांमध्ये टुईचा क्रमांक खूप वरचा लागेल. घरी एकही माऊ नाही असा एक अल्पसा भाकड काळ मध्ये आला, आणि मी मांजरांच्या शोधात होते. काही कामानिमित्त मी कुणाची तरी वाट पाहात ‘दीनानाथ थिएटर’च्या प्रांगणात, एका कोपऱ्यात उभी होते. दूरवरच्या कोपऱ्यात एक मांजराचं पिल्लू कुठून तरी कुठे तरी चाललं होतं. मी मोठय़ानं हाक मारली, ‘‘माऊ! माऊ!’’ आणि पिल्लू जागीच थबकलं. त्यानं वळून माझ्याकडे पाहिलं, आणि अगदी सरळ रेषेत माझ्याकडे आलं. काळय़ा केशरी पांढऱ्या रंगाच्या मोहक मिश्रणाची फर मिरवणारी ती छोटी मांजर मी घरी आणली.

टुई अतिशय शहाणी होती. माझ्या पाळलेल्या सोबत्यांना मी कधीच कोंडून ठेवलं नाही. यायला-जायला ती मोकळी असत. टुई आमच्या नव्या फ्लॅटचे सहा मजले चढत-उतरत असे. एके दिवशी मी बाहेरून आले. पाहते तर लिफ्टसाठी उभ्या असलेल्या पाच-सहा जणांच्या घोळक्यात, मधोमध टुई. लिफ्टची वाट पाहात. लिफ्टचं तंत्र तिने केव्हाच आत्मसात केलं होतं. बिल्डिंगवाले तिला कौतुकानं बरोबर घेत. ती कधीच चुकून भलत्या मजल्यावर उतरली नाही. बरोबर सहावा मजला आला की बाईसाहेब बाहेर पडत. मग आमच्या दाराबाहेर शांतपणे वाट पाहात बसून राही. दारावरून जाणारा-येणारी कुणी भली व्यक्ती जाता जाता घंटा दाबून जाई. दार उघडलं की टुईबाई समोर उभ्या!

टुईला पिल्लं झाली. पहिल्याच खेपेला चांगली चार. छोटय़ा फ्लॅटमध्ये सगळय़ांचा सोपस्कार करणं अवघड होतं. तेव्हा खाली गॅरेजमध्ये एक छान खोकं मांडून त्यात मऊ अंथरूण बिछावून आम्ही बाळबाळंतिणीची सोय केली. एका रात्री, मी दोन पिल्लांना उचलून वर घेऊन गेले. थोडा वेळ दोघांनी वळवळ केली, पण मग माझ्या कुशीत छान गुरगुटून झोपली. रात्री दोनच्या सुमाराला मांजरांच्या आर्त आक्रोशाने मला जाग आली. त्या आवाजाला दाद म्हणून की काय, माझ्या जवळची पिल्लंही मोठमोठय़ाने केकाटू लागली. त्यांना घेऊन मी बाल्कनीत गेले. खाली टुई दोन पोरांना घेऊन उभी होती. वर पाहून ती जिवाच्या आकांताने ओरडत होती. साथीला वरची आणि खालची धरून चारही पिल्लं बेंबीच्या देठापासून बेंबटत होती. मला धडकी भरली. आता अवघी बिल्डिंग जागी होणार, आणि माझ्या मार्जारप्रेमाचे एक-दोघे विरोधक होते, त्यांना आयतं निमित्त मिळणार!

‘‘थांब! आले खाली,’’ मी वरूनच टुईला सांगितलं आणि पिल्लं उचलून लिफ्ट गाठली. लिफ्टबाहेर टुई माझी वाट पाहात उभी होती. मायलेकरांचा मधुमिलाप झाला आणि पोरवडा घेऊन टुई गॅरेजमध्ये रवाना झाली. खूप वर्ष साथ देऊन अखेर टुई खंगली. खाईना, पिईना. भावपूर्ण डोळय़ांनी पाहात, निपचित पडून असायची. ‘सोडव मला’ म्हणत असावी. अखेर मन कठोर करून तिला छातीशी धरून डॉक्टरांकडे नेलं. शांतपणे तिनं आमचा
निरोप घेतला.

तिच्या जाण्यानंतर मी ठरवलं, आता यापुढे मांजर पाळायचं नाही. या वयात, अपत्यविरहाचं दु:खं नाही सहन होत. मांजरांची आयुर्मर्यादा फार फार तर सोळा वर्षांची असते. तोपर्यंत मनोभावे तुम्हाला लडिवाळ साथ देऊन मग दु:खात लोटून ती गायब होतात. अनेक जण तर त्याआधीच ‘एक्झिट’ घेतात. कुणी गाडीखाली सापडतं, कुणाला मारामारीत ‘वीरमरण’ प्राप्त होतं. तर कुणी काहीही मागमूस न सोडता नाहीसं होतं, तुम्हाला कायमचा चटका लावून. तर आता मांजर नको असा मी पक्का निश्चय केला. पण नियतीचा काही वेगळाच डाव होता.

एका सकाळी राणीचा, माझ्या मैत्रिणीचा फोन आला, ‘‘परवा आमच्या सोसायटीमध्ये सावलीने, (तिच्या मुलीने) एका सुंदर पिल्लाला कुत्र्यांच्या तडाख्यातून वाचवून घरी आणलं. दोन दिवस त्याला सांभाळलं, पण आता जरा अवघड वाटत आहे.’’ राणी नुकतीच एका दुखण्यातून सावरत होती. आधीच फुलाएवढंच वजन असलेली माझी ही मैत्रीण आता पिसाहून हलकी भासत होती. माझा पुढचा प्रश्न आधीच जोखून तिनं स्पष्ट केलं, ‘‘चालताना माझा झोक जातो मधूनच. या पिल्लाच्या अंगात बारा हत्तींचं बळ आहे. सारखा हुंदडत असतो, आणि मला टकरा देतो. त्याला घरी ठेवणं धोक्याचं आहे.’’ विषय तिथेच संपला. सावलीने मग पिल्लाला त्याच्या सरंजामासकट माझ्या घरी आणलं. त्याला सोडून जाताना ती कासावीस झाली होती. होताच तसा तो गोजिरवाणा. पांढरा शुभ्र, लबाड डोळय़ांचा. त्याचं नाव बाजीराव ठेवलं.

माणसांच्या कोष्टकात बोलायचं झालं, तर बाजा ‘टीन एजर’ होता. त्याचे दात सारखे शिवशिवत. माझ्या मांडीवर बसून तो एकसारखा माझा हात चावत असे. रट्टा बसला की थोडा वेळ थांबे, मग पुन्हा सुरू. पुढे मला कामानिमित्त महिनाभर पुण्याला जायचं होतं. नेमकं तेव्हाच माझं घर संभाळणारा नागेश्वर त्याच्या गावी झारखंडला जाणार होता. मग बाजाला टोपलीत घालून मी पुण्याला आणला. मी माझ्या मामेभावाकडे, विजय परांजपेकडे राहाणार होते. तो आणि त्याची बायको अंजली, दोघे प्राण्यांची वेडी. त्यांच्या घरी दोन मोठाली कुत्री होती. छोटू आणि चिली. त्यांच्यात बाजाचं कसं निभावणार? ‘‘थोडे दिवस बघू या. ’’ अंजली म्हणाली. ‘‘आपण सगळी लक्ष ठेवून असू. दारं बंद ठेवत जाऊ.’’

दुर्गा बंगला भला मोठा आहे. प्रशस्त आवार. जंगी वृक्ष. पाठीमागे छोटंसं आऊट हाऊस. तिथं बाजा आणि मी राहात असू. हा नवा उपटसुंभ पाहुणा, छोटू आणि चिलीला मानवला नाही. संधी मिळताच दोघं चाल करून येत, मग बाजा त्यांना हुकवून कधी उंच झाडावर किंवा कधी आत फ्रिजवर चढून बसे. बंगल्याच्या आवारातल्या कोपऱ्यात एक सेवक सदनिका होती. तिथं एक कानडी कुटुंब राहात असे. ती मंडळी बंगल्यामधली वेगवेगळी कामं सांभाळत असत. त्यांना बाजाचा विलक्षण लळा लागला. त्याचे लाड करण्याची त्यांच्यात अहमहमिका लागे. ‘‘बाजाला तव्यावरची गरम पोळीच लागते,’’ असं नीलवा मोठय़ा कौतुकाने सांगे. थोडक्यात, ‘दुर्गा’ हे आता बाजाचं कायमस्वरूपी घर झालं आहे. चिलीची आणि त्याची चक्क दोस्ती झाली आहे. दोघं एका पलंगावर झोपतात. छोटू मात्र अद्याप अधूनमधून चाल करून आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करीत असतो.

अप्सरांना शाप देणाऱ्या नारदमुनींच्या कृपेमुळे मला मांजरांचा सहवास लाभला, असं म्हणावं का? त्यांच्या मोहक लीला आणि गनिमी डावपेच पाहाण्यात जन्म गेला. छोटय़ा पिल्लांचा खेळ तर खरोखर तिकीट लावून पाहावा. त्यांचं ते दबा धरणं, उंच उडी मध्येच विरून जाणं, छोटय़ा पंजाने प्रतिस्पध्र्याच्या कानशिलात फाटफाट मारणं, त्यांच्या सगळय़ा हालचाली विलोभनीय असतात. पॉल गॅलीको हा थोर लेखक मांजरवेडा होता. त्याच्या लिखाणात मांजरांचं सुंदर निरीक्षण दिसून येतं. The Silent Mieu किंवा ‘नि:शब्द म्याऊं’ हा त्याचा सिद्धांत मला पुरेपूर पटतो. मांजराच्या मनात तुम्हाला वश करून घ्यायचं असेल तर ते तुमच्याकडे पाहून म्याऊ म्हणणार. पण आवाज मात्र ऐकू येणार नाही. ही मूक साद म्हणजे त्यांच्या लाडिकपणाची परिसीमा. मांजराच्या किती लीला वर्णाव्यात?

माझ्या अविरत निरीक्षणाच्या दरम्यान एके दिवशी एक साक्षात्कार घडला. मांजरंदेखील उलटून आपलं- माणसांचं अगदी बारकाव्याने निरीक्षण करीत असतात. आणि गंमत म्हणजे त्यांचं आपल्याविषयीचं मत काही तितकंसं चांगलं नाही. याच जाणिवेमधून माझ्या ‘जास्वंदी’ या नाटकाचा जन्म झाला. या नाटकात दोन महत्त्वाची पात्रं आहेत – मन्या आणि बन्या. हे दोघे बोके. त्यांच्या दृष्टिकोनातून नाटक उलगडत जातं. वेळोवेळी माणसांच्या वर्तणुकीवर ते आपसात भाष्य करतात. सोनियाच्या घरी असलेल्या घरकामवाल्या रंगाबाई, आणि तानपुरे ड्रायव्हर, हे दोघे अतिशय पैसेखाऊ आणि चोरटे आहेत. त्यांच्या कारवाया पाहून बोके थक्क होतात. तेव्हाचा त्यांचा
संवाद :
बन्या : कसली चोरटी जात रे माणसांची? शी!
मन्या : का रे, आपण मांजरं काय चोऱ्या करीत नाही?
बन्या : अरे भूक लागली की करतो. पोट भरल्यावर कधी नाही. पण माणसांचं पोट कधी भरतच नाही.
आणखी एक प्रसंग.आपल्या मालकिणीचा तिच्या तरुण प्रियकराबरोबरचा प्रेमप्रसंग अनाहूतपणे पाहून बन्या प्रचंड चक्रावला आहे.
मन्या : तू का कातावतोस लेका? एक बाई आणि एक पुरुष, निसर्गाला धरून वागले, तर तुझ्या काकाचं काय गाठोडं गेलं?
बन्या : ठीक आहे! म्हणजे पतिपत्नीच्या पवित्र नात्याला काहीच अर्थ उरला नाही, असं म्हणायचं का?
मन्या : पवित्र नातं? वा बन्याबापू! आपणच का बोलताहात हे? मी आसपास नसलो, म्हणजे माझ्या झिपरीवर किती वेळा झडप घातली आहेस, सांग बघू. भटाब्राह्मणांनी मंत्र नसतील म्हटले, पण बायकोच की ती माझी. तुझी वहिनी! केवढं मंगल नातं.
बन्या : हे बघ! तू गल्लत करू नकोस. गोष्ट चालली आहे माणसांची.. नाही पाळता येत, तर स्वत:भोवती लक्ष्मणरेषा आखावी कशाला?
मन्या : वेडय़ा, अरे लक्ष्मणरेषा ही पाळण्यासाठी नसतेच मुळी.. ती ओलांडण्यासाठीच असते.
saiparanjpye@hotmail.com

Story img Loader