माधुरी ताम्हणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘‘जखमी पक्ष्याला काय औषधपाणी लागेल, याची नेमकी माहिती असणारे आजोबा आणि कावळय़ांनी घेरलेल्या पोपटाच्या जखमी पिल्लाला वाचवण्यासाठी सरकारी बैठकीतून उठून जाऊन लगबग करणारे बाबा या दोघांकडून माझ्यापर्यंत ही प्राणीप्रेमाची आवड आली आहे. प्राण्यापक्ष्यांना जवळून पाहाणं, त्यांचे फोटो काढणं आणि त्याच्याही पुढे जाऊन नवनव्या प्रजाती शोधणं, या सगळय़ाची सुरुवात इथूनच झाली. निसर्गजगताच्या भटकंतीनं मला वेगळी दृष्टी दिली, दुर्मीळ प्रजातींचं विस्मयकारक जग दिसत गेलं. त्यातूनच संशोधन, अभ्यासासाठी ‘ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशन’ची स्थापना करण्यात आली असून नव्या पिढीला याकामी सक्रिय केलं आहे. खूप काम सुरू आहे, खूप काम करायचं आहे..’’ सांगताहेत प्राणीप्रेमी आणि वन्यप्राणी संशोधक तेजस ठाकरे.

साधारण २०११ ची गोष्ट. सी-लिंकवरून येताना आदित्य दादाला एक जखमी घार सापडली. त्यानं ती घरी आणली आणि मला म्हणाला, ‘‘तेजा, ही बघ. हिचं काय करू या?’’ मी शाळकरी वयातला! मी काय सांगणार? तेवढय़ात एक कर्मचारी सांगत आला,‘‘आजा बुला रहे हैं.’’ आजोबांना (बाळासाहेब ठाकरे) आम्ही ‘आजा’ म्हणायचो. मी त्यांच्या खोलीत गेलो. ते म्हणाले,‘‘अरे तुम्हाला जखमी घार सापडली आहे का? तिला काय होतंय?’’ त्यांनी घारीला काय होतंय ते सगळं ऐकून घेतलं आणि मला काही औषधं सांगितली. म्हणाले, ‘‘ही औषधं घारीच्या जखमेवर लाव.’’ मी म्हटलं, ‘‘आजा, ती जंगली घार आहे. ती चावायला येते.’’ ते म्हणाले, ‘‘ठीक आहे. या होमिओपॅथी औषधाचे थेंब पाण्यात टाकून तिला पाज आणि ती घार शांत झाल्यावर तिच्या जखमेवर औषध लाव.’’ मी त्यांनी जसं सांगितलं तसंच केलं. घार बरी झाली. आम्ही तिला आकाशात सोडून दिलं.

प्राणीप्रेमाचा वारसा मला आजोबा आणि बाबांकडून (उद्धव ठाकरे) लहान वयातच मिळालाय. मी असं ऐकून आहे, की माझ्या जन्मापूर्वी आमच्या घरात एक पांढरं घुबड होतं. दुर्मीळ जातीचं मार्मोसेट ‘मिनी’ माकड होतं. राजा आणि जुही या बिबटय़ांबरोबरचे आजा आणि आजीचे जुने ब्लॅक अँड व्हाइट फोटोही मी पाहिलेत. मला नेहमी वाटतं, आपल्याला आयुष्यात ज्या गोष्टींची गोडी लागते, त्यापाठी बालपणाच्या मधुर स्मृती दडलेल्या असतात. लहानपणापासून आईबाबांनी मला देशा-परदेशातल्या भ्रमंतीत आवर्जून अनेक प्राणिसंग्रहालयं, मत्स्यालयं, बोटॅनिकल गार्डन्स, म्युझियम्स आणि आर्ट गॅलरीज् दाखवल्या. निसर्ग व प्राणीविश्वाची ओढ निर्माण करण्यासाठी आणि कलांचा आस्वाद घेण्यासाठी याचा मला खूप उपयोग झाला. बाबांच्या अभयारण्यातल्या भटकंतीच्या रम्य कथा ऐकत लहानाचा मोठा झालोय मी. ते राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी  छायाचित्रणासाठी ताडोबा, बांधवगड, पेंचच्या जंगलात रानोमाळ फिरत असत. ते घरी आल्यावर त्यांच्या फिल्म्सच्या निगेटिव्ह डेव्हलप करणं वगैरे कामं करत. त्या वेळी मी उत्सुकतेनं ते काय करतात ते पाहात राही. मग एखादा वाघाचा फोटो दिसला की त्यामागचा चित्तथरारक किस्सा ते सांगत. बाबांच्या अशा रंजक कहाण्यांनी मला जंगलात फिरण्याची, प्राण्यापक्ष्यांचं जग अनुभवण्याची आवड निर्माण झाली.

लहानपणी बाबांच्या कडेवर बसून मी पुण्याला अनेक वेळा सर्पोद्यानात फिरलो आहे. मोठा झाल्यावर मला सापांचं वेडच लागलं. ‘आरे’च्या जंगलात साप, बिबटे, जीवजंतूंच्या निरीक्षणासाठी मी रात्र-रात्र फिरत असतो.

एकदा बाबांनी बांधवगडहून कडकनाथ या काळय़ाभोर कोंबडय़ांची जोडी माझ्यासाठी आणली. मग काय? मला कोंबडय़ांचा नाद लागला. इतका, की मी हैदराबादहून मोठमोठय़ा फायटर कोंबडय़ा आणल्या. मागच्या अंगणात, गच्चीत, घरात कोंबडय़ाच कोंबडय़ा! एक दिवस आजोबांनी मला खोलीत बोलावलं. ते मला रागावले नाहीत, पण म्हणाले, ‘‘अरे, या तुझ्या कोंबडय़ांचं आरवणं रात्री दोनपासून सुरू होतं. झोपायलाच देत नाहीत. असं वाटतं, दहा घडय़ाळांवर वेगवेगळे अलार्म लावलेत!’’ मग मी ते सगळे कोंबडे कर्जतच्या फार्मवर पाठवून दिले. अशी गंमत!

बाबांना आणि मला अ‍ॅक्वेरियममधल्या माशांकडे बघण्याचा, त्यांच्या हालचाली टिपण्याचा छंद आहे. बाबा कुठेही दौऱ्यावर गेले की खाऊ आणण्यापेक्षा पक्षी, प्राणी, सरडे, साप, मासे, वनस्पती या विषयांवरची खूप पुस्तकं घेऊन येतात माझ्यासाठी आणि मी ती सगळी पुस्तकं झपाटल्यासारखी वाचून काढतो. मला वाटतं, बाबांना या गोष्टींची आवड असूनही त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांची प्राणीप्रेमाची आवड माझ्याकडून पूर्ण करून घेतली आहे. आम्ही दोघांनी प्राणीजगत खरं ‘एन्जॉय’ केलं, ते बाबा मुख्यमंत्री असताना ‘वर्षां’वरील मुक्कामात! तिथे दोन समांतर जगं नांदतात. वेगवेगळे पक्ष, त्यांची मातब्बर नेतेमंडळी, मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांचा राबता ‘वर्षां’वर सतत असतो. त्याच वेळी तिथे वेगवेगळय़ा प्रकारचे पक्षी व प्राणी यांचीही एक वेगळी दुनिया आहे. एका रात्री मी या बंगल्याच्या अंगणात टॉर्च घेऊन फिरत होतो. तिथे मला गोगलगायीच्या १३ जाती सापडल्या. एकदा आई अंगणात फिरत होती तर तिच्या बाजूनं एक धामणही येऊन फिरत होती. मला आठवतं, तिथल्या बागेत ‘पॅराडाईज फ्लायकॅचर’ पक्ष्याचा नर यायचा. अत्यंत देखणा पक्षी! मी आणि बाबा त्याच्यावर पाळत ठेवून असायचो. तो दिसला रे दिसला की एकमेकांना फोन करायचो. एकदा लॉनमध्ये मीटिंग चालू असताना एक पोपटाचं पिल्लू खाली पडलं. त्याला कावळे टोचा मारायला येताहेत हे बघून बाबा मीटिंग सोडून तिथे धावले. त्या पिल्लाला त्यांनी औषधपाणी केलं, वाचवलं आणि आकाशात सोडून दिलं.

बाबांनी प्राणीप्रेमातून अनेक साहसी मोहिमा आखण्याची मलासुद्धा तीव्र प्रेरणा दिली आहे. २००८ मध्ये बाबा ‘हडसन बे’जवळ (Hudson Bay) Manitoba इथली भ्रमंती आणि छायाचित्रणाची रोमहर्षक मोहीम फत्ते करून आले होते. कदाचित ते तिथे जाणारे पहिले भारतीय असावेत. त्यांनी केलेलं तिथलं वर्णन माझ्या मनात इतकं मुरलं होतं, की २०१८ मध्ये मी चीनच्या सीमेजवळ उत्तर व्हिएतनाममधील  Khauca  इथे चुनखडीच्या पर्वतरांगांमध्ये Tonkin Snub Monkey च्या (विशिष्ट आकाराच्या बारीक, सुबक नाकाचं माकड) फोटोग्राफीसाठी गेलो. मीसुद्धा त्या भागातल्या या दुर्मीळ माकडांचे फोटो काढणारा कदाचित पहिला भारतीय फोटोग्राफर होतो. ती सगळी मोहीम इतकी चित्तथरारक होती म्हणून सांगू! दोन दिवस हवाई प्रवास करून आधी व्हिएतनामला गेलो. मग हनोईहून बारा तासांचा वाहन प्रवास करून  Khauca या गावात पोहोचलो. वाटेत नदी लागली. छातीभर पाण्यातून नदी पार करून तिथून आणखी तीन-चार तास प्रवास करून बेस कॅम्पला पोहोचलो. बेस कॅम्प म्हणजे चक्क लाकडाच्या ठोकलेल्या फळय़ांवर चादर घातलेली. त्यावर झोपायचं. ते चुनखडीचे डोंगर अत्यंत टोकदार, तीक्ष्ण दगडांचे असतात. त्यावरून चालताना धडपडून अक्षरश: पँट फाटून गुडघ्यातून रक्त येत होतं. सोलवटून गेलेल्या पायांनी अडखळत कॅमेरा घेऊन चालणं म्हणजे मोठं दिव्य होतं. खरंच भन्नाट अनुभव! बरं, ज्यांच्यासाठी गेलो, ती दुर्मीळ प्रजातीची माकडं अत्यंत बुजरी असतात. त्यांना बघायला अनेक लोक पाच-पाच वेळा येऊन गेलेत तरी त्यांना ती दिसली नाहीत. पण मी नशीबवान! मला ही माकडं दिसली. मी त्यांचे फोटो काढले आणि मला इतका आनंद झाला! बाबांसारख्या आपणही जंगलातल्या साहसी मोहिमा कराव्यात हे माझं स्वप्न जणू पूर्ण झालं आणि मग मला तो चस्काच लागला.

  सातवीत असताना मी बाबांबरोबर पेंच अभयारण्यात गेलो होतो. तिथे पहिल्यांदा वाघ बघितला आणि मग त्याला बघण्याचं, त्याचे फोटो काढण्याचं वेड लागलं. पुढे बाबांचं बोट सुटलं आणि स्वतंत्रपणे फिरायला लागलो. मला एक जंगल ट्रेक आठवतो. माझा सहकारी विजय आणि मी उभे होतो तिथून अवघ्या दहा फुटांवर वाघ! मी बसून पोझ घेऊन त्याचा फोटो काढला. म्हटलं, आता या वाघाला डोळे भरून थेट बघू या. कॅमेरा खाली केला. बघतो, तर डाव्या बाजूला केशरी रंगाचं काही तरी चमकलं. डावीकडे बघितलं तर एक वाघीण मला बघत बघत चक्क माझ्या जवळून त्या वाघाकडे चाललीय. ओह गॉड! मी असा ‘थ्रिल्ड’ झालो!

वाघ, बिबटे, सिंह, गोरिला मी अक्षरश: हातभर अंतरावरून थेट पाहिलेत, त्यांचे फोटो काढलेत. एकदा युगांडाच्या जंगलात मी व्हिडीओ काढण्यात दंग होतो. गोरिलाचं एक पिल्लू माझ्या जवळ आलं. त्यानं माझी पॅन्ट धरली आणि माझ्या मांडीपर्यंत चढलं. मी पुतळय़ासारखा स्तब्ध उभा होतो. इतक्यात समोरून त्या पिल्लाची आडदांड आई माझ्याजवळ आली, तिनं पिल्लाला खेचलं आणि त्याला घेऊन निघून गेली. तेवढय़ात एक भलामोठा गोरिला नर माझ्या जवळ आला. त्यानं मला जोरात धक्का देऊन खाली पाडलं आणि  जंगलात निघून गेला. युगांडात किबालेच्या जंगलात एक चिम्पांझीसुद्धा ‘मॉक अटॅक’ करत माझ्या अंगावर आला होता एकदा. खूपशा प्राण्यांची अशी माझी समोरासमोर गाठ पडलीय. अजून तरी मला काही इजा नाही केली त्यांनी! पण धोका असतोच. विशेषत: हत्ती, गवा आणि अस्वल या प्राण्यांपासून!

अर्थात धोका काय फक्त जंगली श्वापदांपासून असतो असं काही नाही. आफ्रिकेत कोंगो, युगांडा आणि रवांडाच्या मधोमध  Virunga volcanoes पर्वतरांगा आहेत. दुर्मीळ जातीच्या गोल्डन मंकीच्या शोधात तिथल्या डोंगरावरच्या जंगलात मी पोहोचलो. त्या माकडांची मोठी टोळी होती. पण ती काही झाडांवरून खाली येईनात. शेवटी मी गाइडला म्हटलं, अशी माकडं आणखी कुठे आहेत का? तो म्हणाला ‘‘हो. त्या तिथल्या डोंगरावर!’’ ‘त्या तिथे’ म्हणजे अक्षरश: बावीस किलोमीटर डोंगर चढत-उतरत कसाबसा तिथे पोहोचलो. तेवढय़ात मळभ आलं, पावसाचे थेंब पडायला लागले. म्हटलं, आता फोटोशूट बोंबललं. पण काही वेळातच मळभ गेलं. सोनेरी प्रकाश पसरला आणि ती दुर्मीळ प्रजातीची माकडं जणू मला पोझ देण्यासाठी मस्तपैकी माझ्याजवळ आली. सगळा थकवा विसरून मी त्यांचे फोटो काढले. काळोख पडू लागला. आम्ही डोंगर उतरू लागलो. तेवढय़ात सरकारी ‘सर्च पार्टी’ आम्हाला शोधत आली. कारण आमची संपर्क यंत्रणा बंद पडली होती आणि तो वन विभाग अत्यंत धोकादायक होता. जंगल भ्रमंतीत प्राणीप्रेमापोटी असे धोके मी खूपदा पत्करले आहेत. त्यात माझ्यासोबत माझं ‘ठाकरे’ हे आडनाव असतं! मात्र कुठेही गेलो, तरी सरकारी सूचना आणि आदेशांचं मी काटेकोरपणे पालन करतो. कारण ते माझ्या भल्याचंच असतं.

एकदा धड गाय नाही की धड हरण नाही अशा  Mishmi Takin नामक विचित्र प्राण्याच्या शोधात मी अरुणाचल प्रदेशात गेलो होतो. तिथे इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांबरोबर मी राहिलो तो अनुभव ग्रेट होता. तोंड बंद आणि कान उघडे ठेवून मी फक्त त्यांचे भन्नाट किस्से ऐकत होतो. वाटलं, आपण खरंच काहीच जग नाही बघितलं. तिथल्या मुक्कामात एकदा सकाळी वातावरण गंभीर वाटलं. कळलं, की तिथून जवळच डोकलाम इथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ती जागा इतकी घनदाट जंगलात, की तिथे ना नेटवर्क, ना चार्जिग! घरचे सगळे काळजीत. बाहेर काय चाललंय आम्हाला कळेना. तिथून सुटका तर अशक्य वाटत होती. थंडी मरणप्राय! मी ठरवलं, की हा तीन दिवसांचा ट्रेक एका दिवसात करून इथून बाहेर पडायचं. अक्षरश: दहा तासांत बेचाळीस किलोमीटर अंतर पार केलं. वाटेत फक्त एक सफरचंद आणि एक कप चहा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाय थरथर कापत होते. त्या क्षणी मला त्या जंगलात जिवावर उदार होऊन डय़ुटी बजावणारे जवान आठवले. मी मनोमन त्यांना सॅल्यूट ठोकला.

जंगलभ्रमंती कठीण आहेच. पण खरं सांगू? प्राण्यांचं जग अनुभवणं खूपच मजेदार असतं! एकदा मी माकडांचा एक मोठा कळप बघितला. मानवी भावभावनांचं दर्शन जणू मला त्यांच्यात झालं. एक माकडीण आपल्या पिल्लाला प्रेमानं कवटाळून बसली होती. दोन नर एकमेकांशी भांडत होते. माकडांची काही पिल्लं मस्त खेळात रमली होती. ते सगळं दृश्यच इतकं अनोखं होतं!

अशी जंगलभ्रमंती चालू होती आणि त्याबरोबर रात्र रात्र संशोधन साहित्याचं वाचन आणि अभ्यासही सुरू होता. या काळात अल्फ्रेड रसेल वॉलेस या संशोधकानं मला पार झपाटून टाकलं. खेकडे, पाली, मासे यांच्या प्रजाती शोधण्याची प्रेरणा मला त्यांच्याकडूनच मिळाली. माझ्याबाबतीत असं होतं, की एखाद्या प्राण्याची आवड प्रथम मनात निर्माण होते, मग त्या प्राण्याचा अभ्यास करण्याचं मला वेड लागतं. टाळेबंदीमध्ये मी विंचवांमध्ये घुसलो. बाहेर कुठे पडायचं नव्हतं. मग मी रात्रंदिवस विंचवांवरचे ब्रिटिश संशोधकांचे पेपर्स झपाटल्यासारखे वाचून काढले. त्यातून त्यांच्या नव्या प्रजातींचा शोध घेतला.

मला एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते, की निसर्गचक्रात प्रत्येक जीवजंतूचं एक स्थान आहे. लाखो वर्ष ते जीवजंतू उत्क्रांत होत आहेत. म्हणूनच माणसानं त्यांना वाचवलं पाहिजे. पशुपक्ष्यांबरोबर, जीवजंतूंबरोबर माणसानं एकत्र जगलं पाहिजे. त्यांचं रक्षण केलं पाहिजे. निसर्गाच्या आत्म्याशी एकरूप झालं पाहिजे. या भावनेतूनच माझं संशोधनाचं काम सुरू झालं.

कॉलेजमध्ये असताना एकदा मी आंबोली घाटात गेलो होतो. तिथे जांभळय़ा आणि गुलाबी रंगाचे खेकडे मला दिसले. मी संशोधन आणि अभ्यास करून या खेकडय़ांच्या नव्या प्रजातीचा शोध लावला. रघुवीर घाटातल्या एका प्रजातीला ‘Sahyadriana Thackerayi’ असं नाव देण्यात आलं. २३ फेब्रुवारी २०१६ च्या आंतरराष्ट्रीय  Zootaxa नियतकालिकामध्ये त्यावर शोधनिबंधही प्रसिद्ध झाला. तमिळनाडूतल्या अगस्तीयमलाई  (Agsthyamalai) मधल्या विंचवाच्या एका प्रजातीचा मी शोध लावला आहे. प्राणिजगतातल्या पन्नासहून अधिक नवीन प्रजातींच्या शोध आणि संशोधन कार्यात आजवर सहभागी झालो आहे. या शोधकार्याला आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांतून प्रसिद्धी मिळाली आहे.

कोयना सातारा विभागात सलग पाच पावसाळय़ांतल्या शोधमोहिमेमधून शोध लावलेल्या सापाला ‘Boiga thackerayi’ नावानं प्रसिद्धी दिली गेली आहे. सध्या अंदमान-निकोबार इथल्या पक्ष्यांवर आमचा संशोधन प्रकल्प चालू आहे.

सुरुवातीला मी स्वतंत्रपणे संशोधनाचं काम करत होतो. पण पुढे लोक आणि काम दोन्ही वाढायला लागलं. म्हणून २०१९ मध्ये ‘ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशन’ची स्थापना केली. अनेक नामांकित संशोधक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्था आता आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत. यापुढच्या काळात गावखेडय़ांतील मुलामुलींना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाती प्राणीविषयक संशोधनाचे प्रकल्प सोपवायचे आहेत. त्यानिमित्तानं भावी पिढीला निसर्गचक्र आणि पर्यावरणाचं महत्त्व कळावं, संशोधनाची प्रेरणा मिळावी, हा हेतू! त्यातून खूप मोठं काम होतं.

आता हेच बघा ना- आंबोली घाटात हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानी, मंदिराच्या कुंडात एका दुर्मीळ, अत्यंत प्राचीन ‘Schistura hiranyakeshi’ माशांच्या प्रजातीचा आम्हाला शोध लागला. त्या प्रजातीला वाचवण्यासाठी आमचे संशोधक, गावकरी, शाळेतली मुलं आणि देवस्थानचे विश्वस्त अशा सगळय़ांनी मिळून ‘देवाचो मासो’ असं नाव ठेवलेल्या या माशांचं संवर्धन आणि रक्षण करण्याचं काम सुरू केलं. हे त्या गावाचं वैभव आहे आणि त्यांनीच ते वाचवायचं आहे. करंगळीएवढय़ा माशांच्या रक्षणासाठीचा हा जगातला पहिला प्रकल्प आहे याचं मला समाधान वाटतं. असाच एकदा योगायोगानं मला बावडीत एक दुर्मीळ मासा सापडला. गुलाबी रंगाचा, बॉलपेनचं रिफील असतं, त्या आकाराचा हा अंध मासा आहे- ‘Rakthamichthys Mumba’. जोगेश्वरीतल्या अंध मुलांच्या शाळेजवळच्या विहिरीत असा मासा पाहिल्याचं ती विहीर साफ करणाऱ्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही तिथे सर्वेक्षण केलं आणि काय सांगू? विहिरीतलं पाणी टाकीत भरत विहीर खालपर्यंत रिकामी करत गेलो, तर जिथून झऱ्याच्या पाण्यानं विहीर भरते, त्या उगमातून पटापट हे मासे बाहेर पडू लागले. ते ‘माइंड ब्लोइंग’ होतं! मुंबईसारख्या शहरात माशांची अशी प्राचीन प्रजाती मिळते हे केवढं आश्चर्य आहे! या माशांनी कधी उजेडच पाहिला नाही, त्यामुळे ते अंध आहेत. योगायोग म्हणजे ही बावडी अंधशाळेजवळ आहे. उत्क्रांती प्रक्रियेदरम्यान आजही ही दुर्मीळ प्रजाती जिवंत आहे हे विशेष.

मला या संशोधनाचं जितकं समाधान वाटतं, तितकंच निसर्गाच्या ऱ्हासाचं दु:खही होतं. गेली दहा वर्ष मी आंबोलीत काम करतोय. या वेळचं तिथलं दृश्य भयंकर होतं. सर्वत्र बीअरच्या फुटलेल्या बाटल्या, वापरलेले डायपर्स, प्लास्टिक पसरलेलं! एरवी मोठय़ा संख्येनं तिथे साप आढळत. या वेळी मात्र मला तिथे फारसे साप सापडले नाहीत. हे काय करतोय आपण? केवळ प्राणिजगतच नव्हे, तर वनस्पतींचंही संवर्धन आपण करायला हवं. मी जंगलभ्रमंतीला जातो तेव्हा आवर्जून तिथल्या दुर्मीळ वनस्पतींची रोपं इथे आणतो आणि लावतो. विशेषत: ऑर्किड आणि आफ्रिकी व्हायलेट्स सारख्या अनेक झाडांची लागवड मी मोठय़ा प्रमाणावर इथे केलीय. पशुपक्षी असोत की वनस्पती, निसर्गाच्या अनमोल वैभवाचं जतन आपण केलं पाहिजे, भावी पिढय़ांसाठी!

मला तरुण पालकांना आवर्जून सांगावंसं वाटतं, की तुमच्या मुलांना वर्षांतून एकदा तरी जंगलात न्या. त्यांचा निसर्गाशी सूर जुळू दे. प्राण्यांसोबतच्या सहअस्तित्वाचं त्यांना भान मिळवून द्या. जे जीवजंतू निसर्गानं लाखो वर्षांपूर्वी जन्माला घातलेत त्यांना आपण वाचवू या. हेच खरं मानवतावादी कार्य आहे.

या प्राणिकल्याणाच्या कार्याचा मी एक भाग आहे याचं मला अतीव समाधान आहे.

इन्स्टा हँडल-Thackeraywildlifefoundation  

madhuri.m.tamhane@gmail.com