माधुरी ताम्हणे

‘‘कसायाला विकलेले बैल, भाकड गाई, ईदसाठी बाजारात आणलेले बकरे, रंग लावून विकायला ठेवलेली कोंबडीची पिल्लं.. यातल्या प्रत्येक प्राण्याची स्वतंत्र कहाणी होती. हाल सोसणाऱ्या प्राण्यांना वाचवण्यापासून सुरू झालेला माझा प्रवास पोलिसांच्या श्वानपथकातून निवृत्त झालेल्या वृद्ध कुत्र्यांच्या संगोपनापर्यंत कधी आला तेच कळलं नाही. कितीही वेळ दिला तरी कमीच पडेल असं हे एकहाती काम मला माझ्या जीवनाचं उद्दिष्ट देऊन गेलं. प्राणिसेवाच माझा धर्म, इबादत आणि प्रार्थना आहे,’’ सांगताहेत प्राणिप्रेमी फिझा शहा.

d y chandrachud
D. Y. Chandrachud : प्रार्थनास्थळांबाबतच्या निर्णयावर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
mla satyajeet tambe writes letter to maharashtra cm devendra fadnavis for bangladesh hindu protection
बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षण करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

माझा प्राणी कल्याणाचा प्रवास दीर्घकाळचा आहे. जवळपास २८ वर्ष या प्राण्यांबरोबर जगताना प्रेमात किती ताकद आहे ते मी अनुभवते आहे. मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबात मी लहानाची मोठी झाले. कॉलेज झाल्याबरोबर लगेच माझं लग्न झालं आणि मी जैन खानदानाची बहू झाले. वडिलांनी माझ्या होणाऱ्या पतीचा दयाळू स्वभाव ओळखला आणि आमच्या लग्नाला संमती दिली. माझे वडील परोपकारी. ते म्हणायचे, ‘‘आपला दैनंदिन खर्च भागवल्यावर जे पैसे उरतात, ते गोरगरिबांना दान करून टाकावेत. खैरात जरुरी हैं!’’ ते स्वत: तसेच वागत. दयाळूपणा असा मुरला माझ्या मनात!

  एकदा माझी मुलगी एक छोटं कुत्र्याचं पिल्लू घेऊन घरी आली. त्या पिल्लाला मी कवेत घेतलं. एखाद्या प्राण्याला असा थेट आणि जवळून स्पर्श करण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. मला आतून काही तरी वेगळं वाटलं. अचानक त्याच्याविषयी माया वाटू लागली. ते पिल्लू आजारी होतं, मी जेव्हा जेव्हा त्याला डॉक्टरकडे नेत असे. तेव्हा तेव्हा रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांकडे माझं लक्ष जाई. मनात विचार येई, मी माझ्या चिमुकल्या कुत्र्याच्या पिल्लाची एवढी काळजी घेते; पण हे बिचारे रस्त्यावरचे मुके प्राणी कडक उन्हात, मुसळधार पावसात, कडाक्याच्या थंडीत कसे बरं जगत असतील? कोण काळजी घेत असेल यांची? मी खूप काळजी घेऊनही मुलीनं आणलेलं ते कुत्र्याचं पिल्लू मेलंच. मी बेचैन झाले. वाटलं, या गरीब, भटक्या प्राण्यांसाठी काही तरी करायला हवं. मग मी त्यांना बिस्किटं खाऊ घालू लागले. त्यांची भुकेली तोंडं पाहिली आणि जाणवलं, की त्यांच्याइतकं गरीब, लाचार कुणीही नाही. या अश्राप जीवांना लोक हाडतूड करतात, त्यांच्या जिवाशी खेळतात.. दिवसरात्र या विचारानं मी अस्वस्थ होते. 

माझ्या लक्षात आलं, की या भटक्या प्राण्यांपैकी किती तरी प्राणी आजारी, लुळेपांगळे आहेत. ते आपल्या वेदना निमूटपणे सहन करत जगताहेत. त्यांना उपचारांची गरज आहे. मी पतीच्या (नवनीतलाल शहा) मदतीनं एक व्हॅन खरेदी केली. तिचं रुग्णवाहिकेत रूपांतर केलं. त्यात प्रथमोपचाराची औषधं भरली. रस्त्यावर आजारी अथवा जखमी जनावरं दिसली, की तिथल्या तिथे मी त्यांच्यावर उपचार करू लागले. गंभीर प्रकृती असलेल्या प्राणी व पक्ष्यांना रुग्णवाहिकेतून इस्पितळात भरती करू लागले. ते बरे झाले तरी लगेच काही तंदुरुस्त होत नाहीत. कमजोर असतात. अशा प्राण्यांना ना मी घरात ठेवू शकायची, ना बेवारशासारखं रस्त्यावर सोडू शकायची. प्राण्यांच्या सेवाभावी संस्थाही त्यांना ठेवायला नकार द्यायच्या. तेव्हा मला जाणवलं की या आजारी प्राण्यांसाठी निवारा हवा.

नेमकं त्याच वेळी ‘पेटा’नं (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स) न्यायालयात एक याचिका दाखल केली होती, त्याचा निकाल आला आणि न्यायालयानं बैलांना बैलगाडय़ांना जुंपण्यास मनाई हुकूम काढला. त्या काळात तेलकंपन्यांतून तेलाचे बॅरन पोहोचवण्यासाठी, बर्फ अथवा धान्य वाहून नेण्यासाठी बैलगाडय़ांचा मोठा वापर केला जाई. भर उन्हात, पावसात बैलगाडी हाकणारे लोक बैलांना मारमारून हे अवजड सामान वाहून नेण्यासाठी वापरत असत. माझं हृदय हेलावून गेलं. ते मुके प्राणी बोलत नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्यावर किती जुलूम कराल? न्यायालयानं बैलगाडय़ांतून मालवाहतुकीला प्रतिबंध केला आणि अचानक हे सगळे बैल निरुपयोगी ठरले. बैलगाडीवाल्यांचा धंदा बसला. ते यांना कुठून पोसणार? या काळात जवळपास ७०० बैलांना कत्तलखान्यात विकल्याचं मला कळलं. ये मेरे जीवन का सबसे डरावना हादसा था! कमालीची अस्वस्थ झाले. सगळय़ा बैलांना वाचवणं मला शक्यच नव्हतं. पण काही बैलांना तरी आपण कसायांच्या तावडीतून वाचवलं पाहिजे असं तीव्रतेनं वाटलं. मी विरारमध्ये एक ओसाड जागा विकत घेतली. यासाठी माझ्या पतीनं मला खूप पािठबा दिला. ते जैनधर्मीय. जीवदया हे त्यांचं मूलभूत तत्त्व. फक्त ते मला म्हणत, ‘‘तू या कामात जास्त गुंतू नकोस. थोडं घरच्या व्यवहारातही लक्ष घाल.’’ पण मला वाटायचं, सहज जमेल तितकं करावं असं हे काम नाहीच मुळी! या प्राण्यांना माझी गरज असेल, तेव्हा तेव्हा मी त्यांच्या सेवेला हजर राहिलंच पाहिजे. त्या जमिनीवर सर्वप्रथम खूप झाडं लावली. वेगवेगळय़ा प्रकारची! पशुपक्षी वृक्षराजींशिवाय जगूच शकत नाहीत. म्हणून पर्यावरणपूरक, हिरवीगार वनश्री असलेला निवारा तयार केला. एकदा फार्म उभारल्यावर, मी बैलगाडी- वाल्यांबरोबर संपर्क वाढवला, त्यांना मी पटवून दिलं, की कसाई तुम्हाला देतात तेवढे पैसे मी तुम्हाला देईन. तुमचे बैल तुम्ही मला द्या. मला त्यांच्या सेवेचं पुण्य मिळू द्या. असे मी शंभर बैल मी खरेदी केले आणि विरार (पूर्व) येथील माझ्या ‘फिझा फार्म’वर ठेवले.

त्यानंतर मी माझा मोर्चा गोठय़ांकडे वळवला. तिथे मी जे काही पाहिलं, अनुभवलं, त्यानं तर हादरूनच गेले. आपण कौतुकानं सांगतो, की आमच्या घरी गोठय़ातून ताजं दूध येतं. पण ते कसं येतं ते आपल्याला ठाऊक नसतं. गाईची कृत्रिम गर्भधारणा करून वासरू जन्माला घातलं जातं. गाईला बच्चा झाला की त्याचं तोंड आचळाला लावलं जातं आणि लगेच त्या वासराला तिच्यापासून दूर करून, तिच्यासमोर बांधलं जातं. वासरू पाहून तिला पान्हा फुटतो. इकडे वासराच्या पुढय़ात गवत टाकलं जातं, त्याला आईचं थेंबभर दूध न देता! ते ताजं दूध विक्रीसाठी घरोघर पाठवलं जातं. गाईची वासरू जन्माला घालण्याची क्षमता संपली की गाय रस्त्यावर! मी अशा रस्त्यावर सोडलेल्या किती तरी गाईंना ‘रेस्क्यू’ करून माझ्या फार्मवरच्या गोशाळेत ठेवलं आहे. अर्थात हे चित्र मी २५ वर्षांपूर्वी पाहिलं होतं. आज गोशाळा अत्याधुनिक झाल्या आहेत, तंत्रज्ञान विकसित झालंय; पण तरी आजही अनेकदा आपण प्राण्यांवर अत्याचार करतोच आहोत. मी जन्मानं मुस्लीम आणि विवाहानं जैनधर्मीय असले, तरी मी कोणताच धर्म मानत नाही. मी मानते अिहसा आणि भूतदया ही तत्त्वं!

 बकरी ईदच्या दिवशी मी विकायला ठेवलेले काही बकरे तरी मला परवडतील त्या किंमतीत विकत घेते आणि फार्मवर ठेवते. आज प्राणी कल्याणाचा कायदा अस्तित्वात आहे. त्यामुळे बैलांच्या शर्यती, कोंबडय़ांच्या झुंजींना आळा बसलाय. तरीही प्राण्यांवर जुलूम होतच आहेत. सरकारी पातळीवर वृद्धांसाठी, अनाथांसाठी, बालकांसाठी, अपंगांसाठी कार्य केलं जातं; पण जनावरांसाठी कुणाचा जीव  तुटत नाही. प्राणी बंड करत नाहीत. मुकाटय़ानं अन्याय सहन करतात. माणसानं वृक्षतोड करून पक्ष्यांना बेघर केलंय. प्राण्यांच्या हक्काच्या जागेवर गगनचुंबी इमारती बांधून त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर आक्रमण केलंय. गवत, जलचर प्राण्यांसारख्या नैसर्गिक अन्नापासून इतर प्राण्यांना वंचित केलंय. कोंबडय़ांची कृत्रिम पैदास माणूस करतो. त्यांना खुराडय़ात दाटीवाटीनं कोंबतो. कोंबडा मारण्यासाठी विकतो, तर कोंबडीला अंडी मिळावीत म्हणून जगवलं जातं. अंडी देण्याची क्षमता संपली की तिलाही मारून टाकलं जातं. कोंबडय़ांच्या छोटय़ा छोटय़ा पिल्लांना रंगाचं पाणी लावून रंगवतात आणि विकून टाकतात. मुलं त्यांच्याशी जीवघेणा खेळ करतात. मी आजवर अशा किती तरी पिल्लांना विकत घेऊन माझ्या फार्मवर ठेवलंय. ती दोन-चार दिवस जगतात आणि मरून जातात. मला ठाऊक असतं, ती जगणार नसतातच. लेकिन कम से कम मौत तो आराम की मिलती हैं उन्हे!

गाय, बैल, घोडे, गाढव.. माणसानं एकाही प्राण्याला सोडलं नाही. घोडय़ांना टांग्याला जोडतात, धड खाणंपिणं न देता त्यांना पळवतात. टांगा ओढताना रस्त्यातल्या खड्डय़ात घोडय़ाचा पाय मुरगळला किंवा मोडला, तर त्याला रस्त्यात बेवारशासारखं सोडून देतात. गाढवांना ओझी वाहायला लावतात, जायबंदी झाल्यावर देतात हाकलून! मी अशा किती तरी बेवारस प्राण्यांना माझ्या फार्मवर आणलंय. मंदिराच्या बाहेर गाय घेऊन बाया बसतात. आपण गाईला दहा रुपयांचा चारा घालून पुण्य कमावल्याच्या आनंदात निघतो; पण खरं तर त्या गाईंचा मालक वेगळा असतो. या बायकांनी पुष्कळदा ती गाय तासावर भाडय़ानं घेतलेली असते. चाऱ्याचा खर्च न करता मालकाला दूध मिळतं. रात्री मात्र त्याच गाईला उकिरडय़ावरचं अन्न चिवडावं लागतं. हे प्रकार मी अनेक ठिकाणी डोळय़ांनी बघितलेत.

निसर्गानं अगदी सापापासून प्रत्येक किडामुंगीला जगण्याचा हक्क दिला आहे. प्रत्येक धर्मानं प्राण्यांवर प्रेम करायला शिकवलं आहे. प्राणी आपले सोयरे बनू शकतात, आपल्या उपयोगी पडतात. आपण मात्र एकीकडे त्यांची पूजा करतो आणि दुसरीकडे त्यांच्यावर अन्याय! केवढा दांभिकपणा आहे हा! मला याचा खूप मानसिक त्रास होतो. मी जरी जमेल तितक्या प्राण्यांना रेस्क्यू फार्मवर ठेवलं, तरी मलाही मर्यादा आहेत. प्राणी कल्याणाचं काम एवढं मोठं आहे, की देवानं मला जरी सौ साल की जिंदगी दिली आणि मी न जेवता, झोपता २४ तास जरी हे काम केलं, तरी दर्यातला एक बूंद भी काम नही होगा! घरचे सोडल्यास माझी ‘वन वूमन आर्मी’ आहे! माझ्या फेसबुकवरच्या एकेका पोस्टला खूप ‘लाइक्स’ येतात; पण माझ्यासोबत काम करायला कुणी पुढे येत नाही. माझ्या फार्मवर ४५० प्राणी आहेत. त्यांची सगळी देखभाल मी स्वखर्चानं करते, माझ्या साठवलेल्या पैशांतून! मी माझ्या सर्व वैयक्तिक खर्चाला कात्री लावते. नवे दागदागिने, कपडेलत्ते, परदेशवाऱ्या काही काही नाही. ‘फिझा फार्म’वरच्या ४५० प्राण्यांचं पशुखाद्य, औषधपाणी, साफसफाई यावर खूप खर्च होतो. विजेचा आणि कर्मचाऱ्यांचाही खर्च असतो. फार्मवरच्या प्राण्यांना पावसापासून, थंडीपासून वाचवायला हजारो रुपयांची ताडपत्री लागते, गोणी लागतात. हल्ली प्लास्टिकच्या गोणी आल्यामुळे गोणपाट मिळत नाहीत.

   थंडीत या प्राण्यांसाठी गवताच्या पेंढय़ा भरून आम्ही उबदार गादी तयार करतो. या प्राण्यांचं जिणं वेदनायुक्त असतं, तसंच मरणही हृदयद्रावक असतं. मृत कुत्र्यामांजरांची मी फार्मवर समाधी बांधते; पण मोठे प्राणी मृत झाले की त्यांना नेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. पैसे खूपच लागतात या कामी. काही लोक या प्राण्यांसाठी पैसे, चारा, तांदूळ, पशुखाद्य पाठवतात. त्यांना मी प्राण्यांच्या व्हिडीओ क्लिप आणि फोटो पाठवत असते. मी प्रत्येक जनावराला त्याचं विशिष्ट पशुखाद्य देते. बच्चे आहेत ते माझे!

२६-११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या काळात सुलतान, सिझर, मॅक्स व टायगर असे चार श्वान पोलिसांकडे होते. त्यांनी मुंबईचं रक्षण केलं. त्यांना ‘डॉग ऑफिसर’ म्हणून संबोधलं जातं; पण असे श्वान निवृत्त झाले की त्यांच्या खाण्यापिण्याची खूप आबाळ होते. मला या कुत्र्यांबद्दल माहिती मिळाली. मी त्यांच्या अधिकाऱ्यांना भेटले. पोलीस पथकानं ‘फिझा फार्म’ची चार महिने माहिती घेतली. नंतर मला बोलावलं आणि म्हणाले, ‘‘तुम्ही इतकं चांगलं काम करता आहात, की आम्ही हे चारही श्वान तुम्हाला दत्तक देतो.’’ त्यानंतर पोलीस, विमानतळ, कस्टम्स, रेल्वेमधले श्वान सेवानिवृत्त झाले, की माझ्याकडे सोपवले जातात. असे ८० श्वान आज माझ्या फार्मवर आनंदानं त्यांचे शेवटचे दिवस कंठत आहेत. मी त्यांची उत्तम बडदास्त ठेवते. आजवर खूप खडतर आयुष्य जगलेत ते! तीन महिन्याचे असल्यापासून त्यांचं प्रशिक्षण सुरू होतं. त्यांना कडक शिस्तीत वाढवलं जातं. खेळणं त्यांना माहीतच नसतं. कार्यकाळात त्यांना सुट्टी मिळत नाही. सतत आरडीएक्स आणि बॉम्बचा वास हुंगावा लागत असल्यानं त्यांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होतो. ते नऊ महिन्यांचे झाले की त्यांना डय़ूटीवर पाठवलं जातं. हे चार पायांचे योद्धेच आहेत! मी देशासाठी सीमेवर जाऊन लढू शकत नाही. पण या श्वानांनी देशाची सेवा केलीय. त्यांची सेवा करून एक प्रकारे मी देशसेवाच करते अशी माझी भावना आहे.

या सर्व प्राण्यांची सेवा आपल्याला त्यांच्यापुढे झुकूनच करावी लागते. आपण असे झुकलो तरच आपण त्यांना स्पर्श करू शकतो. त्यांना जाणवतं, की हे आपले ‘हमदर्द’ आहेत. त्यांच्या निरागस डोळय़ांतून आपल्या प्रति कृतज्ञता ओसंडून वाहाते. कशी व्यक्त करू ही भावना मी शब्दांतून? मानवतेच्या या कार्यासाठी ईश्वरानं माझी निवड केलीय हे माझं भाग्य!

   मी कोणताही धर्म, रूढी, परंपरा, रीतिरिवाज मानत नाही. प्राणियोंकी सेवा यही मेरा धर्म हैं! यही इबादत हैं!  यही प्रार्थना हैं! 

fizzahshah28@gmail.com

madhuri.m.tamhane@gmail.com

Story img Loader