‘‘तुम्ही कितीही लळा लावायला गेलात, तरी कायम स्वत:चा अवकाश जपून राहाणाऱ्या मार्जार जमातीनं मला प्रेमातलं निरपेक्षपण, एकतर्फीपणा शिकवला! आमच्या घरातल्या मांजरांच्या जगानं मला केवळ आनंदच दिला असं नाही, तर त्यांच्या- आपल्यातल्या सीमारेषा धूसर करून टाकल्या. त्यांच्या मुक्या संवेदनांनी माझ्या संवेदनांची तीव्रता, उत्कटता वाढवली नि त्या मुकेपणानं माझ्या संवेदनांना बोलतं केलं. माझ्या एकटेपणात, लेखन-निर्मितीच्या थकलेपणातही ऊब दिली..’’ सांगताहेत प्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्रगडकर.
माझ्या लेखक वडिलांकडून- विद्याधर पुंडलिकांकडून जसा लेखनाचा, कथांचा वारसा मला मिळाला, तसाच मार्जारप्रेमाचाही! आणि लेखनाच्या वारशाचा जसा मला अभिमान वाटतो, तसा नि तितकाच अभिमान मला या मार्जारप्रेमाच्या वारशाचाही वाटतो. कायमच!
मला माहीत आहे, मांजरासारखा निर्बुद्ध, मठ्ठ प्राणी दुसरा नाही- आणि असं विधान करायला श्वानप्रेमी टपलेलेच असतात. कारण कुत्रा आणि मांजर यांची तुलना हमखास केली जाते- तीही श्वानप्रेमींकडून अधिक. ‘कुत्रा कसा मालकाशी इमान राखणारा.. मांजर जात मात्र स्वार्थी, लबाड..’ वगैरे म्हणत हे श्वानप्रेमी मांजरांना तडीपार करून टाकतात.. पण असेना.. काहीही असू दे, चार्ल्स डिकन्सनं म्हटल्याप्रमाणे ‘What greater gift than the love of a cat?’ तर थोडक्यात म्हणजे मार्जारभक्ती ही मला मिळालेली भेट आहे, जी माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग आहे. Happy is the home with at least one cat!’ या इटालियन म्हणीनुसार आमचं पुंडलिकांचं घर हे सुखी, आनंदी घर होतं, कारण ते मांजरांचं नांदतं गोकुळ होतं. सई परांजपे यांच्या ‘जास्वंदी’ नाटकातले दोन बोके कसं माणसांसारखं बोलतात.. किंवा हेमिंग्वेच्या ‘कॅट इन द रेन’ कथेत अमेरिकी बायकोच्या भावनिक अवस्थेचं प्रतीक म्हणून हेमिंग्वेनं मांजराला आणलं आहे. त्यातल्या त्या मांजराला हेमिंग्वे कायम ‘She’ म्हणतो..
it न म्हणता. तशी आमच्या घरातली मांजरं ही प्राणी वगैरे नव्हती, तर आमच्यासारखीच, आमच्यातलीच माणसं होती! आमचं घर पुस्तकांनी भरलेलं, लेखकांच्या राबत्यानं, त्यांच्या साहित्यिक चर्चानी निनादलेलं. त्यात आमच्या घरी असणाऱ्या मांजरांचे ‘म्यांव’ मिसळलेले असायचे. हॉलमधल्या वेताच्या ऐसपैस खुर्च्यात कायम एक-दोन मांजरांची वेटोळी पहुडलेली असायची. येणारी लेखकमंडळी थबकून ‘कुठे बसायचं?’ या संभ्रमात बराच वेळ उभी असायची. अण्णा- माझे वडील प्रेमानं ही वेटोळी तशीच्या तशी उचलून स्वत:च्या मांडीत घ्यायचे. निजलेल्या मांजरांच्या हनुवटीखाली खाजवत, त्यांची गुरगुर ऐकत मग लेखक- चर्चाना सुरुवात व्हायची. या लेखकमंडळींत शांताबाई शेळके- ज्या आमच्याच पंथाच्या- अफाट मार्जारभक्त- घरात पाऊल टाकतानाच म्हणायच्या, ‘‘पुंडलिक, मी नाही बाई तुम्हाला भेटायला आले, मी आलेय ते तुमच्या मांजरांना भेटायला. कालपासून फारच आठवण येत होती हो तुमच्या मांजरांची!’’
काळी, पांढरी, करडी, चॉकलेटी.. ते गबदूल, हडकी, बांधेसूद, ओबडधोबड अशा बहारदार व्यक्तिमत्त्वांची नि वेगवेगळय़ा कळांची कमीत कमी ८-१० भाटय़ा- बोके स्वत:च्या मस्तीत, ‘मेरी मर्जी’ म्हणत, शेपटय़ा फुलारून आमचं घर हे त्यांचं संस्थानच असल्याच्या थाटात वावरत असत. त्यांचं नामकरण करण्यासाठी माझ्या नि वडिलांच्या चर्चा झडत. अण्णांमधला लेखक सावधपणे त्यांचं व्यक्तिमत्त्व पकडणारी नावं शोधत राही. त्यात लय, नाद हवा, रंगांचं भान हवं वगैरे म्हणत राही. पण अखेरीस लाडानं माझ्या तोंडून जे निर्थक शब्द बाहेर पडत, त्याच शब्दांची नावं तयार होऊन जात. म्हणजे चुनुली, चिचू, मुशु, गुंई, गोत्ती, पन्या, कुनी.. अशी. आमच्याकडे एक काळपट सोनेरी आणि करडय़ा रंगाचे अभ्रं असणारी मांजरी होती. ती इतकी लोचट होती, की कितीही हाकला, हेटाळा, पण
ती हटायची नाही! तिचं नामकरण मी ‘लोचटी’ असंच करून टाकलं होतं! दुसरा एक मिट्ट काळोखी रंगाचा, पर्शियन जातीचा बोका होता. त्याच्या गळय़ापासून पुढच्या पायापर्यंतचा भाग त्रिकोणी पताकेसारखा पांढराशुभ्र होता. काळय़ा सुटावर पांढरा टाय घातल्यासारखा. आणि चार पंजे तळव्यापाशी पांढरे- स्टायलिश मोजे घातल्यासारखे. एखाद्या रुबाबदार फॉरेनर साहेबासारखा तो दिसायचा! त्याचं नाव आम्ही ‘इजिप्तू’ ठेवलं होतं. तर आमचा पन्या अगदी देशी आणि गावठी होता. केस राठ, शेपटी बारकुळी, पांढरा, पण अंगावर वाट्टेल तसे, कोड फुटल्यासारखे विचित्र करडे डाग.. शांताबाई म्हणायच्या,‘‘तुमचा इजिप्तू असू दे फॉरिनरसारखा ऐटबाज! पण मला बाई तो परका वाटतो. हा पन्या कसा, आपल्या माणसासारखा दिसतो, वाटतो!’’ त्यावर माझे वडील इजिप्तूला म्हणायचे, ‘‘काय हे लेका, तुझ्या रूपाचा हा केवढा पराभव आमच्या देशात! तुमच्या आंतरराष्ट्रीय धोरणात बदल करा जरा.. मग बघू या मराठीतल्या एका ग्रेट कवयित्रीकडून कौतुक लाभतं का तुम्हाला ते!’’
मार्जारभक्ती ही तशी एकतर्फीच भक्ती असते हे सत्य मात्र ही मार्जारजात तुम्हाला कधी विसरू देत नाही. या जातीचा लडिवाळपणा असतो तो इथूनतिथून फक्त दूध वा खाणं मिळवण्यासाठी. भूक लागली की आपली शेपूट झेंडय़ासारखी फडकवत, मखमली मऊ केसांची पाठ आपल्या पायाला घासत, प्रेमाचा आभास निर्माण करत असा काही बेईमानी लग्गा लावतील! मानेखाली खाजवत राहिलात तर घशातून गुरगुर निघेल, पण ती मायेची गुरगुर तुमच्यासाठी नसेल, तर स्वसुखातून ती निघालेली असेल. तुम्ही दोरीनं, लोकरीच्या गुंडय़ानं त्यांच्याशी आनंदानं खेळत राहाल, पण तो खेळ पुन्हा असतो तो त्यांच्या स्वत:साठीच- शिकारीचा आनंद, टपून नेम धरून जणू सावज पकडण्याचं ते त्यांचं रानटी सुख असतं! म्हणूनच ही जात ‘वाघाची मावशी’ शोभते. पण तरीही या जातीचा लळा किती विलोभनीय! त्यांच्या चकाकत्या गोटय़ांसारख्या डोळय़ांची जादुई तुम्हाला क्षणोक्षणी बुचकळय़ात टाकते. उन्हात त्यांची बुब्बुळं बघता बघता आकुंचन पावत सुईसारखी रेष होऊन जातात- आणि खेळण्याचा आक्रमक मूड आला, की ही बुब्बुळं काळय़ाभोर, भोवती पिवळय़ा रिंगणधारी, चकचकीत गोटय़ा होतात. झोपल्यावर त्यांच्या डोळय़ांच्या बंद चिरा, तुऱ्यासारख्या त्यावरच्या भुवया, गुलाबी नाकाचा इवलासा शेंडा आणि दोऱ्यासारख्या विस्फारित मिशा.. अहाहा! आमच्यासारख्या माणसांना स्वत:कडे आकर्षित करून घ्यायची अवघी लबाडी या रूपात ठासून भरलेली असते. तुम्ही नशीबवान असाल, तर प्रेमाचं हलकं जिभेचं चाटणं मिळतं. नाहीतर आवडत्या तरुणीकडे पाहता पाहता डोळा मारणाऱ्या तरुणासारखा अवचित डोळा मारून कधी ‘कॅट किस’ही पदरात पडतो! इतर वेळी काजळाची रेघ ओढावी तसे काजळाचे डोळे घेऊन, शेपटीचा फुलोरा उंचावून, चवऱ्या ढाळल्यासारखा शेपटीचा तो तोरा हलवत, वाघासारखी दबकी पावलं टाकणारं त्यांचं हेही रूप पाहात राहावं असं दिमाखदारच! खरखरीत जिभेनं आपलं अंग चाटून स्वच्छ करताना या जातीला पाहावं. त्यांच्या गुलाबी पंज्यांच्या गाद्यांचा स्पर्श आपल्या गालावर पंजे दाबून अनुभवावा. पंज्याला लाळ लावून तो पंजा टोकदार, सावध कानांच्या पाठीमागे नेऊन आपलं डोकं स्वच्छ करण्याची निसर्गानं त्यांना दिलेली ही अद्भुत देन पाहावी..
या सगळय़ा मार्जारलीला किती लोभसवाण्या! पण प्रेमातलं निरपेक्षपण, एकतर्फीपणा म्हणजे काय, हे तुम्हाला मार्जारजमात शिकवते. आणि तुमचं हे एकतर्फी प्रेम करणं तुम्हाला स्वत:ला लुभावतही राहतं.
झोपेतून उठल्यावर आळस देण्यासाठी उंटासारखं शरीर बाकदार करणं असो, नाही तर उंदीर, पाल, चिमण्या दिसताच नजरेत एका क्षणात शिकारी रानटीपण उमटणं असो.. अव्वल चित्रकाराला आव्हान देणारे चित्रविचित्र रंगांचे, आकारांचे त्यांच्या अंगावरचे कोलाज असोत.. या सगळय़ा मार्जारजमातीच्या विभ्रमांत एक लय जाणवत राहते. रंगांची, आकारांची.. एका सौंदर्यतत्त्वाची. आणि मग तुमच्या मार्जारप्रेमाचं रूपांतर मार्जारभक्तीत कधी होऊन जातं ते तुम्हाला कळतच नाही!
आमच्या कुनीच्या प्रथम सृजनवेणा मीही प्रथमच पाहिल्या. असेन तेव्हा १४-१५ वर्षांची. नुकतीच वयात आलेली. एक जन्म होताना इतक्या जवळून तो पाहण्याचा अनुभव विलक्षण होता. आमच्या चुनुलीचं कुनी हे अपत्य. चार पिल्लांतून, बोक्याच्या तावडीतून वाचलेलं- गुबगुबीत, भुऱ्या डोळय़ांचं, भुरकट, दाट शेपटीचं. बघता बघता त्याचं एका भाटीत रूपांतर होत गेलं- ही नवतरुणी काश्मिरी सुंदरीच मग दिसू लागली! अनेक बोक्यांना ती घायाळ करत होती! त्यातला एक कुणीतरी तिनं निवडला असावा. हळूहळू तिचं पोट फुगत तट्ट होत गेलं. गर्भवतीचं तेज तिच्यावर चढू लागलं. इतरवेळी चपळ, आक्रमक असणारी कुनी आळसावत, संथ होत गेली होती. आणि मग एके दिवशी तिला वेणा सुरू झाल्या. एका बास्केटमध्ये तिची बाळंतखोली मी सज्ज केली होती- तळाशी गोधडी घालून. सकाळपासून तशीही ती मलूल होती. घशातून खरवडून खरवडून ती ओरडत होती. मी अभ्यास करत होते, तिथे ती पुन्हा पुन्हा येत होती. माझ्या मांडीत बसत होती, अस्वस्थपणे पुन्हा दूर होत होती. मध्येच माझ्या हनुवटीजवळ तोंड आणून हलका चावा घेत होती. एक जीव जगात येऊ पाहात होता. पण त्या मुक्या आईच्या वेदनांची कातरता, करुण ‘मिऊ’- माझं मन पिळवटून टाकत होती. मला असहाय्य वाटत होतं, तिच्यासाठी काय करावं कळत नव्हतं. मग तिच्या वेणा वाढत गेल्या तशी ती कर्कशपणे ओरडू लागली. स्वत:भोवती मध्येच फिरू लागली. पाहता पाहता शेपटीखालून एक मांसल गोळा लोंबू लागला. मग एकेक करत बास्केटमध्ये पाच वळवळते कापसाचे रक्ताळलेले गोळे दिसू लागले. कुनीनं प्रसवलेल्या तिच्या अस्तित्त्व खुणा! त्या गोळय़ांच्या लुटलुटत्या माना, शिवल्यासारखे त्यांचे बंद, गच्च डोळे.. त्यांची आईला लुचण्यासाठीची आंधळी धडपड.. आणि आई या भूमिकेत शिरलेली आमची थकली, भागलेली कुनी.. आपल्या पिल्लांना चाटत स्वच्छ करणारी. तो जन्माचा सोहळा आजही मला आठवतो. मी थरारून गेले होते नि फार अस्वस्थही झाले होते. माझ्यातल्या स्त्रीला अबोधपणे मिळालेली स्त्रीत्वाची ती जाणीवही होती. त्या जाणिवेची तीच ती अस्वस्थता असेल- हे सांगणारी अस्वस्थता, की कुणाचाही जन्म, एक अस्तित्व या जगात उमटणं ही काही सोपी गोष्ट नाही- म्हणून तर ते सर्जन म्हणायचं! त्यानंतर कुनीच्या पिल्लांना बोक्यापासून वाचवणं ही फार मोठी जोखीम ठरली होती. या आधीही चुनुलीची पिल्लं अशीच बोक्याच्या तोंडी लागली होती. दात लावलेल्या, माना पिरगाळून निपचित पडलेल्या पिल्लांना तशीच चाटत राहिलेली चुनुली पाहिली होती. तिचं करुण हाका मारणं, बोक्यावर चवताळून वाघिणीसारखं धावून जाणंही.. हे सगळं हताशपणे पाहताना जाणवलं होतं, यांच्या भावनांना फक्त ‘आवाज’ आहे, पण ‘भाषा’ नाही. तरीही त्यांच्या संवेदना आपल्यासारख्याच तीव्र आहेत. त्यातली अगतिकताही मानवीच तर आहे.. आज वाटतं, आमच्या घरातल्या मांजरांच्या या जगानं मला केवळ आनंदच दिला असं नाही. तर त्यांच्या- आपल्यातल्या सीमारेषा धूसर करून टाकल्या. त्यांच्या मुक्या संवेदनांनी माझ्या संवेदनांची तीव्रता, उत्कटता वाढवली नि त्या मुकेपणानं माझ्या संवेदनांना बोलतं केलं.
पिल्लांना डोळे फुटले, की ती आमच्या घरभर फिरू लागायची. कधी घाईत पायाखाली यायची. प्रजा वाढू लागली, की त्यांना दुसरी घरं पाहावी लागायची. त्यांच्यावरचा आपला हक्क सोडून द्यायचा, म्हणजे मला हुंदक्यांवर हुंदके येऊ लागायचे. दुसऱ्याला पिल्लं देताना त्या पिल्लांचं केकाटणं ऐकवायचं नाही. आपण क्रूर आहोत असं वाटायचं. मन अपराधी व्हायचं. असं निरोप देणं असो, मांजरं घरातून एकाएकी नाहीशी होऊन त्यांचं बेपत्ता होणं असो.. सगळय़ात अस्वस्थ करायचं ते त्यांचं मरण- त्यात एक गूढ आहे असंच वाटायचं. आमच्याकडे मुशु नावाचा बोका होता. त्याचा एक डोळा पिवळा आणि एक डोळा निळाशार होता. भाजलेले दाणे तो आवडीनं खायचा. दूधभात नाही, तर वरण-भात त्याला खूप आवडायचा. तो रस्ता ओलांडताना एका रिक्षाखाली आला. त्याचा निष्प्राण देह मी आणि माझ्या भावानं उचलून आणला होता नि आमच्या वाडय़ाच्या अंगणातल्या प्राजक्ताच्या झाडाच्या आळय़ात मातीत पुरला होता. आम्हाला त्याला कचरापेटीत फेकून द्यायचं नव्हतं. या अपघाताआधीच त्यानं आमचं घर दूर केलं होतं. तो अचानक बेपत्ता झाला होता. खूप शोधूनही सापडला नव्हता. आपलं मरण जवळ आलेलं, त्याची चाहूल मांजरांना लागते म्हणे आणि ती आपलं घर सोडून निघून जातात. हरवून गेलेला मुशु आम्हाला असा सापडला- निश्चेष्ट!
आमची कितीतरी मांजरं अशी निरोप न घेता अचानक कायमची दिसेनाशी व्हायची आणि त्यांची पोकळी निर्माण होता होता नवीन पिल्लांचं आगमन व्हायचं.. ‘पुनरपी जननम् पुनरपी मरणम्’ या चक्रासारखं जन्म-मरणाचं चक्र आमच्या घरात या मांजरांच्या रूपानं अखंड चालू राहायचं.
आता माझ्या मुंबईतल्या घरी अगदी अनपेक्षितपणे मॅक्सिमसचं आगमन झालं आहे. खरं तर गजेंद्रगडकरांकडे मांजरांची विशेष आवड कुणालाच नाही. पण अचानक माझ्या भाच्याच्या ओळखीत मॅक्सिमस होता. त्याची मालकीण दुबईला स्थलांतर करणार असल्यानं मॅक्सीला एक नवं घर हवं होतं. मॅक्सी आमच्या घरात दाखल झाल्यानं आमचं कुटुंब विस्तारलं गेलं आहे. एखादा जिवंत शो-पीस असावा, तसा हा नवा सदस्य आहे. पर्शियन जातीचा, देखणा, बदामी रंगाचा. माझी दोन्ही मुलं अमेरिकेत गेल्यामुळे आम्ही दोघंच घरात उरलो होतो. तेव्हा आमच्या जोडीला हा आमचा तिसरा मुलगा बनून आला! मुलं घरटय़ातून उडून गेल्यामुळे एक प्रकारचं एकाकीपण घराला आलं असताना, एक विचित्र पोकळी निर्माण झाली असताना मॅक्सीच्या येण्यानं आमच्या घराला जशी एक नवीच रौनक आली आहे.
पर्शियन मांजरांच्या चेहऱ्यावर असणारा कुजका, खडूस भाव मॅक्सीच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसणार नाही. त्याचं सरळ नाक, एखाद्या बाळासारखा त्याचा निष्पाप चेहरा- विशेषत: त्याच्या बदामी अंगाला साजेसे बदामीच डोळे.. त्याच्या डोळय़ांत पाहताना खरोखरीच मला माझी लहानपणीची मुलं दिसतात, त्यांचं लहानपण दिसतं. मुलांबरोबरचा तो पाठीमागे गेलेला काळ दिसतो. मांजराला न शोभणारं अरानटीपण मॅक्सीत आहे, त्याची तर गंमतच वाटते. जात्याच एक शहाणपण अंगात असणारं मूल असावं, तसा आमचा हा मॅक्सी आहे. थाळीत ठेवलेलं त्याचं खाणं संपलं असेल, तर तो फक्त समंजसपणे त्या थाळीपाशी जाऊन शांत बसतो- खाणं द्यायची वाट पाहात. तो जवळ येईल, मांडीवर बसेल, असा मात्र लाघवी नाही. त्याचा अवकाश तो सांभाळून असतो नि आम्हालाही तो अवकाश देत राहातो!
मी त्याला तान्ह्या बाळासारखंच हातांच्या पाळण्यात घेते, तेव्हा त्याचे निष्पाप, पण लबाड डोळे माझ्याकडे पाहात असतात. माझं त्याच्याशी बोबडं बोलणं ते डोळेही ऐकत असतात नि ऐकता ऐकता पटकन तो एक डोळा मारून मला ‘कॅट किस’ देतो. घशातून विचित्र आवाज काढतो.. माझं एकतर्फी प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची माझी धडपड यशस्वी झाली म्हणत मी प्रसन्न होते. कधी संध्याकाळच्या कातरवेळेला मुलांची आठवण दाटून येते. भोवती एकटेपणाचा वेढा पडू लागतो. मला सिल्व्हिया प्लाथची ‘एला मॅसन अँड हर इलेव्हन कॅटस्’ कविता आठवते. एला मॅसनचा एकटेपणा. या एकटेपणात ती सोबत शोधते ती ११ मांजरांची. मला माझ्या एकटेपणात- कधी लेखनाच्या तंद्रीसाठीही मॅक्सीची मऊ मऊ फर-सोबत, तिची ऊब आश्वासक वाटते. ती माझ्या लेखन-निर्मितीच्या थकलेपणातही एक ऊर्जा देते.
माझ्या मार्जारप्रेमाची मलाच कधी कधी गंमत वाटते. या मार्जारप्रेमाची कधी नाही ते माझ्या वडिलांना काळजी वाटली होती, जेव्हा गजेंद्रगडकरांच्या घरी मांजर नाही म्हणून ठरत आलेल्या लग्नाला मी नकार देण्याच्या तयारीत होते! पण ‘तुझ्यासाठी मांजर आवडून घेईन’ असं नवऱ्यानं वचन दिल्यावर मी खूश झाले नि निर्णय पक्का केला.. तर असं हे माझं ‘सोयरे सहचर’पुराण- मार्जारपुराण!
gadkarmonika@gmail.com