माधुरी ताम्हणे 

‘‘अनाथ, भटके वा वन्य पशुपक्षी आणि मानव यांच्यात ठिकठिकाणी उभा राहाणारा संघर्ष हा माणसानं अनिर्बंधपणे त्यांच्या अधिवासावर केलेल्या अतिक्रमणाचाच परिणाम. पशुपक्ष्यांचे हाल पाहावले नाहीत आणि मी या क्षेत्रात पाऊल टाकलं. आजारी, भटक्या कुत्र्यांपासून घुबडं, बिबटे आणि तरस अशा जंगली प्राण्यांपर्यंत हे काम पोहोचलं. या प्राण्यांना माझी गरज असण्यापेक्षा मलाच त्यांची गरज आहे, कारण हे कामच मला आनंद आणि समाधानाची भावना देतं, माझं ‘पॅशन’ आता ‘मिशन’ झालं आहे..’’ सांगताहेत ‘रेस्क्यू (RESQ) चॅरिटेबल ट्रस्ट’च्या संस्थापक-संचालक नेहा पंचामिया.

Odisha Forest Department started efforts to bring back Zeenat tigress that entered forests of Jharkhand
‘झीनत’ला परत आणण्यासाठी वनविभागाचे जोरदार प्रयत्न; नेमक झालं काय?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
Citizens of Gondia and state experienced thrill of tigers in Navegaon Nagjira forest
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी

लहानपणापासूनच मला प्राणी खूप आवडतात; पण दोन-चार प्राण्यांना घरात ठेवावं, त्यांचे खूप लाड करावेत, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षांव करावा, असं मात्र मला कधी वाटलं नाही. शाळेत जाता-येताना कधी तरी वाहनाची धडक बसून जखमी झालेलं एखादं कुत्र्याचं अथवा मांजरीचं पिल्लू पाहिलं की मात्र माझा जीव कळवळायचा. मग मी त्या पिल्लाला दप्तरात टाकून पशुवैद्य डॉ. स्वालींकडे घेऊन जायची. ते त्या पिल्लाला गोळी द्यायचे, त्याच्या जखमेवर टाके घालायचे. त्यांना गंमत वाटायची, की एवढीशी पोर रस्त्यावरच्या कुत्र्यामांजरीला घेऊन येते उपचारासाठी! ते माझ्याकडून फक्त दहा रुपये घेत ‘फी’ म्हणून. मी माझ्या खाऊच्या पैशांतून ती फी देत असे.

तेव्हा माझं हे वेगळेपण माझ्या लक्षात आलं नव्हतं, पण आज कळतंय, की मला प्राण्यांच्या वेदना, क्लेश पाहावत नाहीत, अगदी लहानपणापासूनच. कोणताही प्राणी आजारी अथवा जखमी दिसला, की मला अतिशय वाईट वाटतं. आपल्याला बरं नसलं तर आपण लगेच औषध घेतो. हे बिचारे मुके प्राणी, त्यातही बेवारस, रस्त्यावरचे भटके प्राणी किंवा पक्षी. ते औषधपाण्यावाचून तडफडून मरतात. मला त्यांच्या या वेदना पाहावत नाहीत, अगदी लहानपणापासून! आज याच क्षेत्रात मदतकार्य करणारी संस्था उभी करण्यापर्यंत माझ्या संपूर्ण कार्याची हीच एकमेव प्रेरणा आहे. मुक्या प्राण्यांना वेदनामुक्त जीवन देणं आणि हक्काचं मोकळं जग मिळवून देणं. घर, गोठा, तबेला, पिंजरा हा मुळी पक्षी आणि प्राण्यांचा नैसर्गिक अधिवासच नाही. खुल्या आकाशाखालचं मोकळं जगणं हा त्यांचा  नैसर्गिक हक्क आहे. 

 सातवीत असताना मुंबईहून मी जे. कृष्णमूर्ती यांच्या भीमाशंकरजवळील ‘सह्याद्री हॉस्टेल’मध्ये शिकायला गेले. डोंगरमाथ्यावरची ती शाळा! एका बाजूला आरक्षित जंगल. दुसऱ्या बाजूला मोकळं मैदान. सभोवती मनुष्यवस्ती नाही. गर्द वनराईतल्या त्या हॉस्टेलमध्ये गेल्यावर माझ्या सगळय़ा संवेदना जागृत झाल्या. असं वाटलं, की वृक्षराजींच्या, पशुपक्ष्यांच्या या जगात मीच कुणी तरी परकी आहे. या शाळेनं मला निसर्गावर, पशुपक्ष्यांवर प्रेम करायला शिकवलं. वेगवेगळे ट्रेक्स, जंगलातल्या अभ्यास सहली.. मी तिथे ‘संघर्ष’ या विषयावरचा एक माहितीपट बघितला होता. संघर्ष हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो नातेसंबंधांतला वा निसर्गातला असेल, बाह्य जगातला वा अंतर्मनातला असेल; पण एक मानवप्राणी म्हणून कोणत्याही संघर्षांची तीव्रता कमी करणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे. आपण संघर्ष संपवू शकणार नाही कदाचित, पण त्याची धार बोथट करून जगात शांतता नक्कीच प्रस्थापित करू शकतो आणि हेच माझ्या जगण्याचं उद्दिष्ट बनून गेलं. निसर्ग, पशुपक्षी आणि मानवजात यांच्यातली संघर्षांची धार बोथट करण्याचं काम करणं गरजेचं आहे, हे मला मनापासून पटलं.

अर्थात हे सगळे विचार नंतरच्या काळात सुचलेले. लहान वयात मात्र प्राण्यांच्या वेदना कमी करण्यासाठी पशुवैद्यक बनणं हेच स्वप्न मी बघितलं होतं. ‘सीईटी’ दिली, उत्तम गुण मिळाले. मेडिकलला जाण्यापूर्वी नामांकित डॉक्टर असलेल्या माझ्या मामांना ‘मी पशुवैद्यक होण्याचं नक्की केलंय’ हे सांगितलं. त्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘‘प्राण्यांपेक्षा माणसांच्या वेदनांचा विचार कर. प्राणिजगतापेक्षा मानवजातीला तुझी जास्त गरज आहे.’’ मला नकळत हसू आलं. प्राणिजगताला माझी नव्हे, मला प्राणिजगताची गरज होती. ध्येय नक्की होतं, पण अद्याप दिशा मिळत नव्हती.

 प्राण्यांइतकंच मी खाण्यावरही प्रेम करते. मी दुसरा पर्याय निवडला. लंडनला जाऊन आहारतज्ज्ञ झाले. पुढे मास्टर्स करण्यापूर्वी भारतात आले आणि पुण्यात आई-वडिलांबरोबर राहू लागले. मात्र पशुपक्ष्यांच्या वेदना दूर करण्याची मनाला नुसती तळमळ लागून राहिली होती. माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मुंबईत एखाद्या संस्थेला फोन केला, की रस्त्यावर पडलेल्या जखमी प्राण्यासाठी त्यांची रुग्णवाहिका येई, वैद्यकीय मदत मिळे. पुण्यातही मी भटक्या कुत्र्या-मांजरांच्या मदतीसाठी धावून जाई; पण त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, रुग्णवाहिका वा संस्था त्या काळात मला शोधूनही सापडत नव्हत्या. मी हताश झाले. त्यातच एक प्रसंग घडला..

   नुकतीच ओळख झालेल्या तान्या या मुलीचा मला मेसेज आला. तीसुद्धा श्वानप्रेमी होती. तिला एक आजारी, बेवारस कुत्रा रस्त्यात सापडला होता. तो ‘कॅनाइन डीस्टेंपर’ या व्याधीनं जर्जर झाला होता. मज्जातंतूच्या या विकारात कुत्र्याला इतक्या वेदना होत असतात, की तो स्वत:चेच चावे घेतो, रक्तबंबाळ होतो. त्यातच हा रोग संसर्गजन्य! तान्यानं तिच्या मेसेजमध्ये म्हटलं होतं, की तिला या कुत्र्यासाठी एका रात्रीचा निवारा हवा आहे. रस्त्यात तळमळत पडलेल्या त्या कुत्र्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ती डॉक्टरकडे नेणार होती. माझ्या वडिलांच्या कंपनीच्या पार्किंग स्लॉटमध्ये एक पत्र्याची शेड होती. मी त्यांची परवानगी घेतली आणि रात्री १२ वाजता तान्या त्या कुत्र्याला घेऊन तिथे आली. ती म्हणाली, ‘‘इतक्या लोकांना मेसेज केले मी. उत्तर फक्त तुझ्याकडूनच आलं.’’ तो कुत्रा फारच वाईट अवस्थेत होता, पण एकाही संस्थेकडे रुग्णवाहिका नव्हती. पशुवैद्यक तर त्याला हातसुद्धा लावायला तयार नव्हते. आम्ही दोघी हतबुद्धपणे त्याची प्राणांतिक तडफड बघत होतो. शेवटी मी मुंबईच्या एका डॉक्टरांना फोन केला. त्यांनी झोपेच्या गोळय़ा लिहून दिल्या. आम्ही दोघी मध्यरात्री केमिस्टकडे थडकलो. त्या गोळय़ांचं नाव वाचून केमिस्ट आमच्याकडे संशयानं बघतच राहिला. एवढय़ा अपरात्री विशीतल्या या मुली झोपेच्या गोळय़ा का मागतायत? त्याला कसंबसं पटवून दिलं आणि त्यानं दोन गोळय़ा दिल्या. आम्ही एका कॅन्टीनमधून घासभर भात मिळवला, त्यात त्या गोळय़ा घातल्या आणि भीत भीत दुरूनच तो भात कुत्र्याच्या समोर ठेवला; पण कुत्रा वेदनेनं एवढा वेडा झाला होता, की त्याला भात खाणंही सुचेना. अखेर सकाळी तो गतप्राण झाला. एक जिवंत प्राणी औषधपाण्याविना तडफडून मरताना पाहिलं आणि त्या दिवशी माझे डोळे उघडले. मला खरंच असं वाटलं, की आपण फक्त तक्रार करतो; दुसऱ्यांबद्दल, सरकारबद्दल.. पण आपण स्वत: तरी काय करतो?

  आता एक से दो भले! मला तान्या भेटली होती आणि तिला कुत्र्यांच्या प्रशिक्षणाचा अनुभव होता. आम्ही दोघींनी ठरवलं, की आपण एक संस्था सुरू करायची. त्याद्वारे तिनं श्रीमंताघरच्या कुत्र्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि त्यातून पैसे कमावून ते पैसे आम्ही रस्त्यावरच्या निराधार प्राण्यांसाठी खर्च करायचे. असा ‘रॉबिनहूड सिंड्रोम’! प्राण्यांना वाचवायचं, म्हणून संस्थेचं नाव ठेवलं ‘फएरद’.

मी दिवसभर रस्त्यावर फिरून भटके, बेवारस, आजारी प्राणी शोधत राही. दरम्यान मी पुण्यातील डॉ. मिलिंद हाटेकर यांना भेटले. ते प्रख्यात पशुवैद्यक. मी त्यांना म्हटलं, ‘‘तुम्हाला अनाथ, बेवारस कुत्रे, मांजरी यांच्याविषयी फोन आले, तर मी जाऊन त्यांच्यावर उपचार करेन. तुम्ही मला शिकवा.’’ त्यांनी मला पशुवैद्यक प्रशिक्षक म्हणून काम शिकवण्याचं मान्य केलं. मी सकाळ-संध्याकाळ तिथे काम शिके आणि दुपारी त्यांचा दवाखाना बंद असताना रस्त्यारस्त्यांवर फिरून भटक्या कुत्र्यामांजरांवर उपचार करे.

डॉ. हाटेकरांची मी अत्यंत ऋणी आहे. त्यांच्यामुळे प्राण्यांना सलाइन लावण्यापासून, त्यांची शस्त्रक्रिया करण्यापर्यंत प्रत्येक कामात मी तरबेज झाले. आज आमच्या संस्थेत बरेच पशुवैद्यक आहेत, पण ते सगळे माझ्या निदानावर भरवसा ठेवतात. कारण मी हजारो प्राण्यांवर उपचार केल्यानं माझ्याकडे अनुभवसिद्ध ज्ञान आहे आणि संवेदनशील दृष्टिकोनही आहे. मी आमच्या डॉक्टरांना निक्षून सांगते, ‘‘हे कुणाच्याही मालकीचे पाळीव प्राणी नाहीत; पण त्यामुळे असं समजू नका, की त्यांच्यावर चुकीचे उपचार झाले तर तुम्हाला कुणी जाब विचारणार नाही. या सगळय़ा निराधार प्राण्यांची मी मालकीण आहे. मी तुम्हाला जाब विचारीन. तेव्हा त्यांच्या उपचारात हयगय नको.’’  मी जखमी, आजारी प्राण्यांसाठी कुठेही जायचे. रेल्वेरुळांपासून कचराकुंडीपर्यंत! मला लोक विचारत, ‘‘तू कुठे काम करतेस?’’ मी म्हणायचे ‘‘रस्त्यावर!’’ जखमी व आजारी प्राण्यांना उचलायला माझ्याजवळ तेव्हा रुग्णवाहिका नव्हती. माझी गाडी हीच अ‍ॅम्बुलन्स. २००७ मध्ये संस्था रजिस्टर केली, हेल्पलाइन नंबर प्रसारित केला. त्या वर्षी मी १२० प्राण्यांवर उपचार केले। नंतर हा आकडा हजारोंवर गेला.

 दरम्यान माझं लग्न झालं. २०११ ला मुलगा झाला; पण माझं काम काही थांबलं नाही. पतीचा, मुलाचा आणि सासू-सासऱ्यांचा मला भक्कम पाठिंबा आहे. त्यांना ठाऊक आहे, की मध्यरात्री कॉल आला तरी नेहा जाणारच! मी गरोदर असताना एका डॉक्टरकडे तपासणीसाठी जात होते आणि वाटेतच एक कुत्रा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला पाहिला. मी त्याच्याकडे धावले. सासूबाई म्हणाल्या, ‘‘नेहा, तू गरोदर आहेस. अशा कुत्र्याजवळ जाऊ नकोस.’’ मी म्हटलं, ‘‘तो व्हायरस काही उडून माझ्याकडे येणार नाही. मी आधी या कुत्र्याला दवाखान्यात नेणार. मगच मी तपासायला जाणार. तुम्ही काळजी करू नका.’’ मुलाच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी माझ्याकडे एक प्रकल्प अचानक आला. झरीन पटेल या बाईंचा आकस्मिक मृत्यू झाला होता आणि त्यांच्या खासगी फार्महाऊसवर १८५ प्राणी होते. ते सगळे अचानक अनाथ झाले होते. झरीन यांची एक नातलग मला शोधत आली. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून मी परस्पर त्या फार्म हाऊसवर गेले आणि त्या प्राण्यांची व्यवस्था केली. तेव्हा माझा जीव शांत झाला. गेल्या पंधरा वर्षांत कोणत्याही कारणानं माझ्या कामात खंड पडलाय असं मला आठवत नाही.

 त्यानंतर गोहत्याबंदीचा कायदा आला. त्यामुळे अनेक भाकड गाई रस्त्यावर आल्या, त्यांचे अपघात वाढले. भुकेपोटी त्या कचरा खाऊ लागल्या, आजारी पडू लागल्या. आम्ही एका वेळेला ८० ते ९० किलो प्लास्टिक त्यांच्या पोटातून काढत होतो. मला अतिशय वाईट वाटत होतं, पण काय करावं सुचत नव्हतं. अचानक एका कुटुंबानं माझ्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘‘आम्ही गेली सहा वर्ष तुला रस्त्यावर या प्राण्यांसाठी काम करताना पाहातोय. तुझ्या कामावर आमचा विश्वास बसलाय. पुणे शहराजवळ आमचा रिकामा प्लॉट आहे, तो एक रुपया लीजवर आम्ही तुला देतो, अगदी विनाअट!’’ त्यांनी आपला शब्द पाळला आणि प्राण्यांच्या उपचारांसाठी हा प्लॉट मला दिला. ते अक्षरश: उजाड माळरान होतं. दारुडे तिथे येऊन बसत. सुदैवानं देणग्या येत गेल्या आणि आम्ही तिथे अनाथ, जखमी, आजारी पक्षी व प्राण्यांसाठी ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ उभारू शकलो. तस्करीत सापडलेले वन्यप्राणी असोत, पाळीव प्राणी, साप, अजगर असोत, की घुबड, घारीसारखे पक्षी. आमचे पशुवैद्यक त्यांच्यावर उपचार करतात. ते बरे झाले की आम्ही त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देतो. ते इथे कायमस्वरूपी राहात नाहीत. असे पशुपक्षी इथून जातात तेव्हा माझ्या एका डोळय़ात आसू असतात, दुसऱ्या डोळय़ात हसू! या प्राण्यांच्या उपचार, देखभालीचा संपूर्ण खर्च दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणग्यांतून भागतो. अगदी करोनाकाळातसुद्धा मला लोकांकडून देणग्या मिळतच होत्या, हे विशेष. मला नेहमी वाटतं, हे प्राणी गरजू नाहीत, पण मी गरजू आहे! या कामातून मला आनंद आणि समाधान मिळतं. ती माझी गरज आहे, ‘पॅशन’ आहे. जेव्हा आपण समाजाची गरज ओळखून आपलं काम प्रामाणिकपणे करतो, तेव्हा ‘पॅशन’ हे ‘मिशन’ होऊन जातं.

  हे उपचार केंद्र आकार घेत असतानाच पुण्याचा झपाटय़ानं विस्तार होऊ लागला होता. आम्हाला खूप कॉल्स येऊ लागले. घार मांज्यात अडकलीय, बिबटय़ा वस्तीत आलाय, घुबडानं डक्टमध्ये घरटं बांधलंय.. असं का होतं? कारण त्यांच्या अधिवासावर आपणच आक्रमण केलंय. घुबडांना काय ठाऊक, की आधीची झाडं कापून इथे  इमारत उभी राहिलीय. लोक कीटकनाशक फवारणी करून त्यांना मारायचा विचार करत. मी तिथे धाव घेई, त्यांना समजावे, ‘‘तुम्ही थोडा संयम बाळगा. घुबडांची पिल्लं मोठी झाली की ती उडून जाणारच आहेत. तुम्ही तिथे जाळी लावा, पण त्यांना मारू नका.’’ एकदा हिंजवडीला शेतात बिबटय़ाची पिल्लं लोकांना दिसली. याचा अर्थ त्या पिल्लांची आणि त्यांच्या आईची चुकामूक झाली होती.आम्ही तिथे कॅमेरे लावले, त्या पिल्लांचं मूत्र त्या जागेच्या आजूबाजूला शिंपडलं आणि तिथे दबा धरून बसलो. हळूहळू त्या वासावर पिल्लांची आई तिथे आली आणि एक एक करत तिन्ही पिल्लांना जंगलात घेऊन गेली. आम्हाला खूप समाधान वाटलं. असं रेस्क्यू ऑपरेशन केलं नसतं, तर काय झालं असतं? जंगली कुत्रे वा कोल्ह्यांनी त्या पिल्लांची शिकार केली असती अथवा जंगल खात्यानं त्यांना ‘झू’मध्ये पाठवलं असतं! खरं तर प्राणिसंग्रहालय हा प्राण्यांसाठी तुरुंगच आहे.

   अशा ‘बिछडलेल्या’ अनेक मादी व बच्चांची आम्ही गाठ घालून दिली आहे. दुर्मीळ ‘हायना’ (तरस) जातीसारख्या अनेक जंगली प्राण्यांची आम्ही मनुष्यवस्तीतून सुटका करून त्यांना जंगलात सोडलं आहे. महाराष्ट्र सरकारनं वनखात्यासह काम करण्यासाठी आमची निवड केली आहे. राज्याच्या २४ विभागांमध्ये व देशात इतरत्रही आम्ही वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचं व संवर्धनाचं काम करतो. तूहेन सातारकर यांसारख्या तज्ज्ञ प्राणिप्रेमीसह माझी एक टीम आहे. अलीकडेच छत्तीसगडमधून गडचिरोलीत दाखल झालेल्या हत्तीच्या कळपांची माहिती घेण्यासाठी आमची टीम तिथे जाऊन आली. आम्ही सगळेच जण फील्डवर काम करतो. ड्रोनपासून अनेक अत्याधुनिक उपकरणं आमच्या हाताशी आहेत. त्यांच्या सहाय्यानं वन्यप्राणी आणि मानवजात यांच्या अस्तित्वाचा संघर्ष सोडवण्याचा आम्ही कसोशीनं प्रयत्न करतो.

 मी बालपणी पाहिलेल्या एका माहितीपटामुळे प्रभावित होऊन जे उद्दिष्ट मी ठरवलं होतं, ते अशा प्रकारे साध्य होताना पाहून मला फार समाधान वाटतं; पण तरीही मला मनापासून वाटतं, की पशुपक्ष्यांना ‘रेस्क्यू’ करण्याची, मानवापासून वाचवण्याची वेळच भविष्यात येऊ नये. ते स्वप्नरंजन न ठरता वास्तव व्हावं, हीच इच्छा!

वेबसाइट – www.resqct.org

madhuri.m.tamhane@gmail.com

Story img Loader