पूजा सामंत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘पाळीव प्राणी घरात असला की कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतं. पाळीव प्राण्यांनी मला जसा जीव लावला, तसाच रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांनीही लावला. यात होते कुत्री, मांजरे, गायी आणि कावळेही! त्यांच्यासाठी मी काही तरी करू शकले याचा आनंद आहे. त्यांच्यासाठी अन्न घेऊन गेले की गाडी येताना पाहूनच ते उत्सुक साद घालतात, खाणं मिळणार या आनंदानं उडय़ा मारू लागतात. ते पाहाणं जितकं मजेचं आहे, तितकंच मनाला समाधान देणारंही!..’’ सांगताहेत अभिनेत्री आयेशा जुल्का.

माझे वडील इंदरकुमार जुल्का हवाई दलात ‘विंग कमांडर’ होते. त्यामुळे त्यांची देशभर सर्वत्र ‘पोस्टिंग’ होत असे. महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे आम्हाला वास्तव्यासाठी नेहमीच मोठी घरं मिळत. अशा ऐसपैस घरांमध्ये मी वाढले. मला कळायला लागल्यापासून मी आमच्या घरात नेहमीच पाळीव प्राणी पाहात आले. त्यामुळे त्यांचा लळाही लहानपणापासूनच लागला.

मुळात माझ्या आईला (स्नेह जुल्का) प्राण्यांची खूप आवड आणि प्रेम. आपल्या घरात असलेल्या प्राण्यांची देखभाल आपण करतोच, पण माझी आई मात्र आजूबाजूच्या सगळय़ाच प्राण्यांना खाऊ घालत असे. रस्त्यावरचे प्राणी आजारी असल्यास त्यांची शुश्रूषा करण्यातही ती रमून जाई. आजही तिचं प्राणिप्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. मुक्या प्राण्यांविषयीच्या तिच्या या स्वाभाविक भावना मी आणि माझी बहीण (अपर्णा) दोघींमध्ये अलगद उतरल्या. पूर्वी आमच्या घरी एका वेळी किमान दोन कुत्रे, एखादी मांजर असायचीच. शाळेतून आल्यावर आम्ही आमच्या या पेट्सकडे धाव घेत असू.

मला आठवतंय, आईनं वेळोवेळी १६ भटकी कुत्री घरात आणली होती. एकूण १८ कुत्री आणि २ मांजरी झाल्यात आमच्याकडे. आम्ही घरात चार माणसं- मम्मी, डॅडी, मी आणि बहीण. पण प्राणिमित्र मात्र २० झाले! घरात पाळलेल्या सगळय़ा प्राण्यांची काळजी मम्मी स्वत: घेत असे. त्यांना वेळच्या वेळी आहार, स्वच्छता, त्यांचं आरोग्य, या सगळय़ाची ती काळजी घेई. त्यामुळे तिच्याकडून प्राणिमित्रांविषयीचा प्रेम-जिव्हाळा आम्हा सगळय़ांमध्ये उतरला.

माझ्या लग्नानंतरही माझं प्राणिप्रेम कायम राहिलं आहे. सध्या माझ्या मुंबईच्या घरी दोन पपीज् आहेत. त्यांच्याशी मी भरपूर गप्पा मारते! मी दिवसभर घरी नसले की पपीज् घरातल्या केअर टेकरकडे असतात. एक आठवडा सतत चित्रीकरण केल्यावर मला त्या दोघांची खूप आठवण यायला लागते. मग मी विनंती करून एखाद्या आठवडय़ाची सुट्टी मागते! हेतू अर्थातच माझ्या या प्राणी दोस्तांबरोबर वेळ घालवता यावा हाच. मला माझे पूर्वीचे दिवस आठवतात. माझ्या बहुतेक ‘इनडोअर’ आणि ‘आऊटडोअर’ शूट्सना मी आमच्या घरातल्या पेट्सना घेऊनच जात असे. ‘शॉट’ दिल्यानंतर मधला वेळ या प्राण्यांना खेळवण्यात छान जात असे.

लोणावळय़ातही माझं घर आहे. अधूनमधून मी आणि माझा नवरा तिथे राहायला जातो. मला लोणावळय़ात अनेक बेवारस गायी रस्त्यावर फिरताना दिसल्या. त्यातल्या काही गायी अतिशय कृश होत्या, काही गायींच्या अंगावर जखमा दिसल्या. त्यांना अशा अवस्थेत पाहून माझा जीव कळवळला. त्या गायींना वेळेवर खायला मिळत नव्हतं. करोना टाळेबंदीच्या काळात हॉटेल्स बंद असत आणि फारसं कुणी रस्त्यावर नसे. तेव्हा तर भटक्या प्राण्यांची खूपच आबाळ झाली. त्यांना या काळात काहीही खायला मिळत नसे. भटके प्राणी कचऱ्यातूनही अन्न वेचताना दिसतात, पण त्या काळात तिथेही त्यांना काही मिळत नव्हतं. अन्नाअभावी रस्त्यावरचे भटके प्राणी रस्त्यावर मरून पडलेलेही मी पाहिले आहेत. आणि पक्षी त्यांच्या शरीराचे लचके तोडत होते! हे असं काही पाहाणं फार अवघड असतं. मग मीच पती आणि सहाय्यकांची मदत घेऊन अशा २९ भटक्या प्राण्यांना मूठमाती दिली. प्राण्यांची अन्नान्नदशा होतेय हे समजल्यावर मी अनेक लिटर दूध आणि पाव कारमध्ये ठेवून तिथे फिरू लागले आणि दिसेल त्या भटक्या प्राण्यांना खायला देऊ लागले. त्या वेळी प्राण्यांची स्थिती बघून माझं मन सुन्न होत होतं. मी, माझा एक सहाय्यक आणि माझे पती असे आमच्या तिघांचे स्पेशल पासेस त्या वेळी आम्ही बनवून घेतले होते. त्यामुळेच टाळेबंदीत आम्ही रस्त्यावर जाऊन बेवारस प्राण्यांसाठी अन्न, पाणी आणि त्यांच्या अंतिम विधीची सोय करू शकलो. या सगळय़ा कामात मला समाधान मिळत होतं, ते मी प्राणिमित्रांसाठी खारीचा वाटा उचलू शकते आहे याचं. पण त्याबरोबर अस्वस्थही वाटायचं आणि त्या बेचैनीमुळे रात्री झोप येत नसे! पुढच्या टप्प्यात मी माझ्या गाडीत पेपर प्लेट्स ठेवू लागले आणि ताजं शिजवलेलं अन्न या प्राण्यांना देऊ लागले. हळूहळू टाळेबंदी संपली, पण रस्त्यावर राहाणाऱ्या प्राण्यांना अन्नपाणी, झालंच तर निवारा देता देईल का, हा प्रश्न माझ्या मनात घोळायला लागला. लोणावळाच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांना भेटले आणि या प्राण्यांसाठी त्यांच्याकडून काही मदत होईल का, याविषयी चर्चा केली. त्यांच्या सहकार्यानं लोणावळय़ात एका भक्कम शेडची व्यवस्था करण्यात आली. पाणी आणि अन्नासाठी स्टीलच्या प्लेट्स आणल्या. अनेक सुशिक्षित कुटुंबंसुद्धा शिळं अन्न कचऱ्यात किंवा रस्त्यावर फेकतात. हे अन्न भटकी कुत्री, गायी खातील असं त्यांना वाटत असतं, पण कुठेही अन्न फेकलं की ते भटक्या जनावरांना मिळतंच असं नाही. उलट असं फेकलेलं अन्न खराब होतं, रस्ते अस्वच्छ होतात, दरुगधीचा त्रास होतो तो वेगळाच. म्हणून मग या शेडमध्ये ‘फीड पॉइंट्स’ आणि ‘फीड पोल’ करवून घेतले. जवळपासच्या कुणाकडे जास्तीचं अन्न असल्यास ते त्यांनी या फीड पॉइंट्सवर आणावं म्हणजे ते प्राण्यांना दिलं जाईल, अशी सोय केली. असे ५० फीड पॉइंट्स लावले. शेड्सची स्वच्छता राखण्यासाठीही कर्मचारी वर्ग नेमला.

    रस्त्यावर फिरणारे बेवारस प्राणी आजारी आणि भुकेले असल्यास त्यांना या फीड पॉइंट्स-शेल्टरमध्ये आणण्यासाठी मला व्हॅनची गरज होती. अभिनेता जॅकी श्रॉफ या सहृदय मित्रानं मला त्यासाठी व्हॅन्स भेट दिल्या आहेत. या व्हॅनद्वारे प्राण्यांना उचलून आणणं, त्यांच्यावर उपचार करून घेणं, अन्न-पाणी-निवाऱ्याची सोय करणं मला जमलं. पुढचं महत्त्वाचं काम होतं, ते म्हणजे या शेकडो प्राण्यांसाठी दररोज अन्न शिजवण्याचं. सकाळी ६ वाजता प्राणिमित्रांसाठी अन्न शिजवण्याचं काम सुरू होतं. डाळ, भात, चिकन, रोटी, दूध, सोयाबीन असा त्याचा आहार असतो. दररोज ६०० ते ७०० किलो अन्न शिजवलं जातं. क्वचित काही वेळा चिकनही आम्हाला देणगीच्या स्वरूपात मिळतं. अन्न शिजलं की ते २०-२० किलोंच्या पातेल्यांमध्ये भरून व्हॅनमध्ये भरलं जातं आणि प्राणिमित्रांकडे जाऊन त्यांना ते दिलं जातं. ताजं-गरम अन्न मिळाल्यानंतरचं त्यांचं समाधान पाहून मलासुद्धा अगदी सात्त्विक समाधान लाभतं! माझी व्हॅन येताना पाहूनच प्राणी इतके आनंदित होतात की उडय़ा मारत अक्षरश: त्यांचं नृत्य सुरू होतं! ड्रायव्हर, क्लीनर, हेल्पर आणि बऱ्याच वेळेला मी स्वत: असे सगळे मिळून फिडिंगचं काम करतो. कावळय़ांसाठीही आम्ही पिठाचे गोळे बनवतो आणि खाऊ घालतो.  अर्थात या मित्रांसाठी हे सर्व करताना मला अनेकांकडून विरोधही झाला. त्यासाठी संघर्ष करावा लागला. कुत्री भुंकतात, वाटसरूंना चावू शकतात, असे बहुतेकाचे आक्षेप असतात. पण मी नेटानं माझं काम करत राहिले. वकिलांचा सल्ला घेतला. मला पाठिंबा देण्यासाठी काही समाजसेवी संस्था पुढे आल्या, पण त्यांचा उत्साह फार टिकत नव्हता. मग मी स्वत: याबाबत समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. लहान मुलांना भूक लागली की ती रडतात, तसंच मुक्या प्राण्यांना भूक लागल्यावर तेही आवाज करतात, भुंकतात. फारच क्वचित एखादा कुत्रा पिसाळतो आणि म्हणून चावा घेतो. फीडिंग पॉइंट्स बनवल्यानंतर तिथे रस्त्यावरच्या कुत्र्यांचं भुंकणं बंद झाल्याचा अनुभव लोकांना आला.     जे काम मी लोणावळय़ाला केलं, तेच मुंबईत वर्सोव्याला करण्याचा प्रयत्न केला. पण तो काही साध्य झाला नाही. अनेकांचा त्याला विरोध होता. भटकी कुत्री घातक, त्रासदायक असतात, या मतावर ते लोक ठाम होते. मी आयुक्तांना जाऊन भेटले, त्यांचं सहकार्य लाभलं. वर्सोव्यात एक फीडिंग पॉइंट बनवलाही, पण स्थानिकांचा कडाडून विरोध झाला. त्याला राजकीय रंग दिला गेला आणि योजना पुढे जाऊ शकली नाही.

कधी कधी मला वाटतं, की आपल्या सामाजिक संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत का? पण मी असं ठरवलं आहे, की कितीही अडथळे आले, तरी प्राणिमित्रांसाठी मी कायम काम करत राहीन. माझ्या ध्येयापासून दूर होणार नाही. कारण लहानपणापासून घरातला पाळीव प्राणी कसा जीव लावतो हे मी पाहिलं आहे. त्यांच्यामुळे कुटुंब कसं पूर्ण झाल्यासारखं वाटतं, तेही पाहिलं आहे. आपण बाहेरून आल्यावर शेपटय़ा उंचावून आणि पायांत घोटाळत ते व्यक्त करत असलेला आनंद बघितला की आपलं कुणी तरी आहे आणि ते कायम आपल्या जवळच राहाणार आहे, हे वाटणं अनुभवलं आहे.

    रस्त्यांवरच्या प्राण्यांनी मला काय दिलं, तर मन:शांती आणि समाधान. मी त्यांच्यासाठी काही तरी करू शकले की छान वाटतं. अन्न देणारी गाडी येताना पाहून ते घालत अ्सलेली साद आणि गाडीभोवती त्यांची उत्सुक, नाचरी पावलं पाहून मजाही वाटते. मैत्रीची निर्मळ भावना हे प्राणिमित्र शिकवतात, असं मला मनापासून वाटतं. तुम्ही ही भावना अद्याप अनुभवली नसेल, तर जरूर अनुभवून पाहा. तुम्हाला निखळ आनंदच मिळेल.

samant.pooja@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soyare sahchar pooja samant animals happiness pets stray animals streets ysh