‘‘विठ्ठलाचा अवतार राक्षसांच्या निर्दालनासाठी नाही, तर तो सामाजिक कारणातून झाला. भक्त पुंडलिकाच्या मनांत जेव्हा परिवर्तन झालं, तेव्हाच तो आईवडिलांची सेवा करू लागला. तीही इतकी मनापासून की त्याने देवासाठी वीट भिरकावली. विटेवर उभा झाला म्हणून तो विठोबा! आज अनेक घरांत आई-वडील अडगळीत पडलेत, म्हणूनच वृद्धाश्रम वाढलेत. ज्या आईवडिलांनी आपल्याला प्रेमाने वाढवलं त्याची परतफेड केवळ कर्तव्यभावनेतून व्हावी हे उचित आहे का? समाजमनाला ही समज देण्यासाठीच विठोबारायाचा अवतार आहे.’’ कालच झालेल्या आषाढी एकादशीनिमित्ताने खास लेख.
प्रत्येक संप्रदायाची एक परंपरा असते. या संप्रदायाचं विशिष्ट दैवत असतं, वाङ्मय असतं. त्यातून त्या दैवताचे भक्त निर्माण होतात. वारकरी संप्रदायाचं दैवत आहे, पांडुरंग! पांडुरंग हा विष्णूचा अवतार! त्या अवताराचं एक वेगळं वैशिष्टय़ आहे. यापूर्वीचे अवतार हे राक्षसांच्या निर्दालनासाठी झाले. राक्षस वाढले तेव्हा भक्तगणांनी प्रार्थना केली. तेव्हा राक्षसांच्या निर्दालनासाठी भगवंताने अवतार घेतला म्हणजे ते ‘अवतीर्ण’ झाले. ‘अवतीर्ण’ होणे म्हणजे आहे त्या पदातून खाली येणे. मग विठ्ठलाचा अवतार हा इतका वैशिष्टय़पूर्ण का? कारण हा अवतार राक्षसांच्या निर्दालनासाठी झाला नाही, तर सामाजिक कारणातून झाला. भक्त पुंडलिकात परिवर्तन झालं. आई वडिलांची सेवा करण्याची भावना निर्माण झाली. तिची तीव्रता पाहून साक्षात् भगवंत प्रसन्न झाले आणि विठोबाराया अवतीर्ण झाले.
आज आपल्याला ठाऊक आहे की अनेक घरांत आई-वडील अडगळीत पडलेत. उपयोग संपला की फेकलं दूर! म्हणूनच वृद्धाश्रम वाढलेत. कदाचित ती काळाजी गरज असलेही, पण त्यातून सामाजिक नादारकीच प्रकट होते. ज्या आईवडिलांनी कष्ट करून आपल्याला वाढवलंय त्यांना आपण सांभाळू शकत नाही? मजा बघा. गरिबांचे व अतिश्रीमंतांचे आईवडील वृद्धाश्रमात गेलेले आपल्याला दिसत नाहीत. उच्च मध्यमवर्गीयांनाच आईवडिलांची अडचण होते. तर अशा सामाजिक कारणाकरिता विठोबारायाचा अवतार झाला आहे. समाजाला प्रेमाची, कर्तव्याची जाणीव करून द्यावी यासाठी हा अवतार आहे. त्यातही ‘कर्तव्य’ शब्द मला मान्य नाही. कारण आईवडिलांची सेवा ही केवळ कर्तव्यभावनेतून केली तर त्यात भावनेचा ओलावा येत नाही. उदा. आपण संसार करतो. तेव्हा पत्नी जर म्हणाली की नवऱ्याला व मुलांना जेवू घालणं, सांभाळणं हे मी फक्त कर्तव्यभावनेतून करते, तर ते आपल्याला रुचेल का? ज्या आईवडिलांनी आपल्याला रक्ताचं पाणी करून वाढवलं, त्यांनी घातलेल्या प्रेमाच्या घासाने आपण तृप्त झालो. तर त्याची परतफेड केवळ कर्तव्यभावनेतून व्हावी हे उचित आहे का? समाजमनाला ही समज देण्यासाठी विठोबारायाचा अवतार आहे.
तसंच वारी ही माणसाची पापं धुण्यासाठी नाही. वारी ही प्रभूची प्रेमप्रतीती भोगण्यासाठी आहे. भक्त पुंडलिकाच्या मनांत जेव्हा परिवर्तन झालं, तेव्हाच तो आईवडिलांची सेवा करू लागला. तीही इतकी मनापासून की त्याने देवासाठी वीट भिरकावली. विटेवर उभा झाला म्हणून तो विठोबा! ‘मुसावले मुसे प्रेम भक्तांच्या ओरसे’. प्रेमाच्या मुशीत प्रेमच ओतलेय.
वारकरी संप्रदायासाठी विठ्ठलाचं स्वरूप आणखी एक शिकवण देतं. विठूच्या दृष्टीत समत्व आहे. आपपरभाव नाही. त्याच्या चरणातही समत्व आहे. या अवतारात मुळातच विषमता नाही, साहजिकच त्या अवताराच्या भक्तांमध्येही विषमता नाही. कारण हा अवतार मुळातच समतेतून झालाय. पांडुरंगाच्या दृष्टीत सर्वासाठी समत्व आहे. ममत्व आहे. प्रेम आहे. प्रेमाचा प्रवाह अखंड प्रवाहित होणं हीच खरी वारी! आणि या प्रवाहाला करी घेणारा तोच वारकरी!
महाराज विटेवर उभे राहिले तेव्हा भक्तांची मांदियाळी भोवती जमा झाली. अर्पणशीलता ही आपली जुनी परंपरा! देवाला काहीतरी द्यावं ही संतांची भावना! संत म्हणाले, ‘भक्तांसाठी अवतीर्ण झालास! तुला काय द्यावं? काय अपेक्षा आहे तुझी आमच्याकडून?’
‘नाम आणि स्मरण!’ भगवंत उत्तरले.
संतांनी एकमुखाने भगवंताचं मागणं मान्य केलं. ते म्हणाले,
‘आम्ही घ्यावे तुमचे नाम
तुम्ही द्यावे आम्हा प्रेम
ऐसे निवडीले संती
मुळी बैसोनी एकांती’
गंमत बघा! विष्णूच्या अवतारांतील देवस्थानात लाखो रुपये भक्तांकडून येतात. इथे या अवतारात मात्र वारकरी येतो व विठोबाच्या पायावर फक्त भक्तिभावाने डोके टेकतो. असं म्हणतात की विठोबाराया हा गरिबांचा देव आहे. मला हे मान्य नाही. हा मनाने श्रीमंत असणाऱ्यांचा देव आहे. भक्त विठुरायाला प्रेम देतात तसाच विठुराया त्यांच्यावर अलोट प्रेमवर्षांव करून त्याची परतफेड करतो. श्रीमंत माणूस सुखी असेल, पण समाधानी असेलच असं नाही. वारकरी मात्र विठुरायाच्या प्रेमाची प्राप्ती झाल्याने सुखी व समाधानी असतो, म्हणूनच हा गरिबांचा देव नाही, तो महान श्रीमंतांचा देव आहे. एखाद्याने आपली स्तुती केली तर आपल्याला आनंद होतो, पण कुणी नुसती प्रेमाने विचारपूस केली तर त्याचे शब्द हृदयाला भिडतात. कारण ते हृदयाला प्रेमाचा ओलावा देतात. पैसा हा प्रेमाचा दर्शक आहे. वाहक आहे, पण विठुरायाच्या भक्तीतून प्रेमाची प्रचीती येते हे वारकऱ्यांच्या दृष्टीने अतिमहत्त्वाची आहे.
वारी करणं ही चैतन्याची अनुभूती आहे. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. अणू इतकाही परिच्छिन्न भाव नसतो या अनुभवात! वारकऱ्यांना अणुरेणूत ईश्वराचं अस्तित्व दिसतं, म्हणूनच सकाळच्या प्रहरी वारीला निघताना वारकरी तळातल्या मातीची चिमूट, ते रज:कण मस्तकी लावतो व मगच चालायला सुरुवात करतो.
वारकरी संप्रदाय शतकानुशतके टिकलाय. विस्तारलाय. पण तो विस्तारत असताना अनेकांनी त्यावर टीका केली. दोष काढले, पण त्यातूनही हा संप्रदाय तरला. टिकला. आहे त्या परंपरेत नावीन्य आलं. तुकाराम महाराजांवर टीका झाली, पण त्यांनी समतेची दिंडी काढली. त्यात सर्व जातीधर्माचे लोक सहभागी झाले. ब्राह्मण, शुद्र, क्षत्रिय अवघ्या वैष्णवांची दिंडी त्यांनी काढली. तुकोबांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान आजही वारीमध्ये आम्ही आचरणात आणतो. आडनाव बंधुभावाच्या आड येतं. ते नका विचारू. गळ्यातली माळ बघा आणि त्याला जवळ करा. शेवटी अध्यात्मात तीन शब्द महत्त्वाचे. जगत, जीव, परमात्मा! प्रत्येक प्राणिमात्र सारखा! त्याच्यात फरक आम्ही-सामान्यांनी केला. आपपरभाव आम्ही आणला. वारकऱ्यांनी संतांची शिकवण आत्मसात केली. त्यांना प्रत्येक वस्तुमात्रात, मनुष्यप्राण्यात ‘तो’ दिसतो, म्हणूनच भेटताक्षणी ते नाव, गाव न विचारता एकमेकांना ‘माऊली’ संबोधतात. एकमेकांच्या पाया पडतात. इथे लहान थोर हा भेदाभेद नाही, म्हणूनच माळ घातली की आजोबासुद्धा नातवाच्या पाया पडतात. ते प्रत्येकाच्या ठायी असलेल्या चैतन्याला वंदन आहे, म्हणूनच तुकोबांनी वारकरी संप्रदायाला नाव ठेवलंय ‘चैतन्य संप्रदाय!’
दिंडीतल्या वारकऱ्यांना दिवसेंदिवस चालण्याची ही ऊर्जा, ही शक्ती कुठून मिळते, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. त्यांच्या मनात अशी कोणती शक्ती जागृत होते जी त्यांना विठ्ठल भेटीची तीव्र ओढ लावते? याचं साधं उत्तर आहे. ते म्हणतात, आम्हाला देव भेटलेलाच आहे. तो आमच्या हृदयात विराजमान आहे. तरीही ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथांच्या सोबतीने आम्ही विठूची आळवणी करतो. आमची ज्ञानोबा माऊली सख्याला भेटायला जाते, त्या आतुरतेची ऊर्जा, संतांच्या अलौकिक मिलनाची आस आमच्यात प्रकटते.
पांडुरंगाबद्दल प्रेम ही अलौकिक अवस्था! त्या अवस्थेशी एकरूप झालेला असा तो वारकरी असतो. इथे भावनेला प्राधान्य आहे, म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी ‘भावार्थ दीपिका’ लिहिली.
वारक ऱ्यांच्या हृदयात ‘सगुण-निर्गुण एक गोविंद उरे!’ तुम्ही बघता, बोलता ते सगुण रूप! दिसतं ते रूप सगुण, दिसत नाही पण असतं ते निर्गुण! आपल्यामध्येही ही दोन्ही रूपं आहेतच की!
‘सगुण-निर्गुण जयाचीही अंगे,
तोची आम्हासंगे क्रीडा करी!’
निर्गुण ही जाणीव आहे. तर सगुण हे समाधान आहे. अनुभव आहे. हा अनुभव घेण्यासाठीच पंढरीला जावं लागतं. वारकरी व्हावं लागतं.
तरुण पिढी आमच्यावर टीका करते, वारीला जाता म्हणजे २५ दिवस तुम्ही वाया घालवता. मी म्हणतो, अरे तुम्ही तर आयुष्य वाया घालवताय त्याचं काय? आज माणसं व्यसनाधीन होतायत. त्यांना कोणता आनंद मिळतो? जी गोष्ट करताना, रुपये पैसे न मोजता मला निर्भेळ, शुद्ध आनंद मिळतो, ती मी का करू नये?
वारकऱ्यांमध्ये उच्च कोटीचा अर्पणभाव असतो. आपण एखादी वस्तू श्रीहरीला अर्पण करतो, तसं वारी म्हणजे आपलं जीवन प्रभूला अर्पण करणे! मग वारकऱ्यांसाठी स्वत:चं जीवनही प्रसाद ठरतो व तो ते आदराने वापरतो. एरव्ही कुणी काही दिलं की आपण म्हणतो, मला भूक नाही. मला आता नको. पण कोणी प्रसाद पुढे केला तर आपण लगेच हात धुऊन तो स्वीकारतो. कणभरही टाकून देत नाही. प्रसाद कोणता? तर देवाला दाखवलेला असतो तो! देहावर तुळशीपत्र ठेवलं, तुळशीमाळ गळ्यात घातली की मग तो देह श्रीहरीला अर्पण केला. मग त्या देहाचे भोग, सुखदु:खसुद्धा न कुरकुरता स्वीकारणं हेही ओघाने आलंच.
ज्ञानोबाच्या काळापासून वारकरी संप्रदायाने उच्चप्रतीचं संत वाङ्मय समाजाला प्रदान केलं आहे. ज्ञानदेव तत्त्ववेत्ते आहेत. आत्मसाक्षात्कारी आहेत. ज्ञानेश्वरीतून त्यांनी अलौकिक तत्त्वज्ञान जगासमोर मांडलं आहे, असे ते ज्ञानदेव – ज्ञानाचे देव आहेत. पण त्यांनाही विचारलं, ‘तुम्हाला काय आवडतं?’ तर ते उद्गारतात, ‘‘सावळे परब्रह्म आवडे या जीवा!’’ त्यांच्याही मनी प्रेम उपजतं ते सावळ्याचंच! आणि ते इतकं पराकोटीला जातं की एकदा तरी ते रूपडं बघण्याची तीव्र तळमळ लागते. या सावळ्याच्या दर्शनाला असं वर्षांतून एकदा तरी जाणं हीच वारी! सगुण रूपातल्या सख्याच्या भेटीला जाणं हीच वारी! तोच आमचा सखा पांडुरंग. तोच आमचा मायबाप! हीच ज्ञानेश्वरांची ज्ञानोत्तर प्रेम लक्षण भक्ती!’ ‘पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थानं! एकदा कळलं ब्रह्म आहे की ते बाजूला सारलं आणि सुरू झाला प्रवास ‘तुझ्या’ दिशेने. ‘तू माझा, मी तुझा.’ अखेर आनंद प्राप्तीसाठी द्वैत पाहिजेच. हृदयातील परब्रह्माचं सगुण साकार रूप बघावं असं वाटतं तेव्हा वारकरी वारीचं प्रस्थान ठेवतात. आता बघा, आई आपल्या अमेरिकेतल्या मुलाला कल्पनेत रोज भेटते. रोज त्याची आठवण काढते. त्याच्यासाठी तिचा घास अडतो, पण प्रत्यक्षात तो आल्यावर ती त्याला कडकडून भेटते ती खरी भेट! ही अशी भगवंताची उराउरी भेट हीच खरी वारी! विठुराया परब्रह्म आहे. ती कर्तुमअकर्तुम शक्ती आहे हे ठाऊक असलं तरी ती माझी ‘आई’ आहे. मायबाप आहे. हाच प्रेमाचा साक्षात्कार – साक्षात आकार, हीच भावना, हीच चैतन्याची अनुभूती वारकरी प्रत्यही घेतात तेव्हा ‘न बोलवी बोलवी श्रद्धा!’ श्रद्धा शब्दाचं रूप घेऊन प्रकटते.
आज माझ्या पाच पिढय़ा वारी करत आहेत. माझा नातू कॉन्व्हेंटमध्ये शिकूनसुद्धा ही परंपरा चालवत आहे. आमच्या घराण्यात ही १५० वर्षांची परंपरा आहे. एक वर्ष नव्हे वारीतला एक दिवसही कधी आमचा चुकला नाही. माझी बायपास शस्त्रक्रिया झालेय. आज माझं वय ७८ आहे. मला लोकं विचारतात, ‘तुम्ही किती वर्षे वारी केली?’ ‘७९ वर्षे!’ मी त्यांना सांगतो. आईच्या पोटात असतानाही मी वारी केलेय. कोणी विचारतं, ‘यंदा वारीला जाणार का?’ हा प्रश्न मला ‘आज तुम्ही पाणी पिणार का’ या प्रश्नाइतकाच निर्थक वाटतो. वारी ही आमच्या जीवनाचा आवश्यक, अविभाज्य भाग आहे. आज माझ्या दिंडीत दोन हजार वारकरी आहेत. त्यांच्यासाठी रोज दोन वेळचं जेवण बनवायला चाळीस माणसांचा ताफा असतो. वीस वाहनं, अॅम्ब्युलन्स आहे. गेल्या वर्षी तीन हजार चष्मे आम्ही मोफत वाटले. वैद्यकीय मदत तर पुरवतोच. आज माझ्याकरवी सात-आठ लाख लोकांनी माळ घेतलेय. त्यातले किमान दोन लाख माळकरी पंढरपूरला येतातच. आज तामिळनाडूतले दोन हजार माळकरी जे माझ्या इंग्रजी कॅसेट्स ऐकून याकडे ओढले गेले ते दिंडीत माझ्यासोबत आहेत. त्यांना ज्ञानेश्वरी, दासबोध वाचायची इच्छा आहे. परंपरा चालवायला तनमनधनाची झीज सोसावीच लागते. माझ्या हयातीत पाच-सहा हजार वारकऱ्यांची संख्या ५-६ लाखांवर पोहोचलेय हेच या संप्रदायाचे यश आहे.
(शब्दांकन -माधुरी ताम्हणे)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा