दिवाळीचं पारंपरिक साजरीकरण म्हणजे भाचीला ‘तेच ते’ वाटत होतं. त्यांच्यात एक जंगी पार्टी आयोजित करण्याचा ट्रेंड सुरू झाला होता. दर आठवडय़ात रिलीज होणारा प्रत्येक मराठी सिनेमा जसा हटके असतो, तशीच ती पार्टी हटके होती. म्हणजे फक्त करणाऱ्यांना हटके वाटत होती. भाचीला तिच्या मुलांच्या पार्टीतल्या अनुपस्थितीवरून छेडलं तेव्हा ती म्हणाली, ‘‘त्यांचं काय विचारतेस मावशी? एकजात आगाऊ झालीयेत कार्टी. गेली पाच-सहा वर्षे आम्ही हा इव्हेन्ट करतोय ना. आता त्यांना तो तोच तोच वाटतो. ‘वेगळं काही तरी करा म्हणजे येऊ’ असं म्हणतात.’’ आता या ‘तेच ते’मध्ये वेगळेपण कसं आणावं बरं, हा प्रश्न मला पडला.
‘‘काही म्हण हं मावशी, तुम्ही लोक आयुष्यभर फारच त्याच त्या गोष्टी करत राहिलात बाई,’’ ऐन दिवाळीच्या तोंडावर माझी तरुण भाची मला म्हणाली तेव्हा यंदा चकल्या करताना भाजणीमध्ये लोण्याचं मोहन घालावं का तेलाचं चालेल, या यक्षप्रश्नात मी पार बुडालेले होते. हा प्रश्नही मला मेला दर वर्षी तोच तो पडायचा. त्या नादात पुटपुटले,
‘‘त्याच त्या गोष्टी म्हणजे?’’
‘‘तीच ती दिवाळी. त्याच त्या रांगोळ्या.. लाडू.. करंज्या.. हाईट ऑफ एक्सायटमेंट काय, तर सकाळी लवकर आवरून चकल्या खात बसायचं.’’
‘‘असंच काही नाही. वाटलं तर उभ्या उभ्यापण चरता यायच्या त्या.’’
‘‘तेच ते गं. मुद्दा काय, व्हरायटी नाही.’’
‘‘कोण म्हणतं?’’
‘‘आम्ही म्हणतो. आम्ही बघत आलोय की आमच्या-तुमच्या जुन्या घरच्या दिवाळ्या.. कुठे काही वेगळेपणा नाहीच.’’
‘‘असं कसं? चाळीतल्या, वाडय़ातल्या प्रत्येक घरातली चकली वेगळी असायची. कोणाची कडक, कोणाची नरम, कोणाची करपट, कोणाची सादळलेली..’’ मी चकलीनिष्ठा त्यातही जपत म्हणाले, ‘‘दिवाळी फराळामध्ये चकलीवर माझं विशेष प्रेम. त्यातही आधी लाडू खाऊन मग त्याच्यावर चकली खाल्ली की तिच्यावर अनरसा चघळताना मला नेहमीच अपूर्व आनंद वाटायचा. बाजूबाजूने फक्क्या मारायला शेव-चिवडा असायचाच. हे सगळे पदार्थ करायला आपल्यासारखे कोण्णा म्हणजे कोण्णाला जमत नाही यातला अहंकार सगळ्याची लज्जत शतगुणित करायचा. भाचीच्या हे काहीच गावी नव्हतं. पुन्हा म्हणाली, ‘‘जरा काही हटके करावं असं वाटत नसे का गं तुम्हाला?’’
‘‘च्यक्. उलट नेहमीचं केलं नाही तर कोणी तरी हटकेल अशी भीती वाटायची.’’
‘‘म्हणजे लोकांसाठीच ना सगळं? तासचे तास माना मोडून रांगोळ्या काढायच्या आणि टाचा उंचावून आकाशकंदील वगैरे लटकवायचे..’’
‘‘आमचा तेवढाच उजेड गं. वर्षांकाठी एकदा!’’
‘‘मला असं एवढं नव्हतं म्हणायचं,’’ भाची सांभाळून घ्यायला निघाली.
‘‘फक्त मला समजूच शकत नाही, की व्हॉट इज सो स्पेशल अबाऊट दिवाळी.’’
‘‘मगाशी म्हटलं तेच. सगळं वर्षांकाठी एकदा, हेच स्पेशल.’’
‘सच अ‍ॅज..’’
‘‘वर्षांकाठी एकदा घरादाराला नवे कपडे मिळायचे. चवीचवीचे फराळाचे जिन्नस मिळायचे. या चैनीची वाट बघावीशी वाटायची.’’
‘‘सो सॅड ना? आता बाराही महिने नाक्या-नाक्यावरच्या दुकानात फराळाचे जिन्नस मिळतात विकत आणि घरातला प्रत्येक कपडा मुळी नवाच असतो. कशात काही वेगळं वाटतंच नाही.’’
‘‘हे सगळं बघतेच आहे की मी. रोजच्या रोज.. घरबसल्या..’’
‘‘तरीही निर्थक परंपरा फिरंपंरा पाळायची हौस. लक्ष्मीपूजन करणं ही तर हाईट झाली माझ्या मते. घरादारानं जमून पैशाची का पूजा करायची? कमाल आहे!’’
‘‘तरी बरं. ती वर्षांकाठी एकच दिवस असायची, राजरोस असायची आणि अगोदर दसऱ्याला रीतसर सरस्वतीची पूजा केल्यानंतर असायची. आता बघावं तर सर्ववेळ, सर्वत्र फक्त लक्ष्मीचीच पूजा. सो सॅड ना?’’
मी माफक सूड घेतला. तो तिच्यापर्यंत पोचला नाही. आपल्याला एकूण उच्च, कला अभिरुची आहे, तेचतेपणाचा कंटाळा आहे, आपण भलतेच इनोव्हेटिव्ह आहोत, प्रत्येक गोष्ट ठरवून हटके करतो या भ्रमात ती स्वत:वर खूश होती. एकूणच लटके-झटके-हटके मिरवण्याच्या वयात ती होती. त्यापुढे माझं आयुष्याचे फटके खाल्लेलं व्यवहारी शहाणपण कुठे तग धरणार होतं? तरीही समजावून सांगायला गेले,
‘‘अगं आपलं गेलं वर्ष चांगलं गेलंय, आपण सगळे नीट आहोत, मजेत आहोत हे दाखवायला आवडतं ना माणसाला?’’
‘‘दाखवा नाऽ पण काही वेगळी आयडिया काढाल की नाही कधी? का वर्षांमागून वर्ष तेच ते, तसंच्या तसं करत बसायचं? हा प्रश्न पडतो मला.’’
‘‘एक बदल नक्की दाखवू शकते मी तुला.’’
‘‘कोणता?’’
‘‘हवामानाचा! पूर्वी दिवाळीत गुलाबी थंडी पडायची म्हणून ते अभ्यंगस्नान वगैरे. आताशा दिवाळीत रणरणीत ऊन, धो धो पाऊस असं काहीही पडू शकतं. ऐन दिवाळीत धो धो पाऊस कोसळल्याने आकाशकंदील भिजून चिरगुटांसारखे लोंबायला लागणं, कोणी कुठे अंगणात मातीचे किल्लेबिल्ले केले असतील तर त्यांच्यावरचे मातीचे मावळे अक्षरश: धारातीर्थी पडणं असे प्रकार होतातच की अधूनमधून.’’
‘‘म्हणजे बघ! नेचरलासुद्धा व्हरायटी हवीशी वाटते. मग माणसं तेच ते करताना कंटाळत कशी नाहीत?.. खंडीभर सण.. त्यासाठी मणभर पक्वान्नं.. आम्ही बंद करून टाकलं सगळं.’’
‘‘म्हणजे?’’
‘सरळ दिवाळीला टूरवर जातो. आमचा पाच-सहा फॅमिलीजचा ग्रूप आहे एक. एकापेक्षा एक हटके डेस्टिनेशन्स शोधतो. खूप धमाल करतो. असलं घरी चकल्या फिकल्या करत बसत नाही कोणी. घाम गाळत. हात मोडत.’’
‘‘अरे वा! मजाच की मग तुम्हा बायकांची.’’
‘‘दिवाळीची सुट्टी संपण्याच्या आदल्या दिवशी एकच मोठ्ठी दिवाळी पार्टी करतो की झालं.’’
‘कोणाचं झालं?’’
‘‘सगळ्यांचं. यंदा ये आमच्या त्या पार्टीला.’’ तिने तोंड भरून बोलावलं. ‘‘बघा, शिका काहीतरी.’’ असं म्हणाली नाही, पण मला तसं ऐकल्यासारखं वाटलं. वयानं काहींना दुसऱ्याचं बोलणं ऐकू येत नाही, काहींना दुसऱ्यानं न बोललेलंही ऐकल्यासारखं होतं, त्यातला प्रकार सगळा.
दर आठवडय़ात रिलीज होणारा प्रत्येक मराठी सिनेमा जसा हटके असतो, तशीच ती पार्टी हटके होती. म्हणजे फक्त करणाऱ्यांना हटके वाटत होती. मोठ्ठा भाडोत्री हॉल, बाहेर रांगोळी, आत दिव्यांच्या माळा- फुगे, कर्कश संगीत, डी. जे., नाचगाणी, नटूनथटून मिरवणारी माणसं, बर्गर, समोसे, चिप्स, आइसक्रीम असा कहर ओरिजीनल मेन्यू असा एकूण थाट होता. ज्या दरवाजाबाहेर रांगोळी घातली तो दरवाजा कोणा एकाच्या घराचा नव्हता आणि आत जमलेली माणसं कोणा एका कुटुंबाशी निगडित नव्हती, एवढाच काय तो फरक. बाकी काहींचा उत्सवीपणा आणि काहींचा ओढाळपणा माझ्या गरीब बिचाऱ्या दिवाळीसारखाच वाटला. नवतरुण मुलं तर फारच कमी दिसली. भाचीला तिच्या मुलांच्या अनुपस्थितीवरून छेडलं तेव्हा ती म्हणाली, ‘‘त्यांचं काय विचारतेस मावशी? एकजात आगाऊ झालीयेत कार्टी. गेली पाच-सहा वर्षे आम्ही हा इव्हेन्ट करतोय ना. आता त्यांना तो तोचतोच वाटतो. ‘वेगळं काही तरी करा म्हणजे येऊ’ असं म्हणतात.’’
‘‘इतक्या अद्ययावत पार्टीलाही असं म्हणतात त्यांच्यात?’’
‘‘पार्टीचं त्यांना काय? कोणी प्रपोज केल्याची पार्टी, कोणाच्या ब्रेकअपची पार्टी, कोणी ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ केल्याची पार्टी असं चालतं आताशा त्यांच्यात.’’ भाची त्रासलेली दिसली म्हणून तिचा मूड सुधरवायला म्हटलं, ‘‘तुमच्या ट्रिपमध्ये तरी खूश होती की नाही ती?’’
‘‘होती थोडीफार. पण त्यांचं वेगळच चालू असायचं बरेचदा. लेकीने काही तरी चारपाचशे लोकांना ‘हॅपी दिवाळी’चे मेसेजेस पाठवले. व्हॉट्सॅपवर व्हच्र्युअल फराळाची ताटं फिरत होतीच. त्यात मुलानं इथून जातानाच, वॉलपेपर म्हणून आमच्या घराचं दर्शनी दृश्य लावून ठेवलं होतं. त्या जैसलमेरमध्ये ते उघडून त्याच्यापुढे एल.ई.डी. का कसल्या पणत्यापण लावल्या दोघांनी. आता बोल.’’
भाचीने तोंडभरून बोलण्याची ऑफर दिली असली तरी मलाच काही बोलवेना. शंभरदा झिडकारायला निघालेल्या ‘तेच ते’मध्ये असे कुठले अतिसूक्ष्म पण चिवट धागे आहेत आणि घटके-घटकेत ‘हटके’ म्हणून गौरवलेलं कुठे-कसं विसविशीत पडतं यावर नव्याने विचार करत बसले झालं!   

Story img Loader