‘‘मित्रा, ‘तू आहेस तिथेच राहा’ तू स्वत:ही पुढे येऊ नकोस आणि मलाही येऊ देऊ नकोस! हे मधलं अंतर तूही ओलांडू नकोस आणि तो मोह मलाही पडू देऊ नकोस! शेवटी मित्रा, ‘जीवन’ म्हणजे ‘पाणी’ त्याचा नैसर्गिक धर्म वाहवत जाण्याचाच आहे. म्हणून त्याला बंधारा-धरण बांधून अडवायलाच हवं..
बेसिनवरच्या आपल्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे राधा डोळे विस्फारून बघत होती. जागरणाने तारवटलेले डोळे, डोक्यावर बॅक-कोंबिंगमुळे फिस्कारलेल्या केसांचं छप्पर, लालभडक ओठ आणि आदल्या रात्रीच्या ड्रिंक्स आणि डान्सच्या पार्टीची चढलेली एकप्रकारची धुंदी.. तिला जरा कससंच झालं, मनात आत खोलवर कुठे तरी खटकलं, खुपलं, दुखलं, अस्वस्थ वाटलं. पूर्वीच्या मानानं आपण खूप बदललो आहोत, हा विचार येत राहिला.. पाहता पाहता समोरच्या आरशात मागून येणाऱ्या जयंतचा चेहरा तिला दिसला. त्याचीही नजर तिच्यासारखीच होती. तारवटलेली.. धुंद! रात्रीची नशा अजून ओसरली नव्हती. पण एक वेगळीच खुशी त्याच्या चेहऱ्यावर पसरली होती.
त्यानं मागून येऊन राधाला जवळ ओढली. एका वेगळ्याच धुंदीत सुखावून तो हसला.. कानात गुणगुणल्यासारखा, खुशीत कुजबुजल्यासारखा!
..पण राधा सुखावली नाही. हसलीही नाही. तिला हे सारं आत्ता नकोसं वाटत होतं. कसलाही प्रतिसाद न देता ती त्याला सोडून झटकन् बेडरूममध्ये आली. समोरच्या भिंतीवर त्यांचा लग्नातला फोटो लावलेला होता. जयंतच्या निकटच्या सान्निध्यानं बावरलेली राधा त्या फोटोत कशी मोहक दिसत होती. मनानं ती १७ वर्षे मागे गेली. बेळगावच्या सान्यांच्या घरांतली सोज्वळ अन् धान्यानं भरलेलं माप ओलांडून रानडय़ांची राधा झाली होती. लग्नातल्या प्रत्येक विधीत जयंतच्या स्पर्शानं लाजाळूचं झाड होऊन बसली होती. फोटोग्राफरनं ‘जरा जवळ सरका’ म्हटल्यावर कणाकणानं मोहरली होती, संकोचली होती. आणि तीच राधा आज? त्यामानानं चांगलीच धीट झाली होती. वृत्तीनं थोडी बेफिकीर बनली होती. समोरच्या पुरुषाच्या नजरेला नजर देत होती. आपल्यात झालेल्या स्थित्यंतराचं तिचं तिलाच खूप आश्चर्य वाटलं. नवरा म्हणून मिळालेला आयुष्याचा जोडीदार मनानं उमदा होता. जिवापाड प्रेम करत होता. सगळ्या प्रकारची मोकळीक देत होता. परंतु, ‘ती आपणही घेत आहोत,’ याचं तिला आत्ता मनोमन आश्चर्य वाटत होतं. तिच्या मनात आलं, आपल्या माहेरच्या माणसांना आपल्यातलं हे स्थित्यंतर पाहून काय वाटेल..? आणि आवडावं असंच हे सारं आहे का?
प्रश्नांगणिक अंत:करणांत कुठे तरी कळ उमटत राहिली. दोन्ही तळहातांनी तोंड झाकून घेत तिनं फोटोखालीच भिंतीचा आधार घेतला. आणि ‘नाही नाही’ असं मनाशी पुटपुटत ती साऱ्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करू लागली. आदल्या रात्रीचा तो प्रसंग तर मनाचा पाठपुरावा करत होता. त्याची आठवण करायची नाही म्हटलं तरी ते जमत नव्हतं..
श्याम भाऊजींची ती ‘राधा ऽऽ’ म्हणून मारलेली एकेरी हाक तिला बेचैन करत होती. लग्न झाल्यापासून भाऊजींचं नातं जोडलेला जयंतचा मित्र श्याम. ‘वहिनी वहिनी’ करत स्वयंपाकघरात ओटय़ाच्या कोपऱ्यावर बसत हक्कानं पिठलं-भाताची मागणी करणारा ‘श्याम’, मुलांचा लाडका ‘श्यामकाका’ आणि जयंत-राधाच्या प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाला स्वत:च्या आवडीची साडी वहिनीला देणारा ‘श्याम भाऊजी’ या नात्यांतला निरागसपणा, सोज्वळपणा- कालच्या त्या एकेरी हाकेनं संपला होता..
राधाच्या डोळ्यापुढे कालचा प्रसंग जसाचा तसा उभा राहिला. तसं पाहिलं तर सगळेच काल खुशीत होते. बोटीवर काम करणारे जयंतचे मित्र सुखात्मे त्यांच्या प्रमोशनची पार्टी होती. शनिवार संध्याकाळ असल्यामुळे पुरुषवर्ग तसा विशेष मूडमध्ये होता. कंपनी द्यायला म्हणून राधानंही ग्लास उचलला होता. बायकांचे एकापेक्षा एक वरचढ असे पोशाख आणि प्रसाधनं, वाक्यावाक्यागणिक खळाळणारे विनोद, संथ सौम्य स्वरांत चाललेलं विलायती ढंगांचं पाश्र्वसंगीत-सगळंच वातावरण तसं धुंदी आणणारं होतं.
तासभर गेल्यावर ‘वहिनी डान्स करणार का?’ म्हणत श्यामनं राधाच्या पुढे हात केला. तिला काही विशेष चांगला येत होता, असं नव्हे. परंतु त्यातल्या चार-दोन स्टेप्स माहीत होत्या. शिवाय श्यामबरोबर पूर्वी तिनं दोन-चारदा केला होता. राधा उठली. तिनं संगीताच्या तालावर पावलं टाकायला सुरुवात केली. दोघांच्यातलं नातंच इतकं निरागस होतं की संकोचाचा त्यात भागही नव्हता.. पण मग एकदम काय झालं कुणास ठाऊक! श्यामनं जरा जवळ ओढल्यासारखं करत राधाच्या कानात साद घातली- ‘‘राधाऽऽ!’ फुंकर घातल्यासारखी, हळुवार! त्या अनपेक्षित हाकेनं राधा क्षणभर मोहरली. पण पाठोपाठ चांगलीच चमकली. हे काही तरी वेगळं होतं. तिनं मान वर करून मोठय़ा डोळ्यांनी श्यामकडे रोखून बघत म्हटलं, -‘‘भाऊजी ऽऽ!’’
‘‘अं हं! भाऊजी नाही. श्याम म्हण!’’
‘‘आज काय हे नवीन?’’- राधानं बावरून विचारलं.
‘‘आजच नाही. यापुढे नेहमीच! राधाऽऽ तू मला खूप आवडतेस. आणि आजच्या साडीचा रंग तर तुला खूपच खुलून दिसतोय!’’
‘‘तुम्हीच तर दिली आहे गेल्या वर्षीच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला. आठवत नाही?’’ संभाषणात सोज्वळपणा आणण्याचा राधानं प्रयत्न केला.
‘‘पण मला वाटलं नव्हतं देताना की, तू इतकी गोड दिसशील म्हणून!’’ श्याम म्हणाला.
राधा बेचैन झाली. कावरीबावरी झाली. हवा थंड असूनही तिला एकदम गुदमरल्यासारखं झालं एवढय़ात संगीत काही क्षण थांबलं. श्यामनं तिचा हात घट्ट धरून ठेवला होता. तरीही निर्धारानं तिनं तो सोडवून घेतला आणि ‘थँक्यू’ म्हणत ती जागेवर येऊन बसली. तरीही बसता बसता, ‘‘का गं, माझ्याबरोबर डान्स करायला येवढय़ातच कंटाळलीस?’’ असा श्यामनं विचारलेला प्रश्न तिच्या कानावर आलाच!
त्यानंतर मग तिचा मूडच गेला. पार्टी संपेपर्यंत ती अवघडल्यासारखी बसून राहिली. श्यामकडे तिनं एकदाही वळून पाहिलं नाही. जयंतबरोबर घरी परततानाही ती गप्पच होती. घडलेला प्रसंग त्याला सांगणं कठीणच होतं. त्यानं सारं हसून उडवून लावलं असतं. घरी आल्यावर अंथरुणावर पडल्या-पडल्या जयंत झोपून गेला. ती मात्र बराच वेळ तळमळत होती. झोप येणं शक्यच नव्हतं! इतक्या वर्षांची मैत्री. जयंतच्या गैरहजेरीतसुद्धा नि:शंक मनाने घरात वावरणारे श्यामभाऊजी उद्या येतील तेव्हा कसं वागायचं त्यांच्याशी? आणि..आणि कधी तरी असं झालं की आपण एकटय़ाच घरात आहोत आणि त्यांचा वागण्याचा तोल गेला तर?..?.. काय करायचं?
‘काय करायचं?’ या प्रश्नाचं उत्तर राधाला कालही मिळालं नव्हतं आणि आता या क्षणालाही मिळत नव्हतं! फोटोतल्या निरागस राधाचा हेवा करत ती फक्त पुटपुटत राहिली- ‘‘नाही.. नाही..!’’ आणि नेमका त्याच वेळी आत आलेल्या जयंतचा हात तिच्या खांद्यावर पडला.
‘‘काय झालं डार्लिग? मला नाही सांगणार?- प्लीऽऽज.’’ त्यानं स्निग्ध नरजेनं तिच्या डोळय़ात पाहिलं.
‘‘जयंत, आपण या अशा पार्टीजना जाणं बंद करू,’’ ती निर्धारानं म्हणाली.
‘‘का गं? एकदम काय झालं? काल तर खुषीत होतीस. श्यामबरोबर डान्सदेखील केलास झकासपैकी!’’
‘‘म्हणजे?’’
‘‘अगं अशी दचकतेस काय? मी काही ‘का केलास?’ नाही विचारलं. तुला माहीत आहे की मला अशीच मॉडर्न बायको हवी होती.’’
‘‘जयंत, माझं काही चुकतंय का हो वागण्यात? माझ्या मोकळ्या वागण्यानं मी पुरुषांना प्रोत्साहन देते, असं तर नाही ना होत?’’
‘‘छट् मला कधीच तसं वाटलं नाही.’’
‘‘तरी पण इतका मोकळेपणाचा सहवास बरा का?’’
‘‘अगं वेडाबाई, दोन-दोन, तीन-तीन मुलांचे बाप आम्ही. तुम्ही चाळिशी ओलांडलेल्या. काय होणार आहे या वयात?’’
‘‘तरी पण तुमच्या बायकोला जवळ घेऊन डान्स केलेला तुम्हाला आवडतोच कसा?’’
‘‘का? मी नाही दुसरीबरोबर केला?’’
‘‘माझा विश्वास आहे तुमच्यावर!’’
‘‘मग माझाही आहे. १७ वर्षे हातात हात घालून सुख-दु:खांना जोडीनं सामोरे गेलो आपण, त्याला काहीच अर्थ नाही?’’
‘‘तरीपण जयंत, नको. खरंच नको. कुठे तरी चुकतंय हो! तुम्ही चांगले आहात. मी चांगली आहे. तरीपण भीती वाटते. मनात येतं, या अशा दोन-तीन तासांच्या आनंदासाठी पुढे आयुष्यातलं स्वास्थ्य गेलं तर?’’
‘‘आणखी काही?’’
‘‘आणखीसुद्धा विचारते- संकोच सोडून! की फक्त आपण दोघं असताना तुम्हाला दुसऱ्या बाईची किंवा मला दुसऱ्या पुरुषाची आठवण यायला लागली तर?’’
जयंत मोठय़ानं हसला. म्हणाला, ‘‘वेडाबाई, किती पराकोटीला जाऊन विचार करतेस? येवढीशी पार्टी ती काय आणि त्याचा आपल्या खासगी आयुष्यावर काय परिणाम होणार? आपल्याला तर बुवा रात्रंदिवस फक्त तुझी आठवण येते. आताऽऽ तुझं माहीत नाही,’’ डोळे मिचकावत जयंत म्हणाला.
‘‘जयंत ऽऽ!’’ राधानं डोळे मोठे केले आणि एकदम खुषीत येऊन ती त्याच्या कुशीत शिरली. त्याच्या छातीवर डोकं घुसळत पुटपुटत राहिली, ‘‘जयंत, जयंत-माझ्याही मनात फक्त तुम्हीच आहात. फक्त तुम्ही! फक्त एवढीच इच्छा आहे की तुमच्या-माझ्यातलं प्रेम, ही ओढ अशीच राहू दे जन्मभर! मला दुसरं काही नको!’’
‘‘अशीच राहील राधाराणी, अशीच राहील. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना?’’ मग सगळ्या काळज्या माझ्यावर सोपवून नि:शंक राहा. नेहमीसारखी खुषीत राहा. अगं वेडे ५-१० वर्षांत आयुष्याची संध्याकाळ सुरू होईल. थोडी मजा केली तर कुठे बिघडलं?’’
राधा काहीच बोलली नाही. आपल्या आयुष्याचा सगळा भार त्याच्यावर सोपवून तात्पुरत्या समाधानानं आत निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत जयंत समाधानानं हसला. अशी सुविचारी पत्नी आपल्याला लाभली आहे, या विचाराचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरला. पण एक वाक्य मात्र तो स्वत:शीच पुटपुटला..
‘राधा, सगळं-सगळं बोललीस. मन मोकळं केलंस. पण काल रात्री श्यामबरोबर डान्स करून बसल्यावर बेचैन का झालीस, ते नाही सांगितलंस. नको सांगूस. कधी तरी सांगशीलच. आणि नाही सांगितलस, तरी मी ते खुबीनं काढून घेईन तुझ्याकडून.’
परंतु राधीची ही खुषी फार काळ टिकली नाही. त्यानंतरचा प्रत्येक दिवस अस्वस्थेतचं पांघरूण घेऊनच आला. मनात घालमेल सुरूच होती. विचार करून मनाला शीण यायला लागला होता. एका अनमिक भीतीची सुप्त लाट तिच्या अंगोपांगावर अशी काही पसरली होती की दरवाजावरची घंटा जरा जोरात वाजली तरी ती दचकत, शहारत होती.
चार दिवस उलटून गेले होते. श्याम आला नव्हता. पण हे फार काळ टिकणार नव्हतं. कारण तीन दिवसांनी तिच्या लग्नाचा वाढदिवस होता. आजपर्यंतचा प्रत्येक वाढदिवस त्या तिघांनी मिळून साजरा केला होता. या वर्षी श्यामभाऊजी काय करतील? येतील का? तिला उत्तर मिळत नव्हतं. खरं तर ते यावेत, त्यांनी वहिनी वहिनी करून घरभर चिवचिवाट करावा, निरागस प्रेमाचा ओघ पुन्हा सुरू व्हावा, याची विलक्षण ओढ तिच्या मनाला लागली होती. पण काय होईल, तेच समजत नव्हतं.
अखेर तो दिवस उजाडला. सकाळच्या चहाबरोबरच जयंतनं श्यामची आठवण काढली.. ‘‘हा श्याम लेकाचा एकटा बसून..?’’ असं म्हणत जयंतनं फोन फिरवायला सुरुवात केली. राधाने प्राण कानांत गोळा झाले. पण काहीच झालं नाही. पलीकडून कुणी फोनच उचलला नाही. शेवटी ऑफिसला जाताना जयंत राधाला म्हणाला, ‘‘तीन तिकिटं घेऊन येतो सिनेमाची. श्याम आला तर ठेवून घे त्याला जेवायला. रात्री जेवून निघू.’’
जयंत गेला आणि त्यानंतरचा राधाचा क्षण अन् क्षण बेचैनीत गेला. शेवटी दुपारी चार वाजता एक लहान मुलगा- श्यामचा नोकर- एक बॉक्स देऊन गेला राधासाठी. राधानं बॉक्स उघडला. वरच्या पातळ कागदाच्या आवरणातली अंजिरी रंगाची तलम साडी होती. आणि त्यावर चार ओळीची चिठ्ठी होती-
‘‘प्रिय सौ. राधा वहिनी,
आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. माझ्या लक्षात आहे. परंतु काही कारणानं या वर्षी तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी येऊ शकत नाही. रागावू नका. साडी स्वीकारलीत आणि नेसलात तर मनापासून आनंद होईल. तेवढी आशा करू ना? तुमच्या दोघांच्या वैवाहिक जीवनातला भविष्यकाळातला प्रत्येक दिवस आनंदानं सुखानं काठोकाठ भरलेला जावो, हीच सदिच्छा!’’
तुमचा
श्मामभाऊजी.
चिठ्ठी वाचून पुरी होता होता राधाचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबून गेले. हरवलेला आनंदाचा ठेवा अचानक हाती गवसला होता. क्षणभर तिनं विचार केला आणि दुसऱ्या क्षणाला निर्धारानं डोळे पुसून ती फोनकडे धावली. काय पवित्रा घ्यायचा, याचा तिनं मनाशी निर्णय घेतला, मग नंबर फिरवला.
‘‘हॅलो’’- पलीकडून आवाज आला.
‘‘मी वहिनी’’
वहिनी तुम्ही?’’ – अधीरतेनं श्यामनं विचारलं.
‘‘हो. का? येवढं आश्चर्य वाटलं?’’
‘‘आश्चर्य आणि आनंदसुद्धा वहिनी! खूप खूप बरं वाटलं वहिनी. खूप रागावला आहात ना माझ्यावर?’’
‘‘मी? मुळीच नाही. उलट सांगायला फोन केलाय की तासभरात आधी इकडे या. दर वर्षीप्रमाणे जेवणाचा आणि सिनेमाचा कार्यक्रम आहे.’’
‘‘वहिनी, फक्त या वर्षी नका आग्रह करू’’
‘‘भाऊजी, मग मलाही ती साडी घेता येणार नाही.’’
‘‘बरं येतो. पण एक विचारू?’’
‘‘एक का? खूप विचारा.’’
‘‘वहिनी, तुम्ही इतक्या चांगल्या आहात की मी तसं नको होतं वागायला, माझ्या मनाचा तोल कसा गेला, तेच समजत नाही. गेले पाच-साहा दिवस फार वाईट गेले.’’
‘‘मग लगेच दुसऱ्या दिवशी का नाही फोन केलात?’’
‘‘धाडसच नाही झालं मला. वहिनी, तुम्ही मला वाट्टेल ती शिक्षा करा. पण माझ्यावर रागवू नका.’’
‘‘हीच शिक्षा की प्रथम आधी इकडे या.’’
‘‘वहिनीऽऽ- प्लीज!’’
‘‘भाऊजी, आता जरा मी बोलते. थोडं स्पष्टच बोलते सगळं. नीट ऐका. या सगळ्या गोष्टी आजकाल घडायला लागल्या आहेत, याचं कारण स्त्री-पुरुषांचा ‘मोकळा सहवास’ हे आहे. परवासारख्या पार्टीत आपण एकमेकांत मिसळतो, गप्पागोष्टी करतो, ड्रिंक घेतो. साहजिकच वातावरणाला फार वेगळं स्वरूप येतं. तशा त्या वातावरणात मन धुंद होतं. ते पिसासारखं हलकं होतं. विचारही तरल होतात. त्यातूनच मग काही दिवसांनी अशी वेळ येते की सगळीच बंधनं झुगारून द्यावीशी वाटतात. भाऊजी, हा दोष एकाच्या माथी मारण्यात अर्थ नाही. आजच्या मोकळ्या वातावरणानं तो निर्माण केला आहे.’’
‘‘मग तुमचं काय म्हणणं? पूर्वीसारखं कोंडून घेणार आहात तुम्ही स्वत:ला?’’
‘‘भाऊजी, असे होणारे परिणाम पाहिले की खरंच वाटतं कधी तरी की जुन्या स्त्रीप्रमाणे कोषात गुरफटून घ्यावं स्वत:ला. पण ते आता शक्य नाही. घराबाहेर पडलेली आजची स्त्री आता मागे फिरणं शक्यच नाही.’’
‘‘मग काय करायचं?’’
‘‘करायचं इतकंच की प्रत्येकानं ‘संयम’ हा राखायलाच पाहिजे. अनपेक्षितपणानं मनाचा तोल जरा ढळत असेल तर त्यापासून दूरच राहिलं पाहिजे. मनाला लगाम घालायला हवा. अशा खेळकर सहजीवनातून मनाला जो आनंद मिळतो, तो घ्यायचा. परंतु त्यातून म्हणजे नातेसंबंधात कटुता निर्माण करणाऱ्या गोष्टी टाळायलाच हव्यात. भाऊजी दिवसेन्दिवस आता असंच होणार आहे. तुम्हाला मैत्रिणी असणार आहेत. आम्हाला पुरुषमित्र असणार आहेत. मात्र मधलं संयमाचं अंतर मात्र दोघांनी ओलांडायचं नाही. असा निर्धार करायला हवा. आणि तसा तो केला तर काऽऽही होणार नाही.’’
‘‘वहिनी, तुम्ही म्हणता ते सर्व बरोबर आहे. पण सोपं आहे का हे? तशा त्या धुंद वातावरणात मनावर ताबा ठेवणं सहजसाध्य आहे का?’’
‘‘नाही, सहजसाध्य नाही. पण प्रयत्नानं तो ताबा ठेवायला शिकलं पाहिजे. आणि नाही तर असे प्रसंग जमवूनच आणायचे नाहीत. जास्त बोलत नाही. झालं ते विसरून जा. आणि आधी या इकडे.’’
रिसीव्हर खाली ठेवता ठेवता राधाने डोळे मिटले. फोनवर तसाच हात ठेवून खाली मान घालत ती स्वत:शीच बोलत राहिली-
‘‘मित्रा, ‘तू आहेस तिथेच राहा. तू स्वत:ही पुढे येऊ नकोस आणि मलाही येऊ देऊ नकोस! हे मधलं अंतर तूही ओलांडू नकोस आणि तो मोह मलाही पडू देऊ नकोस! शेवटी मित्रा, ‘जीवन’ म्हणजे ‘पाणी’ त्याचा नैसर्गिक धर्म वाहवत जाण्याचाच आहे. म्हणून त्याला बंधारा-धरण बांधून अडवायलाच हवं. आजचं म्हणशील, तर समाज पुढेच जाणार आहे. त्याचे विचार आपण थांबवू शकत नाही. ती ताकद आपल्याकडे नाही. आपण फक्त एकच करू शकतो- ‘तू मला सांग आणि मी तुला सांगते की- ‘तू तिथेच राहा.
तू तिथेच राहा.’’
‘तू तिथेच राहा..’
‘‘मित्रा, ‘तू आहेस तिथेच राहा’ तू स्वत:ही पुढे येऊ नकोस आणि मलाही येऊ देऊ नकोस! हे मधलं अंतर तूही ओलांडू नकोस आणि तो मोह मलाही पडू देऊ नकोस! शेवटी मित्रा, ‘जीवन’ म्हणजे ‘पाणी’ त्याचा नैसर्गिक धर्म वाहवत जाण्याचाच आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-10-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special article on diwali occasion