ती माइयाकडे आहे म्हणून स्वयंभू गांधार माझ्या सतारीत येईल असे नाही, त्यांच्या अफाट मेहनतीपुढे माझा रियाज तो काय? पण तरी त्या माळेने मला जखडून ठेवलंय.. मला रियाजाला प्रेरणा मिळते, कार्यक्रमांच्या वेळी आशीर्वाद मिळतो, कार्यक्रम नसताना साधना चालू ठेवण्याचं बळ मिळतं, त्यातून जगण्याचं बळ मिळतं.. प्रवासात साथ सोडली जरी अनेकांनी, तरीही प्रवास चालू ठेवण्यासाठी एका भावनिक सुरक्षेची ही माळ..
सुमारे चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट.
आत्ता निमित्त, कारण, आठवत नाही पण किशोरीताई, (गानसरस्वती, पद्मविभूषण किशोरी आमोणकर) मला फोनवर म्हणाल्या, ‘‘मुंबईत कधी येणारेस?’’ मी म्हणालो, ‘‘तुमचं काम असेल तर सांगा ताई, आत्ता येतो.’’ त्या हसून म्हणाल्या ‘‘अरे काम आहे, पण घाईचं नाहीये, आलास की ये घरी.’’ मला त्या निमित्तानं त्यांच्या घरी बऱ्याच दिवसांनी जायला मिळणार म्हणून मी लगेच पुढच्या दोन-चार दिवसांत येतो म्हणालो अन् गेलो..
घरी गेल्यावर अर्थातच मी त्यांच्याकडे शिकण्याचा दोन वर्षांचा काळ आठवला. जाताना प्रवासातही माझे दोन वर्षांतले जवळपास शंभर पुणे-मुंबई प्रवास, तळेगावहून सॅन्ट्रो घेऊन फॅक्टरीतून परस्पर जाणं, चाळीत राहून अॅन्थनीकडील जेवण घरी नेऊन जेवणं, शिवाजी पार्कच्या कट्टय़ावरच्या गोंधळलेल्या मन:स्थितीत पुष्कराजबरोबरच्या गप्पा, येताना फूड मॉलवर १५ रुपयांतलं पिठलं-भाकरीचं जेवण, हा सगळा काळ डोळ्यापुढं सरकत होता.
सगळ्याच बाजूंनी ताण असे तेव्हा आíथक, मानसिकता भावनिक, शारीरिक.. पण ताईंकडे शिकण्याचा एक अद्भुत अनुभव या सगळ्यांवर मात करी. काय काम असेल या उत्सुकतेनेच मी त्यांच्याकडे पोचलो.
नेहमीप्रमाणे त्या झोपाळ्यावर बसल्या होत्या अन् मी पायाशी.. मीनाला त्यांनी काही तरी आणायला सांगितलं अन् मला गोष्ट सांगितली, त्या आणलेल्या वस्तूची..
ती एक अप्रतिम मण्या-मण्यांची माळ होती, (त्यात एकूण २४ मणी आहेत) त्यात दोन सोन्याचे मणी होते. एका प्लास्टिकच्या पिशवीत ती ठेवली होती माझ्या हातात त्यांनी ती दिली अन् म्हणाल्या, ‘‘ही माळ कोणाची आहे, ठाऊक आहे तुला? अरे, आपले विलायत खाँ साहेब.. आहेत नं? त्यांची!’’
मी थरारलो. गोष्ट ऐकू लागलो, त्या म्हणाल्या, ‘‘अरे, विलायत खाँ फार मोठा माणूस, त्यांची सतार काय वाजते! अगदी पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे, केवढी मेहनत, केवढी तपस्या, साधना. मला त्यांच्याविषयी प्रचंड प्रेम, आदर होता. मला मोठय़ा भावासारखे होते ते. तुला सांगू विदुर, सतारीत स्वयंभू गांधार फक्त त्यांनाच सापडला होता. मला त्यांच्याविषयी फार प्रेम.’’ विलायत खाँ साहेबांबद्दल बोलताना त्यांचा स्वर सद्गदित झाला होता. मग म्हणाल्या, ‘‘असेच एकदा आम्ही कुठे तरी संमेलनात कार्यक्रमाच्या निमित्त भेटलो, त्यांच्या हातात ही माळ होती.’’ हे सांगताना ‘‘त्यांनी किती रियाज केला असेल ही घालून!’’ असं आत्यंतिक प्रेमानं ती माळ हाताळत म्हणाल्या. मग म्हणाल्या, ‘‘मी त्यांना म्हणाले, मला खूप आवडलीय ही माळ, मला द्या नं. ते हसून मला म्हणाले, देईन कधी तरी!’’ १५-२० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग सांगताना ताई तो प्रसंग जगत होत्या.
‘‘यावर बरीच र्वष लोटली’’ त्या म्हणाल्या, ‘‘आणि मी आता त्यांना भेटायला मुंबईतल्या त्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. फार आजारी आहेत रे ते .. मी गेले. मला म्हणाले, बहना, मी तुझं एक देणं लागतो. तू माझ्याकडे मागितलेली एक गोष्ट, असं म्हणून त्यांनी बरोबर आणलेली ती माळ काढून मला दिली. बघ, काय माणूस आहे विदुर, इतक्या वर्षांपूर्वी मी मागितलेली एक गोष्ट त्यांनी अशा वेळी लक्षात ठेवून मला दिली.’’
ताईंनी दिलेली ती माळ मी हातात घेतली आणि अक्षरश: रोमांच उभे राहिले! मला क्षणभर इतका आनंदही झाला की ती माळ मला देण्यासाठी ताईंनी मला बोलावलं की काय? मला तर जे वाटलं ते शब्दातीतच. पण काही क्षणांत अनपेक्षितपणे ताई म्हणाल्या, ‘‘आता ही माळ मी तुला देतेय, ती तू युसुफ(मिरजकर)ला नेऊन दे.’’ मी एकदमच खट्टू झालो. म्हणजे कोसळलोच जणू, मी रडवेल्या आवाजात म्हणालो, ‘‘ताई, असं काय हो, त्याला द्यायची होती तर, त्यालाच बोलवायचं न? मला बोलावून माझ्या हातून का ती देऊ मी?’’
ताई म्हणाल्या, ‘‘ते तू मला काही विचारू नकोस. सांगते तेवढं कर, त्यांच्या (विलायत खाँ साहेबांच्या) पश्चात त्याचं काय करायचं मला काही कळणार नाही, तू युसुफला दे. तो ती दग्र्यात वगरे ठेवायची असेल किंवा आणखी काही करायचं असेल तर उगीच प्रॉब्लेम नको. तू त्याला नेऊन दे. बस्स.’’
ताईंपुढे मी काय बोलणार? खट्ट झालो. पण, काही काळ का होईना ही वस्तू माइयाकडे आली होती, ताईंच्या आज्ञेप्रमाणे वागायचं ठरवून मी परतलो.. त्यानंतर काही काळातच विलायत खाँ गेले.. युसुफला फोन केला म्हणालो, ‘‘बुधवारी येतो भेटायला, तुझ्यासाठी ताईंनी काही तरी दिलंय ते द्यायला.’’ युसुफ म्हणाला, ‘बरं.’ गेलो..
त्याची-माझी भेट माडीवरच्या दुकानात. गेल्या-गेल्या त्याला सगळी कथा सांगितली आणि ती माळ दिली. ती देताना खूप वाईट वाटलं होतं, पण ‘गुरुआज्ञा-प्रमाण’ म्हणून काही बोललो नाही.
त्या माळेविषयीचं प्रेम तर माइया मनात कायम असणार होतं- युसुफला हे सारं कळलं असावं, पण तो मुळात मितभाषी. काही बोलला नाही. मी परतलो. युसुफ बरोबर असतानाच ताईंना फोन केला. माळ दिल्याचं सांगितलं. वाईट वाटलं अन् समाधानही.. काम पूर्ण केल्याचं.
युसुफच्या भेटी होत होत्या. अधूनमधून माळेबद्दल मी विचारे त्याला, ‘‘तू काही असं दग्र्यात वगरे देणारेस का?’’ पण तो म्हणे, ‘‘नाही नाही, मी माझ्याकडेच ठेवणार आहे ती.’’ तोही आमच्या मित्रमंडळींपकी काहींना ही गोष्ट सांगे आणि अभिमानाने ती दाखवे. मला असं कुणाकडून कळे की, ‘‘युसुफनी सांगितली रे ती माळेची गोष्ट..’’ इत्यादी.
दरम्यान तळेगावजवळ आमचं ‘मत्रबन’ उभं राहिलं. ‘मत्रबन ट्रस्ट’ झाला. १९ जून २०११ ला घर तयार होऊन ‘‘मत्रीच्या सिलसिल्यासाठी दार उघडणारी वास्तू..’’ अशी एक सुंदर आमंत्रण देणारी वास्तू उभी राहिली. युसुफ तर परममित्र. त्याला म्हटलं, ‘‘आता ये एकदा. ‘मत्रबन’ संकल्पना आधी एका दु:खद घटनेतून मग एका शब्दातून, फुलत गेली आहे. ये म्हणजे येच एकदा.’’ तोही ‘येतो’ म्हणाला.
घर पूर्ण झाल्यावर चारच दिवसांनी २३ जूनला त्याचा फोन आला, तळेगावातून. ‘‘अरे, मी दातांच्या कामासाठी आलोय. काम झालंय, ये मी डॉक्टरांकडेच आहे.’’ हा दातांचा डॉक्टर म्हणजे आमचे मित्र
डॉ. विलास पारित्यादार. मी लगेच गेलो. उत्साहात म्हटलं, ‘‘चल मत्रबनात जाऊ, जेवूनच जा. नवीन घर बघ.’’ ‘चल’ म्हणाला.
मग आमच्या गप्पा (माझी बडबड जास्त) जेवण झालं. हॉलमधल्या कोनाडय़ांमध्ये ठेवायला निरनिराळ्या वाद्यांची मॉडेल्स तो करून देतो म्हणाला. निघताना म्हणालो मी त्याला, ‘‘मला फार वाटतं रे ती माळ माझ्याकडं असावी..’’
म्हणाला, ‘‘देईन तुला. ये दुकानात.’’ ६ जुलला मी त्याला भेटायला गेलो. पुन्हा मागायची नाही, ती आपणहून दिली तर घ्यायची, मागे लागायचं नाही. मी स्वत:ला बजावलं. ‘अगत्य’मध्ये अर्धा-अर्धा बिनसाखरेचा चहा, बाहेर पान- सारं यथासांग झाल्यावर मी निरोप घेतला. ‘‘चल जरा.’’ खालच्या दुकानात नेलं मला त्यानं. मी बाहेर रुमाल, मोजे खरेदी करेपर्यंत हा त्या दुकानातून बाहेर आला. हळूच माझ्या हातात ती माळ असलेली पिशवी ठेवली, माझा हात किंचित दाबला. म्हणाला, ‘सांभाळ.’
त्यानंतर १७ ऑगस्टच्या सकाळी अपघातात युसुफ गेला. दोन दिवसच आधी आमचा चंदू गेला अपघातात.
(पं. चंद्रकांत सरदेशमुख) १७च्या सकाळी त्याच्या बायकोच्या माहेरी चंदूचा ‘भूप’ ऐकता ऐकता सुन्नपणे तिच्याशी बोलत असतानाच विलासचा मला फोन आला.. ‘युसुफ गेला.’ सारंच अतक्र्य!
युसुफच्या पश्चात त्याच्या मुलाला, साजिदला मी हे सारं सांगितलं. त्याने मागितली असती तर मी त्याला ती माळ देणार होतो. तो म्हणाला, ‘‘तुमच्या आणि बाबांच्या मत्रीची माळ आहे विदुरकाका, राहू दे तुमच्याकडेच.’’
ती माझ्याकडे आहे म्हणून स्वयंभू गांधार माझ्या सतारीत येईल असे नाही, त्यांच्या अफाट मेहनतीपुढे माझा रियाज तो काय? पण तरी त्या माळेने मला जखडून ठेवलंय.. मला रियाजाला प्रेरणा मिळते, कार्यक्रमाच्या वेळी आशीर्वाद मिळतो, कार्यक्रम नसताना साधना चालू ठेवण्याचं बळ मिळतं, त्यातून जगण्याचं बळ मिळतं.. प्रवासात साथ सोडली जरी अनेकांनी, तरीही प्रवास चालू ठेवण्यासाठी एका भावनिक सुरक्षेची माळ..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा