दिवाळी सणाला जसा पौराणिक कथांचा आधार आहे तसाच जैन पुराणांतदेखील याचा उल्लेख आहे. सुमारे २६०० वर्षांपूर्वी जैन र्तीथकर महावीर यांचे आश्विन महिन्यातील अमावास्येच्या पहाटे चार वाजता बिहार राज्यातील पावापुरी येथे निर्वाण झाले. निर्वाण म्हणजे मोक्ष आणि मोक्ष म्हणजे मुक्ती, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका. जैन धर्मात ‘स्वर्गसुखाच्या’ प्राप्तीपेक्षाही दुर्लभ असा मोक्ष मिळवण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान महावीर हे चोविसावे आणि शेवटचे र्तीथकर होते. त्यांनी मोक्ष मिळवला त्या आनंदाप्रीत्यर्थ पहाटेच्या अंधारात असंख्य दिवे उजळून दीपावली साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. याला ‘निर्वाण महोत्सव’ असेही म्हणतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरात्र सरतं, दसऱ्याचं सोनं लुटून होतं आणि ‘दीन दीन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी’ असं नाचत-गात वासुदेव दिवाळी आल्याची वर्दी देत सर्वाच्या खुशालीचं मागणं मागत खेडोपाडी फिरतो. शहरातील रस्ते ओसंडून वाहत असतात. कपडय़ांच्या, दागिन्यांच्या, फíनचरच्या, मिठाईच्या दुकानांत गर्दी मावत नाही. दिवाळीपूर्वीचा हा माहोल आपण नेहमीच अनुभवत असतो. तशीही आपल्याकडे सणांची एवढी रेलचेल आहे की वर्षभर आपण त्या उत्सवी वातावरणातच रमत असतो. मधली रिकामी जागा वेगवेगळे ‘डे’ज् भरून काढतातच, पण या सगळ्या सणाचं फक्त त्या-त्या दिवसापुरतंच वैशिष्टय़ आहे. जसं गुढीपाडव्याला गुढीचं, दसऱ्याला आपटय़ाच्या पानांचं, पोळ्याला बलाचं. पण दिवाळीची बातच न्यारी. दिवाळी हा सण सर्वसमावेशक आहे. त्यांत विविध मानवी नात्यांची सांगड तर घातलीच आहे पण रीती-भाती, परंपरा, ऋतुमान यांचाही विचार केलेला आढळतो.
    इतर धर्माप्रमाणेच जैन धर्मीयही दिवाळी साजरी करतात, पण जैन धर्मातील दिवाळीची संकल्पना थोडीशी वेगळी आहे. दिवाळी सणाला जसा पौराणिक कथांचा आधार आहे तसाच जैन पुराणांतदेखील याचा उल्लेख आहे. सुमारे २६०० वर्षांपूर्वी जैन र्तीथकर महावीर यांचे आश्विन महिन्यातील अमावास्येच्या पहाटे चार वाजता बिहार राज्यातील पावापुरी येथे निर्वाण झाले. निर्वाण म्हणजे मोक्ष आणि मोक्ष म्हणजे मुक्ती, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका. जैन धर्मात ‘स्वर्गसुखाच्या’ प्राप्तीपेक्षाही दुर्लभ असा मोक्ष मिळवण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान महावीर हे चोविसावे आणि शेवटचे र्तीथकर होते. त्यांनी मोक्ष मिळवला त्या आनंदाप्रीत्यर्थ पहाटेच्या अंधारात असंख्य दिवे उजळून दीपावली साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. याला ‘निर्वाण महोत्सव’ असेही म्हणतात.
या दिवशी सर्व जैन धर्मीय लोक पहाटे चार वाजता जैनमंदिरांत जाऊन ‘निर्वाण लाडू’ चढवतात. (बदलत्या परिस्थितीनुसार आणि सोयीनुसार आता ही वेळ थोडी थोडी पुढे सरकत गेली आहे.) लाडू जुन्या काळातील पायलीच्या आकाराचा, मोठ्ठा असतो. त्यावर आणखी एक छोटा लाडू ठेवतात. काही ठिकाणी तो बुंदीचा किंवा तिळाचा बनवतात. एका ताटात हा लाडू, साळीच्या लाह्य़ा, आवळे, विडय़ाची पाने, तांदूळ, झेंडूची फुले आदी ठेवतात. या वेळेस महावीर भगवंतांपूर्वी झालेल्या आणि मोक्षाला गेलेल्या तेवीस र्तीथकरांचा आणि कोटय़वधी जैन साधूंपकी काही प्रमुख साधूंचा उल्लेख असलेले ‘निर्वाणकांड’ हे स्तुती-स्तोत्र म्हणून, जयजयकार करत हा लाडू चढवला जातो. समाजाच्या वतीने मुख्य लाडू चढवला जात असताना प्रत्येक जण आपल्या हातातील एका ताटलीत एक छोटा लाडू घेऊन चढवत असतो. अलीकडे काही उत्साही लोकांनी या वेळेस फटाके वाजवण्यास सुरुवात केली होती. जैन धर्म अिहसेचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळे समाजातील विद्वानांनी फटाके वाजवू नयेत, असे प्रबोधन केले आणि फटाक्यांनी एकूणच पर्यावरणाची किती हानी होते हे सर्वश्रुत आहेच. त्यामुळे जीविहसा टळून आपोआपच पर्यावरणरक्षणालाही हातभार लागला. आता बरेच जण मंदिराच्या परिसरात तर नाहीच पण घरीही फटाके वाजवत नाहीत.
बहुतांशी जैन समाज हा मूळचा राजस्थान आणि उत्तरेकडचा. दुष्काळ, युद्धजन्य परिस्थिती, उपजीविका आदींमुळे कैक पिढय़ांपूर्वी तो महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यांत स्थिरावला. जैन समाजातही बघेरवाल, खंडेलवाल, सतवाल, काम्भोज अशा अनेक जाती, पोटजाती, उपजाती आहेत. इकडे आल्यानंतर त्यातल्या काहींनी इथल्या भाषा, वेशभूषेसोबत आपली भाषा, वेश तसेच टिकवून ठेवले. काही जण मात्र इथल्या मातीशी एवढे एकरूप झाले की, ‘जसा देश तसा वेश’ असं म्हणत त्यांनी घरादारात बोलण्यासाठी मराठी भाषा तर आत्मसात केलीच पण नऊवारी ते पाचवारी असा महाराष्ट्रीय वेशही अंगीकारला, पण हा समाज इथे तुलनेने तसा लहान आहे. राजस्थानात अजूनही त्यांचे तिथली परंपरा टिकवलेले समाज-बांधव आहेत. म्हणूनच इथे राहणाऱ्यांनी स्वत:ला ‘जैन’ म्हटलं की तुमची भाषा आणि वेश मराठी कसा हा प्रश्न हमखास विचारला जातो.
पण विषय आहे दिवाळी साजरी करण्याचा. तर जैन धर्मातील सर्वच पुरुष आणि बहुतेक स्त्रियाही याच पद्धतीने पहाटे ‘निर्वाणलाडू’ चढवतात. पण काही विशिष्ट समाजातील (उदा. बघेरवाल) स्त्रियांसाठी ‘दिवा देणे’ ही वेगळी प्रथा असते. (हा मारवाडी भाषेतील ‘दिवो दिखानो’चा अपभ्रंश असावा) देवासमोरील वेदीवर ओल्या कुंकवाचे स्वस्तिक आणि पद्म काढून त्यावर रव्याच्या आठ पातळसर पुऱ्या (साळ्या) ठेवतात. त्यांतील चार पुऱ्यांवर प्रथम गूळ घालून केलेली जाडसर लहान दशमी (गुण्या) ठेवतात. त्यावर सुत्तरफेणी (सुत्रफेणी) मग फेनला आणि त्यावर तिळाचा लाडू ठेवतात. उरलेल्या चार पुऱ्यांवर एखादं मोठं फळ, बहुतेक सीताफळ ठेवतात. याच्या चारही बाजूंना पाच विडय़ाची पानं ठेवून त्यावर आवळे, तांदूळ, साळीच्या लाह्य़ा, झेंडूची फुलं इ. ठेवतात. नंतर या सर्वावर प्रत्येकी एक-एक कणकेचा दिवा लावतात.
यातील आठ पुऱ्या हे अष्टकर्माचे प्रतीक, सुत्तरफेणीमध्ये बारीक बारीक अशी अनेक सूत्र असतात म्हणून ते ८४ लक्ष योनींचे प्रतीक, तीळ हे एक दलीय अखंड धान्य शिवाय स्निग्धतेचं भांडार, फळ हे मोक्षरूपी फळाचं प्रतीक, असे हे सर्व पदार्थ प्रतीकरूपी आहेत. पूर्वी आणि आताही काही ठिकाणी रोजचा स्वयंपाक करताना किंवा सणावाराला तसंच नवीन फळ खाण्यापूर्वी प्रथम देवाला वाहण्याची पद्धत आहे. त्यानुसार दिवाळीच्या फराळातील करंजी धनत्रयोदशीला, चतुर्दशीला लाडू, अमावास्या आणि पाडवा हे मुख्य दिवस म्हणून फेणी-फेनल्याचा मान आणि भाऊबिजेला सांजोरी असे पदार्थ प्रथम देवाला आणि मग स्वत: खायला घेतात शिवाय या दिवसांतच सीताफळ, आवळे, झेंडूची फुलं इ. येत असतात (आता सर्व काही ऋतुपूर्वीच उपलब्ध होते हा भाग वेगळा) म्हणून तीही देवाला अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल.
 जैन तत्त्व-प्रणाली भोगांपेक्षा त्यागावर आधारित आहे. जैन धर्मीय देव हे रागद्वेषविरहित, कुठल्याही इच्छा-आकांक्षानी रहित, मोक्षगामी असतात. दैनंदिन पूजे-अच्रेत. त्यांना अष्ट-द्रव्यादी अघ्र्य चढवतांनादेखील इहलोकातील नश्वरवैभवापेक्षा आपल्याला त्यांच्याप्रमाणेच शाश्वत असे मोक्षपद मिळवण्यासाठी संयम, त्याग, तप इ. मुक्ती-सोपानाच्या पायऱ्या क्रमाक्रमाने चढता याव्यात अशीच प्रत्येक जैनाची(श्रावकाची) इच्छा असते.
भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी गौतम गणधरांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर म्हणजे भगवंतांचे प्रमुख शिष्य. ते त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी घरांत मातीच्या जमिनीवर आणि आता फरशीवर राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला ‘मांडणे’ असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळण्यादी विधी केले जातात. (बदलत्या काळानुरूप जैन तत्त्वज्ञान आचरण्यात आणण्यासाठी कठीण आहे आणि मनुष्य हा सामान्य प्राणी आहे. लौकिक सुखाची सुप्त इच्छा तर असणारच. त्यामुळे व्यवहारात अशी अपेक्षा ठेवणारे जैन धर्मीय दिसले तर नवल वाटायला नको.)  
भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच. राजस्थान, उत्तरेकडे राखी पौर्णिमेला महत्त्व आहे. इकडे आलेल्या जैन समाजातील काहींनी तीच परंपरा कायम ठेवली. काहींनी मात्र इथल्या रीती-रिवाजाप्रमाणे भाऊबीज साजरी करण्यास सुरुवात केली. त्यातही वर उल्लेख केलेल्या विशिष्ट समाजांत फक्त भावाकडूनच ओवाळणी ‘वसूल’ केली जात नाही तर बहीणही भावाला आणि भाऊ विवाहित असेल तर वहिनीलाही भेटवस्तू देत असते. ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणता येईल याला.
थोडक्यात काय, तर दैनंदिन जीवनात जरी इतर प्रांतातील रीती-रिवाज आणि खाद्यसंस्कृती काहीशी आपलीशी केली तरी सणा-उत्सवाच्या वेळी मात्र आपलीच परंपरा जपण्याचा आणि खाद्यसंस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करणारा असा हा जैन समाज आणि अशी ही त्यांची दिवाळी.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special article on diwali occasion