दीप हे अग्नीचे आणि तेजाचे रूप, तर दीपज्योत ही ज्ञानाचे व बुद्धीचे प्रतीक आहे. प्रकाशाचे साधन या दृष्टीने दिव्याला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवसा प्रखर तेजाचा सूर्य हवा, तसाच रात्री छोटासा दिवाही हवाच. ‘दीपज्योति नमोऽस्तु ते’ असं म्हणतच घराघरांत रोजची सांजवात प्रज्वलित केली जाते. अशा या दीपज्योतींची सुंदर अशी रांग अथवा रचना ज्या उत्सवात केली जाते तो दीपोत्सव म्हणजेच दिवाळी..
’तमसो मा ज्योतिर्गमय।’
चाक्षुबोधनिषदांतील ऋषींची ही प्रार्थना!
‘अंधारातून मला प्रकाशाकडे ने’ असा याचा अर्थ. ‘अंधार म्हणजे अज्ञान, कारण अंधारात आपल्याला काही उमगत नाही; पण एक छोटी काडी पेटवली तरी सगळं लख्ख समजतं- ज्ञान होतं’ असाही या वरील ओळीचा गर्भितार्थ!
    दीप हे अग्नीचे आणि तेजाचे रूप तर दीपज्योत ही ज्ञानाचे व बुद्धीचे प्रतीक आहे. प्रकाशाचे साधन या दृष्टीने दिव्याला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवसा प्रखर तेजाचा सूर्य हवा, तसाच रात्री छोटासा दिवाही हवाच. ‘दीपज्योति नमोऽस्तु ते’ असं म्हणतच घराघरांत रोजची सांजवात प्रज्वलित केली जाते.
अशा या दीपज्योतींची सुंदर अशी रांग अथवा रचना ज्या उत्सवांत केली जाते तो दीपोत्सव म्हणजेच दिवाळी. छोटय़ा छोटय़ा पणत्या तेल-वात घालून पेटवल्या जातात व एकापुढे एक अशा छान मांडल्या, की वातावरण बदलूनच जातं. त्यांतल्या थरथरत्या दीपकळ्या आपल्याला एक अतिशय शुभकारक मंगल अशी आनंददायी अनुभूती देतात. त्याचा पिवळसर प्रकाश आसमंत उजळून टाकतो व एक प्रकारचा उत्फुल्ल आनंदी उत्साह आपल्यांत निर्माण करतो. एक उत्सवी मंगलमय वातावरणनिर्मिती होते, हीच तर आपल्या सर्व सणांना आवश्यक अशी गोष्ट.
   माणूस उत्सवप्रिय आहे, त्यांतून दिवाळीचा सण तर सर्वाचा अति आवडता सण! घराची फुलांनी, दिव्यांनी सजावट करायची, घरापुढे शुभ प्रतीकांची रंगीबेरंगी रांगोळी घालायची, छान छान नवे कपडे घालायचे, दागदागिने घालून नटायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडू, करंज्या, चकल्या असे गोड-तिखट आवडते फराळाचे जिन्नस करायचे नि खायचे या सर्व गोष्टी या सणाचा पायाच होत.
   मुख्यत: अश्विन कृष्ण त्रयोदशी (धनतेरस) ते कार्तिक शुद्ध द्वितीया या पाच दिवसांचं दिवाळीत खरं महत्त्व आहे. सबंध वर्षांतील हेच दिवस का निवडले असावेत हे जाणून घेणंही गरजेचं आहे. नुकताच चातुर्मास म्हणजे पावसाळा संपलेला असतो. कृषिप्रधान भारतात पावसावरच शेतकऱ्यांची लावणी-पेरणी होत असते. पाऊस संपता संपता शेतं तरारतात- भरली कणसं बघून कष्टाचं चीज झाल्याचं समाधान शेतकऱ्यांना मिळतं. शेतीची कापणी-मळणी ही कामंही काही प्रमाणात हातावेगळी झाल्यानं शेतकरी थोडा मोकळा झालेला दिसतो. पुढील वर्षांची धान्याची व पोटापाण्याची त्याची सोय लागलेली असते हातांत पैसेही येतात. पाऊस, थंडी, उन्हाळा या कुठल्याही ऋतूचा कडाका नाही. हवामान अगदी प्रसन्न. बळीराजा सुखावलेल्या स्थितीत असतो.
    पाऊस पडून आपलं घर बाहेरून स्वच्छ झालेलं असतं. मोकळा वेळ असल्याने व घर सजवण्याचा उत्सव समोर असल्याने घराची स्वच्छता करून वातावरण प्रसन्न करायचं असतं. घराची स्वच्छता हेही दिवाळीचं एक वैशिष्टय़. मंगल व उत्साही करण्यासाठी स्वच्छता हवीच.
   चातुर्मास म्हणजे भर पावसाळ्याचे दिवस. पावसाळी हवामानात पचनशक्ती थोडी क्षीण होते म्हणून याच काळात अनेक व्रत-वैकल्यं, उपास केले जातात. तेलकट-तुपकट-तळलेलं, वातूळ अशा पदार्थाचा वापर कमी करावा अशी पद्धत पडलेली असते. त्यामुळे आता हवामान सुधारल्याने खाण्यापिण्याच्या बंधनातून सुटून करंज्या, शेव, चकल्या, लाडू यांसारख्या पदार्थानी जिभेचे लाड पुरवता येण्यासारखी स्थिती असते.
 अशा तऱ्हेने भौगोलिकदृष्टय़ा, आर्थिकदृष्टय़ा व उत्सवप्रिय समाजमनाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असतो, त्यामुळे दिवाळीचे दिवस सुखकारक ठरतात. असा हा दीपोत्सव केव्हापासून सुरू झाला, हा जरा अभ्यासाचा व संशोधनाचा विषय असला तरी महाराष्ट्रात अश्विन कृष्ण चतुर्दशीचा दिवस हा दिवाळीचा अभ्यंगस्नानाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो.
   भगवान श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुराचा वध करून नरकासुराने बंधनात ठेवलेल्या सर्व हजारो स्त्रियांना सोडवले म्हणून या पहिल्या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असं म्हटलं गेलं; पण अशा कुणाच्या तरी घरात बंधनात असलेल्या स्त्रियांना समाज कसा स्वीकारील? त्यांच्याशी कोणी लग्न करणार नाही, अशा विचाराने श्रीकृष्णानेच त्या सर्वाशी विवाह करून त्यांना समाजात स्थान दिलं. ज्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता त्यांचं संरक्षण व सांभाळ करून एक मोठ्ठाच सामाजिक प्रश्न श्रीकृष्णाने सोडवला. स्त्रियांचा सन्मान राखला म्हणून नरकचतुर्दशीला ‘कारेटं’ नावाचं एक फळ नरकासुराचं प्रातिनिधिक स्वरूप ठरवून, मुद्दाम पायाखाली चिरडून फोडायचं असतं. जणू नरकासुरासारख्या समाजकंटकांना व स्त्री सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करा, असा विचार समाजात रुजवायचा हा प्रयत्न असावा!
  दुसरा दिवस हा लक्ष्मीपूजनाचा. मानवाला सगळ्यात जास्त आवडणारी व हवीहवीशी वाटणारी
देवता म्हणजे लक्ष्मी! पण या लक्ष्मीचा स्वभावच विचित्र. ‘न मागे तयाची रमा होय दासी’ असा तिचा स्वभाव. लक्ष्मीचं स्वयंवर ठरलं; पण स्वयंवरासाठी लावायचा ‘पण’ मात्र जाहीर केला गेला नाही. भूतलावरील सर्वच राजे लक्ष्मीसाठी आसुसलेले; पण वरमाला हातात घेऊन स्वयंवर मंडपात जेव्हा लक्ष्मीने प्रवेश केला तेव्हा तिने असं जाहीर केलं, ‘मी ज्याला नको आहे त्याच्याशीच मी विवाह करणार.’ सगळेच एकदम मागे सरले. लक्ष्मी वरमाला हातात घेऊन शोधीत निघाली तेव्हा तिला क्षीरसागरात शेषावर आनंदात पहुडलेले भगवान विष्णू दिसले. तिने त्यांनाच वरमाला घातली व ती त्यांचे पाय चुरीत तिथे स्थिर झाली. अशी ही लक्ष्मी! इतरांपेक्षा सगळं वेगळंच- म्हणूनच की काय- जो अमावास्येचा दिवस आपण सर्व शुभ कार्यात टाळतो तोच दिवस लक्ष्मीने निवडला आणि अश्विन अमावस्येलाच खास लक्ष्मीपूजन होऊ लागलं.
   यावरून असंही लक्षात घ्यायचं की, पंचांगातली कुठलीही तिथी वाईट नसते. प्रतिपदेपासून पौर्णिमा व अमावास्या यातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे. प्रत्येक तिथीचा कुठल्या ना कुठल्या शुभ गोष्टीशी संबंध आहे.
    कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा तिसरा दिवस. शेतीच्या मुख्य कामातून शेतकरी मुक्त झालेला असतो. नव-धान्याचं तोरण दाराला लावलं जातं. त्यासाठी हे नवं वर्षच उजाडत असतं. आर्थिक स्थिती सुधारल्याने बाजारातही बरीच नवी उलाढाल सुरू होते. व्यापारीही सुखावतात. त्यांच्या पेढीवरही नव्या हिशोबाच्या वह्य़ा मांडल्या जातात. त्यांचंही ‘नववर्ष’ सुरू होतं. असा हा तिसरा दिवस ‘पाडवा’, ‘बेसतुं वरस’ या नावांनी ओळखला जातो. व्यापारी लोक खास एकमेकांच्या घरी जाऊन नववर्ष शुभेच्छा देतात.
या दिवाळीच्या पाडव्याला ‘बळी प्रतिपदा’ असं म्हटलं जातं, कारण याच दिवशी भगवान विष्णूने बळी नावाच्या राजाला पाताळात गाडलं अशी आख्यायिका आहे.
    बळी नावाचा राजा अतिशय बुद्धिमान, दानी, राजनीतिनिपुण होता; पण तो भोगवादी व जडवादाचा पुरस्कर्ता होता. तो त्याच्यासारख्या जडवादाच्या पुरस्कर्त्यांनाच महत्त्वाच्या पदावर नेमून तेजस्वी ब्राह्मणांना व क्षत्रियांना राज्यकारभारापासून दूर ठेवीत असे. त्याला शिक्षा करण्यासाठी विष्णूने वामनाचा अवतार घेऊन बळीकडे फक्त तीन पावलं मावतील एवढीच जमीन मागितली; पण विष्णूची तीन पावलं स्वर्ग, पृथ्वी, पाताळ एवढं व्यापणारी होती. तिसरं पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवून त्याने बळीला पाताळाच्या दारात उभं केलं. या दिवशी बळीपूजन होते.
   या गोष्टीतील राजकारणी रूपक दडलेलं आहे. चातुर्वण्र्य व्यवस्था व दैवी संस्कृतीची स्थापना करण्यासाठी वामनाला अवतार घेऊन सर्व व्यवस्था आपल्या हातात घ्यायची होती. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला वामनाने सर्व व्यवस्था आपल्या हातात घेऊन उत्सव कसा करावा हेही लोकांना शिकवलं. महाराष्ट्रात या दिवशी पत्नी पतीला ओवाळते व पतीकडून भेटवस्तू मिळवते.
    कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज. पूर्वीच्या काळी बालविवाह होत असत. आपली लेक दूरच्या गावी लग्न करून जात असे. प्रवासाची साधनं नव्हती. शिक्षणाच्या अभावाने पत्रलेखनही नव्हतं. दिवाळीसारख्या मोठय़ा आनंददायी सणाला आपल्या लेकीची आठवण येणं अगदी स्वाभाविक. अशा वेळी बहिणीने भावाला भेटायला बोलवायचं असे. भाऊही आनंदाने प्रवास करून बहिणीच्या सासरी जाऊन तिची व तिच्या घरची एकूण खबरबात घेत असे. तिला प्रेमाने काही भेट द्यायची- तिच्याकडून ओवाळून घ्यायचे. भावा-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून ही भाऊबीज. यातही यम आणि यमी नावाची त्याची बहीण यांची गोष्ट सांगतात. त्यातही भावाबहिणीचे नातेच उलगडले आहे.
भारतातील सर्वच सण हे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक व शारीरिक स्वास्थ्य यांचा विचार करूनच योजलेले आहेत. त्यामागे कारण आहे, विचार आहे. पुराणांतर्गत अनेक गोष्टी या रूपकात्मक आहेत. त्यांचाही गूढार्थ शोधून काढल्यास त्यामागे नक्कीच सांस्कृतिक विचार आहे. संस्कृती टिकवण्याची दृष्टी आहे. या सर्व सणांमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी ओवाळणी होते. त्याचाही अर्थ तुझ्या जीवनात प्रकाश उजळू दे- ज्ञान असू दे, अज्ञान दूर होऊ दे, मंगलमय, तेजस्वी जीवन घडू दे, अशी इच्छाच व्यक्त केली जाते. परमेश्वराकडे अशीच पवित्र भावना व्यक्त होते. म्हणूनच म्हणायचं,
दीपज्योति: परब्रह्म दीपज्योती जनार्दन।
दीपो हस्तु मे पापं दीपज्योतिर्नमोस्तुते।।    
आजचा अंक दिवाळी विशेषांक असल्याने नियमित प्रसिद्ध होणारी सदरे अंकात प्रसिद्ध होऊ शकली नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा