ऐश्वर्या पुणेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या प्रत्येक मराठी घरात गणेश चतुर्थीला मोदक हमखास केले जातातच. सुगरणींसाठी कळीदार मोदक बनवणं आव्हानात्मकच असतं, पण त्याचा आनंद वेगळा असतो. मात्र मोदक तयार करण्यापासून दृष्टिहीन स्त्रियांनी मागे का राहावं, या कल्पनेतून त्यांच्यासाठी विशेष वर्ग घेण्यात आले आणि त्यांचे हातच त्यांचे डोळे होऊन विविध चवींचे, रंगांचे साच्यातले मोदक त्यांनी तयार केले. या तरुणींना मिळालेला आनंद आणि समाधान सांगणारा हा लेख.

गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे ‘मोदक’. विविध प्रकारचा नैवेद्या गणपतीसाठी केला जातो, पण त्यात अग्रक्रम असतो मोदकाचाच. उकडीचे आणि तळणीचे मोदक हे परंपरागत आहेत, मात्र आताच्या बदलत्या काळात वेगवेगळ्या सारणांचे त्यामुळे वेगवेगळ्या चवींचे, वेगवेगळ्या रंगांचे मोदकही केले जातात.

गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या प्रत्येक मराठी घरात गणेश चतुर्थीला हे मोदक हमखास केले जातातच. मी पाककृतीचे क्लासेस घेत असल्याने आतापर्यंत अनेकींना मोदक करायला शिकवले, त्यात माझ्या काही दृष्टिहीन मैत्रिणीही होत्या. जेव्हा त्या मुलींनी प्रत्यक्ष हाताने ते मोदक केले तो अनुभव प्रचंड आनंद आणि समाधान देणारा होता, त्यांना आणि मलादेखील.

आणखी वाचा- मोडक्या व्यवस्थेचे कठोर वास्तव

अर्थात सुरुवातीच्या टप्प्यात मी या दृष्टिहीन मुली, स्त्रियांना फक्त साच्यातले आणि गॅसचा वापर न करता तयार करता येणारे साच्यातले मोदक शिकवते आहे. आपल्या हाताने मोदक करून ते गणपती बाप्पाला नैवेद्या दाखवण्याचं समाधान त्यांना मिळत आहे, हे महत्त्वाचं. मी गेली १५ वर्षं पाककलेचे क्लासेस चालवत आहे.

जेव्हा मला काही दृष्टिहीन तरुणी, स्त्रिया भेटल्या आणि त्यांनी स्वयंपाक किंवा काही खास पदार्थ बनवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा माझ्याही मनात त्यांच्यासाठी काही करावं हा विचार रुजू लागला. त्याचाच एक भाग म्हणून मी ‘रुचिपालट’ हे माझ्या पाककृतीचं पहिलं पुस्तक ब्रेल लिपीमध्ये काढलं. त्या पुस्तकाच्या १००० प्रती विनामूल्य दिल्या. माझ्या पुस्तकांना दृष्टिहीन स्त्रिया-मुलींकडून खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. खूप मुलींनी मला माझं ब्रेलमधील पुस्तक वाचतानाचे व्हिडीओ पाठवले. कोणी त्यातील बिर्याणी, चायनीज पदार्थ करून ‘यूट्यूब’वर टाकले. त्यामुळे मला प्रेरणा मिळाली. आणि म्हणून मग मी (त्याचेही) विनामूल्य क्लास घ्यायचं ठरविलं. दरवर्षी मी गणपतीच्या १ ते २ आठवडे आधी मोदक बनवण्याची कार्यशाळा घेतेच, परंतु जेव्हा मी दृष्टिहीन मुलींसाठी मोदक बनवण्याचे वर्ग घ्यायचं ठरवलं तेव्हा पहिला प्रश्न आला तो त्यांना प्रत्यक्ष कसं शिकवावं हा. कारण मी मोदक कसा करायचा, हे दाखवलं तर त्या पाहू शकणार नव्हत्या. यावर थोडा विचार करून ठरवलं की, या दृष्टिहीन स्त्रियांना गॅसचा वापर न करता येणारे मोदक शिकवू या आणि त्यांच्याकडून करवूनही घेऊ या. यासाठी मोदकाच्या सहज करता येतील अशा सोप्या रेसिपी (मी) निवडल्या. आणि मला (चक्क) सहा पाककृती मला सुचल्या.

मी ही कल्पना डोंबिवलीच्या ‘ब्लाइंड प्रोग्रेसिव्ह असोसिएशन’चे अध्यक्ष अनिल दिवटे आणि ‘रोटरी क्लब ऑफ डायमंड’चे माजी अध्यक्ष नीलेश गोखले, नम्रता गोखले, (जगदीश आणि जयश्री तांबट ) यांना सांगितली आणि अवघ्या दोन दिवसांत त्यांनी कल्पना उचलून धरली आणि पाठिंबा दिला. त्यातूनच ज्या मुलींना मोदक शिकायचे आहेत त्या मुली माझ्याकडे आल्या. यंदा पहिल्या बॅचमध्ये आठ मुली हे मोदक शिकूनही गेल्या आहेत. त्यांचे अनुभव चांगले आहेत. त्यांना मी सारण करून उकडीचे मोदक शिकवू शकत नव्हते, त्यामुळे चॉको वॉलनट मोदक, गुलाब मोदक, मावा मोदक, केक मोदक, पान मोदक, शुगर फ्री खजूर ड्रायफ्रूट मोदक असे सहा प्रकारचे मोदक (मी) त्यांना शिकवले.

आणखी वाचा-सांधा बदलताना : कळा ज्या लागल्या जीवा

सर्वप्रथम मी प्रत्येकीच्या हाताला धरून त्यांना मोदक साचा कसा असतो, तो उघडायचा कसा, त्यात मिश्रण कसं भरायचं तसेच साचा बंद कसा करायचा यांची स्पर्शाने ओळख करून दिली. नंतर एकएक करून सर्व प्रकारच्या मोदकाचे साहित्य त्यांच्याकडूनच एकत्र करून त्यांनाच स्पर्शाने मिश्रण एकत्रित करायला लावलं. ते मिश्रण साच्यात घालून त्यांनी अतिशय सुंदर मोदक बनवले. साच्यातून मोदक बाहेर काढून जेव्हा त्यांना प्रत्येक कळीसह मोदकाचा स्पर्श जाणवला, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दातीत होता. आणि त्यांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता. त्यांचे हातच आता त्यांचे डोळे झाले होते. वेगवेगळे मोदक त्या करून पाहत होत्या. एकमेकींना स्पर्शाने दाखवत होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया’ करत प्रत्येकीने हा आनंद साजरा केला. त्यांचा उत्साह बघून मलाही त्यांना शिकवायला खूप मजा येत होती. दृष्टिहीन मुलींना मोदक शिकवतानाचा अनुभव मलाही खूप काही शिकवून गेला. या मुली स्वत:साठी, कुटुंबीयांसाठी तर हे मोदक करतीलच, परंतु यापुढेही अनेक पदार्थ शिकून त्या त्यांच्या पायावर उभ्या राहू शकतील, हे माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आणि समाधान देणारं आहे.

punekaraish@gmail. com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special modak making classes for visually impaired women mrj