11-anandप्राणायाम साधना करायची ती केवळ मनोनियंत्रणासाठीच हे आपण जाणले. किंबहुना योगसाधनेचे फलित वर्णन करताना पतंजली म्हणतात, ‘योगाच्या अष्टांगांची साधना केल्यास अशुद्धीचा क्षय होऊन ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होते.’ साक्षीभावाच्या प्रत्यक्ष प्रचीतीतून द्रष्टा म्हणजे पाहणारा, हा दृश्यापासून वेगळा आहे, हा अनुभव जागृत होतो. अर्थात हा अनुभव जागृत होण्यासाठी लागणारी स्वच्छता, अंतर्बाहय़ असावी लागते. प्राणायामाच्या लाभांचे वर्णन करताना पतंजली म्हणतात, ‘तत: क्षीयते प्रकाशावरणम्’ साधनेने आपल्या अंत:करणावर आलेली काजळी, मळ सगळा हळूहळू कमी होऊ लागतो. झाकला गेलेला प्रकाश हळूहळू दृष्टीस पडू लागतो. अहंकाराची पुटे नाहीशी व्हायला लागली की खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या दृष्टीने जग पाहता येते आणि या सर्वाची परिणती धारणेसाठी, मनाची योग्य अवस्था प्राप्त करण्यात होते. म्हणूनच साधनेचे उद्दिष्ट पक्केअसले, तरच साधकाची गाडी रुळावर राहते. नाही तर आध्यामिक अहंकारही अपघात घडवून आणू शकतो.
शीतली प्राणायाम
आज आपण शीतली प्राणायामाचा सराव करू या. अपवादात्मक, म्हणजे तोंडाने पूरक करण्याचा प्राणायाम आहे. हा प्राणायाम करण्याआधी कुठल्याही सुखासनात बसा. पाठकणा सरळ ठेवा. डोळे मिटलेले असतील. एक दीर्घ श्वास घ्या व सोडून द्या. आता जिभेची पन्हळ करून त्या पन्हळीतून ओठांवाटे तोंडाने श्वास घ्या. (पूरक).
हा श्वास घेताना पोट बाहेर घ्या (उदरश्वसन). तोंडाने श्वास घेताना हवेचा गारवा जिभेवरील उंचवटे, हिरडय़ा, तोंडाची पोकळी इथे जाणवतो तो अनुभव घ्या. तोंडाने पोटभर श्वास घेऊन आता दोन्ही नाकपुडय़ांनी रेचक करा. जर जिभेची पन्हळ करणे जमत नसेल तर अशा वेळी ओठांचा चंबू करून दोन्ही ओठांच्या मधून पूरक करणे सहज जमू शकते.
या प्राणायामाच्या सरावाने शरीरात थंडावा निर्माण होतो. त्यामुळे ताण घालविणारा, दडपण दूर करणारा असा हा प्राणायाम आहे. थंड हवेत, पावसाळय़ात, सर्दी-पडसे झाल्यावर हा प्राणायाम करू नये. शीतली प्राणायामाप्रमाणेच थोडय़ाफार फरकाने सीत्कारी प्राणायाम केला जातो.

Story img Loader