आपण आरशात कशासाठी पाहतो? असा प्रश्न एका शिष्याने महात्मा सुकरान यांना विचारला. यावर सुकरान उत्तरले, ‘मी कुरूप आहे हे मला माहीत आहे. या जीवनात कोणते सद्गुण धारण केले असता माझी कुरूपता नष्ट होईल याचे चिंतन सतत बुद्धीत राहावे म्हणून मी पुन्हा पुन्हा आरशात बघतो.’ शिष्याने प्रतिप्रश्न केला, ‘सुंदर माणसाने कशासाठी आरशात पाहावे?’ सुकरान म्हणाले, ‘कोणते सद्गुण धारण केले असता माझे सौंदर्य असेच टिकून राहील याचे चिंतन व्हावे म्हणून सुंदर माणसाने आरशात बघावे.’
गीतेच्या दहाव्या अध्यायात ‘सुंदरता’ ही प्रभूची विभूती आहे, असे सांगितले आहे. अर्थात जेथे-जेथे सुंदरता तेथे-तेथे प्रभू आहे. भगवंताला परम पवित्र म्हटले जाते. म्हणूनच जेथे जेथे पावित्र्य नांदते ते सर्वही सुंदरच असेल. म्हणूनच येथे म्हटले जाते,
पवित्र तन रखो, पवित्र मन रखो।
पवित्रता मनुष्यता की शान है।
जो मन, वचन, कर्म से पवित्र है।
वो चरित्रवान ही कहाँ महान है।
पण आजच्या या मायावी दुनियेत सुंदरतेची व्याख्या काही औरच आहे. आज बाह्य़रंगाला अंतरंगापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. तुमचं व्यक्तित्वही ठरवलं जातं ते केवळ बाह्य़ रूपावरूनच. चेहरा आकर्षक व सुंदर असावयास हवा. चारचौघांत आपण उठून दिसावं, आपला प्रभाव इतरांवर पडावा याकरिता अनेक प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर हमखास होताना दिसतो. पण लोकहो, दिसतं ते रूप व असतं ते स्वरूप! रूपसंपदा दोन दिवसांची हे माहीत असूनही क्षणभंगुर रूपाच्या मागे लागतो व शाश्वत, चिरंतन अशा सत्य स्वरूपाला मात्र विसरतो.
  राजा जनकाच्या दरबारात ‘बंदी’ नावाचे पंडित होते. स्वत:च्या विद्वत्तेबद्दल यांना फार गर्व होता. शास्त्रार्थ वादविवादात त्यांच्याकडून हार खाणाऱ्याला नदीत बुडवले जायचे. काहोद नामक ऋषींना आपले प्राण यामुळेच गमवावे लागले होते. काहोद ऋषींना अपंग आणि अतिशय कुरूप असा एक मुलगा होता. त्याचं नाव होतं अष्टावक्र. त्याचं शरीर आठ ठिकाणी वाकडं होतं. पण परमेश्वराने त्याला अद्भुत प्रतिमा दिली होती. एखादी गोष्ट केवळ एकदा ऐकली की ती त्याच्या लक्षात राहत असे. या अद्भुत स्मरणशक्तीबरोबर त्याच्याजवळ कल्पनाशक्ती व तर्कशक्तीदेखील तशीच अद्भुत होती. थोडे मोठे झाल्यावर त्याने अध्ययनास सुरुवात केली. त्याने अतिशय कमी कालावधीत खूप परिश्रम करून विद्यार्जन केले व तो जनकाच्या राजधानीत येऊन दाखल झाला.    
जेव्हा तो राजमहालाजवळ आला, तेव्हा त्याची बालमूर्ती पाहून पहारेकऱ्यांनी त्याला राजवाडय़ात प्रवेश करण्यास मनाई केली. तेव्हा अष्टावक्र धीटाईने म्हणाला, ‘मी लहान दिसत असलो तरी वयाने चांगला मोठा आहे. मीदेखील सर्व विद्यांचं अध्ययन केलं आहे. माणसांची उंची, पेहेराव त्याच्या मोठेपणाचे निर्देशक नसून माणसाच्या विद्वत्तेवरून त्याची श्रेष्ठता ठरते.’ पहारेकऱ्यांनी तरीही त्याला प्रवेश नाकारला. त्यावर काहीशा आश्चर्याने तो म्हणाला, ‘मला माहीत नव्हतं दरबारात लहान-मोठा असा भेदभाव असतो. अखेरीस न्यूनता वा मोठेपणा हे माणसाच्या श्रीमंतीवरून नव्हे, तर त्याने संपादन केलेल्या विद्येवरून ठरवायला हवे.’ पहारेकऱ्यांनी दुर्लक्ष केले असले तरी राजा जनकाने स्वत:च त्याला राजदरबारात येण्याचे निमंत्रण दिले. अष्टावक्रानेराजदरबारातले पंडित बंदी यांना शास्त्रार्थ वादविवाद करण्याचे आव्हान दिले. जनक राजाने पंडितांना बोलावले व सभा सुरू झाली. एकीकडे सुडौल देहाचे पंडित बंदी आसनस्थ झाले, तर दुसरीकडे शरीरावर अनेक ठिकाणी बाक असलेला अपंग अष्टावक्र, त्याचं ध्यान एखाद्या बोक्याप्रमाणे दिसत होतं. आणि म्हणून दरबारातील सर्वजण त्याच्या या रूपाकडे पाहून हसू लागले. जेव्हा ते कुजबुजत्या आवाजातले हास्य बंद झाले तेव्हा अष्टावक्राने सिंहगर्जनेसमान आपलं हसणं सुरू केलं. त्याच्या हसण्याचा आवाज एवढा मोठा होता, उपस्थितांची अंतकरणे भेदून गेला. काही वेळाने सभा शांत झाली.
राजा जनकाने नम्रपणे अष्टावक्राला विचारले, आपल्या हसण्याचे कारण समजू शकेल काय? अष्टावक्र म्हणाला, ‘राजा, पुष्कळ दिवसांपासून तुझ्या विद्वत्त सभेची तारीफ ऐकून होतो, पण आता असे वाटतेय तुझ्या दरबारात शरीरावरील चामडं पाहणारे चर्मकार आहेत. ज्ञानाला समजणारा, ज्ञानाची देवाणघेवाण करणारा एकही व्यापारी नाही. मी माझ्या मूर्खपणावर हसत होतो की इतके कष्ट घेऊन मी येथे आलोच कशाला?’ आता मात्र सभेतील वातावरण गंभीर झाले. पंडित बंदीही काहीसे अस्वस्थ झाले. मग शास्त्रार्थ वादविवाद सुरू झाला. पंडित बंदींच्या प्रश्नांना अष्टावक्र सहज उत्तर देत होता. वादविवाद बराच वेळ चालू राहिला. एकाहून एक अशा सरस उत्तरांनी त्याने पंडित बंदींना नामोहरम केलं. हतबल झालेले पंडित बंदी त्याच्या प्रश्नांना उत्तर देण्यात असमर्थ ठरू लागले. शेवटी त्यांनी शरणागती स्वीकारली. ज्यांनी अष्टावक्राचा उपहास केला होता, त्या सर्वाच्याही माना शरमेनं खाली झुकल्या.
  व्यक्तीचे सौंदर्य म्हणजे तिचे सुडौल शरीर नव्हे, तर बुद्धिमत्ता, गुण हेच तिचे खरे सौंदर्य. अष्टावक्र शरीराने जरी कुरूप होता तरी त्याच्यात असलेल्या विचारांच्या पवित्रतेमुळे व बुद्धिमत्तेमुळे सर्वाना नतमस्तक व्हावे लागले. आपण सुंदर व्हावं, असं कोणालाही वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण सुंदर विचार व आदर्श कर्म यानेच मनुष्य खऱ्या अर्थाने सुंदर बनतो. कुरूप असूनही पुन्हा पुन्हा आपण आरशात कशासाठी पाहतो? असा प्रश्न एका शिष्याने महात्मा सुकरान यांना विचारला. यावर सुकरान उत्तरले, मी कुरूप आहे हे मला माहीत आहे. या जीवनात कोणते सद्गुण धारण केले असता माझी कुरूपता नष्ट होईल याचे चिंतन सतत बुद्धीत राहावे म्हणून मी पुन्हा पुन्हा आरशात बघतो. शिष्याने प्रतिप्रश्न केला, ‘सुंदर माणसाने कशासाठी आरशात पाहावे?’ सुकरान म्हणाले, ‘कोणते सद्गुण धारण केले असता माझे सौंदर्य असेच टिकून राहील याचे चिंतन व्हावे म्हणून सुंदर माणसाने आरशात बघावे.’
 आजच्या युगात लोक देह सजवण्यासाठी धन व शक्ती व्यर्थ खर्च करीत आहेत. शरीर सुंदर असूनही जर त्या व्यक्तीकडे शुद्ध बुद्धी नसेल, नम्रता नसेल तर त्याचे ज्ञान चक्षुहीन असंच म्हणावं लागेल. आणि जर ती व्यक्ती अवगुणांनी संपन्न असेल तर तिला कुरूप म्हणावं लागेल. आपण जुन्या हिंदी चित्रपटातील एक गीत बऱ्याच वेळा गुणगुणतो, ‘लागा चुनरी में दाग, छिपाऊँ कैसे, घर जाऊ कैसे।’ पुढे यात म्हटले आहे ‘मैली चुनरिया आत्मा मोरी, मैल है मायाजाल।’ येथे चुनरी हा शब्द आत्म्यासाठी वापरला आहे. विकारांच्या वशीभूत झालेल्या आत्म्यामुळे चारित्र्यावरही अयोग्य व अशुद्ध विचारांचे डाग तयार होतात. हे डाग जाण्यासाठी काय करावे, हा प्रश्न कवीने उपस्थित केला आहे. असं म्हणतात,
When wealth is lost, nothing is lost
When health is lost, Something is lost.
शरीराला जसे वस्त्र आभूषणांनी सुशोभित करतात तसे आत्म्यासही सुशोभित करण्याची गरज आहे. सुख, शांती, आनंद, प्रेम, ज्ञान, शक्ती, पवित्रता हे सात आत्मगुण धारण केले असता माणसाला दैवी सौंदर्य सहज प्राप्त होते, जे चिरकाल टिकणारे असते.
थोडक्यात, चारित्र्य तर सुधारायचे असेल, तर निश्चितच व्यवहार (कर्म) सुधारावा लागेल, व्यवहार सुधारावा असे वाटत असेल तर वाणी, वैखरी सुधारावी लागेल. वाणी सुधारण्यासाठी विचारशैली सुधारावी लागेल, अर्थात विचारात पवित्रता आणावी लागेल. आणि हीच पवित्रता तुम्हाला सुंदरता प्रदान करेल. म्हणून चला तर, चिरकाल टिकणारे हे दैवी सौंदर्य प्राप्त करण्यासाठी शरीराला नव्हे, तर आत्म्याला सात दिव्य गुणांनी शृंगारायला.
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रसिद्ध होणाऱ्या अध्यात्मिक प्रवचनांचा हा अनुवादित भाग)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा