श्रीकांत ना. कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयातून १९७३ मध्ये मी ‘बीएस्सी.’ची पदवी घेतली. त्याच वर्षी मराठवाडा विद्यापीठात वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रम नव्यानं सुरू झाला होता. मला वाचण्याची आणि लेखनाची आवड असल्यामुळे मी वृत्तपत्रविद्येचा पदव्युत्तर अभ्यासक्रम करावा, असं माझ्या सर्वात मोठय़ा भावानं मला सुचवलं. त्या अभ्यासक्रमाची सहज चौकशी करण्यासाठी म्हणून त्या विभागात गेलो. समोरच मोठय़ा टेबलावर पांढरेशुभ्र कपडे घातलेली एक गोरीपान, प्रौढ व्यक्ती काही तरी लिहिताना दिसली. मला पाहताच त्यांनी ‘या, या,’ म्हणून समोरच्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं आणि आनंदानं आपल्या ओघवत्या शैलीत पत्रकारिता क्षेत्राची आणि त्या अभ्यासक्रमाची माहिती सांगितली. ते होते वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख असलेले स. मा. गर्गे सर. त्यांचं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व पाहून मी भारावून गेलो आणि लगेच तिथे प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>> कलावंतांचे आनंद पर्यटन : रस्ता गिळत.. अंग आदळत..

गर्गे सर हे मुळात इतिहास संशोधक. त्यामुळे प्रत्येक विषयाच्या मुळाशी जाऊन शिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. बातमी कशी लिहायची, मिळालेल्या माहितीच्या आधारे लेख कसा लिहायचा, इथपासून वृत्तपत्राचं तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि इतिहास अशा अनेक विषयांबाबतीत ते आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करीत. गर्गे सर त्या वेळी पुण्यात राहात असले, तरी ते मूळचे मराठवाडय़ाचे असल्यामुळे त्यांनी कुलगुरूंच्या खास विनंतीवरून मराठवाडा वृत्तपत्रविद्या विभागाचं प्रमुखपद सांभाळलं होतं. केवळ त्यांच्या मैत्रीखातर अनेक नामवंतांनी अतिथी प्राध्यापक या नात्यानं आम्हाला शिकवलं. त्यात मराठवाडा दैनिकाचे संपादक अनंतराव भालेराव, व्यवस्थापक केशवराव देशपांडे, ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’चे आबासाहेब मुळे, त्या वेळी मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागात असलेले साहित्यिक भालचंद्र नेमाडे, इंग्रजी विभाग प्रमुख चंद्रशेखर जहागीरदार, पुण्याच्या रानडे इन्स्टिटय़ूटचे प्रा. जगझाप सर, प्रा. ल. ना. गोखले आदींचा समावेश होता. पहिल्याच वर्षी सुरुवातीलाच वृत्तपत्र विभागाचं साप्ताहिक स्वरूपातील नियतकालिक काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्याच्या नावापासून आतील सर्व मजकूर ठरवण्यापर्यंतची जबाबदारी त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांवर सोपवली. नियतकालिकाला आकर्षक नाव असावं म्हणून सरांनी विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धाही ठेवली. त्यात मी ‘वृत्तसाधना’ हे नाव सुचवलं, ते गर्गे सरांना अतिशय आवडलं आणि त्यांनी तेच निश्चित केलं. स्पर्धेच्या उल्लेखासह त्यात माझं नावही छापून आल! गर्गे सर जेवढय़ा गंभीर प्रकृतीचे वाटत तेवढाच त्यांचा स्वभाव मिश्कीलही होता. पत्रकारितेत त्यांना ग. त्र्यं. माडखोलकर यांच्यासारखे गुरू लाभले होते. त्यामुळे कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाऊन त्याचा सांगोपांग आढावा घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. ते कोणत्याही विशिष्ट राजकीय विचारसरणीचे नव्हते, मात्र राजकारणाचा अभ्यास दांडगा होता. त्याच वर्षी मुंबईत, एका काँग्रेस खासदाराच्या निधनामुळे लोकसभा पोटनिवडणूक घ्यावी लागली होती. त्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं बॅ. रामराव आदिक यांना उमेदवारी जाहीर केली, तर विरोधी पक्षांच्या वतीनं कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे यांना उमेदवारी मिळाली. त्या वेळी जोमात असलेल्या शिवसेनेनं आदिक यांना जाहीर पाठिंबा दिला होता, कारण रामराव आदिक हे बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले मित्र होते. त्यामुळे आदिक सहज विजयी होतील असं आम्हाला वाटत होतं. एकदा वर्गात आम्ही यावर जोरजोरात चर्चा करत होतो. ते ऐकून गर्गे सर तिथे आले आणि ‘‘तुमची मतं मला तरी वरवरची वाटतात,’’ असं सांगून पोटनिवडणुकीत रोझा देशपांडे कशा बाजी मारून जातील, हे त्यांनी पुढील पाच मिनिटांत विश्लेषणासह सांगितलं. आणि झालंही तसंच! गर्गे सरांचं विश्लेषण अचूक ठरलं होतं.   

हेही वाचा >>> ‘‘हो, स्त्रियाही शिकारी होत्या..’’

वृत्तपत्रविद्या विभागाच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून पुणे-मुंबईतल्या मोठय़ा वृत्तपत्रांची, तसंच इतर माध्यमांची ओळख व्हावी, म्हणून सरांनी आमची शैक्षणिक सहल पुण्या-मुंबईलाही काढली. वरळी भागातील टीव्ही. सेंटरलाही आम्ही भेट दिली. तिथे प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची मुलाखत सुरू असल्याचं मला अजूनही आठवतंय. सहलीदरम्यान गर्गे सरांचा दांडगा जनसंपर्क आम्हाला वेळोवेळी उपयोगाला आला. ठरल्याप्रमाणे विभागप्रमुख म्हणून एकच वर्ष काम केल्यानंतर गर्गे सर पुन्हा पुण्यास आले. तिथली सरांच्या मार्गदर्शनाखालील आमची पहिली बॅच म्हणून आम्हाला अजूनही त्याचा अभिमान आहे. आमच्या बॅचचे बहुतेक सर्व विद्यार्थी मोठय़ा वर्तमानपत्रांसह विविध क्षेत्रांत मोठय़ा पदांवर कार्यरत राहिले. कालांतरानं पत्रकारितेच्या निमित्तानं मीही पुण्यात आलो. ‘तरुण भारत’, ‘लोकसत्ता’, यांसारख्या मोठय़ा वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली. गर्गे सर पुण्यातच राहात असल्यामुळे अधूनमधून त्यांच्या शिवाजीनगरमधील ‘ज्ञानेश’ बंगल्यात जाऊन भेटत असे, गप्पांचा आनंद लुटत असे. सरांनी उतारवयातही ज्ञानदानाचं कार्य चालू ठेवलं होतं. ‘समाजविज्ञान कोशा’चं अवघड काम पूर्ण करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. सरांनी मराठवाडय़ाच्या विकासाच्या संदर्भात अनेक ग्रंथांचं संपादन केलं. एक कार्यवाह म्हणून पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ ही संस्था नावारूपास आणण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे.

हेही वाचा >>> निसर्गकन्यकांचा गणेश!

४ नोव्हेंबर २००५ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचं पुण्यात निधन झालं. मी नेमका नांदेडला होतो. त्यांचं अंत्यदर्शनही मला घेता येणार नाही म्हणून खूप वाईट वाटलं. मात्र मी लगेच त्यांच्यावर एक लेख लिहून नांदेडच्या ‘प्रजावाणी’ या स्थानिक दैनिकात नेऊन दिला होता. ‘प्रजावाणी’चे तत्कालीन संपादक सुधाकरराव डोईफोडे यांनी माझा तो लेख अग्रलेख म्हणूनच वापरला. पत्रकारितेतल्या माझ्या गुरूला मी अग्रलेखाद्वारे श्रद्धांजली अर्पण करावी हा कदाचित अनोखा योगायोगच असावा. पत्रकारिता करताना मलाही बरे-वाईट अनुभव आले. एक चांगलं चाललेलं वृत्तपत्र अचानक बंद पडलं आणि मी एका क्षणात बेकार झालो. तरीही मला पत्रकारिता सोडावी असं कधीच वाटलं नाही. याचं मुख्य कारण असावं गर्गे सरांची शिकवण आणि त्यांनी त्या काळी दिलेलं नेहमीसाठीचं पाठबळ!   

shreenakul@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srikanth kulkarni article on his teacher sadashiv martand garge zws
Show comments