आज हा स्तंभ संपत असला तरी त्याच्या संपण्यात कुठली सुरुवात दडली आहे हे मला शोधायचं आहे. जेणेकरून या स्तंभाची ‘सुरुवात’ जरी माझ्या सजग, सलग लिखाणाची सुरुवात असली, तरी त्याचा ‘शेवट’ हा माझ्या लिखाणाचा ‘अंत न ठरता’ मध्य ठरेल आणि मला माझ्या लिखाणसाखळीची सुरुवात, मध्य आणि परत सुरुवात अनुभवता येईल.   
राजीव नाईक लिखित ‘साठेचं काय करायचं?’ या माझ्या नाटकात एक वाक्य आहे. ‘‘आपल्या गप्पांना अंत असा नसतोच. सुरुवात, मध्य की परत सुरुवात!’’ प्रत्येक ‘शेवटात’ कुठलीही ‘सुरुवात’ दडलेली असते म्हणतात. जर शोधायचं ठरवलं तर ती दिसते. त्या अर्थानं कुठलीच गोष्ट संपत नाही. ‘शेवट’ हा ‘मध्य’ असतो, त्यानंतर परत ‘सुरुवात’.. पूर्णविरामापुढे खूप काही असतं, जर बघायचं ठरवलं तर!
त्या अर्थानं मी वरवर ‘पूर्णविराम’ दिसणाऱ्या आयुष्यातल्या ठिकाणांपाशी थांबून त्यांचे ‘स्वल्पविराम’ करण्याची स्वत:ला सवय लावते आहे. त्यानं कुठल्याही ‘शेवटापाशी’ विफल झालेल्या मनाची थोडी तरी समजूत घालता येते, असा माझा अनुभव आहे. शेवटापाशीचा ‘शोक’ साहजिकच, पण त्यापलीकडे जाऊन त्या ‘शेवटात’ ‘सुरुवात’ शोधणं हे मला स्वत:ला नेहमीच मोठं करत आलेलं आहे. त्या अर्थानं आज हा स्तंभ संपत असला तरी त्याच्या संपण्यात कुठली सुरुवात दडली आहे हे मला शोधायचं आहे. जेणेकरून या स्तंभाची ‘सुरुवात’ जरी माझ्या सजग, सलग लिखाणाची सुरुवात असली, तरी त्याचा ‘शेवट’ हा माझ्या लिखाणाचा ‘अंत न ठरता’ मध्य ठरेल आणि मला माझ्या लिखाणसाखळीची सुरुवात, मध्य आणि परत सुरुवात अनुभवता येईल.
पण गंमत अशी आहे, शेवटापाशी उभं असताना आपण नेमक्या कुठकुठल्या सुरुवातींपाशी थांबलो आहोत हे आधी समजत नाही. पण मी शेवटापाशी थांबली नसून सुरुवातीपाशी थांबली आहे, असा विश्वास मनात धरून थांबावं लागतं. ‘सुरुवातीच्या’ कोंबांची वाट पाहत.. ते थांबताना थोडं मागे वळून बघावंसं वाटतं. स्वाभाविकपणे. त्या ‘मागच्यात’ गुंतण्यासाठी नव्हे, तर त्यातलं संचित पुन्हा एकदा गोळा करण्यासाठी. या ‘संचिताच्या’ पाण्यावरच पुढच्या सुरुवातींचे कोंब फुटतील. म्हणूनच या शेवटापाशी ते सगळं संचित काही न सांडता, निगुतीनं, व्यवस्थित गोळा करून मगच पुढे निघावं लागेल. त्या संचिताचे ऋण मानून. हे ‘संचित’ गोळा करण्याची सुरुवात नेमकी कुठून करावी लागेल? मला वाटतं, त्यापाठी या स्तंभाच्या ‘सुरुवातीच्या’ही मागं जावं लागेल. म्हणजे, स्तंभाचा शेवट जसा नाही, तशीच त्याची सुरुवात हीसुद्धा त्याची सुरुवात नव्हतीच, असं दिसतं आहे. तो ही मध्यच! मी लिहिलं ते वर्तमानाबरोबर खूपसं बालपणातलंसुद्धा. ते माझं आयुष्य, भूत, वर्तमानातलं आणि त्याकडे बघण्याची माझी दृष्टी याच्या संयोगानं कागदावर काय काय उतरत गेलं. पण ते आयुष्य किंवा ती दृष्टी फक्त माझी कशी म्हणू.. ही सगळी मालमत्ता मी खर्च करत असले तरी ती माझ्या एकटीची नाही. खचितच.
परवा एक फार गमतीशीर गोष्ट घडली. कुठल्याशा अगदी लहानशा गावात चित्रीकरण करत होते. रात्रभर चित्रीकरण करून दुसऱ्याच दिवशी माझ्या या स्तंभावर आधारित ‘एक उलट.. एक सुलट’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होता. थोडा वेळ हाताशी होता, ठरवलं, प्रकाशन समारंभाचं भाषण लिहून काढावं.. नेमकी लिखाणाची वही जवळ नव्हती. जिथे राहत होते तिथल्या छोटय़ाशा हॉटेलच्या रिसेप्शनचा वेटर म्हणाला, ‘‘क्यूं चाहिए कागद?’’ मला कागद का हवेत हे माहीतच असणार सर्वाना, असं का कुणास ठाऊक मनोमन वाटत असताना त्या वेटरनं मला पुन्हा त्याच प्रश्नापाशी आणून सोडलं. ‘‘मला कागद का हवेत?’’ मला त्याला सांगावंसं वाटलं, ‘‘तेच शोधायचं आहे, कागद का हवेत तेच, म्हणूनच दे कागद!’’ पण तो दिङ्मूढ झाला असता म्हणून म्हटलं, ‘‘कुछ लिखना है इसलिए चाहिये कागज!’’ तो बिचारा थोडय़ा वेळाने काही पावत्या घेऊन आला. म्हणाला, ‘‘इसके पीछेही लिखो, और कागद नहीं है!’’ पावत्यांचं ते बंडल पुढय़ात घेऊन बसले. मला कागद वाचवायला फार आवडतं. माझ्या सगळय़ा लेखांचे पहिले खर्डे मी माझ्या चित्रपटसंहितांच्या पाठकोऱ्या कागदांवर करते. पण पावतीमागे लिहिण्याइतका काटेकोरपणा कधी केला नव्हता. पावती उलटून पाहिली, त्यावर कसलासा हिशेब लिहिला होता. मला माहीत नसलेल्या नावांनी मला माहीत नसलेल्या कशासाठी तरी पैसे मोजले होते, त्याचा तो हिशेब.. तीच पावती उलटी केली, त्यामागच्या कोऱ्या जागेत लिहावं म्हणून, एकदम मनात आलं, एक उलट, एक सुलट. पावतीवर जर हिशेब लिहिला असेल तर पावतीमागं काय लिहावं लागेल? बेहिशेब! पण हिशेब ही लिहायची गोष्ट आहे आणि बेहिशेबीपणा ही करायची गोष्ट आहे. बेहिशेब लिहायचा कसा? मला या स्तंभानं, माझ्या लिखाणानं इतकं भरभरून दिलं की माझ्या पावतीवर जमेचा रकाना ओसंडून वाहतो आहे. जे काही खर्च झालं ते या स्तंभातनं मांडण्याचा प्रयत्न केला, पण ती मिळकतसुद्धा अनेक हातांनी अशीच बेहिशेबीपणे माझ्यापर्यंत पोचवलेली. माझ्या अनुभवसमृद्धीची जी बेहिशेबी मालमत्ता इतके वर्षे माझ्याकडे साचत चाललेली आहे त्याबद्दल कुणी मला विचारत नसलं तरी त्याचा हिशेब आजच्या दिवशी सादर करावा लागेल मला! हा प्रयत्न कितीही तोकडा वाटला तरी करावा लागेल. बेहिशेबी मालमत्तेची सुरुवात जन्मापासून. आई-बाबांचं चांगलं-वाईट घेऊन या जगात आले, पहिलं ऋण त्यांचं. या स्तंभावरचं पुस्तक माझ्या आईच्या आईला, रहिमतपूरच्या आजीला अर्पण केलं आहे. दुसरं ऋण तिचंच. तिनं एक श्लोक शिकवला होता. लहानपणी.
‘‘शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे
साधवो न ही सर्वत्रम् चंदनं न वने वने॥’’
प्रत्येक शिंपल्यात माणिक असेल असं नाही. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मोती असेलच असं नाही. साधू, चांगली माणसं सगळीकडे सापडतील असं नाही. चंदनाचं झाड प्रत्येक वनात सापडेलच असं नाही. तिनं या श्लोकातनं ‘डोळे’ दिले. जणू सांगितलं, ‘गफलत करू नको. जे आहे ते डोळे उघडे ठेवून, सच्चेपणानं नीट बघ.’ मोठं होता होता थोडी गडबड झाली. सगळय़ांत येतो तसा माझ्यातही धूर्तपणा आला. शिंपल्यात माणिक दिसलं नाही तरी ज्याचा शिंपला त्याला बरं वाटावं म्हणून ‘आहे माणिक’ असं म्हणून टाकलं. कुठल्याशा हत्तीच्या गंडस्थळात मोती नसला तरी सोयीसाठी दडपून ‘आहे मोती’ म्हणून टाकलं. बाभळीला चंदन म्हटलं, सगळय़ांनाच साधू म्हटलं. पण तसं वरवर म्हणताना आत एक हट्टी मुलगी तिचे तिचे हिशेब मला ऐकवत राहिली. ‘‘त्या शिंपल्यात माणिक मोती नव्हता तरी आहे का म्हणालीस?’’ असं विचारत राहिली. ‘‘मला तुझा राग येतो’’ म्हणत राहिली. तिला मी म्हटलं, ‘‘सगळीकडेच ‘खरं’ पचतं असं नाही.’’ ती म्हणाली, ‘‘तरीही बोलायचंय मला खरं, माझ्यापुरतं, माझ्या डोळय़ांना दिसलेलं, पण खरं.’’ आई-बाबा, आजीनं मिळून या ‘खऱ्या’ मुलीला जन्म दिलाय. या स्तंभामुळे तिला बोलता आलं आहे. ती वाढते आहे. आता मला तिला मोठं करत न्यायचं आहे. ती, तिचा खरेपणा माझ्या बेहिशेबी संचिताचं मला जाणवणारं दृश्य रूप आहे. या स्तंभामुळे हे रूप मला सापडलं. ते आता जपायचं आहे. या सच्च्या मुलीला वाढवणारे अनेकजण आहेत. त्या सगळय़ा सच्च्या साधूंशी तिला जुडलेलं ठेवायचं आहे. असं जुडलेलं ठेवण्याची एक अमूल्य जागा नुकतीच मला गवसली आहे. तिथे मला माझ्या शेवटातल्या अनेक सुरुवातींची सुप्त बीजं धुगधुगताना जाणवली. ही जागा आहे एक सुंदर बुक गॅलरी. तिचं नाव ‘अक्षरधारा’. रमेश राठीवडेकर नावाच्या एका पुस्तकवेडय़ा माणसानं ही गॅलरी पुण्यात सुरू केली. पुस्तक, शब्द, सच्चे शब्द जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. या एका सच्च्या ध्यासानं. तिथे पाऊल ठेवलं आणि मला सच्चेपणाचा, खऱ्या स्वप्नांचा वास आला. तिथे निगुतीनं मांडलेली सुंदर पुस्तकं पाहिली आणि आजीचा श्लोक आठवला. वाटला, इथल्या शिंपल्यात खरोखर माणकं असतील. गंडस्थळात मोती असलेलेच हत्ती इथं विराजमान असतील. ती पुस्तकं म्हणजे अनेक शंख-शिंपलेच वाटले. शंख कानाला लावला की एक अनोखा आवाज येतो. किती दिवसांत तो ऐकलाच नाहीये. किती दिवसांत शांतपणे दुर्गा भागवत वाचल्याच नाहीयेत. किती दिवसांत ‘शेवगा’ कविता मनातल्या मनातसुद्धा म्हणलीच नाही. किती दिवसांत अरुणाताईंचं ‘कृष्णकिनारा’ उघडलंच नाही. ‘अक्षरधारे’च्या शंख-शिंपल्यांमध्ये अशा अनेक ‘किती दिवसांत न केलेल्या’ गोष्टींची गाज ऐकू आली. दुर्गाताई, शेवगा, सावित्री, कृष्णकिनारा, या सगळय़ांचे ऋण ते नुसते शब्द नाहीत. त्या आहेत पाठशाळा. माझ्यासारख्या नुसत्या लिहू लागलेल्यांच्या पाठशाळा. आता पुन्हा पाठशाळेत जायचं. तिथे पुढचा रस्ता दिसेल. नवी सुरुवात. आता पहिलं पुस्तक आलं आहे. पुढे काय करायचं आहे? कुंभारासमोर माती येते तेव्हा नवशिका कुंभार लोक सांगेल ते बनवून देतो. पण थोडं पुढे गेल्यावर त्याचं त्याला कळत जाईल, आतल्या या मातीचं नक्की काय करायचं ते. ललित लिहून सुरुवात झाली आहे, या स्तंभामुळे. आता आतली माती अजून कोणकोणते आकार मागते ते शोधायचं आहे. स्तंभ संपता संपता त्यानं या शोधाची सुरुवात करून दिली आहे. या शोधापाशीच, शोधाच्या गाण्यानं थांबते. सुनील सुकथनकरांच्या शब्दांतलं हे गाणं,
नितळ नितळ आरस्पानी
ऊन-सावल्यातून मी
अनोळखी या सकाळी काहीतरी शोधत मी
नितळ नितळ आरस्पानी.
स्वच्छ निखळ आकाशाच्या अंतहीन  घुमटाखाली
वाट चालता चालता दिसलेले काहीतरी
हूल चाहूल माहीत नाही, सूर कणसूर ठाऊक नाही
निसटत्या गवसत्या क्षणी हुरहुर.. धूसर..
काहीतरी शोधत मी.. नितळ नितळ आरस्पानी।
उभी मजसमोर मी.. अनोळखी या सकाळी
काहीतरी शोधत मी.. नितळ नितळ आरस्पानी!
नितळ नितळ आरस्पानी!
नितळ नितळ आरस्पानी! (सदर समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा