महाभारतात युधिष्ठिराला यक्षाने विचारलेल्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न होता : ‘देवाने पुरुषासाठी निर्माण केलेला उत्तम मित्र कोण?’ युधिष्ठिराने त्याचे उत्तर दिले होते : ‘त्याची बायको’. हजारो वर्षांपूर्वीच युधिष्ठिराने दिलेले हे उत्तर सध्याच्या काळातही मान्य करून जगल्यास पती-पत्नी नातेसंबंधांना मित्रत्वाचे परिमाण लाभेल, घटस्फोट घटून समाजस्वास्थ्य सुधारायलाही मदत होईल.
प्रेम आणि प्रेमभंग यांचे नाते नाण्याच्या दोन बाजूंसारखे असते. प्रेम आणि विवाह हे जणू विरुद्धअर्थीच शब्द असल्यासारखा अनुभव बऱ्याच जणांना येत असतो. संपूर्ण आयुष्य ढवळून टाकणारा हा अनुभव असतो. परंतु प्रेम, प्रेमभंग आणि लग्न यांची समीकरणे जर नीट जाणून घ्यायची असतील तर या संज्ञांचे अर्थ व त्यांना खोली देणाऱ्या भावना नीट अभ्यासल्या पाहिजेत.
प्रेम म्हणजे प्रेम असले तरी प्रत्येकाचे ते सेम नसते. वैद्यकीय दृष्टीने कुठलेही विरुद्धिलगी आकर्षण हे शृंगारिक प्रेमच असते. कारण मेंदूमध्ये त्याची प्रक्रिया ही हायपोथॅलॅमस भागाशीच निगडित असते. इथेच सेक्सच्या आकर्षणाचे केंद्र असते आणि त्याचा संबंध ‘टेस्टोस्टेरॉन’ व ‘ऑक्सिटोसीन’ या हॉर्मोनशी असतो.
अपेक्षापूर्ती ही तर गृहीत गोष्ट मानली जाऊन प्रेमपूर्तीचे साध्य प्रेमविवाह मानले जाते. पण बहुतेक जण जरी प्रेम करीत असले तरी त्यातील फारच कमी जणांच्या नशिबी अशी इच्छापूर्ती होत असते. म्हणजेच प्रेम करणे सोपे, पण प्रेमविवाह करणे कठीण आणि तो टिकवणे तर महाकठीण. प्रेमाला वास्तववादाची जोड न दिल्याने आणि प्रेमविवाहाला आदर्शवादाची जोड दिल्यानेच अपेक्षा पूर्ण न होऊन प्रेमभंग व प्रेमविवाहभंग घडत असतो.
वास्तवाचा चष्मा नसल्यानेच प्रेमाला आंधळे म्हटले गेले आहे. आणि रोमँटिकपणाचा गुलाबी चष्मा सतत न वापरल्यानेच प्रेमविवाह निभावणे कठीण वाटत असते. एखाद्या करण्याच्या क्रियेला कृती म्हटले जाते, आणि कुठलीही कृती समाधानकारक करण्यासाठी जी तत्त्वप्रणाली वापरली जाते त्याला कला म्हणतात. आणि कुठलीही कला शिकण्यासाठी जी नियमबद्ध पद्धत वापरतात तिला त्या कलेचे शास्त्र म्हणतात. प्रेम जर करण्याची गोष्ट असेल तर प्रेमाचीही कला व शास्त्र हे असू शकते. आणि शास्त्र हे तर विचार व अनुभव यांचे अपत्य असते.
सेक्स आणि रिलेशनशिप समस्यांना व्यवसाय रूपात अभ्यासून गेली तीस वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रातील मिळालेला अनुभव व ज्ञान सूत्रबद्ध करून कित्येक दाम्पत्यांना त्यांचा वास्तविक जीवनातील वेगवेगळय़ा परिस्थितींमध्ये सहजपणे वापर करता येईल असे माझ्या लक्षात आले.
ही प्रेमसूत्रे जाणून घेतली तर तणावाच्या परिस्थितींवरही पती-पत्नींना मात करता येईल. त्यामुळे त्यांचे नाते दृढ होऊन समाज सुदृढ होण्यास मदतच होईल. अ‍ॅरेंज्ड मॅरेजला लवमॅरेज करण्यासाठी व लवमॅरेजला समृद्ध करण्यासाठी पती-पत्नी दाम्पत्यांनी प्रेमशास्त्राच्या पूर्वतयारीची तीन सूत्रे ध्यानात ठेवली पाहिजेत.
अ. उत्तिष्ठत जाग्रत : उठा, जागे व्हा. तुमच्यात पती-पत्नी नाते आहे याबद्दल जागरूक व्हा. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, नात्यातील तणावामुळे याकडे अजाणतेपणाने किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले असेल तर ‘पुनश्च हरिओम’साठी तयारी करा.
ब. ड्रॉप कर्टन मेथड : आजवरच्या दाम्पत्य जीवनातील त्रासदायक व निगेटिव्ह भूतकाळावर पडदा टाका. अगदी ‘लोखंडी’ पडदा. भूतकाळ बदलता येणार नाही. भूतकाळातील नुकसानकारक, दु:खदायक घटनांतून बोध घेऊन वर्तमानकाळ जगा नाहीतर भविष्यकाळ तुम्हाला माफ करणार नाही.
क. पॉझिटिव्ह नेक्स्ट स्टेप : यापुढील काळापासून दाम्पत्य जीवनात सकारात्मक, पॉझिटिव्ह राहा. वारंवार निगेटिव्ह भूतकाळात शिरून त्याचा उल्लेख करायचे टाळा.
पती-पत्नी नात्यामधील माधुर्य हे त्यांच्यातील मित्रत्वाच्या नात्यानेच फुलत असते. म्हणूनच पती-पत्नी नात्यातील मत्रीची चार प्रेमसूत्रे आत्मसात करणे आवश्यक आहे.
१. जोडीदाराकडे लक्ष द्या :
तसे बऱ्याचदा तुम्ही जोडीदाराकडे बारकाईने लक्ष ठेवून असताच, पण काळजीपूर्वक लक्ष द्यायला शिका. कारण तुम्ही जर तसे केले नाही तर दुसरा कोणीतरी टपलेलाच असतो हे जाणून घ्या. यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. तुमची जीवनाविषयीची मानसिकता बदलणे आणि तुमची वैवाहिक जीवनाविषयीची मानसिकता बदलणे. आयुष्यात आपण कष्ट घेत असतो ते उद्याचा दिवस आनंदात जावा म्हणून. पण जेव्हा तो उद्याचा दिवस उगवतो तेव्हा तो आनंदात न घालवता आपण पुन्हा एकदा कष्ट घ्यायला लागतो तो पुढचा ‘उद्या’ आनंदात जावा म्हणून! अशा व्यक्तींना आपण ‘वर्कोहोलिक’ म्हणतो. हेही एक दाम्पत्य जीवनावर दुष्परिणाम करणारे व्यसनच असते. अशा व्यक्ती आपल्या जोडीदारापेक्षा आपल्या बॉसचाच चेहरा जास्त काळ बघण्यात वेळ घालवतात किंवा जोडीदाराबरोबर असतानाही त्यांचे ‘मोबाइल ऑफिस’ चालूच असते. जर हे वारंवार घडत असेल तर ते पती-पत्नी नातेसंबंधाला घातकच ठरते.
‘टाग्रेट ओरिएंटेड’ आयुष्य जगणाऱ्यांनी लक्षात ठेवावे तुमची कंपनी तुमच्याशिवायही चालू राहत असते, पण तुमचे वैवाहिक जीवन नाही! माझ्या माहितीतील एक पस्तिशीतील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अशा ‘टाग्रेट’ पूर्ण करण्याच्या धकाधकीच्या प्रयत्नांमध्ये हार्ट अ‍ॅटॅक येऊन वारला तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच्या कंपनीने त्याला दोन मिनिटांची श्रद्धांजली वाहून कामकाज पुढे सुरू केले, पण त्याची गरोदर पत्नी मात्र उद्ध्वस्त झाली होती.
म्हणून दिवसाचे चार कप्पे करा. एक कप्पा स्वत:साठीचा, जो तुम्ही व्यायाम, छंद यासाठी वापरा. दुसरा कप्पा करिअरचा. तिसरा फॅमिलीसाठी आणि चौथा जोडीदारासाठीचा. यामध्ये कामजीवन, सहजीवन यासाठीचा वेळ तुम्ही काढू शकता. प्रत्येक कप्प्यासाठीचा वेळ हा कितीही कमी-जास्त ठरवू शकता. पण रोज हे चार कप्पे जगायचेच असे ठरवा. यामुळे तुम्ही धर्म, अर्थ व काम या तीनही जबाबदाऱ्या पार पाडू शकाल.
आपल्याला हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी नेहमीच एकतर महाग असतात, बेकायदेशीर असतात, आरोग्याला हानिकारक असतात नाहीतर दुसऱ्याशी लग्न झालेल्या असतात. वैवाहिक जीवनात मात्र ही हव्यास-मानसिकता, ग्रीड सायकॉलॉजी बदलणे समाधानी दाम्पत्य जीवनासाठी आवश्यक असते. कित्येकांना आपल्या जोडीदारापेक्षा इतरत्रच आकर्षण वाटत असल्याने वैवाहिक जीवनातील बंध कमजोर होत राहतात.
छोटय़ा छोटय़ा रोमँटिक भेटवस्तूंनी वैवाहिक जीवनाचे आयुष्य वाढत असते. प्रत्येक रोमँटिक भेटवस्तूच्या भेट-गुणाची नोंद बायकोच्या मेंदूत होत असते हे नवऱ्याने लक्षात ठेवावे आणि आश्चर्य म्हणजे ती भेटवस्तू किती मोठी, किती महाग याचा संबंध न ठेवता तिच्याकडून प्रत्येकी एक भेट-गुण दिला जात असतो. म्हणजे एक गुलाब दिला तरी एक भेट-गुण व गुलाबांचा गुच्छ दिला तरी एकच गुण! दागदागिने, गाडी यांसारख्या भेटवस्तूंनीही प्रत्येकी एकाच भेट-गुणाची नोंद तिच्या मेंदूत होत असते. फक्त छोटय़ा भेटवस्तूपेक्षा अशा गोष्टीचा ‘परिणाम काळ’ हा जरा जास्त असतो इतकेच. नोंद केल्या गेलेल्या भेट-गुणांचा संबंध नंतरच्या कामजीवनाशी जोडला जातो हेही पुरुषाने लक्षात ठेवले पाहिजे.
२. तडजोड : वास्तवाशी व स्वभावाशी
तडजोडीने जोडीदार जोडला जात असतो, न केल्यास तो तोडला जात असतो. आदर्शवाद हा कधीही वास्तववादी नसतो, पण आयुष्य मात्र वास्तववादीच असते. ‘आदर्श जोडपे’ कुठलेही नसते. अनुरूपता  दिसण्यात असेल, पण वागण्यात, स्वभावात ती कधीच आढळत नसते. म्हणून आदर्श जोडीदाराच्या अपेक्षेने आपल्या जोडीदाराकडे बघणे हे निराशा निर्माण करणारेच असते.
अपेक्षाभंग हेच कित्येक उद्वेगलेल्या जोडप्यांचे मूळ कारण असते. वैवाहिक जीवनात अपेक्षा या असतातच, किंबहुना त्या असाव्यातही; परंतु आपल्या जोडीदाराच्या मर्यादा व परिस्थितीचे वास्तव ओळखूनच त्या ठेवल्या तर अपेक्षा व्यवहार्य ठरतील. इतरत्र बघून तुलनात्मक अपेक्षा ठेवणे म्हणजे दाम्पत्य जीवनाच्या स्थिरतेला सुरुंग लावण्यासारखेच असते. जोडीदाराच्या कमजोरी स्वीकारूनच वैवाहिक आयुष्य काढणे आवश्यक असते.
लग्न करणाऱ्या दोन्ही व्यक्ती मुळात वेगवेगळय़ा वातावरणात वाढलेल्या असतात, त्यांचे विचार, कल्पना हे पूर्णपणे भिन्नच असतात. पण लग्नसंस्थेमुळे ते एकत्र आयुष्य काढत असतात. लग्न म्हणून केवळ दोन व्यक्तींचे नसून दोन व्यक्तिमत्त्वांचे असते. एकत्रपणामुळे जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाची नकारात्मक बाजूही प्रकर्षांने लक्षात येत असते. हे घडणारच असते. त्यामुळे निराशा, उद्विग्नता, राग, चीड यांना थारा न देता आपण एकमेकांना कसे अ‍ॅडजस्ट होऊ हे दोघांनीही पाहिले पाहिजे. एकमेकांशी चर्चा, गप्पा, संवाद हे त्यासाठी महत्त्वाचे साधन असते. गरज लागल्यास काउन्सेिलगचा आधार घ्यावा.
३. सुसंवाद कला विकसित करा :
बहुतेक दाम्पत्यांना लग्न म्हणजे इतरांशी भांडण्यापासून दूर ठेवण्यासाठी समाजाने केलेली एक महत्त्वाची उपाय-योजनाच वाटते. सु-संवादापेक्षा वि-संवादात पती-पत्नींचा वेळ जात असतो. सुसंवाद ही एक कला असून ती विकसित करण्यासाठी विशेष कष्ट दोघांनीही घेणे गरजेचे असते. सततची भुणभुण (नॅिगग), उगीचच चिडवणे (टीिझग), टोमणे मारणे (टाँटिंग) आणि वाद (आग्र्यूमेंट) हे विसंवादाचे प्रकार आहेत.
बहुतेक वाद अत्यंत क्षुल्लक कारणांनी होतात हे ओळखून ते ताणले जाणार नाहीत हे बघा. वाद करताना आपण आपल्या जिवलग व्यक्तीशी तो करतोय हे नेहमी ध्यानात ठेवा. कारण वादामुळे तुम्ही मुद्दा जिंकालही, पण त्यातील जहालपणामुळे तुम्ही त्या व्यक्तीच्या आपुलकीला गमवाल. एका बायकोने नवऱ्याच्या अशा नेहमीच्या हमरीतुमरीच्या सवयीला कंटाळून शेवटी त्याला एकदा विचारले, ‘तुला आत्ता वादात खूश व्हायचंय का रात्री?’
सुसंवादासाठी जसं आपलं म्हणणं नीट मांडण्याची गरज असते, तशीच आवश्यकता आपल्या जोडीदाराचे म्हणणे ऐकण्याची. म्हणून सुसंवाद एक कला आहे. जोडीदाराचा विचार तुमच्या विचारापेक्षा वेगळा विचार असला तरी तो योग्य असू शकतो. कोणाचेही म्हणणे बरोबर की चूक यापेक्षा त्या वेळी काय योग्य किंवा काय अयोग्य हे लक्षात घेणे आवश्यक असते. बहुतांशी गोष्टी किरकोळ महत्त्वाच्या असतात. महत्त्वाच्या मुद्दय़ावर योग्य व्यक्तीचे मत घेणे वा समुपदेशन करणे जरुरीचे असते.
४. रोमँटिक बना :
मुळात कामजीवन हाच वैवाहिक जीवनाचा पाया असल्याने त्याला दुर्लक्षून वैवाहिक जीवन हे विफल ठरण्याची शक्यता असते. मग इतरही गुंतागुंत होऊन निराशा व उदासीनता येण्याची शक्यता असते. कामजीवनाचे शास्त्र जाणून घेऊन आपल्यामध्ये योग्य तो बदल करणे महत्त्वाचे असते, कारण जोडीदाराला एकटेपणा वाटू न देणे ही तुमची जबाबदारी असते. उदासलेल्या कामजीवनाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मधूनमधून आउटिंग किंवा मत्री-सहल करणे पती-पत्नींच्या दृष्टीने आवश्यक असते. जवळपासच्या ठिकाणी केवळ रात्रीपुरते वा दिवसभरासाठी दोघांनी जाण्याने कित्येकदा त्यांच्या कामजीवनात शृंगारिकतेचा ‘स्पार्क’ यायला मदत होत असते.
सेक्स हे निसर्गाचे वरदान असून वैवाहिक जीवनात हे वरदान उपभोगण्याचा हक्क आपल्या जोडीदाराला निश्चितच आहे हे जाणून घ्या. ‘काम’चुकारपणा करून तुम्ही तो त्याच्याकडून हिरावून घेणे म्हणजे वैवाहिक अशांततेला आमंत्रित करणेच. कित्येकदा पुरुष ‘काम, काम आणि काम, कामजीवनात नाही राम’ अशी वृत्ती बाळगतो. तर स्त्रीनेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की, ‘बायको कमी, आई जास्त, तर काहींना देवधर्मच वाटतो रास्त’ अशा विचारांमुळे नाते दुरावले जाते.
आपण एकाच वेळी व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यही जगत असतो हे कित्येकांना लक्षात येत नाही. ऑफिसमध्ये बॉस किंवा नोकरदार जरी असाल तरी त्याच वेळी तुम्ही कुणाचा तरी नवरा/बायको हेही असता. अर्थात ही ओळख अध्याहृत असते, पण पडछायेसारखी सतत आपल्याबरोबर असते. या वैयक्तिक पडछायेत वैवाहिक ओळख ही जास्त महत्त्वाची असते. ती जिवंत ठेवण्याची कला जाणीवपूर्वक आत्मसात करा. म्हणूनच रोमँटिक राहा. वेळ काढून ‘दूरस्पर्शी संवाद’ कला वापरा. मोबाइलचा हा पॉझिटिव्ह उपयोग वैवाहिक जीवनाचा तारणहार ठरू शकतो. ‘तुझी आठवण आली म्हणून.’ ते ‘लाल ड्रेसमध्ये तू यम्मी दिसत होतीस.’ असे डायलॉग शोधा आणि करा. मग बघा ती लाल ड्रेसवाली रात्री खुशीत कुशीत शिरेल की नाही (त्या वेळी तो ड्रेस नसला तरी!).
पती-पत्नी नाते हेच प्राथमिक नाते असून समाजस्वास्थ्यासाठी ते सुदृढ असणे आवश्यक असते. हे प्रायमरी किंवा प्राथमिक नाते या वैवाहिक प्रेमसूत्रांनी मजबूत झाले तर वैवाहिक जीवनातील वादळे निश्चितच शमवता येतील. आणि ही प्रेमसूत्रे दोघांनीही, सतत व वारंवार वापरायची असतात हेही लक्षात ठेवले पाहिजे.
कामजीवन हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे, तर सहजीवन हा सुखी कामजीवनाचा पाया आहे. आता प्रेम करायलाच आयुष्यात वेळ कमी उरलाय, कमी पडणार आहे, हे लक्षात ठेवून भांडणामध्ये वेळ का दवडायचा?

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य
mla satyajeet tambe writes letter to maharashtra cm devendra fadnavis for bangladesh hindu protection
बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षण करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…
Story img Loader