नाताळ जवळ आला की ब्रेड, केकचे वेध लागायला लागतात. नाना आकारांचे, चवींचे ब्रेड, केक बाजारात दिसायला लागतात. लो कॅलरीचा असाच एक ब्रेड स्टोलन. त्याविषयी..
मुंबईत कधीच म्हणण्यासारखी थंडी पडत नाही. डिसेंबर अर्धा उलटला की आम्ही मुंबईकर स्वत:लाच सांगतो- जरा गार झाले आहे, नाही? वर्षांतले २ दिवस मिळतात, त्यात शाल-स्वेटर काढायला हरकत नाही. थंडीतले पदार्थ- उन्धीयू, हुरडा, उत्तरेतून आलेले  तिळाचे गजक कधी एकदा मिळू लागतील याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. या दिवसांतच सकाळी पांघरुणात आणखीन पंधरा मिनिटे झोपायला अधिकृत कारण सापडते. माझ्या मनात डिसेंबर महिन्याच्या आणखीन वेगळ्या आठवणी आहेत. मुंबईच्या प्रदूषणाचं धुकं खाली उतरलं आणि सकाळी खिडकी उघडल्यावर थंडगार वारा चेहऱ्याला जाणवला की मला नाताळचे वेध लागतात..
लहानपणी तुम्ही इनीड ब्लायटनची पुस्तके वाचली असतील, किंवा मिशन आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकला असाल तर डिसेंबर म्हणजे फन-फेर, रंगीबेरंगी सजावट केलेली ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजची लाल, कापसासारखी पांढरी झालर असलेली टोपी आणि बेकरीबाहेर मांडलेले सुगंधित प्लम केक. मी शाळेतल्या गायकवृंदामध्ये गात असे. नाताळाच्या काही दिवस आधीपासून आम्ही शाळेत तालमीसाठी तासभर आधीच जात असू. सकाळी ६ वाजता हवा अगदी थंडगार असे. आजीने विणलेला एकुलता एक स्वेटर घालून, नाक बर्फासारखे गार करत मी शाळेत पोहोचले की असेम्ब्ली हॉलची ऊब मनात शिरे आणि “Silent Night” किंवा “O Come All Ye Faithful”  गात, आयुष्य एखाद्या ख्रिसमस ग्रीटिंग कार्डसारखे वाटू लागायचे-उबदार!
माझी एक पणजी (आजीची काकू) ख्रिश्चन होती. नाताळात भरपूर मोठय़ा प्रमाणावर ती केक आणि इतर कितीतरी प्रकारचे गोड पदार्थ करत असे आणि लोकांना भेट देत असे. परदेशी राहून आल्यामुळे तेथील ख्रिसमस केक करायची पद्धत ती शिकून आली होती. त्यात आपल्याकडे उपलब्ध असलेली सामग्री घालून त्यातला त्यात बदल करून दरवर्षी आम्हाला खाऊ पाठवत असे. ती जाऊन आता बरीच वर्षे झाली. आजही तिच्या आठवणीत आम्ही ख्रिसमस ट्री उभारतो आणि दिवाळीत जितके फराळाचे पदार्थ करतो तितकेच बनवायचा प्रयत्न करतो. मुंबईत जिथे मिळतील तिथून मी maarzipan sweets, ग्वावा जेली, फिग रोल इत्यादी वस्तू आणते आणि भरपूर केक बनवते. त्यात आणखीन या एका पदार्थाची हल्लीच भर पडली आहे- स्टोलन. हा एका प्रकारचा जर्मन ब्रेड आहे- नाताळात केला जातो. भरपूर सुका मेवा आणि गोड मसाले घालून हा केला जातो. त्यात maarzipan (बदामाची कतली) चे सारण भरले जाते. या सगळ्या सामग्रीमुळे या ब्रेडला सुंदर, केकसारखीच चव येते. लो कॅलरीज गोड पदार्थ हवा असलेल्या लोकांना खरंच आवडेल असा हा खाद्यपदार्थ आहे. मूळ रेसिपीत जरासे बदल करून आणखीन सोपी केली आहे- यंदा करून पाहा! मुलांच्या डब्यात किंवा सकाळच्या नाश्त्याला खायला योग्य पदार्थ आहे!
स्टोलन
साहित्य : ३ कप मदा, १ मोठा चमचा किंवा फ्रेश यीस्ट, ३ मोठे चमचे साखर, १/२ कप दूध, १/२ कप १/४ कप रम, ब्रँडी किंवा संत्र्याच्या रसात रात्रभर भिजवलेला सुका मेवा (बेदाणे, ग्लेझ चेरी, टुटी फ्रुटी, कापलेले बदाम, काजू इत्यादी), ११/२ मोठा चमचा लोणी, एक चिमूट दालचिनीची पूड, एक चिमूट जायफळाची पूड, एक चिमूट वेलदोडय़ाची पूड, एक चिमूट लवंग पूड, एक चिमूट मीठ, २ मोठे चमचे मार्मलेड किंवा चुरलेली काजू कतली, २ मोठे चमचे आयसिंग शुगर (भुरभुरायला)
कृती :
१. प्रथम परातीत मदा आणि मसाल्यांच्या सगळ्या पूड घालून एकत्र करावे. लहान भांडय़ात यीस्ट आणि साखर एकत्र करून त्यावर अगदी कोमट दूध ओतावे. फसफसेपर्यंत ५ मिनिटे थांबावे.
२. मग यीस्टचे मिश्रण मद्यात घालून मऊ पीठ भिजवावे. त्यात लोणी फेसून घालावे व पुन्हा एकजीव होईपर्यंत मळावे. गोळा करून, किलग फिल्म लावून उबदार ठिकाणी २०-२५ मिनिटे ठेवावे. या काळात पीठ दुप्पट आकाराचे होते.
३. पुन्हा पीठ क्षणभर मळावे म्हणजे त्यातली हवा निघून जाते. मग पीठ जरा चपटे करून, मध्ये मार्मलेड किंवा काजू कतली भरावी आणि दुमडून गोल आकार द्यावा. बेकिंग शीटवर ब्रेड ठेवून पुन्हा १५-२० मिनिटे त्याला बाजूला ठेवावे.
४.  प्री हीट केलेल्या ओवनमध्ये १८ डिग्री सेंटिग्रेडवर ब्रेड ३०-४० मिनिटे सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजावा.
५. थंड करून त्यावर आयसिंग शुगर भुरभुरून बटर, जॅम इत्यादीबरोबर खाण्यास द्यावा.
  ‘खाणे-पिणे आणि खूप काही’ या सदरातला हा माझा शेवटचा लेख. गेल्या एका वर्षांत या सदराने मला खूप काही दिले- मुख्यत: आठवणी आणि आवडत्या रेसिपींबद्दल तुमच्याशी बोलायची संधी. लेख वाचून तुम्ही मला ईमेल आणि इतर माध्यमांतून लिहिलेली पत्रे आणि त्यातून झालेली आपली मत्री ही कायम माझ्याबरोबर असेल- त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. सदर संपले असले तरी माझ्याशी संपर्क ठेवलात तर मला फार आवडेल- www.myjhola.in या माझ्या ब्लॉगवर तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला मला आवडेल.
(समाप्त)

No appointment of guardian minister yet Mumbai news
पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना अद्याप मुहूर्त मिळेना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Tasty Bread Paratha
उरलेल्या ब्रेडपासून बनवा टेस्टी ब्रेड पराठा; झटपट होणारी रेसिपी लगेच वाचा
pm crop insurance scheme
शेतकऱ्यांना दिलासा; खतावरील अनुदान कायम, पंतप्रधान पीक विमा योजनेला बळ
Crowds gather at the wealthy Dagdusheth Halwai Ganapati temple for darshan Pune news
नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी; मध्यभागात कोंडी
sugar industry loksatta news
गाळप हंगाम विलंबाचा साखर उद्योगाला फटका, साखर उत्पादनात ९२ लाख क्विंटलची घट
Devendra fadnavis
महाराष्ट्र आता थांबणार नाही, प्रतिज्ञा करा! नववर्षाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
States sugar mills produced 29 lakh tonnes sugar by December with season gaining momentum
डिसेंबरअखेर राज्यात किती साखर उत्पादन ? जाणून घ्या, विभागनिहाय स्थिती आणि एकूण उत्पादनाचा अंदाज
Story img Loader