दीपावली भारतात सर्वत्र साजरी होते. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व काíतक महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. हा सण अगदी पुराणकाळापासून साजरा करण्यात येतो. प्रत्येक दिवसाला विशिष्ट अर्थ आणि महत्त्व होतं. काय आहे या दिवसांमागची संकल्पना ते विशद करणारा हा खास लेख..
दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील अतीव आनंदाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. स्नेहाच्या ज्योतीने माणसामाणसातील प्रेमाचे बंध अधिक बळकट व्हावेत यासाठी भारतीयांच्या सण-उत्सवांच्या मालिकेत समाविष्ट झालेली दिवाळी प्रकाशवाटा घेऊन येते अशी भारतीयांची भावना आहे.
लोकसाहित्यात एक सुंदर कथा आहे. त्या कथेतली ती चिमुरडी आजीला विचारले, ‘आजी, दिवाळी कोण कोण साजरी करतं.’ त्यावर आजी उत्तर देते, ‘सगळीच माणसे दिवाळी साजरी करतात’. पुन्हा ती मुलगी विचारते, ‘राजा दिवाळी साजरी करतो का?’ त्यावर आजी सांगते, ‘राजाला रोजच दिवाळी असते. सुखदु:खाच्या या रहाटगाडग्यात काही आनंदाचे क्षण वाटय़ाला यावेत म्हणून सामान्य माणसंही दिवाळी साजरी करतात.’
दीपावली भारतात सर्वत्र साजरी होते. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व काíतक महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते काíतक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात. या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्याचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या कालातच झाला असे म्हणतात. सहा महिन्यांची दीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव साजरा करीत असावेत. आर्याच्या सात पाकयज्ञांपकी पार्वण, आश्वयुजी, आग्रहायणी या तीन यज्ञांचे एकीकरण व रूपांतर होऊन दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा, अशीही कल्पना आहे. पार्वण पाकयज्ञ हा पितरांसाठी असे; आश्वयुजी हा यज्ञ इंद्र व कृषिदेवता सीता यांच्यासाठी असे आणि आग्रहायणी संवत्सर समाप्तीचा याग असे.
काही लोकांची अशी श्रद्धा आहे, की चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र-सीतेसह अयोध्येला परत आले ते याच दिवसात. त्या वेळी अयोध्येतल्या प्रजेने दीपोत्सव साजरा केला आणि तेव्हापासून हा उत्सव दर वर्षी चालू झाला.
पुराणांत दीपावलीसंबंधी कथा आहे, ती अशी प्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढय़ झाला त्यानं पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवांना बंदीत टाकले. मग विष्णूने वामनावतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे त्रिपादभूमीची याचना केली. बळीने त्रिपादभूमी वामनाला दिली. वामनाने दोन पावलांतच पृथ्वी व स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कुठे ठेवू, असे विचारताच बळीने आपले मस्तक नमवून त्यावर तिसरे पाऊल ठेव, असे वामनाला सांगितले. वामनाने बळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पातळात दडपले. हे सर्व आश्विन वद्य त्रयोदशी ते अमावास्या या तीन दिवसांत घडले. नंतर वामनाने बळीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘देवा, केवळ लोककल्याणासाठी मी एक वर मागतो. या तीन दिवसांत जो कोणी यमाप्रीत्यर्थ दीपदान करील, त्याला यमयातना भोगाव्या लागू नयेत आणि त्याच्या घरात निरंतर लक्ष्मीचे वास्तव्य असावे.’ त्यावर वामनाने ‘तथास्तु’ म्हटले. तेव्हापासून दीपदान व दीपोत्सव करण्याची प्रथा सुरू झाली. काíतक शुद्ध प्रतिपदेला बळीचा दिवस मानून लोक त्याही दिवशी आनंदोत्सव करू लागले.
दिवाळीच्या उगमासंबंधी ऐतिहासिक कल्पना अशी आहे, की सम्राट अशोकाच्या दिग्विजयाप्रीत्यर्थ हा महोत्सव सुरू झाला. दुसरी कल्पना अशी आहे, की सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या राज्याभिषेक समारंभात जो दीपोत्सव करण्यात आला, तोच पुढे दरवर्षी साजरा करण्याची प्रथा पडली.
भारतीय वाङ्मयात दीपावलीचे उल्लेख अनेक भिन्न भिन्न नावांनी आलेले आहेत. वात्स्यायनाच्या कामसूत्रात यक्षरात्री नामक उत्सवाचा उल्लेख आहे. हेमचंद्राच्या मते यक्षरात्री म्हणजे दीपालिका उत्सव होय. श्रीहर्षांच्या नागानंद नाटकातील दीपप्रतिपदुत्सव म्हणजेही दीपावलीचाच उत्सव आहे. नीलमत पुराणात त्याला दीपमाला उत्सव असे नाव दिले आहे. सोमदेव सूरी (इ.स. चे १० वे शतक) याच्या यशस्तिलकचंपूत दीपोत्सवाचे वर्णन केलेले आहे, ते दीपावलीच्या उत्सवाशी जुळते आहे. इ.स. च्या ११ व्या शतकातील श्रीपती नामक ज्योतिषाचार्याने आपल्या ज्योतिष रत्नमाला या ग्रंथावरील मराठी टीकेत दिवाळी हा शब्द वापरला आहे. ज्ञानेश्वरी व लीळाचरित्र या ग्रंथांतही (इ.स.चे १३ वे शतक) दिवाळी हा शब्द आढळतो.
दीपावली हा मुख्यत: दीपोत्सव आहे. घरातील प्रत्येक भागात, कोनाकोपऱ्यात तेलाचे लहान दिवे लावून सर्व घर प्रकाशमान केले जाते.  प्रत्येक वास्तूच्या बाहेरील अंगावरही दिव्यांची आरास करून तो परिसर उजळून टाकला जातो.  तिमिराकडून तेजाकडे वाटचाल करा हाच यामागचा संदेश आहे.  
सूर्य आणि अग्नी यांचे प्रतीक असलेला दिवा पवित्र आणि शुद्ध मानलेला आहे. देवपूजा तसेच कोणतेही दैनंदिन वा पतृक धर्मकृत्य करण्याच्या वेळी दिवा आवश्यक मानला जातो. दीपदान हे पुण्यप्रद कृत्य मानले जाते. संध्याकाळी दिवा लावल्यावर त्याला नमस्कार करतात. दिव्यात तेल वा तूप याशिवाय इतर पदार्थ वापरू नयेत. त्यातली वात विशिष्ट प्रकारची असावी असे पुराणात सांगितले आहे.  महाराष्ट्रातील बऱ्याच देवळांसमोर दिवे लावण्यासाठी दीपमाळ उभारलेली आढळते. दीपोत्सव साजरा करणे हाच त्यामागचा हेतू आहे.
दिव्याचा शोध अश्मयुगात इ.स.पू. ७० हजार वर्षांपूर्वी लागला. हा दिवा दगडात खोदलेला असायचा. खोलगट केलेल्या भागात प्राणिजन्य चरबी आणि शेवाळे द्यालून वा तत्सम भिजणारा पदार्थ त्यात द्यालून तो पेटवीत. अशा प्रकारचे दिवे अलास्कातील एस्किमो लोक व अल्यूशन बेटातील लोक वापरत.
भारतात अग्नीचे व पर्यायाने प्रकाशाचे ज्ञान माणसाला बऱ्याच काळापासून असावे असे दिसते. सतत धगधगणारे यज्ञकुंड त्या काळात माणसांचा मोठा आधार असे. त्यामुळे श्वापदांचा व दैत्यांचा त्रास कमी होत असे. या आधाराच्या भावनेतूनच आर्यानी अग्नीला देवता कल्पिले होते. ऋग्वेदात अग्नीला महत्त्व दिलेले आढळते. अग्नीचा शोध भृगू राजाने लावला असे वेदात म्हटले आहे. रामायण आणि महाभारत या प्राचीन ग्रंथांत दिव्यांचा उल्लेख असून तेथे काही ठिकाणी ते सोन्याचे व रत्नांचे असल्याचे म्हटले आहे. अति प्राचीन दिव्यांच्या आकार प्रकाराविषयी विशेष तपशील उपलब्ध नाही. पण मोहोंजोदाडो येथे मातीचे टांगण्याचे दिवे सापडले. ते इ.स.पूर्व ३७०० ते ३५०० या काळातले आहेत. ही सिंधू संस्कृती लोप पावल्यानंतर सोळाव्या सतराव्या शतकापासूनचे दिवे दक्षिण भारतात पाहावयास मिळतात, हे पितळ किंवा कासे या धातूंचे केलेले असून त्यावर नक्षीही कोरलेली आहे. निरंजन, समई, ओवाळण्याचा दिवा आणि पंचारती हे भारतीय दिव्यांचे खास प्रकार. उत्तर भारतातील दिव्यांवर मोगल काळाचा मोठा परिणाम झालेला दिसतो.  
दिव्यांना प्रसंगनिष्ठ अशीही काही नावे आहेत. दिवाळीच्या दिवसात लटकणारा आकाशदिवा लावतात. तो पितरांना प्रकाश देतो अशी समजूत आहे. आकाशदिव्यामुळे शिव, विष्णू आणि यम आदी देव संतुष्ट होऊन संपत्ती देतात असे पुराणात सांगितले आहे. लग्नकार्यात एक ओळणीचा  दिवा रोवळीत ठेवतात. त्याला शकुन दिवा असे नाव आहे. करवल्या तो दिवा हातात धरून वधू-वराच्या मागे उभ्या असतात. अमावास्येला पिठाचे दिवे करून त्याची पूजा करतात.  मंगळागौरीच्या पूजेत व लग्नातील ऐरणी दानातही पिठाचे दिवे वापरतात. या दिव्यांना पिष्टदीप म्हणतात. देवपूजेच्या प्रसंगी वा कोणत्याही मंगलविधीत एक दिवा साक्षी म्हणून ठेवतात. त्याला स्थापित दीप म्हटले जाते. शंकराच्या देवळात अखंड तेवत राहणारा एक दिवा असतो तोच नंदादीप.
अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी हे नाव आहे. यमराजाने आपल्या दूतांना या दिवशी जो दीपदान करेल त्याला अपमृत्यू येणार नाही, असे सांगितल्याची कथा आहे. म्हणून या दिवशी मंगलस्नान करून दीप लावतात. यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड करून याच दिवशी दिवा लावायचा असतो. इतर वेळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावणे अशुभ समजतात.
नरकचर्तुदशीच्या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला व त्याच्या बंदिवासात असलेल्या सोळा सहस्र स्त्रियांना बंधमुक्त केले. नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून कृष्ण सूर्योदयापूर्वीच परत आला त्या वेळी त्यास मंगलस्नान घालून ओवाळण्यात आले याची स्मृती म्हणून सूर्योदयापूर्वी स्नान करून दिवे लावतात व आनंदोत्सव साजरा करतात.
अश्विन वद्य अमावास्येच्या रात्री लक्ष्मीपूजन असते. या निमित्ताने अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे आणि वैभवाचे प्रतीक आहे. संयमपूर्वक धन संपादन केले तर मनुष्याचे कल्याण होते यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करतात. या रात्रीच केवळ द्यूत खेळावे असे सांगितले आहे. द्रव्य हे चंचल आहे. हे लक्षात येण्यासाठीच या खेळाची योजना आहे. लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, मांगल्य आणि प्रकाश आढळेल तेथे ती निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्यांची रोषणाई करतात. ती लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीच!
काíतक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हे नाव आहे. या दिवशी विष्णूने वामनावतार घेऊन बळी राजाला पाताळात लोटले या दिवशी दीपदान करून त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत असा वामनाने बळीला वर दिला अशीही कथा आहे. पाताणे प्रभूंकडे बलिप्रतिपदेच्या दिवशी एक नोकर पहाटे सर्व घर झाडून स्वच्छ करतो. सगळा केर एका टोपलीत जमा करतो. मग त्या टोपलीवर जुनी केरसुणी, एक पणती व पसा-सुपारी ठेवून ती टोपली प्रत्येक खोलीपुढे ओवाळतो. त्या वेळी तो म्हणतो, ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ नंतर एक स्त्री सूप वाजवीत त्याच्या मागोमाग दरवाजापर्यंत जाते. तो मागे न पाहता बाहेर जाऊन सर्व केर रस्त्याच्या कडेला टाकतो. नंतर घरात येऊन कोणालाही न शिवता  तेल व गरम पाण्याने आंघोळ करतो.
बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्याभोवती एकवीस दिवे मांडण्याचीही रीत काही ठिकाणी आहे. बळीराजा देवांचा शत्रू असला तरी तो दुष्ट नव्हता. अलोट दातृत्व आणि प्रजाहितदक्षता याविषयी त्याची ख्याती होती. त्याचे राज्य हे सुराज्य होते म्हणूनच ते पुन्हा प्रस्थापित व्हावे अशी आकांक्षा वरील लोकाचारात प्रकट झालेली दिसते. या दिवसापासून विक्रम संवत सुरू होते म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात. िहदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तापकी हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे.
काíतक शुद्ध द्वितीयेचे भाऊबीज हे नाव आहे. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला तेव्हा तिने त्याला ओवाळले आणि आनंद व्यक्त केला. तेव्हापासून बहिणीने भावाला दीर्घायुष्यासाठी दिव्याने ओवाळण्याची चाल रूढ झाली असे म्हटले जाते.
तेलाचे आणि विजेचे असंख्य दिवे प्रज्वलित करून आसमंत प्रकाशमान करता येणे सहज शक्य आहे. पण खरी गरज आहे ती मनामनातल्या प्रेमाच्या, आपुलकीच्या, स्वाभिमानाच्या, माणुसकीच्या, त्यागाच्या, सहकार्याच्या, विवेकाच्या, संयमाच्या अंतज्र्योती पेटविण्याची, त्या पेटविता आल्या तरच भारतीय संस्कृतीला अपेक्षित असणाऱ्या संदर्भाना धरून ‘दिवाळी’ साजरी झाली असे म्हणता येईल.
(संदर्भ : मराठी विश्वकोश प्रमुख संपादक :
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि भारतीय संस्कृतीकोश संपादक : पं. महादेवशास्त्री जोशी)
Joshi.milind23@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा