मीना वैशंपायन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या मुळांशी प्रामाणिक राहात आधुनिक जीवन जगताना उत्पन्न होणारा तणाव आता केवळ परदेशस्थ भारतीयांची चिंता राहिलेला नाही. ही दोलायमान मन:स्थिती आजच्या नवीन जगात जवळपास सगळीकडेच दिसते. झुम्पा लाहिरी यांनी तीस वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘इंटरप्रीटर ऑफ मॅलडीज्’ या कथासंग्रहातल्या कथा हा संघर्ष चपखलपणे मांडतातच, पण ‘चूक-बरोबर’ ठरवण्याची घाई न करता संवाद प्रवाही राहावा याचा आग्रह धरतात. म्हणूनच झुम्पा यांचा हा पहिला आणि ‘पुलित्झर पुरस्कार’प्राप्त कथासंग्रह वाचायलाच हवा.

‘‘साहित्यनिर्मितीच्या आरंभापासून कवी आणि लेखक यांनी आपल्या कथना-लेखनातून विविध सीमा ओलांडणं, भटकणं, वनवासात जाणं, ओळखीच्या, सरावाच्या अनुभवांपलीकडे जाणं, या विषयांशी संबंधित असं लिहिलं आहे, सांगितलं आहे. महाकाव्यात, कादंबरीत अनोळखी व्यक्ती हा आदिबंध वापरलेला दिसतो. परकेपण, तुटलेपण आणि मिलाफ, एकत्र येणं, यातील तणाव हा बऱ्याचदा मूळ कथेचा पाया असतो,’’ असं प्रतिपादन करणारी भारतीय वंशाची, अमेरिकी लेखिका झुम्पा लाहिरी. तिचं नाव काही वर्षांपूर्वी ऐकलं आणि तिच्याविषयीचं कुतूहल मनात राहिलं.

तिच्या पहिल्याच कथासंग्रहाला-
Interpreter of maladies ला (‘इंटरप्रीटर ऑफ मॅलडीज्’) मानाचा ‘पुलित्झर पुरस्कार’ मिळाला हे वाचलं होतं. हा कथासंग्रह वाचल्यावर तिच्या मनावर उपरोल्लेखित विचारांचा किती प्रभाव आहे याची जाणीव झाली. कारण यातील नऊही कथांमध्ये स्थलांतरितांचे अनुभव, त्यांची मानसिक स्थिती, त्यांच्यामधले ताणतणाव यांचं कथन येतं. यातल्या बहुतेक साऱ्याच पात्रांचा मूळ प्रदेश बंगाली, नावं बंगाली, पण ती सारी पात्रं अमेरिकेत राहिल्यानं अमेरिकी जीवनशैली, विचार, पेहराव यांचा स्वीकार केलेली. नंतर पश्चिम बंगालमधल्या नक्षलवादी चळवळीतल्या तरुणांचा वेध घेणारी ‘Lowland ही कादंबरी किंवा ‘Namesake’ ही कादंबरी बऱ्याच गाजल्या. An unaccustomed earth या कथासंग्रहालाही चांगलं यश मिळालं. ‘In other words’ या इटालियन भाषेमध्ये लिहिलेल्या रोजनिशीवजा लेखनानंतर ती हल्ली इटालियनमध्येच अधिकतर लिहिते.

नीलांजना सुदेष्णा लाहिरी हे झुम्पा यांचं मूळ नाव. शाळेत जाऊ लागल्यावर आपलं संपूर्ण नाव उच्चारणं सर्वाना त्रासाचं वाटतंय असं लक्षात आल्यावर, आपण आपलं घरगुती नावच लावू या असा विचार त्यांनी केला. अशा लाडाच्या नावांशी आपल्या बालपणाचे ठसे, आठवणी जोडलेल्या असतात, असं त्या म्हणतात. लहानपणी बरोबरीच्या इतर अमेरिकी मुलांपेक्षा आपण वेगळय़ा आहोत याची जाणीव त्यांना फार लवकर झाली. अमेरिकी भाषेतले उच्चार आत्मसात केले तरी आपण दिसतो वेगळय़ा, अमेरिकी दिसत नाही, आपलं नावही तसं नाही, हे लक्षात आलं. त्यांच्या रंगरूपावरून किंवा कपडय़ांवरून कोणी काही बोलत नसलं, तरी त्या मुलांना आपण त्यांच्यापैकी न वाटता परक्या वाटतो, हे जाणवू लागलं. तसंच आपले आई-वडील इतर पालकांशी बोलत असले, तरी सामाजिक, सांस्कृतिक मेळाव्यांत ते वेगळे पडतात, हेही लक्षात येऊ लागलं. एक प्रकारचं सामाजिक एकटेपण त्यांना जाणवे.
१९६० च्या दशकात अनेक भारतीय अमेरिकेत आपलं नशीब अजमावण्यासाठी जाऊ लागले. निवृत्तीनंतर भारतात परत येण्याचा त्यांचा विचार तिथे गेल्यावर हळूहळू मावळत जाई. मग ते तिथेच कायमचे स्थायिक होऊ लागले. परंतु आपला देश, आपलं मूळ गाव, वतन, यात त्या पिढीचा जीव गुंतलेला होता. आपल्या मुलाबाळांना त्या पहिल्या पिढीतले लोक भारतीय संस्कारांचं बाळकडू देण्याचा प्रयत्न करत राहिले. पुढच्या पिढीला ते सारं आवडलं नाही, तरी त्यांना आईवडिलांचं मन मोडावंसं वाटत नव्हतं. त्यामुळे कधी मनापासून, तर कधी तेवढय़ापुरतं, ती पिढी सांगितल्यासारखं करत राहिली. झुम्पा यांच्यासारखी मुलं आधी आज्ञापालन म्हणून, तर कधी या सर्व बाबींची गंमत वाटूनही तसं करत.

‘इंटरप्रीटर ऑफ मॅलडीज्’मधली पहिली कथा ‘अ टेम्पररी मॅटर’ फारच वेगळी आहे. सुकुमार आणि शोभा हे एकमेकांच्या प्रेमात असलेलं दाम्पत्य. त्यांना झालेलं पहिलं मूल मृतावस्थेत जन्मतं. त्या दोघांमध्ये त्या दु:खाचा एक विचित्र तणाव आहे. दोघंही मूकपणे, शक्यतो एकमेकांसमोरही न येता, आपापली कामं करत असतात. त्यात एकदा काही दुरुस्तीचं काम करण्यासाठी काही दिवस वीजपुरवठा बंद राहाणार असल्याची बातमी मिळते. नाइलाज होतो आणि अंधारात वेळ घालवण्यासाठी काही तरी खेळ म्हणून एकमेकांशी आजवर जे बोललो नाही, मग ते कितीही क्षुल्लक का असेना, ते बोलू या, असं ते ठरवतात. घराच्या पायऱ्यांवर बसून लहानपणीच्या किरकोळ खोडय़ा, शाळेत केलेली कॉपी, यांसारख्या गोष्टी बोलतात. मग रोज दिवसभर कामं करत असताना आज रात्री काय सांगायचं आहे, याचा ते विचार करू लागतात. शोभानं लग्नाच्या वाढदिवशी भेट दिलेला स्वेटर गहाण ठेवून सुकुमार मद्यपान करतो हेही तिला त्यातून कळतं. या अवधीत दोघांमधला तणाव निवळत ते काहीसे एकमेकांजवळ येऊ लागतात, निदान त्यांना तसं वाटतं. शेवटच्या दिवशी दिवे येतात, एक अनपेक्षित वळण घेत रात्र येते आणि त्यांचं लग्न मोडतं. मग ते जवळ येणं तेवढय़ापुरतं, की एकूण लग्नाकडे बघण्याची दृष्टीच तात्कालिक, याचा अर्थ वाचकांवर सोपवत कथा संपते. झुम्पांची कथनशैली अतिशय आकर्षक. शब्दांची निवड इतकी अचूक, की मनात अनेकदा विविध अर्थवलयं उमटतात. कुठेही कंटाळवाणं होऊ न देता, भरपूर तपशील पुरवत, नर्मविनोदाचा आधार घेत, चपखल शब्दांमधून त्या घटनेमागचं सत्य शोधत जातात, या कथा सुमारे २५-३० वर्षांपूर्वीच्या काळात घडलेल्या असल्या, तरी आजही आपल्याला तीच चित्रं दिसू शकतात. काही तपशील वगळता, मानसिकता फार बदलली आहे असं वाटत नाही. उलट ती अधिक व्यक्तिवादी झालीय.

पुस्तकाची शीर्षककथा तर आजच्या परदेशस्थ भारतीयांचं नेमकं वर्णन करणारी आहे. पती-पत्नी आणि तीन मुलं, असं दास हे बंगाली-अमेरिकी कुटुंब सुट्टीत भारतभेटीला आलेलं, कोणार्कचं सूर्यमंदिर बघायला निघालेलं. भाडय़ाच्या गाडीचा ड्रायव्हर- कापसी, हा सुशिक्षित. त्याला कामचलाऊ स्वरूपाच्या इंग्रजीसह आणखी ३-४ परदेशी भाषा येतात. तो आठवडय़ातले पाच दिवस एका डॉक्टरकडे दुभाष्या किंवा संवादक (इंटरप्रीटर) म्हणून काम करतो. ग्रामीण भाषा डॉक्टरला येत नाही आणि तिथल्या बोलीभाषेशिवाय गरीब रुग्णांना दुसरी भाषा येत नाही. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात दुभाष्या-संवादक म्हणून कापसी काम करतो. औषधयोजनेचीही माहिती डॉक्टरनं सांगितल्यानुसार रुग्णाला सांगायची.. अर्थातच त्याचं काम अधिक जोखमीचं, जबाबदारीचं. कधी काहीसं सांत्वनाचं, धीर देण्याचंही! इकडे दास कुटुंब आपापल्या स्वभावानुसार, आवडीनुसार आजूबाजूच्या गोष्टींबद्दल टिपण्या करत, मार्गदर्शक पुस्तकं, खेळणी इत्यादी घेऊन गाडीत बसलेले. गाडी चालवताना, नावडत्या पत्नीशी विसंवाद असणाऱ्या कापसीची चुकार नजर नकळत दासपत्नीच्या तोकडय़ा, फॅशनेबल कपडय़ांची नोंद घेते. मध्येच एक वेळ अशी येते, की पती व मुलं माकडांमागे धावत जातात आणि अशा अवचित मिळालेल्या निवांत क्षणी दासपत्नी आपल्या मनात जपलेलं, पतीपासून लपवलेलं, आयुष्यातलं अतिशय महत्त्वाचं रहस्य कापसीला सांगते- त्याला आपल्या मनचं दुखणं कळेल या आशेनं. तो चकित, किंचित भ्यायलेला, गोंधळलेला. मात्र तिनं त्याचा पत्ता लिहून घेतलेला कागद वाऱ्यावर उडताना पाहून आपली गरज केवळ याच क्षणापुरती होती, याचं लख्ख ज्ञान त्याला होतं. तो इथेही पाहुण्याच्या मानसिक दुखण्याचं ओझं पेलतो. पती-पत्नी-मधला विसंवाद पाहून आपणही सुन्न होतो.

‘द ब्लेस्ड हाऊस’ या कथेतही अगदी भिन्न स्वभाववैशिष्टय़ं असणारं टिंवंकल आणि संजीव हे जोडपं! त्यांच्यातला विसंवाद, नाराजी, बायकोकडून असणाऱ्या पारंपरिक अपेक्षा पुऱ्या न झाल्यानं रोजचे वाद, यांचं चित्र दाखवणाऱ्या या कथेला एक वेगळा धार्मिकतेचा पदरही आहे. शेवट दोघांच्या दूर होण्यात. पुढील पिढीच्या नैतिकतेच्या, धार्मिकतेच्या, राहणीमानाच्या कल्पना कालमानानं बदलत जातात, दोन पिढय़ांमधलं अंतर वाढत जातं. हे सर्वाच्या बाबतीत, सगळीकडेच घडतं. पण अमेरिकी आणि युरोपीय देशांत स्थलांतर केलेल्यांच्या बाबतीत अधिक मोठय़ा प्रमाणावर घडतं. झुम्पांच्या लेखनात याची स्पष्ट चित्रणं दिसतात. या संग्रहातल्या कथा दोन पिढय़ांमधला, नातेसंबंधांमधला ताण, अथवा त्यांच्यातलं वैचारिक अंतर दाखवणाऱ्याही आहेत. आपलं मूळ, आपले रीतिरिवाज आपण जपले नाहीत तर आपलं खूप काही चुकतंय, मुळात आपण घरदार सोडून इथे केवळ उदरनिर्वाहासाठी आलोय, ही भावना आधीच्या पिढीत बळकट असल्यानं, कोणताही बदल करताना त्यांच्या मनात अपराधीपण असे. ‘मिसेस सेन’ या कथेतली संभाषणं या दृष्टीनं पाहण्यासारखी आहेत. मग त्यांचं भाजी चिरणं असो किंवा ‘ताजे मासे केवळ कोलकात्यालाच कसे चांगले मिळतात’ हे आलेल्याला पटवून देणं असो.
‘द थर्ड अॅण्ड फायनल कॉन्टिनेन्ट’ या कथेतला निवेदकही नोकरीनिमित्त आधी भारत, मग इंग्लंड, मग अमेरिका, असा गेली तीसहून अधिक र्वष स्थलांतर करत गेला आहे. मात्र आता त्याची भावना प्रातिनिधिक आहे- ‘आज इतक्या वर्षांनंतर मी जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा मला वाटतं, अरेच्या, शेवटी आपण इथे येऊन पोहोचलो तर! मनात समाधान आहे. हॉर्वर्डमध्ये शिकणारा माझा मुलगा जेव्हा माझा प्रवास ऐकून चकित होतो तेव्हा मला वाटतं, खरंच आपणच हे सारं केलं का? मला माहीत आहे, की माझं हे यश साधारणच आहे. शिवाय नशीब अजमावण्यासाठी इतक्या दूर येणारा मी काही पहिला नाही आणि एकटा तर नाहीच. तरीही कधी कधी मी त्रिखंडातून केलेली भ्रमंती, काही तरी पोटात ढकलत पोटाची खळगी भरणं किंवा वेगवेगळय़ा ठिकाणी घालवलेल्या निद्राहीन रात्री, हे सारं माझ्या लक्षात आहे. आणि तिथून मी आज या सुस्थितीत येऊ शकलो हे माझं मोठंच कर्तृत्व आहे असं मी मानतो.’

आरंभी डोक्यावर पदर घेत, पदराला किल्ल्या अडकवणारी त्याची बंगाली पत्नी माला आता जरी आधुनिक वेशभूषा करत असली, तरी तिच्या भांगातला सिंदूर तसाच असतो. त्याच्या मुलाच्या मनावर आईवडिलांच्या या स्वदेशत्यागाचं, त्या आठवणींचं अदृश्य ओझं आहे. ते ओझं तो सांभाळूही शकत नाही आणि टाकायची हिंमत त्याच्याजवळ नाही.आता अधिकृतरीत्या परदेशस्थ झालेले तरुण भारतीय हळूहळू बदलत जाताहेत. धार्मिक उत्सव हे बहुतांशी स्नेहमेळाव्याचं निमित्त ठरताहेत. मात्र प्रेम, लग्न, मुलांचं संगोपन, पालकांचा सांभाळ करणं, यांसारख्या विषयात निर्माण होणारे प्रश्न हाताळताना तरुण पिढी काहीशी गोंधळलेली आहे. मिश्र संस्कृतीतले विवाह बऱ्याचदा दु:खदायक ठरताहेत असं इथे जाणवतं. या साऱ्या कथा वाचताना नकळत मनात वर्तमान परिस्थितीचा विचार येऊन आपण अंतर्मुख होतो. कारण आज अनेक बाबतीत इथलंही वास्तव तसंच आहे असं प्रकर्षांनं जाणवतं.

यातल्या बहुतेक कथांमधील दांपत्यामध्ये, वेगवेगळय़ा नातेसंबंधांत जो संवादाचा अभाव आढळून येतो, हाच माणसाला इतरांपासून एकटं पाडतो असं दिसतं. सातत्यानं जाणवलेलं वैशिष्टय़ हे, की झुम्पा यात कुठेही कुणालाही उपदेश करण्याची वा चूक-बरोबर ठरवण्याची भूमिका घेत नाहीत. समजूतदारपणानं, एकमेकांशी संवाद साधूनच माणसांचा एकटेपणा कमी होईल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. जेव्हा आजूबाजूच्या लेखनातून बहुतांश वेळा विस्कटलेल्या संसाराची, तुटलेल्या नात्यांची लक्तरं टांगलेली पाहायला मिळतात, तेव्हा आत्यंतिक व्यक्तिवाद, तीव्र अहंकार यांचा हा परिणाम असावा का, असं मनात येतं. या बाबतीतली झुम्पांची दृष्टी अधिक प्रशंसनीय, विकसित वाटते.

घरातल्या बंगाली वातावरणाचा आग्रह, तेच तेवढं चांगलं, अशा लहानपणापासून दिसणाऱ्या वृत्तीमुळे झुम्पांच्या मनात ‘ते अमेरिकी- पाश्चात्त्य आणि आपण भारतीय’ यातलं अंतर तसंच राहात गेलं. त्यांना आपण नेमके कुठले, असा पेच पडे. यात आईवडील, घरातलं वातावरण याबरोबरच मोठा वाटा होता, तो भाषेचा. घरात बंगाली बोलणं, बाहेर इंग्रजी. पण बंगाली ही तत्त्वत: आपली मातृभाषा असली, तरी ती आपण वाचूही शकत नाही आणि लिहूही शकत नाही, याची त्यांना खंत वाटे. त्यांना वाटे, या दोन्ही भाषा मला आपलं म्हणत नाहीत. बंगाली म्हणजे सख्खी आई आणि इंग्रजी सावत्र, पण आपल्याला दोघीही नाकारत होत्या असं वाटे. म्हणून अगदी वेगळीच भाषा अभ्यासायची असं ठरवून त्यांनी इटालियन शिकायला आरंभ केला.

माणसाला एकटेपणा जाणवतो, तो त्याची संवादक्षमता संपते म्हणून. प्रसिद्ध ऑस्ट्रियन तत्त्वचिंतक विट्गेस्टाइन म्हणत असे, की ‘भाषेचा विचार, भाषेची कल्पना करणं म्हणजे एका जीवनाकाराची कल्पना करणं. मी म्हणजेच माझं जग आहे. आपल्या भाषेच्या मर्यादा म्हणजे माझ्या जगाच्या मर्यादा!’आजच्या जागतिकीकरणाच्या काळात खरं पाहता भाषिक बंधनं बऱ्याच अंशी अपरिहार्यपणे सैल झाली आहेत. पण माणसांमधील विसंवाद, नात्यांमधली दरी कमी करण्यासाठी प्रयत्नशील असावं, यासाठी प्रत्येक जण जरी आपापल्या पातळीवर संवादी राहिला तरी यातून बरंच मिळाल्याचा आनंद होईल. हेच प्रत्येक कथेतून अधोरेखित करणारा ‘इंटरप्रीटर ऑफ मॅलडीज्’ कथासंग्रह सर्वानी वाचायलाच हवा.
meenaulhas@gmail.com