..आई काहीशी लाजत आम्हाला म्हणाली, ‘ खरं सांगू हे तुमच्यामुळेच झालं. घराबाहेर पडल्यावर बाहेरचं जग किती विशाल आहे. तेही आपलंच आहे आणि त्यालाही आपली गरज आहे. हे मला जाणवलं आणि मी ते केलंच पाहिजे हेही.’
ने हमीचीच एक सकाळ..
धांदलही रोजचीच.. आईची स्वयंपाकघरात आणि आमची तिघांची म्हणजे दादा, वहिनी आणि मी. ऑफिसला जाण्याची..!
त्या गडबडीत दाराची बेल वाजली. दार उघडलं तर बाईचा पोरगा दारात उभा.
.‘ताई, आई येनार नाय आज कामावर.!’
कसंबसं एवढं सांगून तो बाहेरच्या बाहेर पळाला.
‘अरे थांब. थांब ’ म्हणत आई बाहेर येईपर्यंत तो जिना उतरून नाहीसा झाला..
आई एकदम वैतागली.
‘गेल्या १५ दिवसांतली ही तिसरी दांडी.. लबाड! पोराला पाठवते निरोप देऊन. पोरगा तिच्यापेक्षा वस्ताद.. आता उद्या येईल चेहरा पाडून.. रोज वेगळं कारण सुचतं पण या बाईला.. कितीही चांगलं वागा. कितीही वस्तू द्या. जाण आहे का..!’
भाजी फोडणीला घालताना आईच्या लाह्य़ा उडत होत्या. मी आणि वहिनीने जमेल तशी मदत केली. डबे भरले आणि आम्ही तिघंही ऑफिसला निघालो.
संध्याकाळी घरी आले तर आई दमलेली दिसत होती.. एकटीच खिडकीत कंटाळून बसली होती. दादाही आज कंपनीच्या कामानिमित्त टूरवर गेला होता. घरात आम्ही तिघीच. म्हणून आल्या आल्या मीच म्हटलं, ‘चल बाहेर फेरफटका मारून येऊ. वहिनीही येईल इतक्यात. सगळ्याच जणी जाऊ या.!’
‘नको गं. आज अजून स्वैपाकसुद्धा केला नाही..  आज कंटाळाच आला.’
‘मग तर जाऊयाच. बाहेर भटकू, जेवू आणि आरामात घरी येऊ.!’
‘नको बाहेर नको. थालीपीठं लावते ती खा गरम गरम..!’
‘ते काही नाही.. थालीपीठं नंतर कधीतरी.! आज बाहेरच जायचा मूड आहे.’
पपा गेल्यापासून आई तशी कुठे फारशी बाहेर जात नसे. सकाळची स्वैपाकघरातली कामं आटोपली की दिवसभर काही ना काही कामं काढत असे. कपाटं साफ कर. बगिच्यात झाडांची माती उकर, खत घाल. आणि हे सगळं आटोपलं की पुस्तकं. संध्याकाळी आम्ही आलो की पुन्हा स्वयंपाकघर..
असा बंदिस्त दिनक्रम झाला होता तिचा..
पण त्या दिवशी आम्हा दोघींपुढे तिचं काही चाललं नाही..
थोडंसं फिरणं. थोडंसं शॉपिंग.. आईची घरातील थोडी खरेदी केली. बाहेर जेवलो आणि रात्री उशिरा घरी परतलो.!
झोपता झोपता म्हणाली, ‘बरं वाटलं ग खूप दिवसांनी..! बाहेरची मोकळी हवा. लोकांची गर्दी, रेस्टॉरंटमधलं आयतं सुग्रास जेवण.!’
‘.मग आम्ही काय वेगळं सांगतोय. घरातून जरा बाहेर पड.. खरं तर संध्याकाळी नेमाने तू फिरायला बाहेर पडत जा.. त्या कोपऱ्यावरच्या बागेत जाऊन बसलीस तरी कितीक बायकांच्या ओळखी होतील.!’
‘नको बाई ते रिकामटेकडय़ासारखं एकटंच बागेत जाऊन बसणं.. फिरावंसं वाटलं तर तुम्ही आहातच की. आज नाही का कशा छान फिरून आलो.!’
‘आम्ही आहोतच गं.! पण आम्हाला ऑफिसपुढे वेळ नाही. खरं म्हणजे आमच्यापेक्षा तुला तुझ्या वयाच्या मैत्रिणी भेटल्या तर अधिक आनंदात वेळ जाईल तुझा. गप्पाटप्पा. वेगवेगळे विषय. सगळ्यांकडे सांगण्यासारखं काहीतरी असतंच.! आज प्रत्येकीचीच ती गरज आहे.’
‘आणि आई किती दिवस तू घराला कवटाळून बसणार आहेस.? आणि तू घरातच बसलीस तर तुला कोणीही बोलवायला येणार नाही. आपणच जायला हवं तरच नव्या ओळखी होतील. वेळ छान जाईल. एकटेपणा संपेल..’
माझं घर. माझी मुलं.. खूप झालं की आता.. आमच्यासाठी जे करायचं होतं ते केलंस, पपांसाठी केलंस, आता पुढचं आयुष्य स्वत:च्या मनाप्रमाणे जग.!’
पूर्वी अनेकदा झालेलं हे व्याख्यानसत्र पुन्हा त्याच हिरिरीने झडलं..
आईवर त्याचा काही परिणाम होणार नाही हे आम्हाला माहिती होतंच. म्हणजे तिलाच ते नको होतं..!  तरीही मी चिकाटी सोडली नाही. ‘मला तर बाई एक दिवस घराबाहेर नाही पडले तर जीव घुसमटतो. तुला कसा ग कंटाळा येत नाही आई..?’
‘नाही कसा? येतो की, मीही माणूसच आहे ना.? पण सांगणार कोणाला.?’
बघ, आता तूच कबूल केलंस की आपलं मन जाणून घ्यायलासुद्धा हवं असतं कुणीतरी..! आम्ही दिवसभर घरात नसतो. फक्त पुस्तक पुरेशी नाहीत आई.
खरं म्हणजे आईला हे सगळं माहिती होतं. पण तिला त्या गर्दीत एकटीने जायचं नव्हतं. सोबतीला कोणीतरी हवं होतं..!
..दिवस असेच चालले होते. बाहेर असले तरी मला आईची काळजी वाटत राही. आईशी बोलून उपयोग नव्हता. घर सोडायला ती तयार नव्हती. पण एक दिवस तीही वेळ आली..  मी ऑफिसमध्ये असताना आईचा फोन आला.
‘सरू, पेंडसेकाकूंच्या यजमानांना हार्ट अ‍ॅटॅक आलाय.. त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये जातेय.. त्यांच्या घरात कोणी नाही. शेजारचं घरही बंद आहे.. मग त्याच धावतपळत आपल्याकडे आल्या. त्यांच्याबरोबर मी जातेय. आता फोन ठेवते. नंतर बोलू.!’
पेंडसेकाका हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत आई नियमित काकूंच्या सोबतीला जात होती.. आठवडाभरात काका घरी परत आले. मग अधूनमधून आईचं त्यांच्या घरी जाणं सुरू झालं.!
काही का निमित्ताने आई घराबाहेर पडली याचं मला बरं वाटलं.!
.काकूंची आणि आईची चांगलीच गट्टी जमली. दोघी संध्याकाळी नेमाने फिरायला जाऊ लागल्या. भाजी खरेदीही एकत्र सुरू झाली. आता आम्ही घरी परतल्यावर कधी नव्हे ते आमच्या घराला कुलूप दिसू लागलं.
आई उत्साही दिसू लागली. गप्पांचे विषय बदलले. आता आणखी दोन मैत्रिणी त्यांना मिळाल्या होत्या. गप्पांच्या ओघात नवी नावं, वेगवेगळ्या हकिगती, पदार्थाच्या रेसिपीज..  आता आईकडेसुद्धा सांगण्यासारंखं खूप काहीतरी असायचं. एरव्ही क्वचितच वाजणारा आईचा मोबाइल पुन पुन्हा वाजू लागला.. ‘हो. जाऊ या ना, कधी ठरवता.?’
‘हो, हो, निघतेच आहे. तुम्हीही निघा.!’
‘तिकीट कोण काढणार आहे, मीच जाऊ का?..’ असे तुटक तुटक पण सुखद संवाद कानावर पडू लागले.
भरभर घरकाम आवरून टापटीप तयार होऊन बाहेर पडण्याची आईचीही लगबग आमच्या बरोबरीने सुरू झाली.
कधी एखादीच्या घरी गप्पांचा अड्डा. कधी एकत्र खरेदी. बाहेर जेवायला जाणं तर कधी नाटक.!
‘बघ आई, किती सोपं होतं.! अगं, या वयात प्रत्येकीलाच कोणी ना कोणी तरी हवं असतं.. गेल्या तीन-चार महिन्यांत किती बदललीयस तू. चेहराच सांगतोय तुझा.!’
‘खरंय तुझं. संसार किती जरी आपला असला तरी शेवटी माणसाला माणूसच लागतं. मन मोकळं करायला.. ‘बऽऽरं.! उद्या रविवार- बाईची रजा आहे म्हणजे मीच दिली आहे तिला. सगळ्यांनी मिळून कामं आटपायची आहेत.!’
‘आता हे काय नवीन.?’
आश्चर्य वाटलं ना? त्या पाटीलवहिनी आहेत ना त्यांच्याकडे मोलकरणीला महिन्यातून दोन रविवार हक्काची रजा देतात. वर्षांनुवर्षांचा नियम आहे त्यांच्याकडे. रविवारी घरातली सगळी कामं ती सगळी मिळून करतात.!
‘बापरे.!’ ‘बापरे’ काय त्यात! आपल्या मनात तरी कधी आला का हा विचार! उलट एखाद्या दिवशी ती आली नाही तर किती त्रागा करतो आम्ही बायका. त्यांच्या बाजूने कधी विचार करतो का ग आपण. खरं तर दारिद्रय़ाने, नवऱ्यांच्या व्यसनांनी, उद्याच्या विवंचनेने गांजलेल्या बायका आहेत त्या तरी सगळं सहन करून बिचाऱ्या घरोघर वणवणत असतात.! खरं म्हणजे त्या आहेत म्हणून आपली घरं सुरळीतपणे चालू आहेत.’
..एक दिवस आईच्या नावाचं कुरियर आलं. एरव्ही आई कुरियरने पुस्तकं मागवीत असे. पण ही पुस्तकं नव्हती.
‘काय आहे ग?’
‘वाडा तालुक्यात आदिवासींचं एक गाव आहे, तिथल्या आश्रमशाळेचं पत्र आहे. मुंबईत त्यांचं ऑफिस आहे. माझी मैत्रीण थत्ते आहे ना ती त्यांची सभासद आहे. बरीच वर्षे ती तिथे काम करते. आम्हीही तिच्याबरोबर त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. आता आम्हीही त्यांच्या सभासद झालो आहोत. त्या शाळेच्या भेटीचं ते पत्र आहे. यापुढे महिन्यातून एकदा त्या शाळेला भेट द्यायची. मुलांशी गप्पा मारायच्या. त्यांना गोष्टी सांगायच्या. लिहायला शिकवायचं. शिवाय त्यांच्या गरजेच्या गोष्टी कपडे, खेळणी, खाऊ, पुस्तकं, पाटय़ा त्यांना पुरवायच्या. किती छान कल्पना आहे!
आमच्या बागेत आता आम्ही ‘कट्टा’ सुरू केलाय. आणखीही बऱ्याचशा बायका आमच्याबरोबर येऊन बसतात. त्यांना ही कल्पना सांगितली म्हणजे मीच अगदी सविस्तर माहिती देऊन तपशीलवार सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आपण त्यांच्यासाठी आणखी काय करू शकतो त्याही कल्पना दिल्या. सगळ्याजणी मदत करायला तयार आहेत. आई उत्साहाने म्हणाली.
‘म्हणजे भाषणच ठोकलंस की?’ आम्ही तिघांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
‘थट्टा करता रे पोरांनो.!’ आई काहीशी लाजत म्हणाली, ‘पण खरं सांगू हे तुमच्यामुळेच झालं.. लक्षात आलं, घराबाहेरचं, बाहेरचं जग किती विशाल आहे. तेही आपलंच आहे आणि त्यालाही आपली गरज आहे. दारिद्रय़ाच्या अंधारात ज्यांच्या वाटा हरवल्यात त्यांना प्रकाश देऊन त्यांच्या वाटा शोधायच्या आहेत. कितीतरी हताश डोळ्यातली स्वप्नं फुलवण्यासाठी मदतीचा हात हवा आहे. मला जर हे शक्य आहे तर मी ते केलंच पाहिजे.’
मी आईकडे बघत होते. ती मला वेगळीच भासली. निर्मळ आनंदाने फुललेली!
‘एक मात्र कबूल केलं पाहिजे हं. तुमची पिढी बिनधास्त धडाडीची. आम्ही तशा नाही! आम्हाला निदान, मला तरी कुणाचा हात हातात असावा लागतो. मग बळ येतं. . ते आता आलंय.!’
‘माझी काळजी मिटली. एक आत्ममग्न झाड उन्मुक्तपणे बहरू लागलं होतं..!’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा