वयाच्या साठाव्या वर्षी ती परिस्थितीच्या शाळेत गेली आणि सगळं शिकली. आम्हाला सांभाळण्याचा वसाही तिनं पूर्ण केला. आमच्या लग्नानंतरही ती तिथंच राहिली अगदी मरेपर्यंत. आजोबांवर पूर्ण अवलंबून असलेल्या तिनं त्यांच्यानंतर मात्र आपला भार कधीच कुणावर पडू दिला नाही. तिची गोष्ट..
पाण्यात पडलं की पोहता येतं. अर्थात, परिस्थिती माणसाला शिकवते म्हणतात ते काही खोटं नाही. याचं अगदी जवळून पाहिलेलं उदाहरण म्हणजे माझी आजी. मोठी भाग्याची होती ती. तसं आमचं घराणं काही खूप श्रीमंत नव्हतं. पण आमच्या आजोबांच्या प्रेमाची श्रीमंती तिच्या वाटय़ाला आली होती. शिक्षणाचा तिला गंधही नव्हता. घरकामाव्यतिरिक्त तिला कशातच रस नव्हता. पण आजोबांनी मात्र तिला त्यावरून कधीच टोकलं नाही. मला आठवतं, तिच्या गळय़ातली पोत तुटायची तेव्हा तीदेखील आजोबाच ओवून द्यायचे आणि ते जर घरात नसतील तर ते येईपर्यंत ती तुटकी पोत पदरात बांधून ठेवायची. कारण पोतीविना सवाष्णबाईनं तोंडात पाणीदेखील घ्यायचं नसतं, असा तिचा समज. आजोबा कामावरून आले, की आम्हाला सोबतीला घेऊन पहिली तिची पोत ओवून द्यायचे. घरकाम आणि आम्हा दोन नातींना सांभाळण्याव्यतिरिक्त त्यांनी तिच्यावर कसलीच जबाबदारी टाकली नव्हती. आम्ही लहान होतो तोवर आमचे फाटलेले कपडेदेखील आजोबाच शिवायचे, कारण साधं हेमिंगही तिला जमायचं नाही. बाजारहाटाचंही सगळं काही आजोबाचं बघायचे. आजोबांना फिरतीवर जायचं असेल तर जाण्याअगोदर घरात काही आहे, नाही बघून बाजारहाट करूनच ते निघायचे. ते नसतील तर दळणाची जबाबदारी तेवढी ती उचलायची. कासाराकडे बांगडय़ा भरायला, शिंप्याकडे ब्लाऊज शिवायला आणि शेजारीपाजारी हळदीकुंकवाला जाणं एवढंच काय ते तिचं एकटीचं ‘आऊटिंग’. मेण, कुंकू, साडी, ब्लाऊज पीस, चप्पल सगळं काही आजोबा तिला हातात आणून द्यायचे. एवढंच काय, तिची नखं आणि तिच्या टाचेला त्रास देणारं कुरूप वाढलं तर तेदेखील आजोबाच कापून काढायचे. आम्हाला या सगळय़ाची सवय झाली होती. पण शेजारपाजाऱ्यांना या सगळय़ाची गंमत वाटायची. बाहेरच्या जगात काय चाललंय, वस्तूंचे भाव काय आहेत, काही काही तिला माहीत नसायचं.
आजोबांशिवाय आजीचं पानदेखील हलायचं नाही. ते आजोबा एक दिवस अचानक पक्षाघाताच्या तीव्र झटक्यानं अध्र्यावरच तिला सोडून गेले. सगळय़ांनाच प्रश्न पडला आता कसं होणार? घरची सगळी जबाबदारी आता तिलाच उचलावी लागणार होती. शिवाय लोणंदसारख्या खेडेगावात दोन मुलींना घेऊन राहायचं होतं. माझे वडील म्हणाले, ‘मी घेऊन जातो मुलींना, माझ्याकडे साताऱ्याला. ‘मामांनीही मग ‘तू आता इथं राहून काय करणार. तूही आमच्याबरोबर मुंबईला चल’ असा प्रस्ताव ठेवला. आजीनं मात्र हे दोन्ही प्रस्ताव धुडकावले. आजपर्यंत ज्या नवऱ्यामध्येच तिचं जग सामावलं होतं, त्याच्या जाण्याचं आभाळाएवढं दु:ख तिनं बाजूला सारलं. ती म्हणाली, ‘नातींना त्यांचं लग्न होईपर्यंत आम्ही सांभाळू, असं लेकीला मरतेसमयी मी वचन दिलंय. तो वसा मी अध्र्यावरच टाकणार नाही. यांची पेन्शन आहे. तुम्ही दोघंही पैसे देताच आहात. मुलीही आता मोठय़ा होऊ लागल्यात. करतील त्या मला मदत. तुम्ही काही काळजी करू नका. मी नेईन सगळं निभावून.’ सगळय़ांना सगळं अवघड वाटत होतं. पण तिनं कुणाचंच काही चालू दिलं नाही. शेवटी आम्हा दोघी बहिणींचं दहावीचं वर्ष होतं म्हणून मग तिचा हट्ट सगळय़ांनी मान्य केला. या सहा महिन्यांत ती हे सगळं कसं काय निभावते ते बघायचं ठरलं.
आता आजीची खरी कसरत होती. घर म्हणजे काय लागत नाही, सगळं सगळं आता तिलाच बघायचं होतं. पैसाही तसा बेताचाच येणार होता. आजोबांची पेन्शन, माझे वडील आणि मामा पैसे पाठविणार होते. सगळय़ांचीच परिस्थिती बेताची. त्यामुळे त्यालाही मर्यादा होतीच. आजोबा असतानाही तशी तंगीच असायची. पण आजीला मात्र त्यांनी ती झळ कधीच लागू दिली नव्हती. त्यांचं पानाचं दुकान होतं. त्यांच्यानंतर ते दुकानही बंद केलं. तेवढय़ातच आता सगळं भागवायचं होतं. काहीच अनुभव नसताना तिनं जबाबदारीचं हे शिवधनुष्य उचलायचं ठरवलं आणि पेललंही लीलया!
पहिला पाढा ती शिकली तो बजेटचा. महिन्याच्या सुरुवातीला पैसे आले की दूधवाल्याचं बिल ती पहिलं भागवायची. लाइट बिल दोन महिन्यांनी, तर घरपट्टी, पाणीपट्टी सहा महिन्यांनी यायची. ती मात्र दर महिन्याला यासाठी थोडे थोडे पैसे राखून ठेवू लागली. काही झालं तरी त्या पैशाला ती हात लावायची नाही. मग महिन्याला लागणारा किराणा माल ती घेऊन यायची. सुरुवातीला आम्हाला ती सोबत घेऊन जायची. मग स्वत:च जाऊ लागली. विशेष म्हणजे लाइट बिल आणि घरपट्टी भरायलाही तीच जायची. बँकेतून पेन्शन आणायलाही ती एकटीच जायची. आपण शिकलो नाही. हे सगळं आपण कसं करणार हा प्रश्नही तिला पडला नाही. सगळं काही ती स्वत:च समजून घेऊन करू लागली. महिनाअखेरीस पैसा कमी पडला तर एका दुकानात उधारी होती. तिथून ती माल घेऊन यायची. तिथली किती उधारी झाली हा हिशेब तिच्या डोक्यात पक्का असायचा. उपवास, पाहुणेरावळे असले की ती जास्त दूध घ्यायची. महिनाभरात किती मापं जास्त झाली हे न लिहिता ती बरोबर लक्षात ठेवायची. कधी बाजारहाट न केलेली ती वर्षभरासाठी लागणारं धान्यही एकटी जाऊन खरेदी करू लागली.
तिचं धाडसंही केवढं! एकदा घरात साप निघाला. आम्ही दोघी बहिणी साऽप साऽऽप करत धावतच घराबाहेर आलो आणि रस्त्यावरच्या येणाऱ्या-जाणाऱ्याला ‘अहो मामा, घरात साप निघालाय, जरा मारता का?’ असं काकुळतीला येऊन विनवू लागलो. पण एकही जण मदतीला येईना. त्यात आजी घरातच. साप शोधत बसलेली. किती हाका मारूनही ती बाहेर येईना. आम्ही अगदी रडकुंडीला आलो. थोडय़ा वेळानं ती स्वत:च त्या हातभर लांबीच्या सापाला मारून त्याला काठीवर घेऊन बाहेर आली.
वयाच्या साठाव्या वर्षी ती परिस्थितीच्या शाळेत गेली आणि सगळं शिकली. आम्हाला सांभाळण्याचा वसाही तिनं पूर्ण केला. आमच्या लग्नानंतरही ती तिथंच राहिली अगदी मरेपर्यंत. आजोबांवर पूर्ण अवलंबून असलेल्या तिनं त्यांच्यानंतर मात्र आपला भार कधीच कुणावर पडू दिला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा