एकटेपणा लहान मुलांनाही जाणवतो, पण त्याला पालकांकडून कधीच प्राधान्यक्रम दिला जात नाही. शिवाय एकटेपणा जाणवणारं मूल नेहमीच भावंडं नसलेलं, एकटं मूल असतं असं नाही. भरल्या घरातली लहान मुलंसुद्धा एकाकी असू शकतात. मुलांचं हे एकाकीपण त्यांच्या भविष्यावर नकारार्थी परिणाम करतं, हे लक्षात घेऊन पालकांनी आपल्या वागण्याचा गांभीर्यानं विचार करायला हवा.

एकटेपणा वाटणं ही आंतरिक भावना आहे. ती व्यक्त केल्याशिवाय समोरच्याला फारशी कळणारी नाही. प्रौढांना आपल्या भावना, त्यांची तीव्रता व्यक्त करून दाखवता येते. त्यासाठी लागणारा शब्दसाठा त्यांच्याकडे असतो. पण आपल्याला काय वाटतंय हे न कळणारा आणि कळलं तरी ते व्यक्त न करता येणारा समाजात एक मोठा वर्ग आहे, तो म्हणजे मुलं. मुलं म्हटल्यावर फक्त बालकं नाही, तर किशोरवयीन मुलांचाही त्या वर्गात अंतर्भाव होतो. ‘त्यांना काय होतंय एकटं वाटायला? सगळं आयतं मिळतंय! आता परिस्थिती जशी आहे तशी आहे. यांना करमायला मी कुठून आणखी माणसं आणू?’ असा सूर घरातल्या प्रौढांचा असतो. मुलांच्या मानानं त्यांचे भावनिक प्रश्न मोठेच असतात. त्या भावनांना हाताळण्यासाठी लागणारी कौशल्यं त्यांच्यात तोपर्यंत विकसित झालेली नसतात. त्यामुळेही त्यांच्या मानसिक प्रश्नांकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. काही अडचणीत सापडलेली, असुरक्षित (vulnerable) मुलं सोडता प्रत्येक मुलाच्या आयुष्यात किमान एक जबाबदार प्रौढ (responsible adult) असतोच. मग तरीसुद्धा बालकांना एकटेपणाशी सामना करण्याची वेळ खरंच येते का?

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
kids anger issues
तुमची मुलंही सतत रागावतात, चिडचिड करतात? मग ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा नियंत्रण
children passport loksatta news
पालकांच्या वादात अल्पवयीन मुलांना पारपत्रापासून वंचित ठेवता येणार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा
Youth Addiction, Young Generation, Nagpur Police ,
तरुणांनो प्रेम करा, पण…

हेही वाचा : एक न्याय्य न्याय!

सोसायटीच्या आवारात संध्याकाळी होणाऱ्या किलबिलाटात सर्वात वरचा आवाज असलेला पीयूष आज आवारातल्या एका बाकावर उदासपणे बसलेला होता. चेहऱ्यावर निराश भाव. डोळे पाण्यानं डबडबलेले. त्याचा नेहमीचा निरागस चेहरा आणि आताचा हा निराश चेहरा काही वेगळंच सांगत होता. मी बाकापाशी जाऊन पीयूषचा एक गालगुच्चा घेतला. एरवी असं केल्यावर त्याच्याकडून काही तरी मस्तीवाली प्रतिक्रिया मिळायची, पण आज स्वारी आपल्याच तंद्रीत होती. त्याच्याजवळ असलेला रुबिक क्यूब एका मिनिटात सोडवून दाखवला तेव्हा कुठे तो बोलायला लागला. ‘‘कोणीच नाहीये माझ्याशी खेळायला.. ख्रिसमसची सुट्टी लागलीय. सगळे मित्र तर कुठे कुठे फिरायला गेलेत. बाबांना सुट्टी नाही म्हणून मी घरीच.’’ म्हणजे खेळायला सवंगडी नाहीत, ही गोष्ट होती तर!

पीयूषसारखी परिस्थिती असणारी मुलंमुली बऱ्याच अंशी एकटेपणाचा सामना करत असतात. घरात आजी-आजोबा, आई-बाबा, सगळे असतात, जे मागितलं ते लगेच हजर होतं, सगळया घराचा केंद्रबिंदू व्हायला मिळतं, पण तरीही समवयस्कांची, भावंडांची उणीव या सगळया गोष्टी करून भरून काढू शकत नाहीत. संदीप खरे यांच्या एका गाण्यात खूप समर्पकपणे ही गोष्ट मांडली आहे. ‘ऑफिसला जाऊ नको,’ म्हणून आर्जवं करणारा छोटा मुलगा आईला सांगतो की, ‘‘मी एकटाच असतो गं! मला कोणी दादा-ताईपण नाहीये..’’ शाळा, सोसायटीतले मित्रमैत्रिणी, नातेवाईकांची मुलं असली, तरी या ‘बिझी’ आयुष्यात दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ कोणाकडेच नसतो. मग राहिलेल्या वेळात त्यांच्याकडे असतो तो फक्त एकटेपणा. काही पालक म्हणतातही, ‘‘एकत्र खेळायला कोणी मिळालं तरी कुठे खेळतात? मारामारी आणि भांडणंच होतात!’’ पण मग त्याला उत्तर, होऊ दे की भांडणं! आपणही धडपडत, कधी मारत, कधी मार खात मोठे झालेलो आहोत. असली कारणं देऊन मुलांना खेळायला जाऊ न देणारे पालक मुलांच्या एकटेपणावरचा तात्पुरता उपायही हिसकावून घेतात. लहान मुलांच्या एकटेपणाच्या कंगोऱ्यांपैकी ‘एकुलते एक’ हा सर्वात ओळखीचा आणि सर्वत्र आढळणारा प्रकार. यात भर पडतेय ती घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणाची.

हेही वाचा : मनातलं कागदावर : बूट चोरीला गेले त्याची गोष्ट

पीयूषचा मित्र असलेला निनाद शेजारच्याच बिंल्डगमध्ये राहायचा. त्याच्या आई-बाबांचा घटस्फोट झालेला होता. आई ‘आय.टी.’ कंपनीत इंजिनीयर होती आणि तिला त्याच्या उच्च शिक्षणासाठी काम करणं, पैसा कमावणं भागच होतं. एक बाई घरी येऊन स्वयंपाक करून जायच्या आणि एक आजी निनादच्या सोबतीला असायच्या. पण या आजी काही पीयूषच्या आजीसारख्या लाड नाही करायच्या. पीयूषची आजी त्याला नवनवीन खाऊ करून द्यायची, त्याचा डबा उघडून तपासून बघायची, डबा संपवला नसेल तर रागवायचीसुद्धा. पीयूषला भारी कटकट वाटायची आजीची! पण निनादला मात्र हे सगळं सुखावून जायचं, कारण त्याच्याकडे असं प्रेमानं रागवणारी आजी नव्हती. घरात ‘वल्र्ड कप’ बघायला त्याच्यासोबत बसणारे बाबाही नव्हते. घटस्फोट घेतलेल्या जोडीदारांचा विचार समाज निश्चितच करतो आणि त्यांना सहानुभूती मिळते. पण घटस्फोटित नवरा -बायकोंच्या मुलांना येणारं एकटेपण तेवढं प्रकर्षांनं समोर येत नाही. घटस्फोटासारखी परिस्थिती जोडीदाराच्या मृत्यूमुळे येणाऱ्या एकल पालकत्वातही दिसते. एकल पालकत्व निभावणारा पालक (मग कारण घटस्फोट असो की मृत्यू) स्वत: घरातल्या आर्थिक, ऑफिसमधल्या आणि मुलांच्या जबाबदारीनं इतका दबून जातो, की त्याच्यासाठी मुलाचा एकटेपणा हा विषय प्राधान्यक्रमात पार तळाला जातो. मूल किशोरवयीन असेल तर त्याला त्याच्याबरोबर असलेल्या पालकांचं दडपण, कुचंबणा, विवंचना, सगळं जाणवत असतं. त्यामुळे त्यात भर पडायला नको म्हणून ती मुलं त्यांच्या एकटेपणाशी वेडंवाकडं, स्वत:च लढत राहतात. आपल्याच कोषात जात राहतात. काही वेळेला चुकीच्या संगतीत अडकतात. एकल पालकत्वातलं मूल जर वाममार्गाला गेलं, तर लक्ष ठेवायला कोणी नव्हतं, धाक दाखवायला कोणी नव्हतं, म्हणून मूल त्या मार्गानं गेलं, असा निष्कर्ष काढला जातो. पण कित्येक वेळा मुलं एकटेपणा घालवण्याच्या नादात पुढे आलेला हात कोणाचा आहे हे न बघताच तो हातात घेतात आणि मग चुकीच्या रस्त्यावर जातात. याचाच फायदा घेत कित्येक मुलांना गुन्हेगारीच्या रस्त्यावर नेलं जातं. मी जेव्हा विधिसंघर्षग्रस्त बालकांचं समुपदेशन करायचे, (यापूर्वी या मुलांसाठी ‘बालगुन्हेगार’ ही संज्ञा वापरली जायची. आज त्यांना ‘विधिसंघर्षग्रस्त बालक’ असं म्हटलं जातं.) तेव्हा अशा वाटेवर चालणाऱ्या खूप जणांना घरातली पोकळी जाणवत असल्यामुळे ते बाहेरच्या समाजातल्या ‘जबाबदार’ प्रौढांचा शोध घेत इथपर्यंत पोहोचले आहेत असं कळलं.

तुम्ही थोडी उत्सुकता दाखवलीत, ऐकायची तयारी दाखवलीत, तर मुलांना खूप काही सांगायचं असतं. दर वेळेस त्यात काही महत्त्वाचं असतंच असं नाही, पण प्रौढांच्या मानानं मुलं नवनवीन अनुभव जास्त घेत असतात. त्यांचे नवनवीन नातेसंबंध निर्माण होत असतात. त्यामुळे चाललंय ते बरोबर चाललंय ना, हे समजण्यासाठी किंवा मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी त्यांना एक श्रोता हवा असतो. तो श्रोता कधीही समवयस्कांपेक्षा जबाबदार प्रौढ असला, तर ते जास्त फायद्याचं असतं. घरातल्या सदस्यांची संख्या किंवा मुलांचं मित्रमंडळ यांवर आपलं नियंत्रण नसेल कदाचित; पण आपण आपल्या मुलांसाठी जबाबदार, प्रौढ, चांगले श्रोता होऊ शकतो का? ते फारसं अवघड नाहीये खरं तर, पण कित्येक वेळा हातातला फोन व्हिलन बनतो! विविध समाजमाध्यमांवर एक फेरी मारायची म्हटलं, तरी पंधरा-वीस मिनिटं जातात. आपल्यातला पालक आपल्याला एक बोचणी लावत असतो. मूल काही तरी सांगायला आलेलं होतं, पण आपण ‘रील्स’मध्ये बिझी होतो. समाजमाध्यमांचं गारुड असं काही पसरलं आहे, की आपण ही बोचणीही बोथट करून टाकतो. परिस्थितीनं कोणतेही फटके दिलेले नसताना, कुटुंबात सगळं आलबेल असतानासुद्धा आपण मोबाइलमध्ये बिझी असल्यामुळे मुलाला एकटेपणा जाणवत राहतो. अर्थात त्याच्या हातात त्याचा स्वत:चा फोन येत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती असणार आहे; नंतर तोही त्याच वाटेवर जाणार आहे आणि मग कदाचित तो एकटेपणा तुम्हाला जाणवणार आहे. प्रत्येक परिणामामागे काहीतरी कृती असते किंवा असं म्हणता येईल की, तुम्ही जी कृती करतात त्याचा निकाल म्हणजे परिणाम असतो.

हेही वाचा : माझी मैत्रीण : काय झाले गं बोटाला?

पुढे आणखी एक घर लागलं. माझी लेन्स अजून थोडी ‘झूम’ केली आणि मला तनया आणि साहिलचं घर दिसलं. दोघांच्यात फक्त दोन वर्षांचं अंतर. आई पूर्णवेळ गृहिणी, आजी-आजोबा घरात. आई नोकरी करत नसल्यामुळे मुलांना पुरेसा वेळ देत असायची. माझ्या मनात आलं की, इथं काही आपल्याला एकाकीपणा सापडणार नाही. लेन्स अॅतडजस्ट करून बघितलं, तर साहिल खूप चिडचिड करताना दिसला. घरात वस्तूंची आदळआपट करायचा. त्यांच्या घरात मला टीव्हीच्या बाजूस एक मोठी शो-केस दिसली. शोकेसमध्ये भरपूर मेडल्स, बक्षीसं दिसत होती. लेन्स आणखी झूम केली आणि कळलं की, ही सगळी मेडल्स फक्त तनयाची आहेत. तनया दिसायला छान, वागायला नम्र आणि गोड. अभ्यासासह इतर कलांमध्येही निपुण. साहिल अभ्यासात जेमतेम होता. त्याला खेळणं सोडून कशातच विशेष रस नव्हता. तनया एखादं मेडल घेऊन आली रे आली, की बाबा म्हणायचे, ‘‘हा साहिल बदलला का गं बाळ असताना दवाखान्यात? आपला मुलगा आहे असं वाटतच नाही!’’ आठ-नऊ वर्षांच्या मुलाला तुम्ही सातत्यानं अशी टोचणी लावत असाल, त्याच्याबरोबर भेदभाव करत असाल, तर त्या मुलाला अशा घरात सगळयांबरोबर राहूनही किती एकटेपणा वाटत असेल याची जाणीव असायला हवी. पाणी न घालता एखादं रोपटं जगू शकेल का? मुलांनी या जगात तग धरून राहण्यासाठी, फुलण्यासाठी, विनाशर्त प्रेम हे पाण्यासारखं काम करतं. या प्रकारचा भेदभाव पूर्वी फक्त मुलं-मुली असा होता, पण हल्लीच्या काळात मुलांनी सगळीकडे यश मिळवलं पाहिजे याची इतकी क्रेझ आहे, की भावंडांपैकी असं यश मिळवणारं मूल घरातलं ‘स्टार-किड’ असतं. त्याला भरभरून प्रेम, प्रशंसा मिळते. दुसरं मूल प्रेम मिळवण्यासाठी धडपडत राहतं. त्याची आदळआपट, राग, रडणं, हे एकटेपणा व्यक्त करण्यासाठीच असतं. असा भेदभाव त्वचेचा रंग, हुशारी, गुण, लिंगभेद यांपैकी कशावरूनही होत असतो.

माझ्याकडे आलेल्या एका भावंडांच्या प्रकरणात घरातल्या आजीच्या मृत्यूनंतर काही महिन्यांत लहान बहिणीचा जन्म झाला होता. कोणीतरी पसरवलं, की आजीच तिच्या रूपानं परत आली आहे. झालं; आता ती कुटुंबातल्या सगळयांची ‘जीव की प्राण’ आहे. त्यामुळे मोठया भावाला कोणी भावच देत नाही. त्यानं मला एकदा सांगितलं की, तो घरात पारदर्शक आहे. मी त्याला विचारलं, ‘‘पारदर्शक म्हणजे काय रे?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘ सगळे लोक मी समोर असलो, तरी माझ्या आरपार, पलीकडे उभ्या असलेल्या बहिणीशी बोलतात.’’ या मुलाचे बोलच त्याच्या एकटेपणातला भकासपणा किंवा गंभीरता दाखवून देतात.

हेही वाचा : ‘ती’च्या भोवती..!: कालातीत उसुलांची हमिदाबाई

एकदा मुलांचा एकटेपणाचा प्रश्न मान्य केल्यावर उपायांकडे वळू या. पहिली गोष्ट म्हणजे यावर १०० टक्के असा काही हमखास उपाय नाही. प्रयत्न करणं मात्र आपल्या हातात आहे. आपण सतत मुलांचा अभ्यास, शिस्त, या विषयांवर बोलत असतो. गरजेनुसार भूमिका बदलून आपण कधी जबाबदार प्रौढ, तर काही वेळेला आपल्या पाल्याएवढं मूल होऊ शकतो. सारखंच गंभीर आणि शिस्तीचं वर्तन करून आपल्यालाही कंटाळा येतोच की! खूप पालक घरात पसारा नको, गोंधळ नको, म्हणून मित्रमैत्रिणींना घरी खेळायची परवानगी देत नाहीत. मुलांसाठी घर आहे, की घरासाठी मूल? होऊ दे की थोडा पसारा! पण ‘बाहेर गेल्यावर मूल बिघडेल’, ‘बाकीची मुलं आपल्या ‘लेव्हल’ची नाहीत’, ‘आपलं मूल या सगळयांमध्ये जाऊन बिघडत चाललं आहे,’ अशा सगळया विचारांनी त्यांना खाली खेळायलासुद्धा पाठवलं जात नाही. स्क्रीनपासून लांब मुलं किती आनंदानं आणि सर्जनशीलता वापरून खेळतात बघा तरी खरं!
परिस्थितीतून येणाऱ्या एकाकीपणाला आपण पुढे उत्तरं शोधू. पण तोपर्यंत फक्त आपण किमान आपल्या पाल्याचं एकाकीपण कमी करण्याचा प्रयत्न करू या..
trupti.kulshreshtha@gmail.com

Story img Loader