दोन वर्षांचा एक मुलगा अचानक गायब होतो आणि सापडतो तब्बल दोन वर्षांनी, तोही दुसऱ्या राज्यात. एकीचं हरवलेलं मूल दुसरीला मिळालं. तिनं त्याचा सांभाळ यशोदेच्या ममतेने केलाही. पण जेव्हा त्याची खरी आई सापडली तेव्हा? ..उद्याच्या मातृदिनानिमित्ताने या दोन आईंया, आजच्या देवकी आणि यशोदेची अनुभवांची गोष्ट. चटका लावणारी..
दोन वर्षांचा, तोळामासा प्रकृती असलेला जिग्नेश अचानक हरवतो. त्याच्या कुटुंबीयांवर आकाशच कोसळतं..दोन वष्रे पोलीस त्याला शोधत राहतात.. तो सापडण्याच्या सर्व शक्यता हळूहळू मावळत जातात..आणि अचानक एके दिवशी दुसऱ्या राज्यातल्या एका शहरात परक्याच कुणा एका बाईच्या पण सुरक्षित हातात तो दिसतो.. दैवाने घाला घातला म्हणून त्या दुर्दैवी मातेच्या अश्रूंच्या सरी अजून तेवढय़ाच प्रवाही असताना दैवाचा हा अनुकूल पडलेला फासा केवळ एका कुटुंबाच्याच नव्हे, तर सर्व परिचितांवर आनंदाचा वर्षांव करून जातो..!
सुरतच्या शीतल राजपूत या मातेने आणि तिच्या हरवलेल्या जिग्नेश या मुलाचा जिवापाड सांभाळ करणाऱ्या मुंबईच्या आरती तानवडे यांच्या दोन कुटुंबांनी गेल्या अडीच-तीन वर्षांत दैवाचे असे अकल्पित फेरे अनुभवले..!
 प्रत्यक्ष ज्या स्त्रीचं मूल हरवलं आहे तिची वेदना जाणून घेताना तर अंगावर थरथरून काटा उभा राहतो. सुरतमध्ये राहणारी शीतल राजपूत ही एका सामान्य गिरणी कामगाराची पत्नी. घरची कामे करून लग्नकार्यप्रसंगी कधीमधी वाढप्याची कामे ती करते. आर्थिक परिस्थिती एकंदर यथातथाच.! विवाहाच्या तीन वर्षांनंतर तिला जिग्नेश झाला. साहजिकच घरात आनंदाचं वातावरण होतं. पण हे मूल सारखं आजारी असायचं. दर एक दीड महिन्याला त्याला रुग्णालयात दाखल करावं लागे. तो दीड वर्षांचा असताना त्याला डायरिया झाला आणि पुन्हा एकदा इस्पितळाच्या वाऱ्या सुरू झाल्या. या वेळी मात्र जिग्नेशच्या नेहमी आजारी पडण्याचं काहीतरी वेगळे कारण असावे अशी शंका डॉक्टरांना आली. विविध तपासण्या केल्यानंतर जिग्नेशला जन्मत एकच किडनी असल्याचं निष्पन्न झालं. या कुटुंबावर तर हा मोठाच आघात होता. सतत औषधोपचार करण्यासाठी लागणारा पसा कुठून आणायचा ही चिंता त्यांना सतावत होती. परंतु तरीही जिग्नेशचे आई-वडील व आजी-आजोबा, आत्या सर्वच जण जिग्नेशसाठी जे काही शक्य होईल ते करायचे. त्याची प्रकृती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते.
जिग्नेश अडीच वर्षांचा झाला. दरम्यान त्याला एक धाकटा भाऊदेखील झाला होता. जिग्नेशची आई शीतल सांगत होती, ‘‘या बाळाला खोकला कफ झाल्यानं आम्ही त्याला दवाखान्यात नेलं. त्याला दोन दिवसांसाठी तिथंच ठेवावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितले. त्याप्रमाणे मी बाळासोबत दवाखान्यात थांबले. जिग्नेश त्याच्या आत्याजवळ अधिक राहात असल्यानं तो तिच्याजवळ छान राहील याची मला खात्री होती. मला त्याची काळजी करायचं अजिबात कारण नव्हतं. जानेवारी महिना असल्यानं थंडी खूपच पडली होती. बाळासाठी स्वेटर व शाल घेऊन या, हे सांगण्यासाठी मी घरी फोन केला व सहजच पतीला जिग्नेश काय करतोय, असं विचारलं तर त्यांनी उत्तर द्यायला टाळाटाळ केली. तसा माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. जिग्नेश पुन्हा आजारी वगरे तर नाही ना या शंकेनं मी अस्वस्थ झाले. तेवढय़ात माझ्या नणंदेचा फोन आला. जिग्नेश दुपारचं जेवून शेजारी खेळायला म्हणून गेला तो अजून घरी परतलाच नव्हता. त्याचा शोध घेणं सुरू असल्याचंही तिनं मला सांगितलं.
जिग्नेशची प्रकृती अचानक बिघडली तर नसेल ना, या भीतीनं मनात नाना शंका सतावू लागल्या. त्याला केव्हा एकदा बघते असं होऊन गेलं होतं. मला घरी परतायची ओढ लागली, पण  या बाळाची प्रकृती नाजूक असल्यानं ते योग्य होणार नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. मी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. शेवटी बाळाला काही झालं तर डॉक्टर जबाबदार राहणार नाहीत, असं त्यांनी आमच्याकडून लिहून घेतलं आणि आम्ही एकदाचे घरी आलो. तोपर्यंत जिग्नेश घरी परतला असेल या आशेवर मी होते. पण माझी घोर निराशा झाली. माझा बांध सुटला. मी धाय मोकलून रडू लागले. जिग्नेशचा काहीच पत्ता नव्हता. सगळा परिसर शोधून झाला, पण त्याचा पत्ता नव्हता.’’
शीतलच्या घरची मंडळी, नातेवाईक शेजारीपाजारी यांनी सर्वानी मिळून जिग्नेशचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवला. शेवटी रात्री दोन वाजता महिन्द्रपुरा पोलीस ठाण्यात जिग्नेश हरवल्याची तक्रार दाखल केली गेली. पुढे दोन वष्रे पोलिसांकडून ‘आम्ही शोध घेतो आहोत, अजून तरी काही धागेदोरे मिळाले नाहीत’ अशीच उत्तरे शीतलच्या कुटुंबीयांना मिळत राहिली. जिग्नेश जिवंत असेल ना, हा प्रश्नही मध्ये-मध्ये डोकावू लागला.
त्याच दरम्यान मुंबईच्या जोगेश्वरी भागात एक वेगळंच नाटय़ घडत होतं. घरगुती खाद्यपदार्थ पुरवण्याचा व्यवसाय करणाऱ्या आरती तानवडे यांच्याकडे कामाला असलेल्या शांताबेन नावाच्या स्त्रीनं आरतीला दोन वर्षांचा एक अनाथ मुलगा  ओळखीतील एक बाई रेखा सोलंकी हिच्याकडे असल्याचं सांगितलं. आरती यांनी यापूर्वी एक मुलगी दत्तक घेतली होती. आरती यांचं आयुष्य तर विचित्र अनुभवांनीच भरलेलं होतं. तिला एक मुलगा होता, परंतु लहानपणीच काही आजारामुळे तो कोमात गेला. त्या अवस्थेत तो पुढची आठ वष्रे होता. त्याची त्या अवस्थेत आरतींनी मनापासून सेवा केली खरी, पण त्याचा इच्छित परिणाम झालाच नाही. अखेर तो वारलाच. त्यातच त्यांच्या पतीचेही निधन झाले. हे दुहेरी दु:ख पचवणं आरतींना जड जात होतं. निदान एक दोन अनाथ मुलं दत्तक घेऊन आपण त्यांचं पालनपोषण करावं. त्यांना शिकवावं असं त्यांना वाटत होतं. एक अनाथ मुलगी त्यांना मिळालीदेखील. त्यांनी तिला रीतसर दत्तक घेतलं. हा सर्व तपशील शांताबेनला ठाऊक होता. त्यांनी हे सर्व रेखा सोलंकी हिच्या कानी घातलं आणि तुझ्याकडे असणारं मूल तू आरतीला दे,असंही सांगितलं.  
आरती तानवडे यांच्यासाठी तर हा सगळा अनुभव म्हणजे आनंद आणि दु:खं यांची सरमिसळ होता. त्या सांगतात, ‘‘मी शांताबेनला रेखा सोलंकीशी माझी भेट घालून दे’, असं सांगितल्यानुसार रेखा मला भेटली. ती म्हणाली की तिचा भाऊ आणि भावजय दोघंही अचानक वारले. आता या मुलाची जबाबदारी माझ्यावर आली आहे, पण माझी स्वत:ची दोन मुले आहेत. अजून एक जबाबदारी मला परवडणार नाही. म्हणून याला मी तुम्हाला देऊ शकते. तिनं हे सगळं ज्या पद्धतीने सांगितलं की मला ते सारं खरंच वाटलं. तरीही मी तिला त्या मुलाचा जन्माचा दाखला द्यायला आणि कायदेशीर दत्तक घेण्याचं सुचवलं. दुसऱ्या दिवशी ती मुलाला घेऊन आली आणि कागदपत्रे तयार करण्यासाठी तिने काही रक्कम मागितली. मी तिचं बोलणं खरं समजून तिला पसे दिले आणि ती निघून गेली, पण नंतर फिरकलीच नाही. मुलाचे नाव जिग्नेश असल्याचं त्याच्याचकडून काही दिवसांनी समजलं.’’
आरती यांच्याकडे ज्या वेळी जिग्नेशला आणलं गेलं, तेव्हा तो तापाने फणफणला  होता. आरती यांनी त्याला दवाखान्यात दाखल केलं तेव्हा जिग्नेशला डबल न्यूमोनिया झाल्याचं व त्याला एकच किडनी असल्याचं समजलं. तरीही जिग्नेशला सांभाळण्याचा त्यांचा निर्णय अटळ होता. काही दिवसांनी जिग्नेशची प्रकृती सुधारली आणि आरती त्याला घरी घेऊन आल्या.
हळूहळू जिग्नेश मोठा होऊ लागला. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्याला घातलं गेलं. आरती आणि जिग्नेश यांच्यातील भावबंध सख्ख्या आई-मुलाप्रमाणे दृढ होत गेले. दोन वष्रे निघून गेली. आणि..
आरती सांगतात, ‘‘२६ जानेवारीला पोलीस माझ्या दारात आले आणि जिग्नेश हे चोरलेले मूल असून रेखा सोलंकी आमच्या ताब्यात आहे, जिग्नेशला त्याच्या आईवडिलांजवळ सोपवावे लागेल, असं त्यांनी सांगितलं. माझ्या तर पायाखालची जमीन सरकली. जिग्नेशला त्याच्या खऱ्या आईवडिलांकडे सुखरूप सोपवण्याचा आनंद मला होता, पण जिग्नेश आता आपला आणि आपल्याजवळ राहणार नाही याचे अपार दुखदेखील होत होते. मृत्यूच्या दाढेतून मी जिग्नेशला अक्षरश खेचून आणलं होतं. माझ्या जगण्याचा तो भाग झाला होता आणि आता इतक्या वर्षांंनंतर त्याला मला परत करावं लागणार होतं.’’
आरती यांना जिग्नेशसोबत सुरत येथे आणलं गेलं. तिथे रेखाची ओळख पटवली गेली आणि रेखावर मूल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रेखा सोलंकी हिला अटक कशी झाली याचाही एक किस्साच आहे. पोलिसांच्या ऐवजी शीतलच्या शेजाऱ्यांनाच तिचा पत्ता लागला. गुन्हेगार त्याने केलेल्या गुन्ह्य़ाच्या स्थळी पुन्हा येतोच असे म्हणतात. रेखानेही तेच केले होते. दोन वर्षांनंतर जिग्नेशच्या घराजवळ ती पुन्हा घोटाळली आणि तिला शीतलच्या नणंदेनं ओळखलं. जिग्नेश हरवला त्या दिवशी हीच आपल्या घरी कुणाचा तरी पत्ता विचारत आली होती असं तिनं सांगितलं. शेजाऱ्यांनीही तिला दुजोरा देत रेखाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. आता रेखावर खटला दाखल झाला आहे.
आतापर्यंत जे घडलं ते असं होतं. यानंतर नेहमीच्या सरधोपटपणे जिग्नेश त्याच्या खऱ्या आईकडे गेला, असंच तुम्हाला वाटेल. पण नाही, ही कहाणी एका वेगळ्या हृदयाच्या आईची आहे. कारण जिग्नेश आता कायमस्वरूपी आरतीजवळच आहे. त्यांच्याजवळच रहाणार आहे.
आरती यांनी भावनाविवश होत सांगितलं की  ‘‘जिग्नेशच्या आईला माझ्या कातडीचे जोडे करून घातले तरीही तिचे उपकार मी फेडू शकत नाही. शीतल मला म्हणाली, ‘स्वतचं मूल गमावण्याचं दु:ख काय असतं ते अनुभवावरून मी जाणते, मी ते भोगलं आहे. तू आधीच तुझा एक मुलगा गमावला आहेस..आता पुन्हा मी तुला ते दुख  देऊ इच्छित नाही. तू त्याला नवा जन्म दिला आहेस, त्यामुळे तूच यापुढे त्याची आई आहेस. तुझ्याकडेच जिग्नेश राहील.’
आता आरती यांनी जिग्नेशला दत्तक घेण्यासाठी कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. शीतलला वाटेल तेव्हा ती आपल्या मुलाला येऊन भेटू शकते. जिग्नेशच्या आयुष्याच्या पतंगाची दोरी आरतीच्या सुयोग्य हातात पडली आहे आणि ती त्याला काटू न देता आयुष्यभर जपणार आहे, याची खात्री तिच्यातली आई आपल्याला देते…

Story img Loader