आजीआजोबांच्या जमान्यात त्यांचे आईवडील मुलांना किती टक्के गुण मिळालेत याची पर्वा करत नसत. पोर पास झालं म्हणजे भरून पावलो, असं त्यांना वाटे. आजीआजोबांनीही त्यांच्या मुलांना म्हणजे आज मध्यमवयीन असलेल्यांना अभ्यास आणि गुणांसाठी फार छळलं नाही. मात्र, आता शाळेत असलेल्यांसाठी परिस्थिती फार वेगळी आहे. व्यवस्थित पास होणाऱ्याच नव्हे, तर ७०-८० टक्के मिळवणाऱ्या मुलांचीही काळजी त्यांच्या पालकांना सतत वाटत असते, खरंच ती रास्त आहे का?
संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी शिंदे काका बाहेर पडले. हातात कापडी पिशवी, त्यात बिस्किटं, शिळी पोळी आणि दुसऱ्या हातात वेताची काठी नेहमीप्रमाणे त्यांच्याबरोबर होती. रस्त्यात भेटणाऱ्या ओळखीच्या कुत्र्यांना एक एक तुकडा टाकणं आणि एखादा अवखळ कुत्रा असेल तर त्याला दूर ठेवण्यासाठी काठी, असा ‘प्रेम अधिक सुरक्षा’ या प्रकारे त्यांचा फेरफटका चालू होता.
हेही वाचा : माझी मैत्रीण : गुलबकावलीचं फूल!
रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या टपरीवर त्यांना स्वानंद सिगारेट ओढताना दिसला. सावकाश पावलं टाकत येणाऱ्या शिंदे काकांना बघितल्यावर स्वानंदनं लगेच पाठ वळवून सिगारेट खाली टाकली आणि बुटानं जमिनीत गाडून टाकली. तेवढ्यात शिंदे काकांचा हात त्याच्या खांद्यावर पडला. ‘‘अरे स्वानंद, मला बघून सिगारेट वाया घालवलीस तू! संसारी माणूस आहेस… असा संकोच करून कसं चालेल?’’
स्वानंद म्हणाला, ‘‘काका, आता मलासुद्धा टोमणे कळायला लागले आहेत बरं का!’’ काकांनी हसत हसत त्याचा हात धरला. ‘‘घाईत नाहीस ना? मग चल जरा चक्कर मारू या आपण.’’
खांद्यावरची लॅपटॉपची बॅग गाडीत ठेवून स्वानंद काकांबरोबर निघाला. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तो रीलॅक्स्ड आहे, हे बघून काकांनी प्रश्न टाकला, ‘‘काय, प्रियाची फार आठवण येतेय का? परत रोज सिगारेट प्यायला लागला आहेस म्हणून विचारतो.’’
स्वानंदने एकदा काकांकडे बघितलं आणि म्हणाला, ‘‘काका, आता तुमच्यापासून काय लपवणार! प्रिया आणि मधुर यांना मीच पाठवलं तिच्या माहेरी. मधुरचा आज आठवीचा रिझल्ट होता. त्याच्या शाळेतूनच येतोय मी. तो रिझल्टच्या दिवशी घरी नको म्हणून दोघांनाही पाठवून दिलं.’’
आता मात्र शिंदे काका चमकले.
हेही वाचा : जिंकावे नि जगावेही : आयुष्याचा ताल आणि तोल!
‘‘काय रे… नापास बिपास झाला की काय मधुर? पण त्यातला वाटत नाही मुळीच. आणि शाळा आठवीमध्ये पास करते ना सगळ्यांना?’’
‘‘तोच तर प्रॉब्लेम आहे ना काका! नापास होणारा असता, तर मला काही इश्यू नव्हता. त्याचा एक चुलत मामा बुद्धीनं कमी आहेच की… आई-वडिलांबरोबर राहतो आहे सुखात. सातवीमध्ये शाळा सोडली आहे, बारीकसारीक कामं करत जगतोय, पण तो तसाच आहे जन्मापासून हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच कोणाच्याच काही अपेक्षा नाहीत त्याच्याकडून.’’
‘‘अरे, पण त्याचा मधुरशी काय संबंध?’’
‘‘काका, माझा लेक दरवर्षी ७० ते ८० टक्के गुण मिळवतो आहे. कोणत्याही विषयात साठच्या खाली जात नाही. मात्र कधीच ८० च्या वरही जात नाही.’’
‘‘मग काय प्रॉब्लेम आहे? दरवर्षी बिनबोभाट वरच्या वर्गात जातो आहे की!’’
‘‘काका रागवू नका, स्पष्ट बोलतोय म्हणून. पण दरवर्षी पास होण्यात आनंद मानणं हे गेल्या पिढीचं बोलणं झालं. आता असं चालत नाही. त्याच्या वर्गातल्या ४० मुलांपैकी पंधरा मुलांना ९० टक्क्यांच्या वर मार्क मिळाले आहेत. मधुरपेक्षा कमी गुण असलेली १५ मुलं आहेत वर्गात. म्हणजे हा धड इकडे नाही आणि तिकडे पण नाही! त्याची शाळा तशी चांगली आहे. शिवाय शाळेच्या फीइतकी त्याची ट्यूशनची फीसुद्धा आम्ही दर महिन्याला खर्च करतो. प्रश्न पैशांचा नाही, आम्ही दोघं त्यासाठी नोकरी करतो आहोत आणि एकाच मुलावर थांबलो आहे, त्याचं कारणही तेच आहे.’’
‘‘म्हणजे तुला काय खुपतंय? मधुर शाळेत खूप हुशारी दाखवत नाही हे? अरे, प्रत्येकात काही तरी गुण असतोच ना! त्याचाही एखादा विषय असेलच की. डॉक्टर, इंजिनीयर याच्या पलीकडे काही जग नाही का?’’
‘‘खरं तर माझ्या कंपनीचा मालक एका छोट्या गावातून शिक्षण करून ‘बी.कॉम.’ करून किती मोठा झालाय ते माझ्या डोळ्यांसमोरच आहे. ५ हजार कोटी रुपयांचा टर्नओव्हर आहे आमच्या कंपनीचा. माझ्यासारखे डझनभर इंजिनीयर हाताखाली आहेत त्याच्या. फार हुशार माणूस आहे तो. एखाद्या मोठ्या शहरात जन्माला आला असता आणि बरी संधी मिळाली असती, तर निश्चित शिक्षणात चमकला असता. ‘आय.आय.टी.’ वगैरे कॉलेजांत गेला असता.’’
‘‘…आणि ‘आय.आय.टी.’त जाऊन काय केलं असतं त्यानं? पुढे अमेरिकेत गेला असता की तुझ्यासारखी गलेलठ्ठ पगाराची नोकरी केली असती?…’’
‘‘माझा पगार काही गलेलठ्ठ नाहीये.’’
‘‘अरे लेका, चाळिशी उलटेपर्यंत तुझं स्वत:चं घर झालंय. दोन गाड्या, दर दोन वर्षांनी परदेशवारी, शिवाय वर्षातून दोनदा सुट्टी, शिवाय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वगैरे. शेजारचा पांड्यांचा विकायला काढलेला फ्लॅट तू आणि प्रिया विकत घेता आहातच ना? आणि पगार लठ्ठ नाही म्हणतोस? दोघांचा मिळून पगार पुरेसा नाही वाटत तुला? कमाल आहे!’’
‘‘तसं नाही हो काका! काही कमी नाही आम्हाला. पण आम्ही दोघं चांगलं शिक्षण घेऊन आणि चांगली नोकरी मिळवून हे कमावलेलं आहे.’’
‘‘मग दु:ख कशाचं आहे तुला?’’
‘‘घर, गाडी, प्रवास, कपडे, महागाच्या वस्तू, ही सर्व लाइफस्टाइल आम्ही दोघं कमावतो आहे म्हणून आहे. मधुरला याची सवय झालीच असणार ना? त्याला स्वत:च्या जोरावर याच्या पुढे जाता आलं नाही, तर तो किती फ्रस्ट्रेट होईल आयुष्यात?’’
‘‘तुम्ही दोघांनी मिळवलेल्या यशापेक्षा त्याचं यश जास्त मोठं नसेल तर काय, अशी काळजी आहे का तुझी?’’
‘‘कोणत्या आई-वडिलांना असं वाटणार नाही की आपल्यापेक्षा आपलं मूल पुढे जावं? असं वाटणं चूक आहे का काका?’’
आपण खूपच असंवेदनशील स्वरात बोललो असं काकांना जाणवलं. स्वानंदच्या स्वरातला राग आणि विषाद दोन्हीही त्यांना आता लख्ख दिसलं.
‘‘प्रत्येक गोष्ट सतत चढत्या भाजणीत वाढतच राहिली पाहिजे. प्रत्येक पिढी पुढे सरकली पाहिजेच.’’
‘‘काका, जाऊ दे! तुम्ही पुन्हा… जाऊ द्या हा विषय!’’ स्वानंद परत फिरू लागला.
हेही वाचा : प्रगतीसाठी लिंगाधारित समानता!
‘‘नाही रे स्वानंद, मी हे उपहासानं नाही बोललो! मला हा प्रश्न कळतो. विशेषत: आपल्या मुलाला लाइफस्टाइल जर नाही कमावता, सांभाळता आली, तर त्याचं कसं होणार याची काळजी तर मला व्यवस्थित समजते. तुझ्या सर्व पिढीसाठीच हा मोठा काळजीचा भाग आहे. तुमच्या शिक्षणानं तुम्हाला उत्तम पैसा आणि स्थैर्य दिलंय. चांगल्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलेले तुमचेच वर्गमित्र तर खूप पुढे गेलेत. म्हणून तुमचा शिक्षणावर फार विश्वास आहे. आणि आता शिक्षण हे गुणांमध्ये मोजलं जाते. त्यामुळे ९५ टक्क्यांचा अभिमान आणि ८० टक्क्यांची लाज वाटते आहे.’’
‘‘काका, तुम्ही स्वत: डॉक्टरेट मिळवली. तुमच्याबरोबरचे बँकेत काम करणारे अल्पसंतुष्ट असताना तुम्ही स्वत: शिकून ‘पीएच.डी.’पर्यंत गेलात. आर्थिक घोटाळे कसे शोधायचे आणि स्वत:ला कसं वाचवायचं, याविषयावरचे तुम्ही तज्ज्ञ आहात. हे काय शिक्षणाशिवाय झालं?’’
आता लोखंड व्यवस्थित तापलं आहे, याची शिंदे काकांना खात्री पटली. त्याला योग्य आकार देण्याचीसुद्धा आता वेळ आलेली आहे हे काकांना जाणवलं. समोर असलेल्या बाकावर त्यांनी बसकण मारली. स्वानंदसुद्धा नाइलाजानं त्यांच्या शेजारी बसला.
‘‘शिक्षणामुळे मी फक्त बँकेतल्या क्लार्कच्या खुर्चीपर्यंत पोहोचलो. मधुरप्रमाणेच मी मध्यम गुण मिळवणारा विद्यार्थी. पोटापाण्याचं भागेल अशी नोकरी आताशा सर्वांना मिळू शकते. राहत्या घराची सोय तर तूच करून ठेवली आहेस. शिवाय तू आणि प्रिया व्यवस्थित आर्थिक सोयसुद्धा करता आहात. त्यामुळे मधुरवर तोही बोजा नाही. त्याचं आयुष्य अगदी श्रीमंती नसलं तरी व्यवस्थित खाऊनपिऊन सुखी जाईल याची सोय तूच करून ठेवली आहेस. त्यामुळे ७०-८० टक्के मिळवणारा तुझा मुलगा निवांत जगणार आहे.’’
हेही वाचा : विज्ञानक्षेत्रात ‘ती’ कुठे?
स्वानंदला हसावं की रडावं हेच समजेना! सध्याच्या जगाचा उत्तम अंदाज असलेली थोरली व्यक्ती म्हणून आपण शिंदे काकांशी बोलायला गेलो, तर हे काही तरी वेगळंच सांगायला लागले. खाऊनपिऊन सुखी म्हणे! असं बिनमहत्त्वाकांक्षेचं आयुष्य जगायचं याला काय अर्थ आहे?
स्वानंदच्या चेहऱ्यावरच्या वेगानं बदलणाऱ्या भावनांचा अंदाज घेत शिंदे काका पुन्हा बोलते झाले, ‘‘जरा शांतपणे पूर्ण ऐकून घे. मी असं म्हणतो आहे की, मधुरच्या आयुष्याचा एक कमीत कमी स्तर तर निश्चितच आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याची चांगली सोय केलेली आहे. त्यामुळे आता लगेच पॅनिक होण्याची गरज नाही. जास्त पुढे जाण्याचा रस्ता आपण शोधू या. भरमसाट गुण मिळवणं ही काही त्याची कौशल्याची बाजू दिसत नाही आणि एखादी कला किंवा खेळ यामध्येसुद्धा त्यानं अजून काही प्रावीण्य दाखवलेलं नाही. म्हणजे थोडा वेगळा विचार करावा लागेल, त्याबद्दल बोलू या.’’
‘‘एक्झॅक्टली! तेच मला म्हणायचंय. पण सुचत नाहीये काय करावं ते!’’
‘‘मी जरी बँकेत क्लार्क म्हणून सुरुवात केली, तरी तिथे थांबलो नाही. खूप पुढे गेलो. भरपूर यशस्वी झालो. मी अनेक यशस्वी माणसांबरोबर कामसुद्धा करतो. तुझ्या कंपनीच्या मालकासारखी अनेक माणसं तुलाही भेटली असतीलच की! शिक्षण साधारण असूनही यश मिळवणारी आणि खूप समाधानाचं आयुष्य जगणारी खूप माणसं आहेत या जगात. या सर्व माणसांमध्ये काही समान गुण आहेत.’’
हेही वाचा : सांधा बदलताना : निवृत्तीचा काळ सुखाचा…
स्वानंदच्या चेहऱ्यावर काय भाव दिसताहेत, त्याकडे पाहात काका सांगत राहिले. ‘‘एक म्हणजे त्यांच्यात भरपूर उत्साह आणि सतत काही तरी करत राहण्याची इच्छा असते. दुसरं म्हणजे इतर लोकांना जिथे फक्त प्रश्न दिसतात, तिथे काही तरी उत्तर शोधण्याची त्यांची इच्छा असते. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या बरोबरीच्याच नव्हे, तर लहान आणि मोठ्यांबरोबरसुद्धा त्यांची चांगली मैत्री जमते. इतरांना मदत करायला ते कायम तयार असतात. चौथी गोष्ट- आपल्या आजूबाजूचं जग हे संधी आणि सुबत्ता यानं भरलेलं आहे आणि आपल्याला काही तरी चांगलं काम निश्चित जमेल, याचा त्यांना आत्मविश्वास असतो. आणि शेवटची गोष्ट म्हणजे इतरांकडे मदत मागायला, सल्ला मागायला त्यांना लाज वाटत नाही. म्हणजे सकारात्मक दृष्टी, उत्साह, समाजाभिमुख आणि मैत्रीपूर्ण स्वभाव, हा या मंडळींमध्ये असतो.’’
‘‘म्हणजे आता मधुरचा जसा स्वभाव आहे अगदी तसंच!’’ स्वानंद एकदम बोलून गेला.
‘‘बरोबर! हा बालसुलभ आणि तारुण्यसुलभ उत्साह जपून ठेवणं आणि आयुष्याला उत्साहानं सामोरं जाणं, हे केलं की यश सापडतंच रे! आनंद अगदी असतोच तिथे. फक्त वेळ लागतो आणि रस्ता जरा नागमोडी असतो. ‘एक्स्प्रेस वे’ नसतो यशाचा.’’
स्वानंदचा चेहरा एकदम उजळला आणि शिंदे काकांचा मात्र गंभीर झाला.
‘‘हे बघ स्वानंद, आठवी-नववीपर्यंत सगळी मुलं अशीच उत्साही असतात. पण सततचं करिअरबद्दलचं बोलणं, स्पर्धेची भीती, गुणांवरचं सततचं लक्ष आणि ज्यांना ९५ टक्क्यांच्या वर मार्क नसतात त्यांचा संपूर्ण सिस्टीमकडून घरात, शाळेत, ट्यूशनमध्ये आणि सगळीकडेच सततचा होणार छळ, यामुळे बहुतांश मुलांचा आत्मविश्वास निघून जातो. बारावीपर्यंत ही मुलं अगदी पंक्चर होऊन जातात! अभ्यासाला एका विशिष्ट वेळेचं कुंपण घालून खेळ, सामाजिक कार्यक्रम, कला, वेगळे वेगळे उपक्रम हे करायला जर वेळ शिल्लक राहू दिला, तर फक्त ‘नोकरी एके नोकरी’च्या पलीकडे काही तरी जमू शकेल. आयुष्यात कुठे तरी संधी मिळत राहतील, इतर लोकांशी कनेक्ट होऊन स्वत:चा एक गट म्हणून काही तरी व्यवसायात माणसाला आनंदानं, भरपूर पुढे जाता येतं. नाही तर दोन पगार आणि सुखवस्तू आयुष्यसुद्धा काळजीनं पोखरून पोकळ होऊन जाईल!’’
हेही वाचा : गर्दीच्या गारुडात गारद विवेक
‘‘काका, हा टोमणा मात्र मला समजला बरं का! आणि पटलासुद्धा. खरंच मधुर गोड मुलगा आहे. त्याचा आनंदी स्वभाव टिकला तर त्याचं काही तरी चांगलं होईल. मला वाटतं की, बाप म्हणून माझी खरी जबाबदारी आहे ती त्याचा आत्मविश्वास टिकवण्याची. फक्त गुण या एका विषयावर त्याची पूर्ण परीक्षा न करण्याची. गुण मिळवून देणं ही काही माझी जबाबदारी नाही. थँक्यू काका. आता लगेच बोलावून घेतो प्रिया आणि मधुरला.’’असं म्हणत स्वानंद उभा राहिला आणि खिशातली काडेपेटी-सिगारेट फेकण्यासाठी कचरापेटी शोधू लागला.
chaturang@expressindia.com