‘इतरांना मिळतात, मग मलाच का नाही मिळत गर्लफ्रेंड?’, हा एकच सवाल.. पण अनेक तरुणांचं हृदय भंग करणारा. आणि एकदा का हा प्रश्न सतावायला लागला, की त्याचं उत्तर शोधण्यासाठी स्वत:विषयी न्यूनगंड वाटण्यापासून ते स्वत:ला ‘स्मार्ट’ बनवण्यापर्यंत हरकोशीश प्रयत्न केले जातात. भरीस भर म्हणजे,जेव्हा आई-वडीलही ते समजून घेत नाहीत तेव्हा त्याच्यावर, ‘हृदय रिकामे घेऊनी फिरतो..’ म्हणायची वेळ येते. खरंच या प्रश्नाचं सरळसोट उत्तर सापडू शकतं का?..
कॉलेजला निघण्यापूर्वी मी आरशात स्वत:ला पुन्हा न्याहाळलं. कमावलेले दंड शर्टाच्या बाह्यांतून डोकावत होते. दाढी-मिशी मुद्दाम झिरोकट ठेवली होती. ‘भारी’ वाटतोय की नाही? ‘कूल’ लुक आहे ना चेहऱ्यावर? केसांना जेल लावलं होतं. चप्पू तर नाही दिसत नाहिए ना मी? अभ्यासू मुलांची ‘नेभळट’ म्हणून मुली चेष्टा करतात. स्पाइक्स काढायचे का? पण मग मुद्दाम हिरोगिरी करतोय, असं तर नाही ना वाटणार मुलींना? एका मागोमाग एक विचार करत मी आरशासमोरच थबकलो.
हेही वाचा : मला घडवणारा शिक्षक: पित्याने दिला ज्ञानरूपी वसा
‘‘काय रे चैतन्य, मुलीसुद्धा एवढा वेळ आरशात बघत नसतील. कुठल्या खास मैत्रिणीबरोबर डेट आहे वाटतं?’’ बाबांचा हसण्याचा आवाज कानांवर पडल्यावर मी चमकलो. ते तिथे कधी येऊन उभे राहिले ते मला कळलंच नव्हतं. चुरचुरणाऱ्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं. डेट तर सोडूनच द्या, पण कुठली मुलगी बघतही नाही माझ्याकडे! कुठल्या गोष्टीत गंमत करायची तेही कळत नाही बाबांना! मनातल्या मनात चरफडत मी उत्तर न देताच बाईकची किल्ली घेऊन घराबाहेर पडलो. बाईकवर स्वार होताना आठवलं, की बाईक घ्यायला आईबाबांचा किती विरोध होता ते!
‘एवढय़ात कशाला पाहिजे बाईक? आधी कमवायला लाग. स्वत:च्या पायांवर उभा राहा आणि मग घे!’ बाबांचं प्रवचन चालू झालं.
‘एकदा बाईक मिळाली की सुसाट नेशील. रोज कुठे ना कुठे बाईकचे अपघात होत असतात. त्यात बहुतांशी तरुणच असतात.’ आईनेही मग री ओढली, पण आईबाबांचं बोलणं मला ऐकूच येत नव्हतं. माझ्याडोळय़ांसमोर चित्र तरळत होतं. मी ऐटीतबाईकवर बसलोय, माझी गर्लफ्रेंड पाठीमागे मला घट्ट बिलगून बसलीय, भन्नाट वाहणारा वारा आणि माझंउधाणलेलं मन! पण माझ्या मनाचं उंच आभाळात उडणारं विमान दाणकन जमिनीवर आदळायलाआईबाबा तयारच होते. मग कितीतरी मनधरणी, वादविवाद, वाटाघाटी! अखेरीस ही बाईक हातात आली खरी, पण अजून गर्लफ्रेंडचा पत्ता नाही! एकटय़ानंबाईक चालवण्यात काय मजा? गर्लफ्रेंडशिवायबाईकला शोभा नाही!
हेही वाचा : मला घडवणारा शिक्षक: कॅलिग्राफी
काय करायचं बाकी ठेवलंयगर्लफ्रेंड मिळवण्यासाठी? जिम जॉइन केलं, हेअरस्टाइल बदलल्या, ढापण्या दिसतो म्हणून लेझरट्रीटमेंटनं चष्म्याचा नंबर काढला. पण माझी पाटी कोरी ती कोरीच! मित्र मारे सांगत असतात की आम्ही गर्लफ्रेंडबरोबरयांव केलं आणि त्यांव केलं, पण मला मात्र नुसत्या कल्पनेवरच समाधान मानावं लागतंय! मी असा कुठला अपराध केलाय की मला रोमान्स करता न येण्याची शिक्षा मिळावी? ग्रुपमध्ये मैत्रिणी आहेत, पण गर्लफ्रेंड आणि मैत्रिणीत फरक आहे ना? गर्लफ्रेंड म्हणजे अगदी खास, हृदयाजवळ ठेवावी अशी!
दहावीत बसनंक्लासला जायचो, तेव्हा बसमधली एक मुलगी आवडायची. तिच्याकडे पाहून वाटायचं, की अगदी आपल्याला आवडते तश्शीच आहे. मोठे डोळे! नाजूक जिवणी! मी अधूनमधून तिच्याकडे पाहायचो. तीही नजरेला नजर द्यायची. मंद हसायची. मनात फुलपाखरं उडत राहायची. हे आठवडाभर चाललं होतं. पुढे काही घडण्याअगोदर ती अचानक बसमध्ये यायचीच बंद झाली. तिचा खूप शोध घेतला, पण जणू काही ती हवेतच विरघळून गेली. मग फुलण्याधीचविझलेल्या प्रेमाचा शोक करत बसलो! कॉलेजला गेल्यावरही वर्गातली एक मुलगी आवडली होती. गहिरे डोळे, निरागस चेहरा. वाटलं, हीच आपली स्वप्नप्रिया! थोडंसं बोलणं होऊ लागलं. एकदा वर्गात तिला सर गैरहजेरीबद्दल ओरडले आणि परीक्षेला बसता येणार नाही अशी तंबी दिली. तिच्या डोळय़ांत पाणी बघून मी गहिवरलो. सरांकडे चकरा मारत राहिलो. तिला परीक्षेला बसू द्यावं म्हणून रदबदली केली. वाटलं, आता लाईन मोकळी झाली. पण कसचं काय! काम झाल्यावर ती एका सीनिअरबरोबर दिसायला लागली. मी बसलो हात चोळत. नुसता तिळपापड उडाला होता माझा! मग आणखी एक भेटली. आमच्यात मेसेजहीएक्सचेंज होऊ लागले, पण ती अध्येमध्ये गायब व्हायची. कधी उत्तर द्यायची, कधी बराच काळ नाही. तिला माझ्यात रस आहे की नाही, तेच कळायचं नाही. हळूहळू समजलं, की ती मला चक्क ‘बेंचिंग’ करत होती. म्हणजे तिचंदुसऱ्याशीही प्रकरण चालू असणार. पण त्याच्याशी बिनसलं तर कुणीतरी पर्याय हवा, म्हणून अधूनमधून माझ्याशी बोलत होती. म्हणजे मी तिचा बॅक-अपऑप्शन होतो. अंगाची लाहीलाही झाली. पण करणार काय?
मलाच सगळय़ा अशा कशा भेटतात? सगळय़ा चालू आणि बनेल असतात, याचा अनुभव येऊनही शेवटी मुलींसाठीच झुरावं लागतंय मला. किती वेळा मुलींचा विचार करायचा नाही, असा निश्चय करतो. पण निश्चय जेवढा ठाम, तेवढा अधिक वेळ मुलींचाच विषय मनात घिरटय़ाघालतो.. कॉलेजमध्ये पोहोचलो तर सगळा ग्रुप कट्टय़ावर बसून हसतखिदळत होता. मला पाहून चिराग म्हणाला, ‘‘काय रे चैतन्य, आज देवदासासारखा चेहरा पाडून का आला आहेस?’’
हेही वाचा : पाहायलाच हवेत: वहिवाटेच्या पलीकडचा प्रवास
गौरव म्हणाला, ‘‘अरे, चैतन्यचीसिक्रेटगर्लफ्रेंड असणार! आपल्याला पत्ताही लागू दिला नाही बेटयानं!’’
प्रज्ञा म्हणाली, ‘‘ हं! खाली मुंडी आणि पाताळ धुंडी!’’ सगळे माझी फिरकी घेऊ लागले. मी कसाबसा तिथून सटकलो.
चिरागबद्दलचा राग मनात काठोकाठ भरला. काय गरज होती याला माझी थट्टा करण्याची? मला गर्लफ्रेंड नाही याचं दु:ख याच्याशीशेअर केलं तर त्यावर फुंकर मारायची सोडून उलट जखमेवरची खपली काढतो? स्वत:चा प्रेमभंग झाला तेव्हा काय म्हणाला होता? म्हणे ‘गर्लफ्रेंडच्या फंदात न पडलेलंच बरं! सतत त्यांची मनधरणी करा, मर्जी राखा, आणि एवढं करून फट् म्हणता त्यांचं कधी बिनसतं ते कळत नाही! शिवाय त्यांना भेटवस्तू देता देता खिसा रिकामा कधी होतो तेही समजत नाही. नकोच ती ब्याद!’ पण एवढं म्हणून नवीन गर्लफ्रेंडशी मात्र यानं लगेच संधान जुळवलं. त्या वेळी त्याच्या खोटेपणाचा राग येण्याऐवजी त्याचा चक्क हेवा वाटला. पठ्ठय़ाला प्रेम करायला गर्लफ्रेंड तरी मिळते! कुठल्यातरीकवीनंम्हटलंय ते खरंच आहे, ‘अजिबात प्रेम न करण्यापेक्षा प्रेम करून प्रेमभंग झालेला परवडला!’
हल्ली लेक्चरलाजावंसंच वाटत नाही. मी कॅम्पसमध्येच रेंगाळत राहिलो. तिथे तर जिथे नजर जावी तिकडे कपल्स! अंग आतून भाजून निघालं. एकटेपणा अंगावर आला. कदाचित मी एकटा राहाण्यासाठीच जन्माला आलो असेन. जन्मभर एकटंच राहण्याची तर माझी नियती नसेल?
मी सिगरेटशिलगावली. सनी म्हणाला होता, ‘‘एकटा आहेस, चिल कर! नाहीतर सगळं स्वातंत्र्य घालवून बसशील. अरे, आपण काय खायचं, काय कपडे घालायचे, हे गर्लफ्रेंडस् ठरवतात. साधा सिनेमाही स्वत:च्या आवडीचा बघता येत नाही. इतर मुलींकडे नुसतं बघितलं तरी थयथयाट करतात.’’ सनीचे त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर खटके उडत होते, म्हणून हे शहाणपण त्याला सुचत होतं. मग म्हणाला,‘‘‘तू कसा, कुठल्याही मुलीकडे बघायला मोकळा! लकी आहेस यार!’’
मी नुसताच मुलींकडे बघत बसतो. पटवता तर एकही येत नाही. म्हणे मी लकी! मी वैतागूनसिगरेटविझवली.
लांबवर मुलींचा घोळका दिसत होता. तिथे नक्की अमोल असणार! हा आहे किडकिडीत, पण मुली त्याच्याशी काय गुलुगुलु बोलत असतात कोण जाणे! त्याला सतत गर्लफ्रेंड मिळत असतात. एकीशी ब्रेकअप झाला तर दुसरी लगेच मिळतेच! हा डबल डेटिंग करतो हे त्याच्या आताच्या गर्लफ्रेंडलामाहितीय, तरीही ही याच्याशी एकनिष्ठ! हा आपल्या एकनिष्ठतेला लायक नाही हे तिला कळत नाही का? का मुलींना लायक मुलगे नकोच असतात? नक्की हवं तरी काय असतं मुलींना?
एकदा हा प्रश्न मी ग्रुपमधल्या जान्हवीला विचारला. ती म्हणाली, ‘‘मुलांना वाटतं, की ‘सिक्स पॅक अॅ ब्ज’ दाखवणारा नाहीतर‘माचो’ टाइप असणारा मुलगा मुलींना आवडतो. खरं सांगू का, त्याहीपेक्षा मुलींना समजून घेणारा, त्यांच्याशी भावनिक जवळीक साधणारा, त्यांना काय वाटतंय ते कळणारा मुलगा त्यांना जास्त आवडतो. खरं तर सगळय़ा मुलांना याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे!’’ मला वाटलं ही मलाच टोमणा मारतेय. मी विषयच बदलला. वाटलं, माझ्यातएम्पथी ओसंडून वाहतेय. पण ती माझ्यात आहे, हे मुलींना कळणार कसं? म्हणजे परत त्याच प्रश्नाशी येऊन थबकलो. अमोल, चिराग, सनी या सगळय़ांनागर्लफ्रेंडस् मिळतात. एक नाही, अनेक! मग मलाच का नाही मिळत? निदान एक तरी? माझ्यात काही कमी आहे की काय?.. मी नखशिखांत हादरलो. कितीही दाबून ठेवला तरी स्वत:बद्दलचा कमीपणा उफाळून वर आलाच! एकही मुलगी पटवता येत नाही. सुरुवात केली तर पुढे जाता येत नाही. भविष्यात तरी मला काही धड जमणार आहे का? का नुसतेच मनचे मांडे? मन उदासीनं भरून गेलं. लेक्चर्स, मार्क्सा, सगळं निर्थक वाटू लागलं..
हेही वाचा : ‘पिंक ऑक्टोबर’चा सांगावा!
घरी आलो तर आईबाबांच्याचेहऱ्यावरूनच कळलं की खडाजंगी होणार! कॉलेजचं पत्र बाजूला पडलं होतं. कव्हरवरून कळलं, की ते लेक्चर्सना गैरहजर राहण्याबाबतचं असणार. ‘‘सांगत होते तुम्हाला चैतन्यलाबाईक देऊ नका, की डोळय़ांसाठीलेझरट्रीटमेंटला पैसे देऊ नका! सगळय़ाहौशीमौजी पुरवल्या, पण याचं अभ्यासात लक्ष कुठाय? नुसताच छानछौकीवर खर्च!’’ आईचा स्वर टिपेला पोहोचला होता.
‘‘अरे, लेक्चर्सबुडवून तू करतोस काय? मुलींना फिरवत असशील! कॉलेजला अभ्यास करण्यासाठी जातात, मुलींना फिरवण्यासाठी नाही. मुलींच्या पाठी लागलं की अभ्यासावरचं लक्ष उडतं. आता डेटिंग वगैरे सगळं बंद! फक्त अभ्यास करायचा! शेवटचं वर्ष आहे ना तुझं? मार्क्सष चांगले काढायलाच हवेत!’’ बाबा गरजले. आईबाबा बराच वेळ सुनावत होते.
..मी माझ्या मनावर कवच ओढून घेतलं आणि आतल्या अगदी खास शिंपल्यात शिरलो. मला काय वाटतंय ते कुणाला कळत नसेल, तर मी तसं करतो. मग कानांवर शब्द पडले तरी ऐकू येत नाहीत. माझ्या व्यथा-वेदना गाडल्या जातात. त्यावर मी एक स्वप्नांचा महाल उभारतो. आणि त्या महालात प्रवेश करणाऱ्यामाझ्यास्वप्नसुंदरीचं चिंतन करत राहतो..
anjaleejoshi@gmail.com