डॉ. आशुतोष जावडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लडका-लडकी कभी दोस्त नही बन सकते’, हा हिंदी चित्रपटातला टिपिकल डायलॉग. काळाच्या कसोटीवर टिकलाय की आजच्या पिढीने तो चुकीचा ठरवलाय? पुरुष वाचकहो, तुम्ही सांगायचंय. आहे का तुमची एखादी अशी निखळ मैत्रीण, जिच्याबरोबरचं नातं ना तुम्हाला कधी लपवावंस वाटलं, ना तुम्हा दरम्यानचं अंतर तोडावंस वाटलंय. अर्थात भिन्निलगी मैत्रीण म्हणून वाटलंच असेल ‘वेगळं’ आकर्षण, तर त्या भावनेची वासलात कशी लावलीत? काय आहे तुमच्या दोघांच्या घट्ट नात्याचं रहस्य? काय आहे तुमच्या नात्यातलं चुंबकत्व? आणि हो, होऊ शकते का अशी निखळ मैत्री? आम्हाला कळवा तुमच्या प्रत्यक्ष मैत्रीच्या उदाहरणांसह आमच्या ईमेलवर – chaturang.loksatta@gmail.com ५०० ते १००० शब्दांत.

मित्राला मैत्रीण आणि मैत्रिणीला मित्र असणं हे आता सर्रास दिसणारं चित्र असलं तरी शतकभराआधी जगाच्या पाठीवर ते जवळजवळ नव्हतंच. आजही अनेक देशांत आणि संस्कृतींत ते सहज स्वीकारलं जात नाही. आजपासून ‘माझी मैत्रीण’ हे सदर सुरू होतंय आणि अनेक पुरुष वर्षभर त्यांच्या मैत्रिणींवर लेख लिहिणार आहेत, ही आश्वासक गोष्ट आहे.
आजही अगदी पुढारलेल्या महाराष्ट्रात पुरुषानं एखाद्या मैत्रिणीवर जाहीरपणे लिहिणं ही घटना त्याला, त्याच्या मैत्रिणीला,(तिला नवरा असेल तर त्याला!) आणि एकंदर घरादाराला सामाजिक गॉसिपच्या मध्यिबदूशी उभी करू शकतेच. जे अगदी विशीत आहेत त्यांना असली दडपणं येणार नाहीत आणि जे सत्तरीपलीकडचे ‘फेसबुकाधीन’ नववृद्ध आहेत त्यांनाही येणार नाहीत. मधल्या टप्प्यातल्या पुरुषांना कदाचित मैत्री जाहीर करावीशी वाटणार नाही. कदाचित त्यांच्या मैत्रिणींना ती मैत्री ‘पब्लिक डोमेन’मध्ये गेलेली रुचणार नाही. खेरीज बदलत्या काळाचा रेटाच असा आहे, की मुळात मित्रा-मित्रांमधली इतकी नितळ अथवा खरी मैत्रीही एकंदर दुर्मीळ होत चालली आहे. अर्थात अनेक जण मैत्रीवरचे हे लेख लिहितील, त्यांना वेळोवेळी दादही मिळेल, पण त्याच वेळी मनात काही प्रश्न रुंजी घालतील.

हेही वाचा : निद्रानाशाच्या विळख्यात..

पहिला म्हणजे समानिलगी नात्यात जशी मैत्री होते तशी मैत्री एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यात होऊ शकते का? त्यात वैषयिकतेचा धागा असतो का? राहतो का, रेंगाळतो का? ‘सायंटिफिक अमेरिकन’ हे १८४५ पासून निरंतर प्रकाशित होणारं अमेरिकेतलं जुनं-जाणतं मासिक आहे. दोनशेहून अधिक नोबेल पारितोषिक विजेते तिथे लिहिते झालेले आहेत. ही पार्श्वभूमी अशासाठी सांगितली, की या मासिकात एक रोचक लेख प्रसिद्ध झाला होता. २४९ स्त्री-पुरुषांचा मैत्रीबाबत अभ्यास केला गेला आणि त्यातले निष्कर्ष अगदी वेगळे होते. म्हणजे समाजात स्त्री आणि पुरुष एकत्र ऊठ-बस करतात, ऑफिसमध्ये काम करतात, प्रवास करतात, करमणुकीच्या ठिकाणी जातात आणि हे सगळं होताना त्यांच्यातल्या आदिम प्रेरणा कार्यरत होऊन फार गोंधळ उडतो असं दिसत नाही. पण हा अभ्यास सांगतो, की त्या आदिम प्रेरणा निर्णायकरीत्या मागे थांबलेल्या असतात. त्यातही पुरुषांना लैंगिक सुप्त आकर्षण अधिक वाटत असतं. खेरीज समोरच्या स्त्रीलादेखील ते तसंच आपल्याविषयी वाटत आहे असाही भ्रम अनेकदा पुरुष जोपासतात. यात वयाच्या हॉर्मोन्सचा वाटा म्हणावं तर तेही निष्कर्ष उलटे आहेत. चाळिशीच्या ‘घोडय़ा’ पुरुषांना मैत्रिणींमधील स्त्रीची आवाहकता जास्त वाटते! स्त्रियांना जे आकर्षण पुरुषांविषयी वाटतं, त्याहून चारपट अधिक आकर्षण विशीच्या पुरुषांना वाटतं. मोठय़ा वयाच्या पुरुषांना ते दहापट वाटतं!

हेही वाचा : सांधा बदलताना : स्थित्यंतराचे पडसाद

हा अभ्यास आणि त्यातले गणिती निष्कर्ष वाचताना गंमत वाटली. आमचे पुरुषा-पुरुषांचे ग्रुप असले की यासंदर्भात काय गप्पा होतात ते आठवलं. मैत्रिणीसमोर सभ्य वागणारा आणि ती मैत्री निर्विष आहे अशी खात्री देणारा पुरुष त्याच्या जवळच्या मित्रांबरोबर असताना त्याच मैत्रिणीविषयी काय बोलतो हे ऐकलं तर त्या मैत्रिणीची झोप उडेल! म्हणजे असं प्रत्येकीच्या बाबतीत होतं असं नाही, पण अनेकदा होतं. त्याचं जीवशास्त्रीय कारणदेखील आहे. पुरुषाचं शरीर फार सुंदर बोलकं असतं. त्याच्या शरीरकळा अनेकदा त्यालाही पेलत नाहीत. विरुद्धिलगी व्यक्तीशी मैत्री करताना अनेकदा त्या शरीराला त्याला कळत नकळत वळण लावावं लागतं. ज्या स्त्रीला पुरुष उमगतो ती हा ताण जाणून असते आणि आपल्यामुळे तो ताण वाढणार नाही याची काळजी घेते. हे अगदी सगळं सूक्ष्मरीत्या होत असतं. पण ते होतं हे नक्की. कधी कधी यालाही मोठे अपवाद असतात. पुरुषाला एखादी स्त्री ‘हॉट’ वाटत नसते, पण उलट तिचं ‘अल्ट्रा-कूल’ असणं त्याला आवडतं. स्त्रियांना या संदर्भात नक्की काय वाटतं हे त्यांनाच मांडावं लागेल. पण माझ्या मैत्रिणी सांगतात, की अनेकदा मुलींना एक भक्कम खांदा लागतो रडायला! गमतीत सांगायचं, तर नवऱ्याच्या कागाळय़ा करायला एक पुरुष मित्र हवा असतो. हे खरंच आहे की दुसरी मैत्रीण तिला देईल त्या सल्ल्याहून मित्र- तो स्वत:ही पुरुष आणि नवरा असल्यानं- अधिक उचित सल्ला यासंदर्भात देईल. बाकी यात काही वेगळय़ा शक्यता पुढे असतात का?.. माझी एक कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारी मैत्रीण मला सांगत होती, की तिनं तिच्या सगळय़ा मित्रांना त्यांच्या ‘बायसेप्स’चे फोटो वगैरे पाठवू नका असं सांगितलं आहे. (म्हणजे हे किती सार्वत्रिक झालं आहे बघा!) मग मी विचारलं, ‘‘ऐकतात का मित्र मग तुझं?’’ तर ती म्हणाली, ‘‘लगेच ऐकतात, खूण ओळखून घेतात आणि पुढे फार मस्त संवाद होतो. त्यात सेक्शुअल टेन्शन नसतं.’’ मला आवडलं तिचं म्हणणं. आणि त्याच वेळी वाटलं, की कदाचित स्त्री-पुरुष मैत्रीत आत लपलेलं हलकं सेक्शुअल टेन्शन आहे तेही सुंदर आहे.

हेही वाचा : ‘एका’ मनात होती..! मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते..

राधा आणि कृष्ण यांच्या नात्यात जी अद्भुतरम्यता आहे, ती सगळय़ांना आयुष्यात एखाद्या टप्प्यावर आपण स्वत: अनुभवावी असं वाटतं. आपल्यापुढच्या वाटा मात्र अनेक असतात आणि अनेकदा त्या कमालीच्या निसरडय़ादेखील असतात. मैत्रीही नाही, प्रेमही नाही आणि उद्विग्नता आणि फसवणूक आहे, असंदेखील अंतिमत: होऊ शकतं. या लेखात मी व्यक्तिगत उदाहरणं घेतलेली नाहीत. पण एवढं नक्की सांगीन, की पुरुषाच्या आयुष्यात मैत्रिणी जसा आनंद आणतात त्याला तोड नाही! तो अनुभव वेगळा आहेच आणि प्रत्येक वेळी त्यात लिंगाधारित असं आवर्तन नसतंच. माझ्या डेंटल कॉलेजमधल्या पंजाबी मैत्रिणींनी मला एकदम बिनधास्त बनवलं आणि मोकळं केलं. खेरीज मला त्यांनी फॅशनची दीक्षा दिली. ती प्रत्यक्षात उतरायला पुढे अनेक वर्ष लागली, तरी आजही माझा ‘इन्स्टा’वरचा फोटो बघून माझ्या पंजाबी सख्या मला शर्ट आणि अ‍ॅक्सेसरीजवर लेक्चर आणि सल्ले देतातच. कधी एखादी मैत्रीण लेखनाच्या रस्त्यावरची सहप्रवासिनी असते. तिच्याबरोबर गप्पा होतात तेव्हा निर्मितीचा सामायिक धागा मध्ये असतो. एक वेगळा बौद्धिक आनंद अशा मैत्रीत असतो. माझी एक पत्रकार मैत्रीण आमची दहा वर्षांची ओळख असूनही अद्याप मला एकदाही भेटलेली नाही. ती दक्षिण भारतात वेगळय़ा गावात असते आणि आम्ही फोनवर बोलतो तेव्हा एकदम मनातलं शेअर करतो. अशी गमतीशीर मैत्रीही सध्याच्या काळात होऊ शकते. कॉलनीतली बालमैत्रीण आणि शाळेतली (आवडणारी मुलगी?) मैत्रीण हा एक स्वतंत्र विषय आहे, इतकं नाटय़ त्यात असतं. ते दोन्ही अनुभव मला व्यक्तिगत आयुष्यात समृद्ध करून गेले एवढं इथे सांगतो.

हेही वाचा : ‘भय’भूती : एकाकीपणाचं सावट

‘भार्या मित्रं गृहेषु च।’(अर्थात, घरी बायकोच मैत्रीण असते!) हे कुठेतरी भारतीय पुरुषांच्या मनात असतं. पण त्यासाठी आपण स्वत: आधी उदार मित्र बनण्याची त्याची तयारी नसते हेही सत्य आहे. जर दोघांनी थोडी मेहनत घेतली तर ते एकमेकांचे उत्तम मित्र-मैत्रीण बनू शकतात. माझ्या ‘मुळारंभ’ कादंबरीची अर्पणपत्रिका आहे- ‘मानसी या माझ्या सर्वोत्तम मैत्रिणीस.’ पण पत्नी हीच एकमेव मैत्रीण असं कुणी म्हणत असेल तर तो इसम खोटं बोलतो आहे असं खुशाल समजावं! बोरकर म्हणाले आहेतच-‘जी जी उगवे चांदणी, तिच्यापरीने देखणी’! इथे बाकीबाब यांना स्मरून ‘स्माईली’ जोडा पुढे!

हे सगळं बोलताना आपण बदलतं ‘जेंडर फ्लुइड’ जग ध्यानात घ्यायला पाहिजे. आकर्षणाचे आणि मैत्रीचे परीघ हे अनेकदा लिंगाच्या सीमा ओलांडत असतात आणि ते अनेकदा ‘ओव्हरलॅप’ करतात. स्त्री-पुरुष मैत्री ही ‘प्लॅटॉनिक’ होऊ शकते का, हे विचारणाऱ्या लोकांनी मुळात समान लिंगांमधली मैत्रीदेखील खरोखर पूर्णत: प्लॅटॉनिक असते का, हे विचारायला पाहिजे. आता काळ इतका बदलता आहे, की हे नातं सोडा, मुळात मैत्रीचंच नातं टिकेल की नाही, यावर आता प्रश्नचिन्ह आहेत असं मला वाटतं. अनेकदा उघड स्वार्थ मैत्रीच करू देत नाही. दुसरीकडे चलाख स्वार्थ हा चलाख मैत्रीच्या आवरणाखाली आपले हेतू साध्य करून घेतो. कुण्या एकाची मग प्रतारणा होते आणि फसवणूक होते. एका शून्यातून आधार घ्यायला दुसरीकडे जावं, तर तिथेही मोठं शून्य असतं. अशा झंझावातात खरं तर हक्काचा मित्र अथवा मैत्रीण असणं ही सध्याच्या काळातली ‘लक्झरी’ आहे!
‘काय झाले गं बोटाला बाई बांधलीस चिंधी, मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी’ असं कवी ग्रेसांनी लिहिलं आहे. मला तर या ओळी वाचताना, गाताना कृष्णच डोळय़ासमोर येतो! संध्याकाळी मित्रानं असं आपुलकीनं विचारावं ही साधी अपेक्षा अनेकदा स्त्रियांची असते. त्यात काव्य असतं, नाटय़ असतं. मैत्रीला खरंच लिंग असतं का? आणि ती खरंच लिंगातीत असते का? असली तर त्याची व्याप्ती आणि खोली किती असते?- बघूया वर्षभर!
ashudentist@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of a very close friend whether its girl of boy mazhi maitrin css
Show comments