रात्रीचे अकरा वाजून गेले होते, बठकीच्या खोलीत अनिकेत, त्याचे वडील शंकरराव आणि त्यांचा सी.ए. बसले होते. उमाबाई आणि सून अलका त्यांच्या बोलण्याचा कानोसा घेत होत्या. काहीतरी गंभीर बोलणे चालू आहे, एवढेच त्यांना समजले. बेचन होऊन उमाबाई तिथून निघाल्या आणि आपल्या खोलीत जपमाळ घेऊन बसल्या. त्यांच्या अंदाजाप्रमाणे शंकरराव खूप चिडले होते, खोलीत आल्यावर स्वत:शी बोलत होते, ‘‘काय समजतो स्वत:ला? त्या सी.ए. समोर मला म्हणाला, तुम्ही आता धंद्यात लक्ष का घालता? मध्ये मध्ये बोलू नका, मला माझ्या पद्धतीने काम करू द्या.’’
‘‘ काय चुकलं त्याचं?’’ उमाबाई पटकन बोलून गेल्या, शंकरराव आणखी संतापले, उमाबाईंनी शांतपणे त्यांच्या हातावर बीपीची गोळी ठेवली आणि त्या झोपायला निघून गेल्या. अलीकडे हे नेहमीचंच झालं होतं, शंकरराव यांचा रबर फ्लोअिरगचा धंदा, त्यांच्या सांगण्यावरूनच, अनिकेतने चालवायला घेतला होता, अमेरिकेत जाऊन तो रबर टेक्नॉलॉजी शिकून आल्यामुळे त्याने आपल्या उत्पादनात खूप चांगले बदल केले होते, धंदा उत्तम चालू होता. आपल्याशिवाय याचं काही अडत नाही, हेच शंकरराव यांच्या चिडण्याचं प्रमुख कारण आहे, हे उमाबाई जाणून होत्या, िभतीकडे तोंड करून त्यांनी झोपेचं सोंग घेतलं. नाइलाजाने शंकरराव बिछान्यावर आडवे झाले. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. उतारवयात आपण काम करू शकणार नाही, हे सत्य मन स्वीकारत नव्हतं. झोप येत नव्हती, पहाटे चारच्या सुमाराला, उमाबाईंनी मान वळवून पाहिलं, त्या वेळी त्यांना शंकरराव दिसले नाहीत. बाथरूमचा दिवा चालू होता, त्या शंकररावांची वाट पाहत होत्या, बराच वेळ झाला तरी त्यांची चाहूल लागेना म्हणून त्या उठल्या. पाहिलं तर बाथरूम रिकामी. ते कुठेच दिसेनात, घाबरून त्यांनी अनिकेतला हाक मारली. ‘‘अनिकेत, हे घरातून निघून गेले की..’’
अनिकेत धावत आला. अलका वॉचमनकडे चौकशी करू लागली, पाहता पाहता सकाळचे सात वाजले, सोसायटीत बातमी पसरली, प्रत्येक जण शंकरराव यांचा शोध घेऊ लागला, अखेरीस, पोलीस ठाण्यावर तक्रार देऊन, वृत्तपत्रांत त्यांना आवाहन करण्याचे ठरले.
इकडे पहाटे घर सोडून शंकरराव एस.टी.ने, आपल्या मित्राकडे, श्रीधरकडे लोणावळ्याला आले, श्रीधरपंत आयुर्वेदाचार्य होते. अविवाहित होते, त्यांच्याकडे अगदी आरामात राहायचं, असं शंकररावांनी ठरवलं.
‘‘ ये, ये, शंकर, अगदी अलभ्य लाभ,’’ श्रीधरपंतांनी मनापासून स्वागत केलं. ‘‘वहिनी कुठे आहेत? पांडू, वहिनी मागे राहिल्या का बघ, त्यांचं सामान आण पाहू,’’ श्रीधरपंत खूश झाले होते,
‘‘ श्रीधर, जरा निवांत बसू, उमा आली नाही, येईल परत कधीतरी’’ आज शंकरचं काहीतरी बिनसलं आहे, हे श्रीधरपंतांनी ओळखलं. त्यांनी जुन्या आठवणी, मित्र, शाळा-कॉलेज यावर गप्पा मारायला सुरुवात केली, दिवस कधी संपला हे दोघांच्या लक्षातही आलं नाही. रात्री झोपताना शंकररावांनी सर्व हकीकत सांगितली, ‘‘श्रीधर मी आता इथेच राहणार आहे, जिथे आपली किम्मत नाही तिथे आपण आता राहणार नाही, बरोबर आहे ना?’’
शंकरची सोबत मिळणार म्हणून श्रीधरपंतांना खूप आनंद झाला, त्यांनाही अलीकडे, वयामुळे एकटेपण नकोसे झाले होते. रात्रीचे नऊ वाजून गेले, शंकरराव घरी परतले नाहीत म्हणून सर्व माणसे खूप काळजीत होती, पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली, सर्व हॉस्पिटल, बगीचे, शंकररावांचा कारखाना, सारं काही शोधून झालं. अनिकेत फार उदास झाला होता. आपलं काय चुकलं, हे त्याला समजत नव्हतं. अखेरीस त्याने वृत्तपत्रात जाहिरातीद्वारे शंकररावांना आवाहन केलं. ‘‘असाल तिथून परत या.’’
दुसरा दिवस उजाडला, शंकरराव आणि श्रीधरपंत गप्पांमध्ये रंगले होते, इतक्यात नेहमीप्रमाणे पांडू वृत्तपत्र घेऊन आला, वृत्तपत्र चाळताना, श्रीधरपंतांना शंकरचा फोटो दिसला, ‘‘असाल तिथून परत या’’ लगबगीनं श्रीधरपंतांनी शंकररावांना त्यांचा फोटो दाखवला, ‘‘अरे वा, फोटो मस्त आहे, केव्हाचा? पगडी घातली?’’ शंकररावांनी कुतूहलानं फोटो पाहिला, ‘‘ हा मी साठ वर्षांचा झालो त्या वेळी काढलेला फोटो आहे, अनिकेतनं फार कौतुक केलं होतं, मला पगडी, हिला पठणी, काय उपयोग?आता घरी या म्हणतोय, कशाला?’’ फोटो आणि आवाहन पाहून शंकर मनातून खूश झाला आहे, हे श्रीधर पंतांनी ओळखलं. ‘‘शंकर, विचार बदलू नको हं.’’
‘‘छे रे, मी काही आता इथून घरी जायचा नाही’’ शंकरराव म्हणाले.
दोन दिवस होऊन गेले, शंकररावांचा काहीच शोध लागत नव्हता, उमाबाई, अनिकेत, अलका सारेच थकून गेले होते, दोन दिवसांनी अनिकेतनं पुन्हा जाहिरात दिली, ‘‘असाल तिथून परत या, आई तुमच्या काळजीनं आजारी पडली आहे, सारं काही तुमच्या मनासारखं होईल.’’
ही जाहिरात शंकररावांनी पहिली तेव्हा ते थोडे अस्वस्थ झाले. ‘‘काय शंकर, बघ, आजसुद्धा तुझा फोटो, ‘‘आताही, विचार बदलू नको हं.’’ श्रीधरपंत म्हणाले,
‘‘छे, मी कशाला जातोय, म्हणे सारं तुमच्या मनासारखं होईल आणि दोन दिवसांत तिला काय धाड भरलीय.’’ शंकरच्या बोलण्यात जोर नव्हता, हे श्रीधरपंतांनी ओळखलं. शंकररावांना पत्नीची आठवण येत होती, तिची काळजी वाटत होती, हे सांगायचा संकोच वाटत होता.
आईची समजूत कशी काढावी, हे अनिकेतला समजत नव्हतं, आईचं आपल्या वडिलांवर खूप प्रेम आहे, हे त्याला ठाऊक होतं, त्यांना शोधायला आई गेली तर? या कल्पनेने तो बेचन झाला. आईला मधुमेह आहे, संधिवात आहे, आपल चुकलं, या जाणिवेनं तो सरभर झाला.
आणि अखेरीस त्याला पुन्हा जाहिरात द्यावी लागली. या वेळी जाहिरातीत उमाबाईचा फोटो होता. ‘‘ प्रिय आई, असशील तेथून परत ये, मी नक्की बाबांना शोधून काढीन. आता तू आली नाहीस तर मी जगू शकणार नाही. -अनिकेत. ’’
शंकररावांनी ही जाहिरात पाहिली, आता त्यांना चन पडेना, श्रीधरपंतांचा निरोप घेऊन ते तडक निघाले.
आता उमाला शोधणं हे फार मोठं आव्हान त्यांच्या पुढे होतं.
आपल्या घरी येईपर्यंत त्यांना रात्र झाली होती, सर्वत्र निजानीज झाली होती. शंकररावांनी बेल वाजवली
अनिकेतनं दरवाजा उघडला.
‘‘ कुठे गेली तुझी आई? मी दोन दिवस नव्हतो, तुला नीट लक्ष देता आलं नाही? ’’
शंकरराव गरजले.
तेवढय़ात आतून आवाज आला, ‘‘आले वाटत घरी? गणराया, तुझी अशीच कृपा राहू दे.’’ गुडघ्यावर हात ठेवून उमाबाई बाहेर आल्या, पदराने डोळे पुसू लागल्या, अनिकेत काही न बोलता आत निघून गेला.
‘‘ उमा तू घरीच ? मग ती जाहिरात? खोटी? अनिकेत अरे इथे येईपर्यंत माझ्या मनाची काय अवस्था झाली तुला काय कळणार? मला फसवतो?’’
डोळ्याला पदर लावून, दाटलेल्या आवाजात उमाबाई म्हणाल्या, ‘‘ नेहमी फक्त आपल्या मनाचा विचार, मी घरी नाही या नुसत्या कल्पनेनं कासावीस झालात, पण तुम्ही आम्हाला टाकून सरळ घराबाहेर निघून गेलात, आमची काय अवस्था झाली असेल, हा विचार तुमच्या मनात आला नाही ना? ’’
काही क्षणातच अनिकेत, अलका बाहेर आले. शंकररावांना नमस्कार करून म्हणाले, ‘‘ बाबा, प्लीज कुठे जाऊ नका, तुमच्या मनात काय आहे? सारं तुम्ही सांगाल तस करू.’’
कुटुंबात आपण सर्वाना हवेहवेसे आहोत ही जाणीव खूपच सुखद होती, अनिकेतला जवळ घेऊन शंकरराव म्हणाले, ‘‘मला हवं ते सारं मिळालं, तुझ्यासाठी जिथे असेन तिथून परत येईन. अलका..’’
‘‘ कळलं.. मस्त चहा करते, आलं, दोन चमचे साखर, एक चमचा चहा पावडर.’’
उमाबाई कौतुकानं हा सोहळा पाहत होत्या, शंकरराव धोतराच्या सोग्यानं डोळे पुसत होते.
ेंिँं५्र.‘ं५्र२ँ६ं१1@ॠें्र’.ूे
‘असाल तिथून परत या!’
दोन दिवस होऊन गेले, शंकररावांचा काहीच शोध लागत नव्हता, उमाबाई, अनिकेत, अलका सारेच थकून गेले होते, दोन दिवसांनी अनिकेतनं पुन्हा जाहिरात दिली, ‘‘असाल तिथून परत या, आई तुमच्या काळजीनं आजारी पडली आहे, सारं काही तुमच्या मनासारखं होईल..’’
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-05-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of angry father