खिडकीशी मुंग्यांसारखे किडे दिसले म्हणून तिने ‘मुन्शिपाल्टी’ ला बोलवलं आणि त्यातून वेळ आली ती फायर ब्रिगेडला बोलवण्याची.. ऐन दिवाळीत मुंगीने घडवलेलं हे महाभारत
स्वत:च्या एक मजली घरात राहणाऱ्या विजूला दिवाळी आधीची साफसफाई करताना रस्त्यासमोरच्या खिडकीशी मुंग्यांपेक्षा थोडे मोठे काळपट किडे इतस्तत: फिरताना दिसले. नीट बघितल्यावर तिला कळले की ते घराच्या कंपाऊंडच्या भिंतीवरही पसरलेत आणि आसोपालवचे (अशोक) झाड त्यांचे उत्पत्तीस्थान आहे. कीटकनाशक स्प्रे मारून त्यांना घालवणे सोपे काम नव्हते. म्हणून तिने समोरच्या घरातील माळीकाम करणाऱ्याला विचारले तेव्हा त्याने ‘मुन्शिपाल्टी अशा झाडांवर फुकट फवारणी करून देते’ अशी माहिती पुरवली. दुसऱ्या दिवशी ती म्युन्सिपालिटीच्या वॉर्ड ऑफिसमध्ये वृक्षसंगोपन विभागाचा शोध घेत गेली व त्यांना झाला प्रकार सांगितला. तेव्हा अनेक सबबी सांगत एकजण तिच्या घरी आला. पण फवारणी करतानाच म्हणाला, ‘म्यॅडम, झाड लई मोठ्ठ झालय. त्याची छाटणी करून घ्या! नायतर अशे कीडे पुन्ना पुन्ना येणार!’ त्याच्या ‘चहापाण्याची’ सोय करून त्याची पाठवणी केल्यावर विजूने पुन्हा समोरच्या माळ्याला छाटणीसाठी बोलावले. त्यावर माळी उत्तरला. ‘म्यॅडम, आपल्याच हद्दीतल्या मोठय़ा झाडाच्या फांद्याबी छाटायला मुन्शिपाल्टीची परवानगी लागते. न्हायतर गुन्हा समजून शिक्षा होते. फकस्त त्यांचीच मान्सं हे काम करतील.’’ विजूच्या डोळ्यासमोर मोठय़ा टॉवर आणि मॉलच्या बांधकामात मध्ये येणारे मुळापासून उखडलेले भलेमोठे वृक्ष आले. पण झाडांबद्दलची तशी बेपर्वाई तिच्यासारख्या कायद्याची बूज राखणाऱ्या मध्यमवर्गीय मनाला जमणारही नव्हती आणि मुळात पटणारीच नव्हती.
संध्याकाळी नवऱ्याशी विचारविनिमय करून दुसऱ्या दिवशी पुन्हा तिने वॉर्ड ऑफिसकडे मोर्चा वळवला. तासाभरानंतर त्या विभागाचे साहेब अवतरले. झाडाच्या छाटणीबद्दल ती त्यांना काही सांगू पाहताच त्यांनी तिच्याकडून लेखी तक्रारीची मागणी केली. लिहून आणायचे कसे सुचले नाही म्हणून स्वत:वर चिडत तिने झटकन थोडक्यात तक्रार लिहून साहेबांकडे दिली. पण मग ती हातात न घेताच, त्यांनी विचारले, ‘तुम्ही झाडाचा फोटो आणलाय का? झाड भिंतीपासून किती अंतरावर आहे? फांद्या खरोखर भिंतीला, खिडकीला चिकटतात का? आम्हाला सर्व फोटोत दिसले पाहिजे!’ आता विजूला हे फोटो प्रकरण नवीनच होते. ती क्षणभर हताश झाली. पण आज या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच या निश्चयाने तिने पुन्हा आपले म्हणणे रेटायचा प्रयत्न के ला. तेव्हा तिचे बोलणे तोडत साहेबांनी विचारले ‘मॅडम, झाडाच्या बुंध्याचा घेर किती इंच आहे?’ दोन हातातील अंतर लांबवीत कमी करीत तिने दाखवायचा प्रयत्न केला. अखेर २ फुटांपेक्षा घेर कमी आहे म्हटल्यावर ‘अहो काय मॅडम? मग हे पत्र-बित्र कशाला?’ आधी लेखी मागितले आणि आता न वाचताच परत दिले म्हणून तिला मनात खूप राग आला पण.. त्यांनी पुढे बबन नावाचा माणूस संध्याकाळी झाडाची छाटणी करायला पाठवतो असे सांगितले. तेव्हा तिने, त्याला काही पैसे द्यायचे का असा बावळट प्रश्न विचारल्यावर ‘आता दिवाळी तोंडावर आलीय. करा काही त्याची ‘चहापाण्याची’ सोय. तेवढेच गरिबाला.. साहेब.
दुपारी ३ वाजल्यापासून बबनची वाट बघत ‘त्याच’ खिडकीशी बसली. सतत मारलेल्या स्प्रेच्या वासाने तिचे डोके ठणकू लागले होते. दिवाळीत येणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी, तिला बरीच तयारी करायची होती पण या नवीन उपटलेल्या कामांमुळे तिला वेळ मिळत नव्हता आणि मूडही नव्हता. ४ वाजता बबन साहेबांचे कार्ड घेऊन आला. तिने त्याला कामाची कल्पना दिली सुमारे २ तास छाटणीचे काम झाल्यावर त्याने तिला बोलावून सांगितले, ‘‘म्यॅडम आता कायपन टेंशन घेऊ नका. मी पार झाडाचा आनि मुंग्यांचा बंदोबस्त केलाय!’’ विजूची नजर खाली पडलेल्या छोटय़ा छोटय़ा फांद्यांकड गेली आणि तिने त्याला त्या जाताना घेऊन जायला सांगितले. त्यावर त्याने ‘‘मी हे समद भाईर ठिवतो, उद्या कचऱ्याची गाडी उचलून न्हेईल.’’ आनि काय प्रॉब्लेम झाला तर मला फोन करा की मोबाईलवर! मी धा मिंटात हज्जर!’’ असे सांगितले आणि विजूने हातावर ठेवलेली नोट घेऊन आणि चहा पिऊन तो निघून गेला, पण फुटपाथवरचा फांद्याचा ढीग विजूला स्वस्थ झोपू देईना. सकाळी स्वयंपाक करताना तिची नजर कचऱ्याच्या गाडीची वाट पाहात होती. एकदाची कचऱ्याची गाडी दिसली तेव्हा तिने धावतच खिडकीतून त्यांना तो कचरा उचलण्याबद्दल सांगितले तेव्हा ‘‘हा झाडाचा कचरा उचलायचे काम आमचे नाही आम्ही फक्त इतर कचरा उचलतो’’ असे सांगत गाडीवाले बिनदिक्कत निघून गेले. विजूचा अगदी संताप संताप झाला. ताबडतोब तिने बबनला फोन लावला, पण पार रात्रीपर्यंत पठ्ठय़ाने फोन उचलला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी फोन घेतला आणि आज-उद्यापर्यंत तो ढीग नक्की घेऊन जाईन म्हणाला. दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीला तिच्याकडे पाहुणे मंडळी आली. २ दिवस त्यांची सरबराई करण्याच्या धांदलीत किंवा बबनराव विसंबल्यामुळे बाहेरच्या ढिगाकडे तिचे दुर्लक्षच झाले. पाडव्याला रात्री पाहुणे गेले आणि ती नवऱ्याबरोबर टीव्ही वरचा कार्यक्रम बघायला बसली. इतक्यात तिची नजर खिडकीकडे गेली. होळी पेटल्यावर दिसतात तशा ज्वाळा त्यांना दिसल्या. तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. दोघेही खाली धावले. बहुधा ‘त्या’ ढिगावर पेटता फटाका पडल्यामुळे इतके दिवसात वाळलेल्या फांद्यांनी पेट घेतला होता. बबनने नेमका तो ढीग इलेक्ट्रिकच्या डिस्ट्रीब्यूशन बॉक्सच्या आडोशाला रचला होता. आग बॉक्सपर्यंत जाऊन बॉक्सने पेट घेतला असता तर प्रचंड गहजब झाला असता. आगीच्या ज्वाळा पाहून आजूबाजूच्या खिडक्या उघडल्या आणि ‘फायर ब्रिगेडला, पोलिसांना बोलवा’ असे सल्ले ऐकू आले. खाली मात्र कुणी आले नाही. रस्त्यावरची १-२ माणसे मात्र तिच्या नवऱ्याला आग विझवायला मदत करायला धावली. तिने फोन केल्यावर ५ व्या मिनिटाला घंटानाद करीत आगीचा बंब आलादेखील! पण होळी प्रमाणेच ‘तो’ ढीग उंच पेटला व पाण्याने विझतही गेला. त्यामुळे त्यांना काहीच करावे लागले नाही. इतक्यात पोलीस व्हॅनही आली. कदाचित ऐन दिवाळीतल्या रात्रीत अशा कामासाठी यावे लागले म्हणून की काय कोण जाणे पण उतरता उतरता ‘ही एज्युकेटेड माणसे स्वत:ला शहाणी समजतात. घरातली अडगळ, कचरा बाहेर फेकून आपले घर, सजवायचे यांना माहीत. आता आग भडकली असती म्हणजे?’ अशी ‘स्तुतीसुमने’ उधळीत वर्दीतला इन्स्पेक्टर विझलेल्या आगीची पाहणी करू लागला. विजूचा नवरा त्याला काही सांगणार तोच ‘आता काय ते चौकीवर येऊन सांगा इथे नाय.’ चला रे यांना घेऊन चौकीवर!’ असा हवालदारांना आदेश देऊन व्हॅनमध्ये बसला. विजूही नवऱ्यापाठोपाठ व्हॅनमध्ये बसली. ऐन पाडव्याच्या रात्री साडे दहा वाजता गल्लीतल्या रहिवाशांसमोर त्यांची वरात पोलीस ठाण्यात चालली होती. चौकीवरचे साहेब मात्र थोडे मवाळ वाटले. दोघांना समोर बसवून पाणी देऊन चौकशी केली. तेव्हा दोघांनी विशेषत: विजूने त्यांना झाडावरच्या क्षुल्लक किडय़ांच्या त्रासापासून, वृक्ष छाटणीचे पालिकेचे नियम, अडेलतट्टू कर्मचारी, त्या सर्वाचा त्यांच्यासारख्या सामान्य लोकांना आजपर्यंत झालेला त्रास, कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी तिचे अथक प्रयत्न अगदी सविस्तर सांगितले. तेव्हा साहेबांनी शांतपणे ऐकून ‘घराखाली आग लागली पण मनुष्य अथवा वित्तहानी झाली नाही,’ अशा अर्थाचा रिपोर्ट लिहून त्यावर तिच्या नवऱ्याची सही घेतली. तसेच तो जळका कचरा उद्या नक्की उचलला जाईल याची हमी देत त्यांना घरी जाण्यास सांगितले. विनाकारण मानहानी आणि प्रचंड मनस्ताप झालेले ते बाहेर पडले तेव्हा विजूचे लक्ष रस्त्यावरच्या मोठय़ा प्रकाशात झळकणाऱ्या एका मोठय़ा फलकाकडे गेले ज्यावर डेरेदार वृक्षाच्या चित्राखाली लिहिले होते. ‘झाडे लावा – झाडे वाचवा!’ ते बघून भर रस्त्यावर विजूला मोठ्ठय़ाने ओरडावेसे वाटले, ‘होय, झाडे वाचवा, पण आम्हालाही वाचवा!’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा