‘‘सुंदर तेची  वेचावे; सुंदर करोनी मांडावे, स्व-इतरांच्या आनंदासाठी!’ हे मी स्वत:च शब्दबद्ध केलेले माझे साधे-सोपे अध्यात्म होते.. कायम स्वत:ला तपासून पाहण्याची प्रेरणा देणारे अध्यात्म.. पुरेशा जागृतीनिशी समोरील चित्रविषयाच्या गाभ्यात पोचवणारे अध्यात्म.. मी ते आचरणात आणत गेलो. निवडलेल्या चित्रविषय-गाभ्यात मला दृश्याचे अंतरंग जाणवत गेले. माझ्या दृष्टीने ‘सुंदर तेची वेचावे’ हे चित्रनिर्मितीच्या प्रेरणा मिळवण्यासारखे होते.’’ सांगताहेत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे.

भिंतीवर रेघोटय़ा मारण्याचे वय मागे सरले. रेघोटय़ांच्या जागी राघू-मना प्रकटू लागल्या. हत्ती-घोडे-माणसे आली.. किंबहुना रेषेने चितारता येईल असे काहीही! भिंती भरून गेल्या.. स्टुलावर चढून भिंतीवरची बारीकसारीक जागाही शोधू लागलो! वडील हसले. दोन स्केचबुके आणून दिली त्यांनी. तीही भरू लागली. मनात साठलेले बाळबोध आकार स्केचबुकांत काढून संपले. थोरा-मोठय़ा चित्रकारांच्या चित्रांच्या नकला करण्याचे पर्व आले.. गेले! समाधानाचा मात्र पत्ता लागेना. एक हताश हुरहुर म्हणा किंवा अस्वस्थता म्हणा.. जे काही होतं, ते छळू मात्र लागले! त्यातच उच्च चित्रकलेच्या अभ्यास पर्वाचा आरंभ झाला. के. बी. कुलकर्णी यांच्यासारखे मातब्बर गुरू लाभले. त्यांचे रेखांकन प्रभुत्व, रंगकाम सारेच अजोड.. मार्गदर्शनही अनोखे! परंतु माझं प्रशिक्षण एका चाकोरीतले आणि माझी अस्वस्थता-हुरहुर मात्र माझ्या आधीच्या पिढीतील सर्वश्रेष्ठ पेंटर-इलस्ट्रेटर्सनी बाळगलेल्या चाकोरीबाहेरच्या गुणवत्तेची, असे चालले होते. अर्थात माझ्या वयाच्या सतराव्या वर्षी माझ्या अस्वस्थतेचे हे स्वरूपही मला ज्ञात नव्हते.
पुढे अचानक एक दिवस, मुंबईत सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील सहपरीक्षार्थी के. के. मेननचे स्केचबुक फक्त अर्धा तास पाहावयास मिळाले. दाट भरून आलेले आभाळ पसार होऊन सुखद लख्ख सूर्यप्रकाश मनात पसरावा, असे काहीसे घडले. त्या सूर्यप्रकाशात माझ्या रेखांकनातील त्रुृटी मला दिसल्या. पेंटर-इलस्टेटर बनण्यासाठी म्हणजे ‘संपूर्ण चित्रकार’ होण्यासाठी, लागणाऱ्या सशक्त रेषेचे मला भान आले. एक नवी दिशा मिळाली. माझ्याकडून झपाटल्यागत रेखांकन सराव सुरू झाला. माझ्या पेन्सिल रेषेत भावस्पर्शी गुणवत्ता आली. मात्र प्रत्यक्षात, ‘पुढे काय?’- हा प्रश्न पडला. माझ्या अस्वस्थ हुरहुरीचा परिघ विस्तारल्यागत बनला. दुसऱ्या बाजूने, कुठल्याही खऱ्या कलाकाराला हवी-हवीशी वाटणारी रेषा मला वश झाली.. चित्रकलेचे प्रशिक्षण संपता संपता!
त्या रेषेच्या शिदोरीवरच मी मुंबईच्या कलाक्षेत्रात पाऊल ठेवले. जणू वैश्विक सत्य ठरावा असा कष्टमय प्रवेश मी अनुभवला. नराश्य-अस्थिरतेचा लपंडाव वाटय़ास आला. निष्क्रियतेच्या गत्रेत अडकण्याची भीती वाटू लागली..
आणि एके दिवशी, माझ्यात एक मोठे परिवर्तन घडवणारा क्षण उजाडला. सहज चाळा म्हणून त्या दिवशी, झिरो नंबर ब्रशने मी पुन्हा रेघोटय़ा मारत बसलो. एरवी, कुणालाही त्या रेघोटय़ा बालिश, निर्थकच वाटल्या असत्या. परंतु, तपकिरी जलरंगाने मारलेल्या माझ्या कुंचला-रेघोटय़ांभोवती मला एक नवा सर्जन-अवकाश दिसू लागला.. पेन्सिलीची रेषा मला वश झाली होती. आता, माझ्या कुंचला रेषेने मला वश केले.. अंकित केले.. मी माझ्याच कुंचला रेषेच्या प्रेमात पडलो! इतका, की माझे दर्जेदार मेमरी ड्रॉइंग सत्कारणी लावत जे आकार कुंचला रेषेने मी चितारले, त्यांतून माझी कुंचला-रेषाच माझी ओळख बनली.. एका स्वतंत्र चित्रशैलीचा मी धनी बनलो. हरकती, खटके, मुरक्या, उपजांच्या जागा आणि छोटे-मोठे तानपलटे यांनी नटलेल्या, सांगीतिक प्रत्यय देणाऱ्या चित्रशैलीचा धनी! चित्रकलेचे प्रशिक्षण संपल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत माझ्यात हे परिवर्तन घडून यावे?
त्या परिवर्तनाच्या क्षणी, हे सारे घडून आले कसे, हा विचार मी केला नव्हता. तो विचार सुरू झाला, अल्पसे स्थर्य वाटय़ास आल्यानंतर.. मागे वळून पाहताना! मला जाणवले, की वयाच्या १५-१६व्या वर्षी माझी मुळातली निवडक्षमता एका कन्नड गीताने अधिकच तीक्ष्ण केली. ‘सुंदर दिन, सुंदर इन। सुंदर वन नोऽऽ डू बा।।’- हे त्या गीताच्या मुखडय़ाचे शब्द. अर्थ साधारणपणे असा – ‘दिवस किती छान आहे.. सुखावणाऱ्या सूर्यप्रकाशात सारे वन जणू न्हावून निघाले आहे.. चल प्रिये, आपण त्याचा आनंद घेऊ या.. ते पाहू या!’ या गीताचे कवी होते के. व्ही. पुट्टप्पा; आणि त्या गीताला लाभलेले अलौकिक स्वर होते पंडित भीमसेन जोशींचे. संगीतही त्यांचेच! यावरून माझ्या निवडक्षमतेची जडण-घडण कशातून झाली असेल याची कल्पना येऊ शकेल. जॉन सिराडी या कवीने म्हटलेही आहे, की ‘कुठल्याही कलेत जे काही उतरते, ते कलावंताच्या निवडक्षमतेतून!’ माझी निवडक्षमता सुरेल शब्दांनिशी घडली.. भीमसेनजींच्या सुरेल गायकीने ती चोखंदळ बनवली. या चोखंदळपणाने मला नित्य स्वत:लाच तपासण्याची सवय लावली. या स्व-तपासणीत माझी सौंदर्यदृष्टी विकसित होत गेली. सुमार दर्जा, स्वत:चा असो वा इतरांचा, मला तो मानवेनासा झाला. पुढे १९६० ते १९८० या काळात मुंबईत घडलेल्या भीमसेनजींच्या सर्व मफली मी ऐकल्या. त्यांतून, ‘सुंदर तेची वेचावे.. सुंदर क रोनी मांडावे.. स्व-इतरांच्या आनंदासाठी’ असे मानणारी वैचारिक बठक मला लाभली. या वैचारिक बठकीतील प्रत्येक छोटी ओळ कलावंतांची जबाबदारी सांगणारी  होती. यांत ‘सुंदर’ म्हणजे ‘नव्या सौंदर्यनिर्मितीस प्रेरक ठरणारे काहीही!’
माझ्या दृष्टीने असे ‘सुंदर’ वेचणे ही सर्जनशील जबाबदारी होती.. कुठल्याही कलावंताला न चुकवता येणारी जबाबदारी! चित्रकारांसाठी, ती जबाबदारी होती, दृश्य जीवन-जगताआड लपलेले सौंदर्य शोधण्याची. ही जबाबदारी होती, लपलेले सौंदर्य दृश्यातील रंग-रेषा-आकार-पोत यांतील परस्पर नात्यांत असते, हे जाणण्याची, त्या नात्यांतील दृश्य संगीत अनुभवण्याची.
उच्च चित्रकलेच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी घडलेल्या अभ्यासात, ‘चित्र म्हणजे दृश्य संगीत असते’ हे फारसे ठसवले जात नाही. ‘दृश्य संगीत म्हणजेच सुबोध-सुंदर-भावस्पर्शी चित्र’, हे सांगितले जात नाही. असे असूनही मी एक चित्रमाध्यमातून गाऊ पाहणारा सुबोध-सुंदर-भावस्पर्शी चित्रकार बनू लागलो. माझ्यासाठी वयाच्या १५व्या वर्षी ऐकलेल्या पं. भीमसेन जोशींच्या एका कन्नड गीताने आणि पुढे त्यांच्या गायकीने केलेला असर कशा प्रकारचा होता, हे यावरून समजून येईल. निवडलेल्या कला क्षेत्राबाहेरच्या कला परंपरेचे संस्कारही इथे अधोरेखित व्हावेत.
थोडक्यात, ‘सुंदर तेची  वेचावे; सुंदर करोनी मांडावे, स्व-इतरांच्या आनंदासाठी!’ हे मी स्वत:च शब्दबद्ध केलेले माझे साधे-सोपे अध्यात्म होते.. कायम स्वत:ला तपासून पाहण्याची प्रेरणा देणारे अध्यात्म.. पुरेशा जागृतीनिशी समोरील चित्रविषयाच्या गाभ्यात पोचवणारे अध्यात्म.. मी ते आचरणात आणत गेलो. निवडलेल्या चित्रविषय-गाभ्यात मला दृश्याचे अंतरंग जाणवत गेले. ते चित्रविषयाचे अस्सल-भारदस्त आणि सुबोध रूपांतर करण्याच्या प्रेरणा देत गेले. माझ्या दृष्टीने ‘सुंदर तेची वेचावे’ हे चित्रनिर्मितीच्या प्रेरणा मिळवण्यासारखे होते.
‘चित्र म्हणजे दृश्य संगीत’ या माझ्या धारणेच्या अध्यात्मातील पुढचा प्रश्न होता, निवडलेले सुंदर काही अधिक सुंदर करून मांडण्याचा. म्हणजेच खिळवून ठेवणाऱ्या चित्ररचनेचा. अशा चित्ररचनेचे दोन भाग म्हणूनच अतिमहत्त्वाचे. पहिला भाग चित्रचौकटीने निश्चित केलेल्या अवकाशाच्या मूलभूत फेर मांडणीचा. ही फेर मांडणी चित्र-अवकाशाचे दोन वा तीन असमान खंड पाडून करावी, हा होता एक पारंपरिक शाश्वत संकेत. हे खंड समान बनले, की त्यातून दृश्य संघर्ष अनुभवास येतो हा चित्रकारांचा वर्षांनुवर्षांचा अनुभव. हा संघर्ष रोखून ‘चित्ररूप स्वर-गुंजन’ मार्गी लागावे, हा अवकाशीय फेर मांडणीचा.. चित्राच्या ‘डिझाइन स्टॅटेजी’चा.. चित्रामागच्या ‘लावण्यनीती’चा मुख्य हेतू! तर परस्परांतील सुखद नात्यांतून सिद्ध होणारी दृश्यातील रंग-रेषा-आकार-पोत आणि उठाव छटांची गुंफण अवकाशीय फेरमांडणीशी जुळवून मांडणे, हा चित्र रचनेचा दुसरा भाग. हे दोन भाग साध्य होण्यात चित्राची फ्रेम-चौकट चित्र रसिकांच्या नजरेला चित्रावर खिळवून ठेवणारी दिशा-गती देते, चित्रकाराने योजलेले गतीतले थांबे पुरवते, हा तर आजचा वैश्विक अनुभव.
आता, अशा साऱ्या सर्जनशील प्रवासाचे उद्दिष्ट काय? तर, चित्राबद्दल कलावंताचे स्वत:चे आत्मिक समाधान चित्रप्रेक्षकांच्या आत्मिक समाधानाशी एकरूप करणे; हेच असावयास हवे. निदान मला चित्रकलेच्या पारंपरिक प्रशिक्षणाबाहेर जी दृश्य-सांगीतिक, वैचारिक बठक लाभली, तिच्या अध्यात्मातला परमार्थ ‘स्व-इतरांचे सुख-समाधान महत्त्वाचे’ हेच ठसवत गेला.. माझा या अध्यात्म-परमार्थात अनेक थोर चित्रकार, त्यांच्या कलात्मक चिंतन-विचारांनिशी माझ्या गुरूस्थानी येत गेले. युजेन दलक्रुआ, क्लोद मोने, पॉल सेजान, पॉल गोगँ, जेम्स मॅकनील व्हिसलर, गुस्ताव क्लिम्ट, चार्लस् रनी मॅकिन्टॉश आणि वू ग्वॉन्झाँग ही त्यापकी काही नावे. या साऱ्यांनी मला आपल्या चित्रांतून पटवले, की :
भिडे कल्पनेचे आभाळ, वास्तवाच्या सागराला
मीलन त्यांचे देई,  क्षितिज-रेषा गवसाया
भासे गवसली जेव्हा, सृजन आकार घेते
अन पुन्हा पाहावे तो, ती दूरची दिसते
पण दूरस्थ जरी दिसे ती, दिशा तिची मोलाची
सागरवाट तिथे नेणारी, म्हणोनी शोधावयाची
शोधात महत्त्वाचे ठरे, तारू ते परंपरेचे
त्यजोनी चालेल कैसे,
जर कलावंत बनोनी टिकायचे
                                      (स्वरचित)
वैश्विक चित्र परंपरेच्या महासागरांत स्वत:च्या सागरवाटा शोधत अनेकदा निर्मिती-क्षितिजावर पोचणारा महान ऑस्ट्रियन चित्रकार होता गुस्ताव क्लिम्ट (१८६२-१९१८). चित्र परंपरेचा डोळस अभ्यास, उच्च दर्जाचे रेखांकन पटुत्व, अनोखे लावण्यनीती अंदाज, भावस्पर्शी रचनात्मक  चित्रकारी, अनोखी सौंदर्यहानी न करणारी अलंकारिकता, द्विमितीजन्य वास्तववादी निसर्ग चित्रण, आशयसंपन्न रूपकात्मकता, सर्जनशील व्यक्तिचित्रण; आणि अभिजात ठरणारी उपयोजित कलानिर्मिती, ही या थोर चित्रकाराच्या कला कर्तृत्वाची महत्त्वाची वैशिष्टय़े. हा थोर चित्रकार भारतीय लघुचित्र शैलींच्या संपर्कात येता, तर काय घडू शकले असते? माझ्या चिंतनात या प्रश्नाला महत्त्वाचे स्थान राहिले. त्या अनुषंगाने माझ्याकडून काही चित्रनिर्मितीही घडली. गुस्ताव क्लिम्टकडून काही प्रेरणा घेत बॉब पेक (१९२७-१९९२, अमेरिकन) आणि मार्क इंग्लिश (१९२०- अमेरिकन) या चित्रकारांनी केलेली चित्रनिर्मितीही मला प्रेरित करून गेली.
अशा थोर चित्रकारांमुळे, इतर क्षेत्रांतील थोर कलावंतांमुळे प्रेरित होऊन चित्रनिर्मिती करणे, म्हणजे माझी स्वत:ची दृश्यसांगीतिक वैचारिक बठक सत्कारणी लावणेच होते. माझ्या सर्वच आदर्शाप्रमाणे, ते परंपरेत राहूनही पुरोगामी बनणे होते. माझ्या या पुरोगामित्वातील चित्रनिर्मितीत सामजिक आक्रोशाला फारसे स्थान  राहिले नाही. परंतु सामाजिक सौंदर्यदृष्टीचा परिघ व्यापक बनून सामजिक आक्रोशाची कारणे दूर व्हावीत, असा माझा विचार-प्रयत्न राहिला. अर्थात अशा प्रयत्नात मी एकटा पुरा पडू शकत नाही, हे मला ज्ञात होते. परंतु समकालीन सौंदर्यद्रोही कला प्रवाह आणि एकूण सांस्कृतिक वातावरण देशात व्यापक सौंदर्यभक्तीचा परिघ वाढवण्यास फारसे पूरक नसूनही, मी प्रवाहाविरुद्ध पोहत राहिलो.. काही जबाबदारी मनाशी बाळगत, हे महत्त्वाचे!
उदाहरणार्थ, शहरांत उच्चभ्रू श्रीमंतांच्या दिवाणखान्यांत ‘राग नसलेल्या ख्याला’समान असणाऱ्या अमूर्त कलेचे स्तोम खूप वाढले  होते. स्वातंत्र्यात दुर्दैवाने आकारास आलेल्या अर्धवट आधुनिकतावादी व्यूहरचनेचा तो परिणाम होता. अशा काळात खेडोपाडीच्या गोरगरिबांच्या वस्तीतही एक प्रकारचे अवकाशीय चतन्य-सौंदर्य असते, हे मला मनोहारी दृश्यापेक्षा  महत्त्वाचे वाटले. ते माझ्या दृश्यसांगीतिक वैचारिक बठकीच्या कोंदणात आणून मी चित्रित केले. सोबतचे खेडय़ातील सायकलीचे व्यक्तिमत्त्व दाखवणारे चित्र किंवा एका वृद्ध खेडूताचे चित्र इथे महत्त्वाचे ठरावे. चित्रांची शीर्षके हुबेहूब चित्रणापलीकडचे काही सुचवतात.. वास्तववादी चित्रातही डिझाइन स्टॅटेजीमुळे निर्माण होणारा अमूर्त आशय असतो, हे ती चित्रे सुचवतात.
भारतीय सांस्कृतिक वारसा समन्वयवादी आहे. तो ऐहिक-आत्मिक चतन्याचा मेळ घालणारा आहे. हे ज्यांना पटते, त्यांची पुरेशी दाद माझ्या चित्रांमागील दृश्य-सांगीतिक वैचारिक बठकीला लाभली आहे. ज्यांना भारताचा हा सांस्कृतिक वारसाच ज्ञात नाही, मान्य नाही, त्यांच्याबद्दल काय लिहायचे?    

Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
angel investor, investor, investment, startup,
प्रतिशब्द : दर्शन दे रे इशदूता : एंजल इन्व्हेस्टर – देवदूत गुंतवणूकदार 
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Story img Loader