सागरिका मुंबईला होती तेव्हा एके दिवशी मी तिला भेटायला गेले. त्यावेळी तिची आई मला पोचवायला म्हणून जिन्यात आली आणि माझा हात धरून खूप रडायला लागली. म्हणाली, पोरीला काही माहिती नाहीये, पण आज डॉक्टरांनी तिचा पाय कापायचा निर्णय घेतला आहे. मलाही धक्का बसला…
ओसामधील बालासोरजवळचं एक खेडेगाव! रात्रीची वेळ! आजूबाजूला शेतं! एक अंधूकशी पाऊलवाट तुडवत चालतोय! मी आणि नारायणराव भिडे! बसने आम्हाला मुख्य रस्त्यावर या पायवाटेशी उतरवून दिलं होतं. पौर्णिमेच्या पाठचा-पुढचा दिवस असावा. लखलख चंदेरी दुनिया आकाशात आणि वाट दाखवणारे काजवे सोबतीला. अंधारातल्या प्रकाशाचा एक अपूर्व अनुभव. भिडेकाकांच्या अखंड गप्पा होत्याच आधाराला.
हळूहळू एखादं घर, मिणमिणणारे छोटे दिवे, एक मंदिर असं करत करत गाव दिसायला लागलं. प्रत्येक घरात घासलेटची चिमणी किंवा कंदील. गावात वीज नाही. एका घरात डोकावून विचारलं, इथं वसंत मास्तर कुठं राहतात? प्रश्न अर्थात बंगालीतून विचारला होता. उत्तर ओडिसीमधून आलं. फारसं संभ्रमात न टाकता एक मुलगा कंदील घेऊन घर दाखवायला बरोबर आला. मास्तरांच्या घराशी येऊन पोहोचलो. मुलगा आत सांगायला गेला. उत्तरादाखल घरातून मोठा आक्रोश कानावर आला. आम्ही आत गेलो. भिडेकाकांना बघून सागरिकाच्या आईचा.. हो.. त्या बाई सागरिकाची आईच होत्या. म्हणजे, आम्ही त्यांना सागरिकाची आई असेच ओळखत होतो. त्यांचा रडण्याचा भर थोडा ओसरला. मास्तर, सागरिकाचे वडील आम्हाला आत घेऊन गेले. बैठकीवर बसवले. सहज समोर नजर गेली. सागरिकाचा मोठा फोटो लावला होता. हसरा! आमचेही डोळे भरून आले. आज या ओडिसातल्या दुर्गम खेडय़ात, आम्ही मुंबईहून पोचलो होतो. तेसुद्धा सांत्वनास! एक हसरा सुंदर दुवा मध्येच निखळला होता.
पहिल्यांदा जेव्हा भिडेकाका कोणाच्या तरी ओळखीने माझ्याकडे आले. ते असं कोणाहीकडे जायचे. त्यांचा भरपूर गोतावळा होता. तसे ते आले तेव्हा कळलं की, आमच्या घरासमोर एका जुन्या बिल्डिंगमध्ये, ‘सीता-सदन’मध्ये, नाना पालकर स्मृती समितीने चालवलेलं, बाहेरगावच्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी असं एक रुग्ण सेवा सदन आहे आणि तिथं भारताच्या पूर्व भागाकडून येणारे रुग्ण जास्त आहेत. मला बंगाली भाषा चांगली येत असल्याने त्या रुग्णाशी संवाद साधायला मदत होईल, म्हणून भिडेकाका मला तिथं घेऊन गेले. तिथं चालणारं काम व साधेपणा बघून मी एकदम भारावून गेले. तिथं असलेल्या आसामी, बंगाली, ओडिसी लोकांशी थोडाफार संवाद साधायचा प्रयत्न केला.
तिथं एक गोड, सुंदर, गोरीपान, चुणचुणीत १०-१२ वर्षांची मुलगी होती. सागरिका! तिचे आई-वडीलपण होते. त्यांच्याशी थोडं बोलून त्यांना घरी यायचं निमंत्रण देऊन मी निघाले. तिथपासून त्यांचं सगळ्यांचं घरी येणं सुरू झालं ते कायमचंच! सागरिकाच्या पायाला घोटय़ाजवळ कर्करोग झाला होता. ती या रोगाच्या अस्तित्त्वाबद्दल अनभिज्ञ होती. तिने माझ्या घरी येऊन टीव्ही व माझ्या एक वर्षांच्या चिमुरडीचा ताबा घेतला! मलाही बरं वाटलं. जाणं-येणं सुरूच राहिलं व अशी आम्हाला एकमेकांची सवय झाली.
३१ डिसेंबर जवळच आला होता. बोलता बोलता कळलं की तिचा ३१ डिसेंबरला वाढदिवस असतो. आम्ही तिच्यासाठी एक सरप्राईज पार्टी ठरवली. भेळ, केक कापणं वगैरे! मी तिला एक सुंदर पिस्ताकलरचा लखनवी ड्रेस भेट दिला. तिला तो इतका आवडला की लगेच घालून मला म्हणे, आँटी, चल फोटो काढून येऊ या. आम्ही, म्हणजे मी, माझी लेक (कडेवर), भिडेकाका व सागरिका स्टुडिओत जाऊन फोटो काढून आलो. तेव्हा काढलेला तिचा एकटीचा फोटो एनलार्ज करून त्यांच्या घरात लावलेला होता. माझ्याकडे आजही तो ग्रुप फोटो आहे.
ती मुंबईला होती तेव्हा एके दिवशी मी तिला भेटायला गेले. तेव्हा तिची आई मला पोचवायला म्हणून जिन्यात आली आणि माझा हात धरून खूप रडायला लागली. म्हणाली, पोरीला काही माहिती नाहीये, पण आज डॉक्टरांनी तिचा पाय कापायचा निर्णय घेतला आहे. मलाही धक्का बसला. मी वयाने लहान, तरी त्यांची तोकडी समजूत घालू लागले. त्या माऊलीच्या डोळ्यांचं पाणी खळेना. इतकं अगतिक मला पहिल्यांदाच वाटलं होतं. तरीही तिला मुलीसमोर रडू नको म्हणून तात्पुरतं समजवण्यात यश आलं. मी त्या दोघींनाही घरी घेऊन आले. थोडय़ा वेळासाठी सगळं विसरायचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशी तिला टाटामध्ये अॅडमिट करायचं होतं. त्या सगळ्यांसाठी हे एक ‘रुटीन’ होतं. गेली तीन र्वष, ती अशी ट्रीटमेंटसाठी येत-जात होती. भिडेकाका त्यांच्याबरोबर कायम होते. दोन-तीन दिवसांनी मला समजलं की तिला सोडलं आहे व ते सगळे रुग्ण सेवा सदनमध्ये आहेत. मी पुन्हा तिला भेटायला गेले. खूप आनंदाने धावत येऊन तिने मला मिठी मारली व म्हणाली, ‘‘आँटी, मी घरी चालले. मला डॉक्टरांनी सोडलं आहे. पण माझी आई बघा ना, खूश व्हायचं सोडून सारखी रडते आहे.’’ माझं वय व अनुभव दोन्हीचाही काही तर्क चालेना. ती हसत हसत रूममध्ये गेली. तिच्या आईने परत मला जिन्याशी नेले आणि ती हृदयद्रावक हकीकत सांगितली. सकाळी सगळी तयारी करून तिचा पाय कापून टाकण्यासाठी म्हणून ऑपरेशन टेबलवर घेतलं. एवढय़ात डॉक्टरांच्या लक्षात आलं की तिच्या खांद्यावर पण गाठ आहे. लगोलग तपासण्या करून कळलं की कर्करोग तिच्या पूर्ण शरीरात पसरला होता. आता पाय कापून टाकायचं काही प्रयोजनच उरलं नव्हतं. जेवढं तिचं आयुष्य आहे ते तिला आनंदाने जगू देत म्हणून डॉक्टरांनी तिला घरी सोडण्याचा निर्णय घेतला होता.
मला मोठा मानसिक धक्का बसला होता. या गेल्या काही महिन्यांत लेकराशी चांगलीच जवळीक झाली होती. त्या माउलीच्या सांत्वनासाठी काही शब्दच उरले नव्हते. मी हळूहळू जिन्याच्या पायऱ्या उतरू लागले. एवढय़ात ‘आँटी आँटी’ असं ऐकू आलं. जिन्याच्या वरच्या टोकाशी उभी राहून सागरिका मला हसत बाय करीत होती. म्हणत होती, ‘आता मी नाही येणार परत मुंबईला. तुम्हीच या आमच्या घरी..’
माझ्या डोळ्यातल्या अश्रूंच्या पडद्याने समोरचं सगळं धूसर झालं होतं. शेवटचं तिला पाहिलं. नंतर दोन-तीन महिन्यांनी कळलं की, ती गेली.
आता तो जिनाही नाही. कारण रुग्ण सेवा सदन स्वत:च्या नवीन १० मजली इमारतीत हललं आहे. भिडेकाकाही शेवटपर्यंत रुग्णसेवेचं व्रत पालन करून माझ्यासारखे असंख्य दुवे जोडता जोडता हे सगळं सोडून गेले. मी आजपर्यंत या सगळ्यांना आठवणींच्या शिदोरीवर जिवंत करून ठेवलं आहे. थोडं मनाचं दार किलकिलं करून या आठवणी तुमच्यासमोर मांडल्या आहेत, बस्..
सागरिकाचं जाणं
सागरिका मुंबईला होती तेव्हा एके दिवशी मी तिला भेटायला गेले. त्यावेळी तिची आई मला पोचवायला म्हणून जिन्यात आली आणि माझा हात धरून खूप रडायला लागली. म्हणाली, पोरीला काही माहिती नाहीये, पण आज डॉक्टरांनी तिचा पाय कापायचा निर्णय घेतला आहे. मलाही धक्का बसला...
First published on: 18-05-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of cancer patient sagarika