डॉ. आनंद नाडकर्णी हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, लेखक, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून १९९० मध्ये ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ (आय.पी.एच.) ही संस्था उभी राहिली. आय.पी.एच. ही संस्था आज ठाणे, पुणे, नाशिक या तीन शहरांत कार्यरत आहे. डॉ. नाडकर्णी यांचं व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कामही पथदर्शी आहे. सध्या ते ‘मुक्तांगण मित्र’ संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी तत्त्वज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ‘मनमैत्रीच्या देशात’ आणि ‘बुद्धांसोबत क्षणोक्षणी’ ही दोन पुस्तके लिहिली आहेत.
गुडघ्याच्या खाली, पोटऱ्यांवर घट्ट बसणाऱ्या जाड चामड्याचे पट्टे खूप त्रासदायक असायचे. तसाच एक पट्टा घोट्यांभोवती. या दोघांना जोडणारी लोखंडी सळ्यांची एक जोडी… ती घुसलेली, त्या जाड बुटांमध्ये… हा जामानिमा रोज सकाळी चढवताना नऊ वर्षांच्या मला, खूप कंटाळा यायचा मध्ये मध्ये. पण इलाज नव्हता. चालायचे तर हे सारे करणे आवश्यक होते. वयाच्या सहाव्या वर्षी आलेल्या तीव्र तापानंतर पायांमधली शक्ती कमी झाली होती. पोलियोचे निदान झाले होते. वरळीच्या ‘सीओएच्’ म्हणजे मुलांच्या अस्थिव्यंगउपचार रुग्णालयात माझी ‘केस’ चर्चेसाठी ठेवण्यात आली होती. पोलियोचे दोन उपप्रकार असायचे. एक कण्याभोवती मर्यादित तर दुसरा मेंदूलाच ताप देणारा. माझ्यामध्ये या दोन्ही हल्ल्यांचे पुरावे होते. माझी बुद्धी शाबूत होती, याबद्दल त्या कॉन्फरन्समध्ये वारंवार आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. त्याचं ‘मोल’ कळायला मला डॉक्टरीच्या शिक्षणापर्यंत यावं लागलं.
तर अशा परिस्थितीत शाळेच्या शिक्षणाबरोबर जुळवून घेणं हे एक आव्हान होतं.
आणखी वाचा-विकलांगतेचा स्त्रीवादी विचार
पायाच्या उपचारांसाठी मुंबई उत्तम, या विचाराने खान्देश, मराठवाडा अशा ग्रामीण भागांतल्या माझ्या बालपणाला अचानक महानगराचं मखर मिळालं होतं. तेही विलेपार्ले इथल्या, पार्ले टिळक विद्यालयामध्ये… या शाळेनं मला इतकं सांभाळलं की त्याला तोड नाही. शिक्षक, सहाध्यायी, कर्मचारी साऱ्यांनी साथ दिली. माझ्यातल्या अनेक गुणांना वाव दिला. आठवीच्या वर्गात मात्र एकदा विपरीत घडलं. तास होता ‘समाजशास्त्र’ अर्थात् इतिहास-भूगोल-नागरिक शास्त्राचा. बाईंनी मला फळ्यावर लिहिण्यासाठी बोलावलं. शिक्षकांसाठीचे लाकडी प्लॅटफॉर्म, त्यातील फटी यामधून स्वत:चे पाय सावरत लिहिताना मी एक चूक केली. बेसावध क्षणी बाई बोलून गेल्या, ‘‘लंगड्या नीट लिही की.’’ विजेच्या लोळासारखे ते शब्द मला थिजवून गेले. हात लिहायचे थांबले. डोळे भरून आले. स्वत:ला सावरत बाई म्हणाल्या,‘‘बरं… बस जाऊन आपल्या जागेवर.’’ जागेवर बसलो, पण मान वर करायचे धैर्य नव्हतं. तास संपला. मला जाणवलं की, माझ्याभोवती मित्रमैत्रिणींनी आश्वासक कडं तयार केलं आहे. या तासानंतर छोटी सुट्टी होती. आमचा वर्ग पुढच्या तासाला वर्गाबाहेर धरणे धरून बसला. पुढच्या तासाच्या शिक्षिका, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक सारे आले. ‘‘आमच्या मित्राचा अपमान झाला आहे. त्याच्या व्यंगावर बोट ठेवलं गेलं आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही वर्गात बसणार नाही,’’ अशी स्पष्ट भूमिका होती, आणि वर्ष होतं १९६८-६९. आमच्या वर्गाच्या शिष्टमंडळाला मुख्याध्यापकांनी बोलवलं. तोवर आमच्या त्या बाई हादरून गेलेल्या. त्यांनी बचावात्मक पवित्रा घेऊन दिलगिरी व्यक्त केली. ‘‘उपमर्द संपूर्ण वर्गासमोर झाला असल्याने दिलगिरी संपूर्ण वर्गापुढे दिली जायला हवी.’’ विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ खंबीर होते. त्यानंतर दहा मिनिटांत हा विधी व्यवस्थित पार पडला. पुढचा तास सुरू झाला. पण या एका प्रसंगानं मला दिलेली ऊर्जा, माझी आजवर सोबत करत आली आहे. मला स्वत:बद्दल वाटणारं न्यूनत्व त्या दिवशी गळून पडलं. किती कृतज्ञता व्यक्त करावी त्या साऱ्या मित्रमैत्रिणींबद्दल.
‘‘तुझ्या अपयशाचा नेमका अर्थ काय ते आपण समजून घेऊ’’ माझे वडील मला म्हणाले. ‘‘कसला अर्थ समजून घ्यायचा आता? एम.बी.बी.एस.च्या फायनल इयरला नापास झालोय मी… करीयर संपलंय माझं.’’ माझे कमालीच्या उद्वेगाचे उद्गार. तोवरच्या शैक्षणिक प्रवासात अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स देणाऱ्या माझ्या अबलख अरबी घोड्याचा प्रवास अशा प्रकारे रोखला गेला होता. तृतीय वर्ष एम.बी.बी.एस.च्या मेडिसिन, सर्जरी, गायनॅक या तीनपैकी मेडिसिन विषयाच्या प्रॅक्टिकलमध्ये माझी दारुण दांडी उडाली होती.
आणखी वाचा-मनातलं कागदावर: बहुपर्यायाचा प्रश्न
‘‘सगळं संपलंय माझ्यासाठी…’’ मी वैतागलो. ‘‘तू तसे समजू शकतोस, पण सत्य हे आहे की, तू एका महत्त्वाच्या परीक्षेच्या, एका प्रयत्नामध्ये, एका विषयाच्या, एका भागामध्ये या वेळी अनुत्तीर्ण झाला आहेस…’’ वडील म्हणाले. ‘‘म्हणजे तेच की…’’ माझा पारा चढलेलाच होता. ‘‘पुन्हा विचार करून पाहा.’’ असं म्हणून त्यांनी त्यांचं वाक्य रिपीट केलं. काहीशा थाऱ्यावर आलेल्या मनानं, त्यांचं वाक्य दोनदा मनातच म्हटलं. त्यातलं वास्तव मनात उतरत गेलं.
‘‘पण मी तुमचे सगळे बेत धुळीला मिळवले.’’ मला नवा उमाळा आला. माझे वडील महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्याच सुमारास निवृत्त होत होते. मी धाकटा मुलगा. ‘‘तू डॉक्टर होणार आणि मी रिटायर्ड होणार… छान योग असेल तो.’’ असे ते म्हणायचे. माझं मन त्या क्षणाला इतकं खंतावलं होतं की, मीच स्वत:वर ‘बेजबाबदार, बेशिस्त मुलगा’ असे कोरडे ओढत होतो. वडिलांच्या डोळ्यातली सहज स्निग्धता मात्र अजिबात झाकोळलेली नव्हती. त्यांनी क्षणभर शब्दांना विसावा दिला. त्यानंतर ते म्हणाले; ‘‘अपयशानं खचलेलं तुझं मन या वेळी तुझ्याशीच भांडत आहे. माझी खात्री आहे की यातून तू सावरणार आहेस; यशस्वी ठरणार आहेस… त्यावेळी माझा आनंद तुझ्या समाधानापेक्षाही जास्त असेल. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेव … उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण, यशस्वी किंवा अपयशी, सुखात किंवा दु:खात… नेहमीच तू असणार आहेस माझ्या लाडक्या मुला…’’
आयुष्य बदलून टाकणारे शब्द होते ते माझ्यासाठी. अजूनही आहेत. इतका विनाअट विश्वास आणि प्रेम दाखवणाऱ्या वडिलांचा मुलगा होण्याचं भाग्य तत्कालीन अपयशाला पुरून उरलं. पुढे त्याच विषयात ‘डिस्टिंक्शन’ मिळवून पहिला आलो तेव्हा मीच माझ्यासाठी वाक्य बनवलं होतं… एका विषयाच्या, एका परीक्षेत, एका प्रयत्नात, परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मी, या वेळी पहिला आलो आहे.
वैनगंगा नदीच्या काठावरचे मार्कंडेश्वराचे प्राचीन देवस्थान. ते दगडी सौंदर्य न्याहाळत गाभाऱ्यामध्ये दाखल झालो होतो मी आणि अभयदादा-राणीवहिनी. गडचिरोली जिल्ह्यातल्या ‘सर्च’ संस्थेच्या व्यसनमुक्ती प्रकल्पाला हातभार लावण्यासाठी १९९४ ते १९९७ या कालावधीमध्ये मी तिथे नियमितपणे जायचो. आमच्या ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती’ केंद्राच्या कार्यकर्त्यांचाही भरीव सहभाग असायचा. आणि पाठिंबा डॉ. सुनंदा आणि बाबाचा! बाबा म्हणजे डॉ. अनिल अवचटांमुळे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग हे जोडपे माझ्या जगण्यात आले. दर सहा महिन्याला ‘सर्च’मध्ये जाणे हा माझा प्राणवायु होता. माझ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यातील वादळे माझ्या मन:स्वास्थ्याला उन्मळून टाकत होती. स्वत:ला मनोविकारतज्ज्ञ म्हणवून घेण्यातला ‘अपुरेपणा’ सतत जाणवायचा. स्वत:ला मार्गावर आणण्यासाठी रोज नव्याने प्रयत्न करायला लागायचे. माझ्या आधारांमध्ये अभयदादा-राणीवहिनीची भर आपोआपच पडली. राणीवहिनी अतिशय भाविक. तिच्या घरातल्या देवदेवतांसाठी स्वत: फुले तोडून हार बनवणारी. आम्ही त्या प्राचीन शिवदैवताचे दर्शन घेतले. तिथे एक मोठीशी, गोलाकार शिळा आहे. वहिनी चवड्यावर बसली. हातांची बोटे न लावता, फक्त दोन कोपरांनी ती जड शिळा उचलायची. हवेमध्ये अधांतरी धरायची. मनामध्ये इच्छा धरायची आणि मग ती शिळा खाली ठेवायची. राणीवहिनीने अत्यंत गंभीरपणे ते सारे विधी केले. मी मूकपणे पाहत होतो. शिवाला नमस्कार करून ती माझ्याजवळ आली. आणि हळुवारपणे म्हणाली. ‘‘तुझ्यासाठी इच्छा धरून आले आहे मी… या सगळ्या अडचणींमधून शेवटी चांगलं काहीतरी बाहेर येणार आहे… तुझं आयुष्य पुन्हा छान सुरू होणार आहे.’’ देवाला केला नसेल तेवढ्या श्रद्धेने मी वहिनीला वाकून नमस्कार केला… त्यानंतर आजवर जेव्हा भेटतो तेव्हा मी वहिनीला वाकून नमस्कार करतो आणि अभयदादाला मिठी मारतो.
आणखी वाचा-जिंकावे नि जागावेही : सजग जीवनाचं बीजारोपण
‘‘तुमचं ‘मुक्तिपत्रे’ पुस्तक विकत घेऊन मी माझ्या भावाला भाऊबीजेला दिलं. त्याच्या पिण्याचं प्रमाण खूपच वाढलं होतं. मला अपेक्षाही नव्हती की तो ते इतकं गांभीर्याने घेईल… पण त्याने पुस्तक वाचलं. तो तुमच्या ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’त स्वत:हून गेला. ‘अल्कोहोलिक अॅनोनिमस’च्या बैठकांना उपस्थित राहू लागला. आता एक वर्ष होईल त्याच्या व्यसनमुक्तीला… तुमचे आभार मानायला आले आहे.’’ त्या भावाची ही बहीण माझ्या क्लिनिकमध्ये आली होती. मलाही अर्थातच आनंद झाला. ‘‘मला ठाऊक आहे, तुमची ठाण्याची आय.पी.एच. संस्था खूप आर्थिक तणावातून जाते आहे. मला माझा छोटासा वाटा उचलायचा आहे.’’ ती म्हणाली. पंचवीस वर्षांपूर्वी, आमची त्यावेळी दहा वर्षे वयाची संस्था, कमालीच्या आर्थिक त्रासातून जात होती. आयुष्यात प्रथमच भेटत असलेल्या त्या बहिणीने एका भक्कम रकमेचा चेक मला संस्थेसाठी ‘भाऊबीज’ म्हणून दिला. त्यानंतर ती मला आजवर भेटलेली नाही.
दहा दिशांनी, दहा मुखांनी, ऐन अडचणीच्या प्रसंगात मला दिलेली ‘ऊब आणि उमेद’. काय सोबत घेऊन जायचं पुढे आयुष्यात? अडचणींचे पाढे, एकटेपणाची शोककथा की अपयशाची करुणगीतं?… ती असणारच नेहमी. त्यांच्याकडून शिकायचं. विवेकाचा ‘फिल्टर’ लावायचा. आणि ओंजळीत ठेवायच्या, या अशा सुगंधी फुलांच्या माळा. काळ लोटला तरी त्यांची ऊर्जा कमी होत नाही. आणि आपण जे रुजवतो तेच आपल्याकडून इतरांसाठी दिलं जातं नाही का?
व्यक्ती म्हणूनच्या अस्तित्वाला आकार देणाऱ्या या आधाराचीच वारंवार अभिव्यक्ती होत राहते, मनआरोग्य क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून. देऊन-घेऊन सतत वाहत्या राहणाऱ्या या ‘ऊब आणि उमेद’ प्रक्रियेचे अनेक आशावादी पैलू आपण अनुभवणार आहोत. येत्या वर्षातल्या आपल्या एकत्रित लेखन-वाचन-सर्जनशीलयात्रेमध्ये!
अडचणीच्या प्रसंगात आपल्याच लोकांकडून मिळालेली ऊब आणि उमेद आयुष्यभर लक्षात राहते. इतरांसोबत सतत वाहत्या राहणाऱ्या या प्रक्रियेच्या अनेक आशावादी पैलूंचे हे अनुभव दर पंधरा दिवसांनी.