म द्रास आकाशवाणीवरून वयाच्या नवव्या वर्षी भल्याभल्यांना थक्क करत अत्यंत सफाईदारपणे व्हायोलिनवादन सादर करणारी बाल कलाकार (एन. राजम), वयाच्या ५ व्या वर्षी टीव्हीवर एकल वादन करणारी छोटी संगीता, वयाच्या ११ व्या व ८ व्या वर्षी भोपाळच्या भारतभवन इथं संगीत क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांसमोर पहिली मफल रंगवणाऱ्या रागिणी व नंदिनी, संगीताचा परिसस्पर्श झालेल्या एकाच घरातली, एकाच कुटुंबातल्या या चौघीजणी अन् ते कुटुंब आहे जगद्विख्यात व्हायोलिनिस्ट पद्मभूषण डॉ. एन. राजम यांचं!
व्हायोलिनवादनाच्या क्षेत्रात कलाकार, अभ्यासक, अध्यापक म्हणून डॉ. राजमजींचं स्थान अढळ आहे. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी डॉ. एम. सुब्बुलक्ष्मींना साथ करत देश पालथा घातला. राजमजींच्या कन्या डॉ. संगीता शंकर यांनी तोच मार्ग निवडून स्वत:ला सिद्ध केलं आहे. ऐन विशीच्या आतल्या दोन नाती रागिणी आणि नंदिनी यांच्या गाठीशीही आजी-आईसोबत वाजवलेल्या शेकडो मफलींचा अनुभव जमा आहे. या चौघींनीही आपापल्या लहानपणीच अशी रसिकांची वाहवा मिळवली आहे.
या साऱ्यावरून आपण सहज म्हणू, या घराण्याच्या नसानसात संगीतच वहातंय. एका अर्थानं ते खरंही आहे. डॉ. राजमजीपूर्वीच्या ५ पिढय़ा संगीताच्या विद्वान होत्या. जाणकार होत्या. त्यांचे वडील पंडित ए. नारायण अय्यर संगीताच्या क्षेत्रातले विद्वान रसिक मानले जात. ते वीणा आणि व्हायोलिन वाजवत असत. अत्यंत कडक शिस्तीच्या या पंडितांनी आपले ४ मुलगे अन् रामनवमीच्या मुहूर्तावर जन्मलेल्या लाडक्या कन्येला प्रेमानं संगीत शिकवलं. आज या कुटुंबात पद्मभूषण टी. एन. कृष्णन (कर्नाटक शैलीचे प्रख्यात व्हायोलिनिस्ट) पद्मभूषण डॉ. एन्.राजम् (हिंदुस्थानी शैली) आणि श्री. टी.एन.मणी जे दक्षिणेकडच्या संगीत क्षेत्रात व्हायोलिनवादक म्हणून नाव कमावून आहेत.
खरंच कला ही रक्तातच असावी लागते का? बनारस हिंदू विश्व विद्यालयासारख्या विद्यापीठात डीन पदापर्यंत पोहचलेल्या, अध्यापन क्षेत्रात चाळीसहून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या डॉ. राजम् नम्रपणे असा निष्कर्ष नाकारतात. त्या म्हणतात, ‘‘माझे कितीतरी शिष्य असे आहेत ज्यांच्या घरांमध्ये संगीत ऐकलंही गेलं नसेल, पण स्वत:ची बुद्धी अन् मेहनतीच्या जोरावर त्यांनी खूप विद्या मिळवली. बस्स .. लगाव चाहिए !’’
‘‘मग तुमच्याच घरातल्या या ७ पिढ्यांच्या परंपरेची संगती कशी लावायची?’’ या प्रश्नावर त्या म्हणतात, ‘‘संस्कार अन् वातावरण हेच त्याचं उत्तर आहे. काही विद्यार्थी १५ व्या वर्षी शिकायला येतात. पण आमच्या घरातली मुलं २४ तास संगीत ऐकतात. शुद्ध-अशुद्ध, योग्य-अयोग्य पाहातच मोठे झालेत. त्याचा त्यांना फायदा होतो.’’
आपण म्हणतो ना, आमच्या घरात जावळ करण्याची पद्धत आहे अशा सहजतेनं डॉ. संगीता शंकर सांगतात की, ‘‘या घरात मूल ३ वर्षांचं झालं की हातात व्हायोलिन द्यायची परंपरा आहे. पिढय़ान्पिढय़ा प्रत्येकाला ही बाळगुटी मिळाली. काहींनी हेच क्षेत्र निवडलं, जोपासलं. तर काहींनी इतर क्षेत्रात कर्तृत्व गाजवून संगीताची आवड कायम राखली.’’
डॉ. संगीता शंकर यांच्या दोन्ही मुली रागिणी आणि नंदिनी या चौथ्या वर्षांपासून व्हायोलिन वाजवत आहेत. पहिली ३-४ वर्ष कर्नाटक नंतर दोन्ही शैलीत. त्या दोघींच्या मते याचं रहस्य मेहनत आणि सराव हेच आहे. त्यांच्या आजीची आणि आईचीही तशी शिस्तच आहे. खाणं-पिणं-झोपणं-अभ्यास अन् सराव. सराव तर श्वासाइतकाच आवश्यक. ‘चांगलं वाजवतात’ या कौतुकावर त्यांची प्रतिक्रिया ‘‘बचपनसे अच्छा सीखा है, अच्छाही सुना है. मग चांगलचं वाजवलं पाहिजे .. त्यात काय?’’
डॉ. संगीताला बनारस िहदू विश्वविद्यालयाचं पोषक वातावरण अन् आई म्हणून, गुरू म्हणून, स्वत: राजमजींकडून सर्वार्थानं तालीम मिळाली. त्याचं त्यांनी सोनं केलं. आईचा वक्तशीरपणा, शिस्त, वेळेचं नियोजन, एकाच वेळी अनेक प्रकल्प करण्याची धमक, मुख्य म्हणजे अध्यापन कौशल्य, कलेशी निष्ठा, मूल्यांची जपणूक, वृत्तीची प्रसन्नता आणि संगीत मुक्त हस्तानं वाटण्याची आंतरिक ओढ, हे सारे सारे गुण संगीताजींमध्ये एकवटलेले आहेत. त्याला नवीन तंत्रज्ञानाची सुरेख जोड मिळाली आहे. परंपरेचा प्रवाह अधिक जोमदार अन् विस्तृत होतो आहे.
अशा विद्वान पंडित कर्नाटक संगीताच्या घराण्यात िहदुस्थानी शैली शिरली हेही एक आश्चर्यच. पण त्याचं उत्तरही डॉ. राजमजींच्या वडिलांची खुली मनोवृत्ती अन् उत्तम संगीतावरचं प्रेम यातच आहे. त्यांनी स्वत:च िहदुस्थानी शैलीवर प्रेम केलं अन् डॉ. राजम् यांनी आपल्या वादनात पं. ओंकारनाथ ठाकुरांच्या बंदिशीचा समावेश करून त्यांचं मन जिंकून घेतलं. डॉ. राजम् यांना पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं. ओंकारनाथ ठाकूर दोघांचंही मार्गदर्शन लाभलं.
‘गाणारं व्हायोलिन’ असं राजमजींचं वर्णन केलं जातं कारण कंठातून स्वर उमटावेत, पलटावेत तितक्या सहजतेनं त्या गायकी अंगानं वादन करतात. अगदी मराठी नाटय़संगीतही खूपच छान वाजवतात त्या. व्हायोलिनसारख्या परकीय मूळ असलेल्या वाद्याला त्यांनी अलवार भावनांच्या मुशीत कसं बसवलं? त्यांच्या मते व्हायोलिन आपल्याकडे येऊन ३०० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला. ते आपलंच झालं की.
शास्त्रीय संगीतात बंदिश असते म्हणजे शब्द असतात, शब्दांबरोबर भाव येतात अन् रसनिष्पत्तीची दिशा निश्चित होते. वादनात खरोखरच निर्गुण निराकारातून हा ‘ब्रह्मानंद सहोदर’ असलेला आनंद त्या कसा वाटू शकतात? अन् प्रतिभेचं हे अलौकिक देणं शिकवून दुसऱ्याला देता येतं का?
प्रश्न प्रश्न अन् प्रश्न .. त्याचं उत्तर अतिशय नम्र अन् साधं .. ‘‘मी शुद्ध स्वरांची आराधना करते, जे शुद्ध आहे ते पवित्र आहे. मनात भावना जशा उमटतात तशा त्या स्वरांमध्ये पकडण्याचा प्रयत्न करते. यातून मला आनंद मिळतोच, ऐकणाऱ्यालाही मिळतो.’’ तो ब्रह्मानंद आहे का चिदानंद ज्याचं त्यानं ठरवावं. संस्कृत, िहदी आणि इंग्रजी भाषेवर विलक्षण प्रभुत्त्व असूनही डॉ. राजमजींच्या उत्तरात ‘प्रतिभा’, ‘तपश्चर्या’, ‘प्रत्यय’, ‘अनुभूती’, ‘साक्षात्कार’ अशा शब्दांचं अवडंबर मुळीच नाही. मंचावर त्यांना पहाणं आणि वादन ऐकणं म्हणजे साक्षात् सरस्वतीचं दर्शन घेण्यासारखंच आहे असं अनेकांना वाटतं. म्हणूनच त्यांची ही नम्रता आपल्याला आरपार भेदून जाते.
खरं तर व्हायोलिन हे दुखाचा प्राणस्वर पकडणारं वाद्य म्हणून ओळखलं जातं. पण डॉ. राजम् यांच्या वादनशैलीत विलक्षण प्रसन्न नजाकत आहे. त्यांच्या साऱ्याच निर्मितीला एक पावित्र्याचा मांगल्याचा अन् समाधानाचा स्पर्श आहे.
डॉ. संगीता या बनारस िहदू विश्वविद्यालयात वाढल्या. घरात आई अन् अभ्यासात गुरू.. दोन्ही भूमिकांमधली शिस्त त्यांनी मनोमन स्वीकारली अन् मुलींकडेही संक्रांत केलीय. पण मुली तर आधुनिक जमान्यात वाढत आहेत, वावरत आहेत. त्या आपल्या आजीच्या रचना सुरेखच वाजवतात. पण काही बंड वगरे करतात की नाही? डॉ.राजमजी म्हणाल्या, ‘‘संगीत हा भावनांचा विस्तार आहे. आजवर त्या आम्ही शिकवलं तसंच वाजवत होत्या. छोटय़ा होत्या. वयाच्या १७-१८ व्या वर्षांनंतर भावनांचा विकास होतो. आता त्यांचे नवे प्रयोग सुरू झालेत. त्यांनी फ्यूजन केलं. नवीन काही वाजवलं तर मला त्याचा आनंदच आहे.’’ नंदिनी आणि रागिणीचं म्हणणं ‘‘आमची स्वरांची बठक पक्की आहे. जोवर संगीताच्या शुद्धतेला आणि पावित्र्याला आम्ही धक्का लावत नाही तोवर आई आणि आजी स्वागतच करतील. आणि कानाला वाईट लागेल असं आम्ही काही वाजवणारच नाही.’’ ऐन विशीच्या आतच या मुलींना चांगल-वाईट याचं भान आहे. त्यांच्या मनाच्या उंबरठय़ावर अम्माजी अन् आईनं लावलेल्या सूरसंस्कारांच्या पणत्या अखंड तेवताहेत हे आपल्याला या बोलण्यातून जाणवतं. हे संस्कार अबोलपणे कसे काम करतात त्याचं उदाहरण प्रत्यक्षच दिसलं.
रागिणीला मेकॅनिकल इंजिनीअिरगला प्रवेश मिळाला, आता वेळेची कसरत सुरू झाली. तरीही सकाळचा दोन तास रियाज चुकू नये म्हणून रागिणी आपणहून पहाटे पाच ते सात रियाज करून, साडेसातला कॉलेजला जायला निघते. नंदिनी म्हणते, ‘मला अभ्यास पटकन करून टाकायची सवय आहे. रियाज आम्हाला आवडतो. त्यामुळे रियाजाला वेळ मिळतोच.’
शैक्षणिक कारकीर्द पाहिली तर डॉ. राजम् आणि डॉ. संगीता दोघींनी सुवर्णपदकं मिळवलेली आहेत. डॉ. एन्. राजम यांचा पीएचडीचा विषय ‘हिंदुस्थानी आणि कर्नाटक शैलींचा तौलनिक अभ्यास हा आहे.’ तर डॉ.संगीता यांचा ‘भारतीय शास्त्रीय संगीतातलं व्हायोलिन वादकांचं योगदान’ हा आहे. राजमजींनी आपले गुरू पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्या नावानं एक फौंडेशन स्थापून त्यांनी उमलत्या प्रतिभेला उत्तेजन दिलं. तर बनारस िहदू विश्वविद्यालयात शिकत असताना डॉ.संगीतानं आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या युवक कलाकारांचा ‘अभिनव’ संगीत महोत्सव भरवला होता.
शास्त्रीय संगीत अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सर्व माध्यमं डोळसपणे वापरण्यावर डॉ. संगीता यांचा भर आहे. दूरदर्शनसाठी तयार केलेली त्यांच्या ‘स्वरसाधना’ ही मालिका खूप गाजली होती. आज त्या शुद्ध शास्त्रीय संगीताची निर्मिती करणारी ‘लीजंडरी लीगसी प्रमोशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी चालवतात. आणि ‘व्हिसिलग वूडस् इंटरनॅशनल’ या संस्थेत शिकवतातही. रागिणी आणि नंदिनी आत्ताच आई-आजीबरोबर संगीत मफलीत व्यस्त आहेत. आणि नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं नवे नवे प्रयोग करण्यात मग्न आहेत. आजीनं, आईनं खूप कष्टानं सारं मिळवलंय. आम्हाला कितीतरी गोष्टी तयार मिळाल्यात. मग आम्ही जास्त मोठी झेप घ्यायला हवी’ याची त्यांना जाणीव आहे.
‘स्त्री’ म्हणून आपण घरात खूपच गुंतून राहतो. डॉ.राजम् यांना स्वयंपाकाचीही खूप आवड. घर-कॉलेज-प्रवास-मफली .. इतका वेळ कसा मिळायचा?’’ या प्रश्नावर त्यांचं साधंसं उत्तर असतं, ‘‘जिथे ज्या भूमिकेत असू तिथे १००टक्के असायला हवं. तीच भूमिका चोख करायची अन् अखंड कष्ट .. आळस करायचा नाही. प्रत्येक क्षण चांगल्या गोष्टीसाठीच वापरला की वेळ मिळतोच.’’ असा सोपा पण आचरायला अवघड असा हा सिद्धांत!
अत्यंत शिस्तीचं, साधं सर्वसामान्य कौटुंबिक आयुष्य सुखासमाधानानं जगून, अहंकाराचा स्पर्शही होऊ न देता, किती उच्च कोटीची प्रसन्न कलानिर्मिती होऊ शकते हे या कुटुंबानं सिद्ध केलंय. आजही डॉ. राजम् हुबळीच्या, ज्येष्ठ कलाकार गंगुबाई हनगळ यांच्या नावानं स्थापन झालेल्या गुरुकुलाच्या आचार्य आहेत. डॉ. संगीता ‘मिलाप’ नावाच्या प्रकल्पात गुंतल्या आहेत. ९९ राग आणि ९९ संस्कारमूल्ये यांची सांगड घालून, नव्या पिढीवर संगीताचे संस्कार करू पाहात आहे. साऱ्या शाळांनी अभ्यासक्रमात घ्यावा असा हा सुंदर प्रकल्प आहे. वादन-अध्यापनाच्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत डॉ. राजम् यांनी डॉ. संगीतासह अनेक शिष्य तयार केले जे आज गुरू म्हणूनही अनमोल कार्य करत आहेत.
त्यांच्या स्वत:च्या कुटुंबातून आणि शिष्यांकडूनही परंपरा जपून नवतेचं स्वागत करण्याची वृत्ती दिसून येते आहे. संस्कारांच्या चौकटीत राहून कलेचा आनंद चहूबाजूंनी वाटावा आणि आपल्या कलेची प्रतिष्ठा वाढवावी याची जाण दिसते आहे. ‘घराणेशाहीचा’ हा सुखद, प्रसन्न प्रत्यय आहे, खरं ना?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा